Skip to content

परस्त्रीच्या स्तनांकडे पाहून मनी फक्त वासनाच का येते ममता का नाही?

मुसाफिर


परस्त्रीच्या स्तनांकडे पाहून मनी फक्त वासनाच का येते ममता का नाही?


हे दोन फोटो पाहिले आणि बरंच काही मनात येऊन गेलं..

पहिल्या फोटोमध्ये जी आहे ती फक्त एक बाई आहे.. आणि दुसऱ्या फोटोमधली बाई आणि आई आहे. एका फोटोकडे पाहिलं तर अनेकांच्या मनात वासना येऊ शकते आणि म्हणूनच, अनेक स्त्रिया कोणताही परका पुरुष असो वा ओळखीचा.. तो समोरून येताच आपला छातीवरून निसटलेला पदर लगेच सावरतात. अर्थात, ते जाणूनबुजून नाही तर आपोआप होतं, कारण प्रत्येक स्त्रीला 100% पैकी 10% तरी असे वासनांध पुरुष भेटलेले असतात.

लग्न न झालेली आणि नुकतंच लग्न झालेली स्त्री, तिच्यातील सुंदरता कुठेच लपवू शकत नाही.. प्रत्येक स्त्रीला आपण सुंदर दिसावं असंच वाटत असतं.. आणि का वाटू नये..??? जर का ती एक अतिशय साचेबद्ध अशी निसर्गाची खास कलाकृती असेल..तर तिने स्वतःला खास राखणं आणि मानणं यात काय चुकतं ना ?? पण हो हे देखील तितकंच खरं आहे की, सुंदर फुलाच्या भोवती प्रत्येक माणसाला 2 मिनिटं तरी घुटमळावसं वाटतंच. पण काही लोक इतकी चांगली भेटतात त्या फुलाला की, त्याची सुंदरता हिरावून घ्यायची इच्छा त्यांना होतही नाही आणि झाली तरी त्या इच्छेवर ताबा ठेवणं त्यांनी शिकून घेतलेलं असतं. तर काही जण क्षणभराचाही विचार न करता त्याच्या सौंदर्याला हात घालतात आणि सारं काही उजाड करून जातात. अगदी तसच स्त्रियांच्या बाबतीत आहे, कधी त्यांना असे पुरुष भेटतात जे दुरूनच पाहून आपल्या माखलेल्या हातांचा स्पर्श त्यांना करत नाही.. तर काही त्यांची सुंदरता चुरगळुन टाकतात.
हे झालं फक्त एक स्त्री असलेल्या बाईचं आयुष्य !

दुसरं असतं ते बाईसोबत आईचं आयुष्य…! आपण मेल्यावर स्वर्ग कसा लाभेल याची अपेक्षा करत असतो, पण स्वर्ग तर जन्माआधीपासून आपल्याबरोबरचं असतो. ती आई एवढं मोठं डोंगरएव्हढं पोट घेऊन 9 महिने ऑफिसला जाते, जगात वावरते. पण कधीच त्याची लाज बाळगत नाही, ना आपल्यात अचानक आलेल्या बदलांना दूर सारते. परपुरुषाला पाहून “बाईपणात” पदर सावरणारी स्त्री, मुलगी… आईपणात त्याच लाजेच्या पडद्याला दूर सारून एक आई असलेली ती बाई आपल्या मुलाला 4 लोकांत दूध देते. पण आपल्या भारतात अगदी हाताच्या बोटांवर मोजण्याइतकीच लोक असतील जी त्या माऊलीकडे तुच्छतेने बघत नसतील… पण हेच बाहेरच्या देशात अत्यंत कूल पद्धतीने स्वीकारलं जातं.. आणि याचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे, लॅरिसा.. ऑस्ट्रेलिया संसदेतील खासदार ! पहिली अशी स्त्री जिने संसदेमध्ये आपल्या 2 महिन्यांच्या मुलीला फिड करून तिची भूक मिटवली आणि बाई पेक्षा आई किती श्रेष्ठ असते हे दाखवून दिलं. इतकंच करून ती थांबली नाही तर तिने इतर मातांसाठी देखील हा कायदा बनवण्यास भाग पाडलं.

म्हणूनच, आई असो वा बाई – ही एका कमळाच्या फुलासारखी असते.. जसा फुलात शिरलेला मोठ मोठी लाकडं छेदनारा भुंगा रात्र रात्र फुलाच्या काळजीपोटी आत अडकून राहतो.. भुंगा हा एक किडा असूनही त्याला काळीज असल्यासारखा तो वागतो. तसा माणूसदेखील माणसासारखं वागूच शकतो ना..??

बाईच्या उघड्या छातीवर कधीतरी आपण झोपणार असतो,खेळणार असतो, बागडणार असतो, श्वास घेणार असतो…हा विचार करून आणि ऐन तारुण्यात आल्यावर हे सगळं बालपणी आपण करून भागलोय म्हणून, त्या छातीकडे, त्या पोटाकडे, त्या कंबरेकडे आदराने बघा.


आपले सुद्धा प्रेरणादायी लेख आम्हांला ९१३७३००९२९ या व्हाट्सएप क्रमांकावर पाठवा. आपल्या नावासकट अत्यंत नम्रपणे ते प्रकाशित केले जातील.

“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया !”

2 thoughts on “परस्त्रीच्या स्तनांकडे पाहून मनी फक्त वासनाच का येते ममता का नाही?”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!