Skip to content

या गोष्टींमुळे नाते कायमचे विस्कळित होऊ शकते…

“जीवनात ही घडी अशीच राहू दे !”


डॉ. श्रुति सचिन देशपांडे
आयुर्वेद कन्सल्टन्ट व कौन्सेलिंग सायकोलॉजिस्ट, पुणे.


प्रसंग १.
अहो आई, यावर्षी किनई, सत्यनारायणाच्या पुजेसाठी, चौरंगाभोवती ठेवायला केळीच्या खांबांचे स्टँड्स घ्यायचं ठरवलं होतं मी… पण यावर्षी माझ्या नोकरीचं हे असं झालं, मनीषचाही जॉब आहे म्हणायला आहे झालं….

अगं असू दे गं तेजू , पूर्वी आम्ही सुतळ्यांनीच बांधायचो… आणि बाकीचं सगळं आहेच की तू दरवर्षी जमवलेलं…

हो अगं मम्मा… मी “जुगाड” व्हिडीओज् मध्येही पाहिलंय बरंच…
तू या सत्यनारायण , गौरी- गणपतींच्या डेकोरेशनचा अजिबातच “स्ट्रेस” घेवू नकोस, काय !

बर बर … नाही घेत मी स्ट्रेस , Okay !
चला आता तयारीला लागुया…

प्रसंग २.
इशिता… What’s wrong with you?
अगं, लागेल मला जॉब नवा… तोपर्यंतच तुला बघावं लागणार आहे बरं ! आणि EMI तर मीच सगळे adjust केलेले आहेत.. तुला फक्त अमूची फी भरायला सांगतोय, ती सुद्धा पहिली Installment फक्त… नंतर तर मी आहेच ना…

सोहम, अरे बेटा, तुझं सेव्हिंग आहे ना..
तिच्या कुठे नादी लागतोस… आणि घर शांत ठेवा बाबांनो ! आम्ही काही घराबाहेर पडू शकत नाही, आणि हे गृहकलह आता सहनही होत नाहीत…

आप्पा, म्हणजे माझ्यामुळे घराची शांतता बिघडते? आणि नादी लागायचं नाही म्हणजे काय? संपले ते दिवस कधीच…
खर्चाचं ओझं म्हणलं की मगच इशिता आठवते.. इतरवेळी मात्र यांचे मानकरी सगळे ठरलेलेच…

नमस्कार मंडळी…

कसे आहात सगळे?
श्रावणमासाच्या लगबगीत… गौरी- गणपतींच्या तयारीत… नव्या कामाच्या शोधात… नव्या कल्पना राबवण्याच्या बेतात….
की, तणावात अन् विवंचनेत?

वरील दोनही प्रसंगांमध्ये सध्याच्या परिस्थिती बरोबरच कुटुंबव्यवस्थेची दोन बोलकी प्रतिकंच आपल्यासमोर उभी राहतात…

पहिल्या प्रसंगात प्रत्येकच नात्यातून परिस्थितीची आदरयुक्त स्वीकृती दिसते… या स्वीकृतीसोबतच केलेली तडजोडही दिसते…
पण, दुस-या प्रसंगात मात्र परस्परसंबंधी आदरही नाही अन् परिस्थिती स्वीकारण्याची तयारीही नाही…

पहिल्या प्रसंगात नातेसंबंधांविषयी फार जास्त काळजीचं कारण नाही…
परंतु, दुस-या प्रसंगामध्ये मात्र नातेसंबंधांमधील तणाव… विशेषतः पती-पत्नी संबंधातील आवश्यक सामंजस्याचा अभाव प्रकर्षाने जाणवतो…
या अन् अशाच गोष्टींमधून मग पुढे आकस वाढीला लागून दुरावा निर्माण होतो…
परिणामी नाती तुटत जातात…
अशावेळी मनःस्थिती शांत, संयमित आणि आनंदी कशी ठेवता येईल ? त्यातही जोडीदारासोबत होत असणारे ताण – तणावाचे प्रसंग, जागेअभावी किंवा Privacy नसल्यामुळे नव्याने उद्भवलेले अन् न सोडवता येणारे प्रश्न… एकंदरीत सगळीच अपरिहार्यता…
यांचा इलाज कसा करावा बरे ?

तेच सांगण्यासाठी आजची ही लेखनमाळ….

आपण नेहमीच म्हणतो, नाते सांभाळण्यासाठी पुरेसा वेळ दिला गेला पाहिजे, खासकरून जोडीदाराकडे विशेष लक्ष पुरवले पाहिजे…
कित्येक गृहिणी म्हणतीलही… “दिवसभर दिमतीलाच तर हजर असतो ! हवं- नको ते सगळं बघतो… मग अजून काय विशेष लक्ष द्यायचे? ”
खरं आहे… आपण स्त्रिया हे सारं करतोच !
पण, पुरूषदेखील त्यांच्या स्तरावरील खिंड लढवतच असतात….
पण मग “विशेष लक्ष पुरवणे” म्हणजे नेमकं काय…. तर, एकमेकांची कौटुंबिक , आर्थिक आणि सामाजिक गरज भागवतानाच आपण आपल्या जोडीदाराची भावनिक गरज भागवतो आहोत ना? हे बघणे !!
एकमेकांना पूरक असणारे हे नाते… एकमेकांची भावनिक गरज ओळखून ती पुरवणे एवढी साधी मागणी असते या नात्याची…

कुटुंबाचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सांभाळण्याची जबाबदारी ही घरातील कर्त्या स्त्री – पुरुषांचीच असते… मग त्यांच्यामधील परस्परसंबंध देखील आरोग्यपूर्णच असायला हवेत ना !
या दोघांमधील असामंजस्य किंवा नात्यातील कटुता ही संपूर्ण कुटुंबाला नैराश्याच्या दुष्टचक्रात अडकवू शकते…

तेव्हा वेळीच सावध होवून नाते दृढ बनवण्यासाठी काय करता येईल ते पाहूया…

सप्तपदी

१. नेमका Problem काय आहे, तो ओळखून मोजक्या व नेमक्या शब्दांत जोडीदाराकडे मुद्दा मांडा…. आणि, त्यांच्या प्रतिसादाची वाट पहा..

२. प्रामाणिकपणे स्वतःजवळ अन् जोडीदाराकडे सुद्धा , Problem व्यतिरिक्त आपल्या नेमक्या काय भावना आहेत, त्या स्पष्टपणे व्यक्त करा…

उदा. काही कारणाने काही गोष्टी पटल्या नसतील, तरी पूर्ण माणूसच कसा वाईट आहे, हे सिद्ध करण्याची काहीच गरज नाही…
उलट, “आज भाजी छान झालीये हं !” किंवा “हा शर्ट इन केला तर अजून छान दिसेल बरं !” असे संवाद होवूच शकतात…

३. जोडीदारासोबतचे आपले नाते सांभाळणे ही आपली वैयक्तिक गरज आणि जबाबदारी आहे… तेव्हा, दोघांमधील प्रश्न शक्यतो दोघांनीच सोडवावेत… लागलीच मदत- तर घ्यावी मोठ्यांची, पडलीच गरज- तर विचारावा सल्ला…
पण, कुठलीच गोष्ट न बोलता आपोआप नीट होईल या आशेवर मात्र राहू नये

थोडक्यात, एकमेकांशी बोला… मत- मतांतरावर चर्चा करा.. चर्चेतून मार्ग नक्की निघतील !
एकमेकांविषयी बोलण्यापेक्षा एकमेकांशी बोला…

४. वादाचे काही मुद्दे असतीलच, तरी ते परत परत बोलून आपण व्यक्तिगत अनादर तर करत नाही आहोत ना , याकडे आवर्जून लक्ष द्या…
कारण, ‘नाते सांभाळणे’ हे अंतिम उद्दिष्ट असून त्या अनुषंगाने माणसांची मनंही सांभाळण्याची कला जमवायला हवी…
याचा अर्थ कायम पडती बाजू घ्यायला कुणीच तयार होणार नाही…
पण, कुणीतरी पुढे आल्याशिवाय, कुणीतरी मागे गेल्याशिवाय गाडी जागेवरून हलणारच नाही ना… आणि त्याशिवाय गाडीच्या सर्व्हिसिंगमधला नेमका फॉल्ट सापडणार कसा?

थोडक्यात , या नात्याची आपल्याला आयुष्यभरासाठी गरज असताना शब्द आणि देहबोली जपून वापरा…
*लक्षात घ्या –
शांततेत अन् सभ्य भाषेतसुद्धा भांडण करता येते बरंका…

५. भावनिक गरजेइतकीच , किंबहुना थोडी जास्तच शारीरिक गरज ओळखून ती पूर्ण करणे ही या नात्याची खरी ओळख आहे, असे म्हणले, तर वावगे ठरणार नाही…
Privacy नाही, जागा पुरेशी नाही, खूप दमायला झालंय, “मूड” नाही, आता काय ते वय उरलंय का, किंवा “तशी” इच्छाच होत नाही…
या व अशा अनेक कारणांनी ही मनुष्यप्राण्याची मूलभूत गरज पूर्ण होऊ शकत नसेल, तर त्याचा परिणाम इतर कामांमध्ये किंवा वागण्या-बोलण्यातून, चिडचिडीतून, त्राग्यातून किंबहुना नाकारले गेल्याच्या अवहेलनेतून नैराश्याच्या स्वरूपात दिसून येईल…
या समस्येबद्दल उघडपणे बोलणेही टाळले जाते !
आणि मग सुरू होतो Pornography सारख्या चुकीच्या सवयींचा प्रवास… त्यातून निर्माण झालेले नकोसे त्रास अन् अवास्तव-अनैसर्गिक अपेक्षा …
तेव्हा, स्त्री असो किंवा पुरुष , आपल्या “या” गरजेच्या पूर्ततेसाठी सुज्ञपणे जागरूक होऊन वेळीच एकमेकांशी बोलून , हवं तर वेळापत्रक आखून योग्य नियोजन करावे…

६. एकमेकांना गृहीत धरणे नक्की टाळावे… प्रत्येक वेळी शक्यतो एकमेकांचे मत विचारून, परस्पर सहमतीनेच निर्णयप्रक्रिया अंमलात आणावी…
कोणत्याही निर्णयात जोडीदाराला उपेक्षित ठेवले गेल्याची भावना नाते पोखरायला सुरुवात करते…
आणि मग Action-Reaction चा खेळ सुरू होतो…. आणि शेवटी आपण एकटे कधी पडलो, हे लक्षातही येत नाही…

थोडक्यात, “एकला चालो रे… ” ??…. नकोच ते !

७. संशय घेणे, आरोप – प्रत्यारोप करणे, अपमान करणे, अडवणूक करणे, सतत नजरकैदेत ठेवणे, किंवा हिंसाचार या सगळ्या गोष्टी “छळ” या व्याख्येत मोडतात… हे प्रश्न सोडविण्यासाठी कायद्याची मदत घ्यावी लागू शकते….

या गोष्टींमुळे नाते कायमचे विस्कळित होऊ शकते… परिणामी कुटुंबव्यवस्था कोलमडते…

*लक्षात घ्या – या सर्व गोष्टींचा घरातील प्रत्येक घटकावर, विशेषतः लहान मुलांवर खोलवर परिणाम होत आसतो… या गोष्टी कटाक्षाने टाळाव्या…

तर, मंडळी,
वर नमूद केलेल्या सप्तपदीच्या आधाराने एकमेकांना बंधनात ठेवण्यापेक्षा परस्पर स्नेहबंध जपूया… नाते दृढ करूया… आणि कुटुंबसंस्था व पर्यायाने सुदृढ, आरोग्यपूर्ण समाज निर्मिती करूया…

तळटीप –
हा लेख नावासह share करण्यास माझी हरकत नाही…



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजच्या नवनवीन लेखांसाठी आत्ताच मोबाईल ऍप डाउनलोड करा!

??

क्लिक करा


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया!”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!