तडजोड
सौ. सुलभा घोरपडे
आपण आपल्या आयुष्यात कितीतरी वेळा तडजोड करत असतो , कित्येक गोष्टी मनाला पटत नसतात किंवा मनासारख्या होत नसतात तरी जुळवून घेऊन आयुष्य सोप करत असतो.
पण आजकाल बहुतांश ठिकाणी लग्नसंस्थेबाबतीत बऱ्याच ठिकाणी नाराजीच दिसते . लग्नाला सहा महिने होतात न होतात तोच घटस्फोटाबद्दल भांडणे ऐकायला मिळतात. काही ठिकाणी तर लग्न संस्था मोडकळीस आलेली दिसून येते .
काळ बदलला , काळाबरोबर काही जुन्या समजूती मोडून काढल्या . तुझ , माझ राजकारण चालू झालेल दिसतय .
“आपलं दोघांच” हे कुठेतरी हरवलय असंच वाटतय .
पूर्वी आणि आता बरंच काही बदललय , लग्न म्हणजे या पीढीला बाहुला बाहूलीचा खेळ आहे असंच वाटतय .
लग्न म्हणजे नुसतेच पतीपत्नी नाही तर दोन कुटुंब जोडली जातात . दोन्ही कुटुंबातील संस्कार , राहणीमान , वातावरण वेगवेगळे असू शकते त्यामुळे सासरी आलेल्या मुलीला तीच्या माहेरच्या सारखेच वातावरण कसे मिळणार शिवाय पत्नी म्हणून येणारी मुलगी तुमच्या घरातील वातावरणात लगेच कशी मॕच होईल .
संसारात मतभेद , वाद , गैरसमज थोड्याफार फरकाने होत असतात . पूर्वीही होतच होते पूर्वीही असंख्य समस्या होत्या , भांडणतंटे कुरबुरी असायच्या पण समाजाचा , घरातील बुजुर्ग मंडळीचा दबाव असायचा त्यामुळे लग्न टिकायची .
आता माझं तेच खरं , अशी ताठर भूमिका , तडजोड अजिबात नको , मीच का तडजोड करायची असा प्रश्न निर्माण व्हायला लागल्यामुळे संसारात तेढ निर्माण होतेय . लहानसहान कारणांचाही फार मोठा बाऊ केला जातो.
तसं पाहिलं तर आयुष्यात आपण कित्येकदा थोड्याफार प्रमाणात तडजोड करतच असतो , आॕफीसमध्ये बाॕसशी पटत नसते तरीही नोकरी करतच असतोच , आपल्या कुटुंबातील व्यक्तीशी सुद्धा काही गोष्टीत पटत नसते तिथेही जुळवून घेतोच की , म्हणजे ही तडजोडच असते .
अगदी देवालाही साध , सरळ आयुष्य मिळालं नाही मग आपल्यालाच कसं सर्व मनासारखे मिळेल .
पतीपत्नीमधील प्रेम हे सहवासाने निर्माण होते आणि प्रेमातून अनेक तडजोडी केल्या जातात आपल्या आईवडीलांनी केलेल्या असतातच की , पूर्वी अरेंज मॕरेज होती तरी संसार प्रेमाने फुलले आणि झालेही पण त्यात स्त्रियांचा तडजोड करण्याचा मोठा सहभाग होता .
संसारात तडजोड दोघांनीही केली पाहिजे , गैरसमज , अहंकार , तुलनेने नाती बिघडतात त्यासाठी थोडा तु बदल थोडी मी बदलते , संवादाने , एकमेकांना समजून घेऊन गैरसमज दूर केले पाहिजेत .
लहानांनी घरातील थोरामोठ्याना समजून घेतले पाहिजे . आणि लहानांचेही काही बाबतीत योग्य असते तेव्हा घरातील मोठ्यानीही समजून घेतले पाहिजे .
प्रत्येकाच्या बाबतीत , जीवनात सर्वच परफेक्ट नसते. आपल्याला जर आपले जीवन , आपला संसार , यशस्वी करायचा असेल तर , नातेसंबंध टिकवायचे असतील तर आणि संबंधात सुदृढता हवी असेल तर तडजोड हाही मार्ग आहे , पण ती करायला शिकलं पाहिजे .
मुळात तडजोड करण म्हणजे हार पत्करण नव्हे..आपण ती परिस्थितीवर केलेली मात असते.
Online Counseling साठी !
रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!
ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

