जर कोणाला डेट करत असाल तर…प्रेमात पडणाऱ्यांनी तर नक्की वाचा !
राकेश वरपे
(करीअर कॉउन्सिलर)
संचालक, आपलं मानसशास्त्र
सदोष वैवाहिक जीवनशैली, संशयीवृत्ती, भांडण-तंटा, संघर्ष ही मोठी उदाहरणं आजकालच्या तरुण-तरुणींसमोर वाढताना दिसत असल्यामुळे कदाचित नंतर तर लग्न करायचंच आहे, म्हणून आत्ता मनमुराद जगूया, ही तरुणांची भाषा बदलत असावी. परंतु इतक्या बिकट वातावरणात सुद्धा नात्यांमध्ये सय्यमीपणा पाहायला या तरुण मंडळींकडे फार वेळ दिसत नाही. असो,
ज्याच्याबरोबर आपल्याला संपूर्ण आयुष्य घालवायचंय, ज्याच्याबरोबर आयुष्यभर विश्वासाचं नातं जोडायचंय, ठीक आहे, प्रेम तर झालं, पण दोघांचंही व्यक्तिमत्व पाहता, आपआपसात किती जुळेल, दोघं एकमेकांशी खुलेपणाने बोलू शकतील का (अगदी सेक्सवर सुद्धा), कोणाला कधी राग येतो-कोणाला कधी शांत बसायचंय. एकमेकांच्या नातेवाईकांसकट दोघं एकमेकांना स्वीकारू शकतील का, असे बरेच खोलात रुजलेले प्रश्न आणि त्यातून जोडीदाराची मिळणारी उत्तरं, ही एकमेकांविषयी-एकमेकांसाठी केलेली चर्चा म्हणजेच डेट. ज्यामध्ये कुठलेही वचन किंवा आणाभाका नसून तर एकमेकांना समजून घेऊन पुढे कसं जाता येईल, पुढचं आयुष्य फ्लेक्सिबल कसं करता येईल, यावर समजूतदारपणे केलेली विस्तृत चर्चा असेल.
इतकी चर्चा कोण करणार, एकाच व्यक्तीला इतक्या वेळा कोण भेटणार ते ही फक्त बोलण्यासाठी, याकडे आजकालच्या तरुणांचा ओढा वाढतोय. कारण जोडीदार काय विचार करतोय, किती समजूतदार आहे, यापेक्षा त्याचा बँक बॅलन्स किती आहे, त्याला सरकारी नोकरी आहे ना ,लग्नाअगोदर तो फ्लॅट घेऊ शकतो का, समाजात त्याचा दर्जा उंचावलेला आहे ना, तो किती तोळे दागिने घेऊ शकतो, यांसारख्या भंपक प्रश्नांना हल्ली उजाळा मिळतोय. म्हणून अगोदरच डेटच्या नावाखाली बरबटलेली आणि धरसोड वृत्तीची तरुण पिढी लग्नानंतर अनेक समस्यांना सामोरे जातात,
या धरसोड जीवनाचा मनमुराद आनंद घेतल्याने लग्नानंतर काही जबाबदाऱ्या सोडता येत नाहीत आणि सोडल्या तरी पुन्हा कोणाला धरता येत नाही, अशी गत यांची होते.
म्हणून डेटच्या नावाखाली स्वतःला हवा तसा अर्थ शोधणाऱ्या तरुणांनो आत्ताची मजा, नंतरची सजा होऊ नये , इतकी फक्त काळजी घ्या. कारण तुम्ही जे देणार तेच तुम्हाला रिटर्न मिळणार हा समाजाचा नियम कायम लक्षात ठेवा. कारण या नियमाने भल्याभल्यांना मोठं काहीतरी गमविल्यानंतर भानावर आणले आहे, म्हणून काहीतरी गमविण्याअगोदर आत्ताच भानावर या.
आपले सुद्धा प्रेरणादायी लेख आम्हांला ९१३७३००९२९ या व्हाट्सएप क्रमांकावर पाठवा. आपल्या नावासकट अत्यंत नम्रपणे ते प्रकाशित केले जातील.