Skip to content

१२ वी मधे शिकणाऱ्या एका “ढ” विद्यार्थ्याचे आपल्या वडीलास पत्र !

१२ वी मधे शिकणाऱ्या एका “ढ” विद्यार्थ्याचे आपल्या वडीलास पत्र !
———————————————

प्रति .
प्रिय पप्पास
साष्टांग नमस्कार !

पप्पा पत्र लिहायला घेतले परंतू नेमकी कुठून सुरवात करावी तेच कळत नाही . हिंमत करतो आणि पत्र पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो .

पप्पा माझा 10 वी चा निकाल लागला आणि मला 82 % मार्क्स मिळाले . खरं सांगतो मला खूप आनंद झाला होता परंतू मला तो व्यक्त करता आला नाही .

कारण मला दहावी ला 82 % मार्क्स पडले आणि तुमच्या दोघांच्याही नजरेत मी गुन्हेगार झालो , ढ झालो .

तुम्हीच काय पण माझ्यावर जीवापाड प्रेम करणारी माझी आई पण खूप नाराज झाली . कारण तुम्हा दोघांनाही माझ्याकडून 90 % च्या वर मार्क्स पाहिजे होते , ते मी मिळवू शकलो नाही .
मला एक प्रसंग चांगला आठवतो , मला दसऱ्याचा ड्रेस घेण्यासाठी आपण दुकानात गेलो होतो . मी मला आवडलेला एक ड्रेस बाजूला काढला आणि तुम्हाला दाखवला . तुम्ही एकदम माझ्यावर चिडलात आणि जोरात ओरडलात ” मूर्खां लाज नाही वाटत , 82 % मार्क घेतो आणि 2000 रुपायचा ड्रेस घेतो ?”

खरं सांगतो मला खूप वाईट वाटलं होतं ! मला ड्रेस ची किंमतच माहीत नव्हती , मी रंग आवडला म्हणून ड्रेस पसंद केला होता . पुन्हा मला कपडे कधीच घ्यावे वाटले नाहीत . त्यावेळेस पासून मी कधीही आवड सांगत नाही , फक्त तुम्ही घेतलेले कपडे घालतो .

मी नको म्हणत असतांनाही तुम्ही मला Science side ला प्रवेश दिला . मला तुमच्या अपेक्षे प्रमाणे मार्क्स पडत नाहीत , पण मी प्रयत्न करत राहतो .

तरीही माझ्या सरांनी त्या दिवशी खूप छान समजून सांगितलं !

आमचे सर म्हणले सर्वच मुलं मेडिकल किंवा इंजिनिअरिंगला कशी लागतील , परंतू तुम्ही ते समजून घेत नाहीत .

आमचे सर मला खूप खूप आवडतात कारण ते त्यांचा विषय तर छान शिकवतातच पण अधून मधून खूप छान संस्कार करतात.

त्यादिवशी सर बोलता बोलता म्हणाले , जग फक्त जिंकलेल्याचं स्वागत करतं ! हार तुरे , मान सन्मान फक्त जिंकणार्याच्या वाट्याला येतात.

पराभव झाल्यावर , हारल्यावर कुणीही जवळ घेत नाही. म्हणून मित्र हो जीव तोडून अभ्यास करा , प्रचंड मेहनत करा आणि यशस्वी होण्याचा प्रयत्न करा !

आणि एवढ्यावरही तुमच्या वाट्याला अपयश आलं , तुम्ही जर हारलात तर खचून जाऊ नका. शांतपणे घरी जा .

सर्व जगानी जरी दरवाजे बंद केले तरी तुमच्या घराचे दरवाजे तुमच्यासाठी उघडे असतील !सगळं जग जरी तुमचा धिक्कार करत असेल तरीही आईवडील तुम्हाला जवळ घेतील , हृदयाला कवटाळतील आणि म्हणतील बाळा तू काही काळजी करू नकोस ” एक दिवस तू नक्की जिंकशील ” ! आणि दुर्दैवाने तसं नाही झालं तरीही काही काळजी करू नका , तुमच्या आई वडिलांनी जरी तुम्हाला दूर लोटलं , घराचे दरवाजे बंद केले तरीही काळजी करू नका या गरीब शिक्षकाच्या घराचा दरवाजा तुमच्यासाठी सदैव उघडा असेल !

कळत नकळत अनेक विद्यार्थ्याच्या डोळ्याला धारा लागल्या आणि कडकडून सर्वांनी टाळ्या वाजवल्या ….. आपल्याला बाप मिळाला म्हणून .

खरं सांगतो पप्पा तेंव्हा पासून मला माझे सर खूप जवळचे वाटतात आणि मला आता अपयशाची भीती वाटत नाही !

पप्पा ” ढ ” मुलाला बाप आणि माय आता खरंच मिळणार नाही का हो ?

आपला लाडका नसलेला,
एक ” ढ ” विद्यार्थी
??????????


पालकांना समजून सांगणारा,मुलांना परिक्षार्थी बनवणाऱ्या व्यवस्थेच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा लेख


आपले सुद्धा प्रेरणादायी लेख आम्हांला ९१३७३००९२९ या व्हाट्सएप क्रमांकावर पाठवा. आपल्या नावासकट अत्यंत नम्रपणे ते प्रकाशित केले जातील.

“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया !”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!