Skip to content

आपल्याला स्वप्न का पडतात ? जाणून घ्या !

आपल्याला स्वप्न का पडतात ? जाणून घ्या !


राकेश वरपे

(मानसशास्त्र तज्ञ, करीअर काउंन्सिलर )
संचालक, आपलं मानसशास्त्र


आपल्या मनाची एक बोध अवस्था (Conscious Mind) असते. यालाच जागृत मन असेही म्हणतात. या जागृत मनाचा वापर आपण आपले दैनंदीन जीवन जगत असताना करीत असतो. म्हणजेच ही बोध अवस्था आपल्यासाठी फार महत्वाची असली तरी दैनंदीन जीवन जगताना आपल्याला अनेक बरे-वाईट अनुभव येतात.

जसे की, चिडचिड, भांडण, क्लेशकारक अनुभव, दुःख, यातना, अपराधी भाव, वैताग, कंटाळा ई. बरेच वेळा या स्पर्धेच्या जगात टिकण्यासाठी आपण अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करून आपले काम सुरू ठेवण्याचा प्रयत्न करतो.

परंतु आपलं मानसशास्त्र सांगतं की, त्या गोष्टी जरी काही वेळ बाजूला सारल्या जात असल्या तरी दबावाच्या स्वरूपात त्या सर्व बऱ्या-वाईट गोष्टींचे दमण होऊन त्या सर्व गोष्टी अबोध मनात (Unconscious Mind) शिरतात. जन्मापासून ते आत्तापर्यंत आपल्या दबलेल्या इच्छा, संघर्ष, अवहेलना या सर्व गोष्टी चिंता आणि भीतीच्या स्वरूपात अबोध मनात घुसमटत असतात.

ज्याचा बहुतांश वेळा आपल्या बोध मनावर प्रभाव पडत असतो. म्हणजेच कधी कधी आपल्याला बोलायचं असतं वेगळं पण भलतंच काहीतरी बोलून बसणे, अचानक भान हरपून जुन्या गोष्टी चाचपडणे, अचानक भावनिक होऊन रडू येणे इ. अस्तित्वात एखादी हवी असलेली गोष्ट स्वप्नांमार्फत पूर्ण केली जाते. तसेच अबोध मनातील दबाव वाढल्यास स्वप्नांमार्फत तो दबाव रिलॅक्स केला जातो,

जर आपल्याला स्वप्नच पडली नसती तर तो दबाव प्रचंड वाढून आपण सर्व मानसिक समस्येने ग्रस्त असतो. म्हणजेच स्वप्न पडण्याचं एकमेव कारण म्हणजे अबोध मनातील दडलेल्या इच्छा, लैंगिक संघर्ष, दुःख, यातना, क्लेशकारक भावना यांचा दबाव होय.

उदाहरण पाहूया……

एका आरोग्यशास्त्र विषय शिकविणाऱ्या शिक्षकांना नाक्यावरील तळलेले भजे खायची प्रचंड इच्छा निर्माण झाली, परंतु मागून येणारे विद्यार्थी व पालक काय म्हणतील म्हणून त्यांनी त्यांची इच्छा दाबली, काही दिवसानंतर त्यांना स्वप्न पडले की, ते शाळेतून सुटतात. नाक्याच्या दिशेने चालतात. एरवी गजबजलेला तो नाका त्यांच्या अबोध मनाने त्यांची इच्छा पूर्ण व्हावी म्हणून पूर्ण रिकामा करून टाकला होता, शिवाय त्या तळलेल्या भजीच्या गाडीशिवाय तेथे कोणीच नव्हते. ते तेथे जातात आणि मनोसक्त भजी खातात आणि अबोध मनातील तो भजीवाला त्यांना म्हणतो की पुढच्या वेळेस इतर शिक्षकांना सुद्धा घेऊन या !

स्वप्न पडल्यामुळे इच्छा काहीशी पूर्ण झाल्याचे समाधान आपल्याला मिळते. परंतु ज्या व्यक्तींना अती प्रमाणात स्वप्न पडतात किंवा मनाची गोंधळलेली स्थिती असूनही स्वप्न पडतच नाही, त्यांचा अस्तित्वाशी संपर्क तुटून त्या मंदगतीनेमानसिक समस्या आणि पुढे आजाराकडे मार्गक्रमण करतात.

म्हणून सतत पडणाऱ्या स्वप्नांकडे दुर्लक्ष करु नका.

हा लेख वाचत असताना, समजून घेत असताना जर तुम्ही कुठेतरी तुमच्याही नकळत अबोध मनात गेला असाल तर आज रात्री तुम्हाला स्वप्न पडण्याची दाट शक्यता आहे.

ते स्वप्न काय असेल… कोणतं असेल, तर सध्या तुमच्या मनातली असणारी अवस्था तसेच केव्हातरी, कुठेतरी तुमच्या मनाने अर्धवट सोडलेली एखादी घटना, प्रसंग किंवा कधीतरी केलेला अतिविचार असं काहीही येऊ शकतं.

तसेच अशीही स्वप्न पडू शकतात, ज्याचा आपल्याला अर्थच समजणार नाही. असं माझ्या आयुष्यात कधी घडलंच नव्हतं असं आपलं पाहिलं वाक्य असेल….

स्वप्नांचा हा प्रचंड गुंतागुंत जरी असला, तरी ते जाणून घेण्यासंदर्भात आपल्या मनात प्रचंड कुतुहुलता असते. म्हणून बरेचसा तरुण वर्ग मानसशास्त्र या विषयाकडे आकर्षित होतोय.

म्हणून आज रात्री जर सामान्य स्वप्न पडलं तर त्याच्या खोलात जाऊ नका…आणि जर भितीदायक, क्लेशकारक, गोंधळून टाकणारं, पिच्छा न सोडणारं स्वप्न असेल आणि ते वारंवार पडत असेल तर त्वरित तज्ञांचा सल्ला घ्या.

कारण अशी स्वप्न दैनंदिन जीवन विस्कळीत करतात.



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी 9137300929 या क्रमांकावर क्लिक करून दररोजचे अपडेट मिळावा!

“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!