Skip to content

सर्वांचा प्रवास फक्त सुखासाठी…

सपना फूलझेले
नागपूर
सुखं म्हणजे नेमकं काय? आहे काय या सुखाची व्याख्या? त्याचा आकार कसा आणि त्याची मर्यादा तरी काय? सुखं म्हणजे नुसताच शब्द, वाक्य की श्रवणीय काव्य. सुखं म्हणजे असं कोणतं दिव्य. सुखं म्हणजे नेमकं काय?
सुख म्हणजे एक अनुभूती… सुख म्हणजे एक आत्मिक समाधान… सुखं म्हणजे मनाची शांतता अन् मनाची तृप्तता… सुख म्हणजे मन, बुद्धी, आत्मा यांच्या समन्वयाने साधली जाणारी एक मानसिक ध्यानधारणा…
काही बघता क्षणी, ऐकता क्षणी, काही विचार करता क्षणी… चेहऱ्यावर एक मोहक हास्य फुलते, डोळ्यात एक चमक येते, मन समाधानाने भरून डोळ्यात आनंदाश्रू येतात… ती आंतरिक अनुभूती म्हणजे सुखं !!!

स्वतःच स्वतःच्या प्रेमात पडणं, स्वतःसाठी जगणं, मनसोक्त, मनमोकळं हसणं म्हणजे सुखं… दुसऱ्याच्या आनंदाने, हास्याने, समाधानाने आपल्या मनात ज्या आनंद लहरी उठतात ते तरंग म्हणजे सुखं…  कुणाचं सोबत असणं, कुणाचा हात हातात असणं म्हणजे सुख… कुणाच्या विरहात, कुणाच्या आठवणीत तडफडणं  म्हणजे ही सुखच… कुणासाठी  झुरण्यात सुख तर कुणासाठी झिजण्यात ही सुखं… मिळविण्यात सुखं आहे तर त्यागात ही सुख… कुणाच्या नजरेत सुखं तर कुणाच्या मनोमिलनात सुखं… देहाचा फुलोरा फुलविण्यात सुखं तर ते उधळण्यात ही तेवढंच सुखं… देहाला जपणेही सुख अन् कुणासाठी लुटविण्यातही सुखं..!
सुख कशातही असू शकतं… कुठेही दिसू शकतं… कशातही मिळू शकतं… पण एक मात्र तेवढंच खरं की, सुखं कुठलेही असो… आत्मिक, ऐच्छिक किंवा दैहिक… 
ते ओरबाडुन घेण्यात कसलंच सुख नाही. ते आहे फक्त हळुवार मिळविण्यात, समजण्यात आणि मनाने, देहाने, आत्म्याने एकरूप होण्यात… आंतरिक सुख, समाधान हेच शाश्वत सत्य आहे. बाकी फक्त सुखाच्या कल्पना! फक्त पोकळ कल्पना!!! कल्पनेत फक्त क्षणाचं सुख असू शकतं; पण ते फसवं असतं… कायमच फसवं असतं!!!

***
आपलं मानसशास्त्र’ या अधिकृत पोर्टलला  भेट द्या आणि सामील व्हा !

आपलेही प्रेरणादायी लेख आम्हाला ९१३७३००९२९ या व्हाट्सएप क्रमांकावर पाठवा. आपल्या नावासकट अत्यंत नम्रपणे ते प्रकाशित केले जातील.
“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!