गौरवी देशपांडे
लोक काय म्हणतील!!!
‘हे बघ, आता ते सगळं करिअर वगैरे बाजूला ठेवून लग्नाचं मनावर घे. लग्नाचं वय उलटून गेलं तर ‘लोक काय म्हणतील?’
तर………
‘लोक काय म्हणतील?’ हे वाक्य हमखास सगळ्यांच मध्यमवर्गीय घरात ऐकायला मिळतं आणि आपल्या आई-बाबांच्या तोंडून ते सतत ऐकायला मिळतं हे विशेष! हा आता काही घरं याला अपवाद असतात ते वेगळं. कारण प्रत्येक गोष्टीला अपवाद असणं हा निसर्गाचा नियम आहे. असो!
तर आपल्या जीवनात स्वतःच्या आवडीनिवडी मतांपेक्षा ‘लोक काय म्हणतील?’ याचा आपण जास्त विचार करतो आणि त्याप्रमाणे वागतो ज्यामुळे आपण आपल्या स्वतःवरच अन्याय करत आहोत हे आपल्याला का समजत नाही??
‘अरे आता लेकीची/लेकाची पंचविशी उलटून गेली लग्न कधी करताय?/लग्नाला कधी बोलवताय?, तुमच्या लग्नाला एक वर्ष झालं ना मग बाळाचे पेढे कधी देताय?, तुमचा घटस्फोट का झाला?, आता तुझं शिक्षण संपलं मग नोकरी केव्हा लागणार?, काय रे तुला पगार किती? इत्यादी इत्यादी.
हे असे खोचक प्रश्न विचारण्याऱ्यांचा ना मला कीव येते. कारण जे रिकामटेकडे असतात, काही काम धंदा नसतो तेच असं सतत दुसऱ्याच्या आयुष्यात डोकावून बघतात. जे अत्यंत वाईट आहे. अरे, लग्न करणं किंवा मूल होणं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे तुम्ही त्याच्यात नाक नाही खुपसू शकत. लग्नाचा खर्च तुम्ही करणार आहात का? किंवा मूल झालं तर त्याला सांभाळायला येणार आहात का? नाही ना. मग तुम्हाला काय करायच्या आहेत नसत्या चौकशा??
शिक्षण घेत असलेल्या मुलांना तर ‘आता पुढे काय?’ हा प्रश्न हमखास ठरलेला असतो आणि एखाद्या मुलाने त्याचा Plan सांगितला तर काही महाभाग त्याने ठरवलेले कसे चुकीचे आहे हे त्याला ठासून सांगण्याचा प्रयत्न करतात. तेही विचारलेले नसताना. अरे का? कशासाठी? ज्या अर्थी त्या मुलाने ठरवले त्या अर्थी त्यांने संपूर्ण अभ्यासाअंती हा निर्णय घेतला असणार आणि पालकांनीही पाठिंबा दिलाय ते काय मूर्ख म्हणून नाही! मग तुम्हाला फुकटचा सल्ला द्यायची गरज काय?? तुम्हाला कोणी अधिकार दिला समोरच्या व्यक्तीच्या आयुष्यात ढवळाढवळ करायचा? प्रत्येकाला स्वतःची काळजी असते त्यामुळे खड्ड्यात पडण्यासारखे निर्णय कोणीही घेत नाही आणि झालाच तर हक्काचे आई-बाबा नातेवाईक(जवळचे) आहेत ना विचारविनिमय करायला!
लोकांनी बाहेर कट्ट्यावर बसून, सण-समारंभात सदर व्यक्तीच्या गैरहजेरीत त्यांचा विषय तासन्तास चघळून त्यातून निष्पन्न काहीच होणार नसतं. होणार असतो तो फक्त टाईमपास आणि गॉसिपिंग.
‘अरे तुला माहितीये का त्या अमुक-अमुक मुलाचं ब्रेकअप झालं. कारण कळलं नाही अजून. तुला कळलं का?’ हे असे प्रश्न किंवा बोलणं ऐकलं की विचारणाऱ्याच्या एक कानाखाली वाजवावी वाटते.
ते दोघे. त्यांचं आयुष्य. ब्रेकप करतील. Patch up करतील. नाहीतर विहिरीत उड्या मारतील. तुला काय करायचंय?
तुला सांगायला आलेत का ते?? आणि जरी आले असतील तरी त्यांचा वैयक्तिक विषय असा चव्हाट्यावर आणण्याचा अधिकार तुला दिला कोणी? आणि असे लोक क्षुल्लक कारणांवरून इतरांच्या मनात विष कालवायचेही काही कमी करत नाहीत. नाहक संबंध बिघडतात आणि आधीच मानसिक त्रासात असलेला माणूस आगीतून फुफाट्यात!!
आणि हे फक्त तरुण वयाच्या मुलांबाबत नाही तर चाळिशी पन्नाशीच्या लोकांबाबत सुद्धा होतं त्यांना तर ‘लोक काय म्हणतील?’ या संकल्पनेने पूर्ण ग्रासलेलं आहे. बाहेरच येत नाहींत. आणि हे माझ्या आजूबाजूला घडलं आहे म्हणून मी हा मुद्दा इथे मांडला.
कोणी काय कपडे घालायचे इथपासून कोणी काय व्हाट्सअप स्टेटस, स्टोरी ठेवायची हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही नका ना बघू! एखाद्याने फिरायला गेल्यानंतर चे फोटो व्हाट्सअप स्टोरी ला टाकले तर सगळे बघून झाल्यानंतर तुम्ही ‘काय ग बाई, किती फोटो यांचे, कंटाळा आला बघून!’ असं म्हणणंच अपेक्षित नाहीये. किंवा एखाद्याला त्याच्या सोशल मीडियावरून जज करणं, त्याच्या व्यक्तिमत्त्वावर ताशेरे आेढणं या बिनबुडाच्या गोष्टी आहेत ज्याला काहीही अर्थ नाही.
‘रात्री ऑनलाईन असतोस/ असतेस, काय चाललंय काय सध्या??’ आपण स्वतः ऑफलाइन असताना समोरचा ऑनलाईन आहे की नाही हे कळेल असं फिचर व्हाट्सअप ने अजुन तरी काढलेलं नाही. त्यामुळे आता हाच प्रश्न जर उलट विचारला तर लगेच नाकाला मिरच्या झोंबणार!!
काही लोक तर इतके ग्रेट असतात उदा, स्वतः बजेट पाच लाख आणि ओढाताण करून घेतात गाडी दहा लाखाची! का तर स्टेटस. लोकांना काय सांगणार? गाडी जरा महागडी नको. अरे पण का?? गरज महत्वाची की स्टेटस??
लोक काय एक दिवस, दोन दिवस बोलतील पण तुम्ही एकदा फाट्यावर मारलं तर ते परत कशाला तुमच्या वाटेला जातील?? हा काही एकोणिसाव्या शतकातला काळ नाही समाजाने वाळीत टाकायला. गेले ते दिवस.
Learn to *Ignore*. Learn to live life with your own ideas.
आयुष्य जगण्याला, त्याचा आनंद लुटायला कोणतीही मर्यादा निसर्गाने घातलेली नाही.या मर्यादा माणसांनीच तयार केल्या त्याही सोयीनुसार. या आपण तोडल्या पाहिजेत. इतरांसाठी नाही स्वतःसाठी!! कारण आयुष्य हे एकदाच मिळतं ते मनमुराद जगून घ्यावं. वेळ गेल्यावर आपल्या हाती फक्त पश्चाताप असतो.
या धकाधकीच्या जीवनात ‘लोक काय म्हणतील?’ यामुळेसुद्धा व्यक्ती डिप्रेशनमध्ये जातात. म्हणूनच हे असे विचार आपल्या पुढच्या पिढीपर्यंत नं पोहोचणं हेच फायदेशीर आहे आणि ती आपली जबाबदारी आहे.
आणि हो,
‘लोक काय म्हणतील?’ याचा सतत टेंभा मिरवणारे महाभाग सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकताना, थुंकताना, नियमभंग करताना ‘लोक काय म्हणतील?’ हा विचार का बरे करत नाहीत?? असा जर विचार प्रत्येकाकडून व्हायला लागला तर आपला देश लवकरच महासत्ता होईल हो!!!!
(लेख नावासकट शेअर करायला माझी ना नाही?
आपले सुद्धा प्रेरणादायी लेख आम्हांला ९१३७३००९२९ या व्हाट्सएप क्रमांकावर पाठवा. आपल्या नावासकट अत्यंत नम्रपणे ते प्रकाशित केले जातील.
फारच छान…?