Skip to content

बस झाल्या मर्यादा, आतातरी स्वतःच्या मनासारखं जगलं पाहिजे!

मर्यादा ! (भाग 1)


सौ. वैष्णवी व कळसे


बस झाल्या आता मर्यादा, आतातरी स्वतःच्या मनासारखं जगलं पाहिजे. खुप ऐकलं सर्वांचं, खुप झालं दुसऱ्याचं, आता स्वतःसाठी काही केलं पाहिजे….. आता स्वतःच्या मनासारखं जगलं पाहिजे.
ते म्हणतात ना प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा असते…. हो नक्कीच असते; पण ती स्वतःला सोडून संपूर्ण जगाला लागू होते… ! नाही का?
असं होतं ना बरेचदा की आपल्याला लिमिट मध्ये राहायला सांगणारे स्वतः लिमिट सोडून वागतात…. मग आपल्यालाच असं का सांगत असतील बरं? जोपर्यंत आपण सर्वांच्या मनासारखं वागतो, स्वतःच्या इच्छेचा त्याग करतो, पटत नसलेल्या गोष्टी देखील हसत हसत स्वीकारतो त्यावेळेस असं कोणी बोललेलं आठवत नाही की लिमिट मध्येच करावं हे बाकी सर्व….

कर्तव्याच्या नावाखाली अनेक वर्षांपासून होत आलेल्या अत्याचाराची नसते का मर्यादा?

आपलं स्वतःच आयुष्य आणि त्यावर स्वतःसाठी एक निर्णय घेण्यासाठी परवानगी ची गरज पडते तेव्हा नसते का मर्यादा….
आपला एकदा सुद्धा विचार न करता कुठलाही निर्णय आपल्यावर लागू केल्या जातो….

कित्येक इच्छा तर फक्त समोरच्या साठी हसत हसत वाहून दिल्या जातात तेव्हा त्या समर्पणाला नसते का मर्यादा….
अशी उदाहरणं द्यायची म्हटलं तर मोठ्यात मोठी वही देखील कमीच पडेल…..

जेव्हा एखादी स्त्री सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यन्त घरातील कामं करत असते तेव्हा त्या कामाला नसते का मर्यादा…..?

दिवसातून चार वेळेस मोबाईल काय हातात घेतला तर मोबाईल वापरायला सुद्धा मर्यादा असते असं सांगितल्या जातं…..

तासंतास घरात कोणाशी बोललेलं,चर्चा केलेलं, गप्पा मारलेलं चालतं, पण त्याच गप्पा फोन वर मित्रमैत्रिणी शी मारल्या गेल्या की आलीच फोनवर बोलायची मर्यादा….

रोज वेगवेगळं जेवण बनवल्या जातं, प्रत्येक दिवशी काहीतरी त्या स्वयंपाकात प्रयोग केल्या जातो तेव्हा त्या प्रयोगाला नसते मर्यादा… मग एक, दोनदा swiggy किंवा झोमॅटो काय केलं तर बाहेरच खायची मर्यादा असते हे पुन्हा नव्यानं समजावण्यात येतं….

सर्व स्वयंपाक तयार असताना देखील बाहेरच जेवण आणायचा प्लॅन बनतो त्यावेळस ती आवड आणि मूड… पण तेच कधी थकून आहे म्हणून करूया बाहेरचं order म्हटलं की त्यावेळेस आलीच मर्यादा….

स्वतः बोलण्याचं कुठलंच तारतम्य बाळगत नसताना, शब्दांचा मनमोकळा वापर केला जातो, टेन्शन च्या नावाखाली बिन्दास्त अपमान केला जातो तेव्हा चालतं…. पण कधी आपल्या टेन्शन मुळे एखादा शब्द चुकीचा निघून गेला तर घेऊन गेल्या जातं आपल्या संस्कारावर…. तेव्हा स्वतःच्या वागण्यातली कुठे असते मर्यादा…?

मोठ्यांशी कसं वागावं, लहानांना कसं सांभाळावं, शेजाऱ धर्म कसा असावा, कामाच्या ठिकाणी कसं राहावं, यावर देखील मर्यादा समजवणारे स्वतः हे सर्व करतात का..?

जेव्हा या सर्व ठिकाणी त्यांना या उलट वागताना बघतो त्यावेळस त्या मर्यादा आपल्याला लागू करून घेणे बरोबर ठरेल का….?

काही बोलताना आपण कोणाशी बोलतोय याचं भान आहे का हे आठवायला सांगितल्या जातं, पण असं बोलायची गरज का पडतेय हे का बघितल्या जात नाही? ते बोलण्याची आधीची कहाणी का ऐकल्या जात नाही?

स्वतःचं ते दुखणं आणि आपलं नाटक?

स्वतः केलेले ते काम आणि आपण केलेला मात्र timepass?
फक्त आपल्याला जास्त स्वतःच्या कामाचं कौतुक करायची सवय नाही म्हणूनच ना?

स्वतःला झालेला त्रास हसत हसत विसरून पुढे पुन्हा नव्याने जगतो त्यावेळेस काय…?

स्वतःची चूक असताना दुसऱ्यांकडून माफीची अपेक्षा केली जाते त्यावेळेस त्या फालतूपणाला नसते का मर्यादा…?

छोटीशी चूक झाली तरीही या आधी झालेल्या चुका एकत्र धरून बोलण्यात येतं त्यावेळेस त्या चिडण्याला नसते का मर्यादा….?

घरा घरात अशा प्रकारच्या गोष्टी घडत असतात….. प्रत्येकालाच लागू होतं असं नाही….. तरीही काहीच चुकलं असल्यास माफी असावी… ?



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!