सारंग धारस्कर
२८ मे…. आज जागतिक मासिक पाळी दिवस
दर महिन्याला स्त्रीला येणारी मासिक पाळी ही स्त्रीच्या जीवनातील अतिशय नैसर्गिक अशी घटना. या अफाट निसर्गचक्राचाच तो एक भाग. हीच गोष्ट लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी, पाळीविषयी समाजात असणारे गैरसमज दूर करण्यासाठी, मासिक पाळीच्या काळातील आरोग्य आणि स्वच्छता याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी २८ मे हा ‘जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिवस’ म्हणून साजरा केला जातो. मासिक पाळीचं चक्र हे साधारण दर २८ दिवसांनी येतं आणि पाच दिवस सुरू राहतं म्हणून २८ ही तारीख आणि मे हा वर्षातला पाचवा महिना निवडला आहे.
अनेक विकसनशील राष्ट्रांमध्ये मासिक पाळीविषयी प्रचंड गैरसमज दिसून येतात. मासिक पाळीला महाराष्ट्रात विटाळ म्हणून संबोधलं जावं यावरूनच काय ते लक्षात यावं. या चार दिवसांत मुलीला किंवा स्त्रीला घरात स्पर्श करण्यास मज्जाव केला जातो. कुठल्याही शुभकार्यात, देवदर्शनास मज्जाव केला जातो. स्वयंपाकघरात प्रवेश नसतो. मासिक पाळी म्हणजे जणू काही अदभुत, विलक्षण अशी काहीतरी वाईट घटना घडली आहे, अशी धारणा अनेक ठिकाणी दिसून येते. खरं तर मासिक पाळी हा मानवी जीवनाच्या अस्तित्वाशी संबंधित भाग आहे. हे निसर्गचक्र नसतं तर मानवी जीव सातत्य खुंटलं असतं. या विषयाशी संबंधित आरोग्यविषयक बाजूसुद्धा अत्यंत भयावह आहे.
सॅनिटरी नॅपकिन्स नावाची काही गोष्ट आहे याची माहितीच अनेक स्त्रियांना नाहीये. तर आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याने अनेकदा माहिती असूनसुद्धा कमी उत्पन्न गटातल्या स्त्रिया सॅनिटरी नॅफकिन्स वापरत नाहीत. खेड्यांमध्ये तर शाळांत टॉयलेट्सचीच सुविधा नसल्याने मुलीला मासिक पाळीच्या चार दिवसांत शाळा बुडवल्यावाचून गत्यंतर नसतं. झोपडपट्टीतल्या असंख्य स्त्रिया या मासिक पाळीच्या काळात कपडे वापरतात. रक्ताचे डाग असलेले हे कपडे वाळत टाकण्याचीही लाज. मग इतर कपड्यांखाली ते टाकायचे. अनेकदा ते वाळत नाहीत. तसेच ओलसर कपडे परत वापरायचे. या काळात सॅनिटरी नॅपकिन्सऐवजी गवत वापरणाऱ्याही स्त्रिया काही सापडल्या आहेत.
प्रसुतीरोग तज्ज्ञ सांगतात की, आदर्शदृष्ट्या बघितला तर पाळीच्या काळात दर चार तासांनी सॅनिटरी नॅपकिन बदलायला पाहिजे. मग ते नॅपकिन ओले होवो अथवा न होवो. ही प्राथमिक माहितीही अनेक स्त्रियांना नाही. सॅनिटरी नॅपकिन्स बदलले नाहीत तर मूत्रमार्गात जंतूसंसर्ग होण्याची शक्यता असते. त्यातून फंगल इन्फेक्शन, युरिन इन्फेक्शन, गर्भाशयामध्ये जंतूसंसर्ग असे अनेक धोके संभवतात. सॅनिटरी नॅपकिन्स जास्त लागू नयेत म्हणून स्त्रिया आठ-आठ, दहा-दहा तास नॅपकिन्स बदलत नाहीत.
यात आरोग्यविषयक जागरूकता ही तर महत्त्वाची आहेच, पण त्यापेक्षाही मोठी समस्या आहे ती म्हणजे सॅनिटरी नॅपकिन्स परवडण्याची. उत्तम आरोग्य प्राप्त करणं हा खरं तर मूलभूत अधिकारच आहे. आणि नागरिकांना उत्तम आरोग्याच्या सुविधा पुरवणं हे राज्याचं मूलभूत कर्तव्य. न्यूयॉर्कमध्येसुद्धा निम्न आर्थिक गटातील स्त्रियांना पाळीच्या काळात सॅनिटरी नॅपकिन्स उपलब्ध करून देणं, त्यावरील विक्री कर काढून टाकणं आणि सार्वजनिक शाळांमध्ये मोफत सॅनिटरी नॅपकिन्सच्या सुविधा उपलब्ध करून देणं या प्रस्तावावर विचार सुरू आहे.
भारत सरकारने सॅनिटरी नॅपकिन्सवर १२ टक्के जीएसटी लावला आहे. यावरून प्रचंड ओरड सुरू आहे. यातला महत्त्वाची आर्थिक बाजू लक्षात घ्यायला हवी. पहिली गोष्ट म्हणजे सरकारने जीएसटी हा पूर्वीपेक्षा कमी केला आहे. जो आधी १३ टक्के होता, तो आता १२ टक्के झाला आहे. दुसरी गोष्ट जर सरकार सॅनिटरी नॅपकिन्स संपूर्ण करमुक्त करणार असेल तर प्रॉक्टर अँड गँबलसारख्या परकीय कंपन्यांना जो प्रचंड नफा मिळतो आहे, त्यावर कर द्यावा लागणार नाही. आणि आपल्या सरकारचं उत्पन्न मात्र बुडेल.
यातला सर्वात महत्त्वाचा भाग हा की, आजही ८० टक्के स्त्रिया या सॅनिटरी नॅपकिन्स वापरतच नाहीत. ज्या २० टक्के स्त्रिया सॅनिटरी नॅपकिन्स वापरतात, त्या मध्यमवर्ग, उच्च मध्यमवर्ग आणि श्रीमंत वर्गातल्या आहेत. आता निम्न आर्थिक गटातल्या सर्व मुलींना, स्त्रियांना सॅनिटरी नॅपकिन्स अत्यंत कमी किमतीत वा मोफत उपलब्ध व्हावेत यात दुमत असण्याचं कारण नाही. यात जीएसटी कमी करण्यापेक्षा सरकारने पुढाकार घेऊन सॅनिटरी नॅपकिन्स तयार करणारे उद्योग उभारावेत.
या संदर्भात निरोधचं उदाहरण घेता येईल. अनेक ब्रँड्सचे कमी-अधिक किमतीचे निरोध आज बाजारात उपलब्ध आहेत. पण सरकारी रुग्णालयातून गरिबांना मोफत निरोध दिले जातात. याच धर्तीवर सॅनिटरी नॅपकिन्सचं होऊ शकतं. सरकारने सरकारी रुग्णालयातून निम्न आर्थिक गटातील स्त्रियांना मोफत सॅनिटरी नॅपकिन्स उपलब्ध करून द्यावीत किंवा अगदी ना नफा ना तोटा तत्त्वावरील किमतीतही ती उपलब्ध करून दिले जाऊ शकतात. सार्वजनिक आणि खाजगी असा समन्वय साधून काही करता येईल का हे बघायला हवं.
मला वाटतं यासाठी गरज आहे ती पारदर्शकता आणि इच्छाशक्तीची.
मासिक पाळीबाबत जनजागृतीसाठी UNICEF चं अभियान
जागतिक आरोग्य संघटनेने 28 मे हा दिवस जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन म्हणून जाहीर केला आहे. हा दिवस अनेकांना माहित नसला, तरीही जागतिक स्तरावर त्याला फार महत्त्व आहे. समाजातील मासिक पाळीबाबत गैरसमज दूर व्हावेत, या दृष्टीने ‘UNICEF’ (United Nations International Children’s Emergency Fund) या संस्थेने एक अभियान राबवले आहे. या अभियानाला सोशल मीडियावर जोरदार पाठिंबा मिळत आहे.
मासिक पाळी हा चार चौघात न बोलण्याचा विषय… त्यामुळे पाळीविषयी खुलेआम चर्चा होत नाही. मेडिकलमध्ये सॅनिटरी नॅपकिनही दबक्या आवाजात मागितलं जातं. मेडिकलमध्ये काम करणारे कर्मचारीही अगदी सोनं दिल्याप्रमाणे ते अगदी कागदात गुंडाळून देतात. कशाला हवी एवढी लपवा-छपवी…मासिक पाळी ही स्त्रियांच्या आयुष्यातील एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. यामुळे प्रत्येक स्त्री परिपूर्ण होते. मात्र शहरात तसेच खेडेगावात मासिक पाळीबाबत अनेक गैरसमज पसरले आहे. सामाजिक स्तरावर हे गैरसमज दूर करण्यासाठी अनेकदा प्रयत्न केले जातात. मात्र या प्रयत्नांना शक्य तितकं यश आलेलं नाही.
‘UNICEF’ इंडियाचं अभियान
मासिक पाळीबाबतचे गैरसमज दूर व्हावेत या दृष्टीने UNICEF इंडिया ने एक अभियान राबवलं आहे. या अभियानात सहभागी होण्यासाठी तुम्हाला तुमच्या हातावर लाल रंगाचा एक ठिपका करावा लागणार आहे. हा ठिपका स्पष्ट दिसणार हवा. यानंतर हात वरील ठिपका दिसेल अशा पद्धतीने तुमचा एक सेल्फी काढून तो सोशल मीडियावर पोस्ट करायचा आहे. हा फोटो पोस्ट करताना #MenstruationMatters हा टॅग वापरायचा आहे. मासिक पाळीबद्दल गैरसमज दूर व्हावेत यासाठी UNICEF इंडियाचा हा एक प्रयत्न म्हणावा लागेल.
मात्र याआधी अनेक सामाजिक संस्थांनी हे गैरसमज दूर करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. काही संस्था अजूनही करत आहेत. यामुळे पाळी संदर्भातील काही जुन्या रुढी परंपरा बंद झाल्या असल्या, तरी काही परंपरा या अद्याप सुरु आहेत. या परंपरा 21 व्या शतकात तरी मोडल्या जाव्या अशी माझी एक अपेक्षा आहे. यामुळे भविष्यात जन्माला येणाऱ्या मुलींना किंवा स्त्रियांना याचा त्रास सहन करावा लागणार नाही.
आपले सुद्धा प्रेरणादायी लेख आम्हांला ९१३७३००९२९ या व्हाट्सएप क्रमांकावर पाठवा. आपल्या नावासकट अत्यंत नम्रपणे ते प्रकाशित केले जातील.