Skip to content

फसवणूक ( एक सत्य कथा )..दोन मैत्रिणींचा संवाद !

मुसाफिर


फसवणूक ( एक सत्य कथा )


काही महीना पूर्वीची गोष्ट, सकाळी उठल्यावर फोन बघितला तर एका मैत्रिणीचा मेसेज आलेला होता की “तू आज फ्री आहेस का. मी तुला भेटायला यायचे म्हणते. “मेसेज वाचल्यावर मला आनंद गगनात मावेनासा झाला कारण तब्बल सहा वर्षांनी आज आम्ही भेटणार होतो. बाळ झाल्यामुळे मी तशी घरीच असायची, लगेच तिला रिप्लाय केला “अगं नक्की ये. मी घरीच आहे, वाट पाहते मी, ये लवकर , एकटीच येत आहे की जीजू, बाळ कुणी सोबत आहे आणि हा जेवायला घरीच या मग तुम्ही सगळे” थोड्या वेळाने तिचा रिप्लाय आला “ओके. १२:३०-१ पर्यंत येते. मी एकटीच येत आहे.” इतक्या वर्षांनी मैत्रिण भेटणार म्हणून उत्साहात पटापट आवरून घेतले. कधी एकदा तिला भेटते अशी मनस्थिती झाली. लक्ष सतत घड्याळाकडे. बाळाचं आवरून बाळ झोपी गेले आणि मी तिच्या येण्याची वाट पाहत होते. ठरल्याप्रमाणे ती आली आणि एकमेकींना बघून डोळ्यात आनंदाश्रु आले. मी विचारले “मुलाला घेऊन आली असतीस तर मला त्याला भेटता आले असते, त्यावर ती म्हणाली “अगं मी त्याला आईकडे म्हणजेच माझ्या माहेरी ठेवले आहे त्याला. महीन्यातून एकदा भेटुन येते, खूप आठवण आली की मग मध्ये कधीही जाते. मी नोकरी शोधत आहे, चांगली नोकरी मिळाली की मुलाला इकडे घेऊन येयील.” तिचं हे उत्तर ऐकून मला जरा विचित्र वाटले. पुढे काही बोलण्याआधीच ती म्हणाली “मला खूप भूक लागली आहे, आपण आधी जेवण करू नंतर गप्पा मारत बसू.” पटापट जेवणाची तयारी करून जेवायला बसलो तेव्हा सहज मी विचारले”जिजू काय म्हणतात” . ती म्हणाली ” आम्ही सोबत राहत नाही, आता दोन वर्षे होतील.” हे ऐकून मला धक्काच बसला. कारण विचारले असता कळाले की त्याचं दुसऱ्या मुलीवर प्रेम आहे, घरच्यांनी बळजबरीने लग्न लावून दिले, त्याने लग्न केले फक्त आई वडिलांच्या सेवेसाठी, घर सांभाळायला बायको मिळेल म्हणून. शिवाय शारीरिक भूक भागवायला अजून एक हक्काची व्यक्ती मिळणार होती. तो फक्त हव्यासापोटी तिला जवळ घेत असे, प्रेमाचे शब्द तर दुर पण काही बोलायलाही त्याला वेळ नसे. सुरवातीच्या दिवसात तिला त्याच्या प्रेयसी बद्दल माहिती नव्हते पण दररोज त्याचे उशिरा येणे, सुट्टिच्या दिवशीही कामाचं कारण सांगून दिवसभर बाहेर असणे तिला विचार करायला भाग पाडत होते. त्याच्या कपाटाला हात लावलेला त्याला चालायचे नाही, बाहेर पडताना कपाट लॉक करून चावी घेऊन तो बाहेर पडायचा. तिने नोकरी करू‌ नये असं त्याला वाटायचं म्हणून तिला गुंतवून ठेवण्यासाठी तिची इच्छा नसतानाही तिला आई होण्यास भाग पाडले. कधीही तिला बाहेर फिरायला घेऊन गेला नाही तर मित्र मैत्रिणींना तिची ओळखही करून दिली नाही. घरातून बाहेर पडू नये म्हणून घरात एक रुपयाही ठेवत नसे, घराची चावी घरी ठेवत नसे या सगळ्यात लग्ना नंतरच्या काही महीन्यातच जेव्हा तिला ती आई होणार ते कळाले तेव्हा काही काळ तिला वाटले की बाळ नकोच पण या सगळ्यात होणा-या बाळाची काय चूक शिवाय बाळ झाले की हा बदलेल म्हणून तिने बाळ होऊ देण्याचे ठरवले. आई होण्याचा आनंद नऊ महीने अनुभवतानाच तिला त्याच्या प्रेयसी बद्दल कळाले आणि तिला मोठा धक्का बसला, त्याला विचारले असता त्याने या सगळ्याची कबूली दिली पण घरी याविषयी सांगितले तर जीवे मारायची धमकी दिली. ती गरोदर होती शिवाय आई-वडीलांना सांगितले तर सगळे काळजी करतील, लहान बहीणीचे काय होणार या विचाराने ती सगळं सहन करत राहिली.

गरोदरपणातही तिला वेळेत डाॅक्टरकडे घेऊन जात नसे, फळं, आवडीचा खाऊ तर‌ दूरच. त्याला काही बोलले की सरळ मारायला धावायचा.

नविन लग्न झाल्यावर मुलींचे किती स्वप्न असतात, प्रेम यात सगळ्यात महत्वाचे असते पण तिला त्याचे प्रेम कधी अनूभवायलाच मिळाले नाही. लग्न झाल्यावर मुंबईसारख्या शहरात ती एकटी पडली होती. गरोदरपणात प्रवास करायचा नाही आहे असं डॉक्टरांनी सांगितले यामुळे सतत घरात बसून, कुणी बोलायला नाही अशा परीस्थितीत नऊ महिने काढले. नववा महिना संपत येत असताना तिची आई तिच्या जवळ राहायला आली. त्याआधी अधूनमधून कुणी घरचे भेटायला आले तरी चेहर्यावरील दुःख लपवुन ती आदर सत्कार करायची. आई जवळ मन‌ मोकळे करावे असे तिला खूपदा वाटले पण सगळ्यांना काळजी लागून राहिल म्हणून ती गप्प बसायची. आता आई बाळ होई पर्यंत जवळ असल्याने हळूहळू आईच्या लक्षात आले की दोघांच नातं दिसतं तसं नाही, आपली मुलगी काही तरी लपवते आहे. शेवटी आईचं मन ते, आईने खूप विचारल्यावर मुलीचा बांध फुटला, वर्ष भर सहन केलेला अन्याय, दुःख तिने आईला सांगितले. लवकरच बाळाचें आगमन झाले , बाळाला बघून त्याच्यात काही सुधारणा होईल अशी अपेक्षा आईलाही लागून होती पण त्याला बाप झाल्याचा काही आनंद तितका झालेला नव्हता. औपचारिकता म्हणून तो सोबत होता. मुलाला जवळ सुद्धा घ्यायला टाळाटाळ करायचा. सासू सासर्‍यांना तिच्या आईने दोघांच्या नात्याविषयी सांगितले तर त्यांची भूमिका म्हणजे आम्हाला काही माहिती नाही आणि तो आमचं ऐकत नाही. अशा परिस्थितीत स्त्रीने काय करावे? तिच्या आईबाबांनी या सगळ्यात तिला खूप साथ दिली. तिला माहेरी घेऊन गेले शिवाय खंबीर पणे लढायला शिकवले. बाळ एक वर्षाचं झालं तेव्हा तिने काही कोर्सेस करून नोकरी शोधायला सुरुवात केली. मुलाला तिने आई वडिलांजवळ ठेवले. आलेल्या परीस्थितीशी झुंज देत पुढे जात राहायचे हे तिला आईने शिकवले, तिचा आत्मविश्वास वाढवला. लवकरच तिला चांगली नोकरी मिळाली आणि झालेल्या अन्यायावर मात करून तिने आपलं आणि मुलाचं आयुष्य सुखी बनवण्याचा प्रयत्नाला सुरवात केली. मला तिचा खरंच खूप अभिमान वाटतो. स्त्रीने जीवनात खंबीर होण्याची खरंच खूप गरज आहे. अन्याय सहन न करता आवाज उठवणे गरजेचे आहे. अत्याचाराला बळी न पडता, स्वत: साठी उभे राहिले तर अन्याय नक्कीच कमी होईल.

यावर तुमचे काय मत आहे हे कमेंट्स मध्ये नक्की लिहा.



आपले सुद्धा प्रेरणादायी लेख आम्हांला ९१३७३००९२९ या व्हाट्सएप क्रमांकावर पाठवा. आपल्या नावासकट अत्यंत नम्रपणे ते प्रकाशित केले जातील.

“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया !”

3 thoughts on “फसवणूक ( एक सत्य कथा )..दोन मैत्रिणींचा संवाद !”

  1. छान आहे लेख परंतु प्रत्येक वेळी पुरुषच दोषी असतो असं मुळीच नाही…कधी कौटुंबिक न्यायालय मध्ये जाऊन या तिकडे असे खूप पुरुष दिसून येतील जे त्यांच्या स्वतः च्याच बायकोच्या अन्यायामुळे पिचून गेलेत पण हिम्मत नाही हरले…यात सगळ्यात जो महत्वाचा भाग आहे ना तो आहे संस्कारांचा…अन् अजून पण आपल्या समाजात जे स्त्री चे चित्र उभे केले जाते ते साफ खोटं आहे.जी स्त्री अबला म्हणून उभी केली जाते तीच खरी खलनायकी असते…

  2. मला या ब्लॉग च्या admin शी संपर्क मिळेल ?

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!