माणसाचं आयुष्य आरामदायी झालं, पण आनंददायी झालं का?
ते दिवसच वेगळे होते. साधारणतः 1994 -95 चा तो काळ. आमच्यासारखी 2री ,3रीतली मुलं शाळेतून आल्यावर किंवा सुट्टीच्या दिवशी घरी सापडली तर शप्पथ. घरच्यांच्या शब्दात सांगायच झालं तर उपाशी तापाशी कुठं कुत्रे मारायला जातेत काय माहीत.
आम्ही मोकळे होतो कुठेही जायला, कोणाकडेही जायला आणि कितीही वेळ खेळायला. सुट्टीच्या दिवशी तर चिंचेची झाडं, बोरं, भोकरं, इंग्रजी चिंचा, अगदी गुलमोहराची फुलं सुद्धा गटकवण्यातून वेळ मिळालाच तर पडक्या विहिरीवर जाऊन बसायचं. दुपारचे 3,4 वाजयचे त्यामुळे जेंव्हा पडक्या विहिरीवर जायचो तेंव्हा अर्ध्या विहिरीत ऊन आणि अर्ध्या विहिरीत सावली असायची.
शांत पाण्याकडं बघत असता तेवढ्या कुणीतरी वरून उडी मारून विहिरीत इंद्रधनुष्य बनवायचा आणि एकाच कल्ला व्हायचा उडालेले पाण्याचे तुषार अंगावर आले की इतका आनंद व्हायचा की बस्स. पोहायला तर येत नव्हतं म्हणून मोठी मूलं पोहताना बघायचं फक्त. सूर ,मुटका, तळाचा दगड आणणे, शिवणापाणी (पाण्यात) असले खेळ मोठी पोरं खेळायची.
सगळ्यात वरून उडी मारणारे, सगळ्यात उंच पाणी उडवणारे, खोल तळाला जाणारे प्रत्येकाची वेगळी खुबी असायची, मोठी पोरं बघून वाटायचं आपण कधी मोठे होणार ? आपल्याला पण हे सगळं जमलं पाहिजे. त्यातून मधेच शेजारचा अप्पा एखाद्या बारक्याला उचलून विहिरीत फेकायची भीती दाखवायचा, आपली तर पुरी तंतरायची तेंव्हा आणि सगळ्या विहिरीत एकच हशा पिकायचा.
आमच्याच सोबत वर्गात असलेला म्हादबाचा सोन्या डबा लावून पोहायचा. बघायला गेलं तर काहिही नाही केलं तरी तो तसाच तरंगला असता पण हातवारे तर असा करायचा की जागतिक दर्जाच्या जलतरणपट्टू आहे. विहिरीत नुसता आवाज, गोंधळ, आणि पाणी हे बघून तिथच मन घुटमळायचं.
रविवारी सकाळी सकाळी बबल्या आला बोलवायला. कुणाला काही न सांगता आम्ही हळूच कलटी मारली. थोड्यावेळ बॅटबॉल खेळलो ग्राउंड वर , मग कैऱ्या तोडल्या आणि ठरल्याप्रमाणे विहिरीवर गेलो. मोठी पोरं आमची चेष्टा करायची, भीती दाखवायची विहिरीत ढकलायची पण माहीत होतं की सगळे चांगले आहेत. थोडावेळ बसल्यावर तिथं राउताचा केशव आला. आंगाखांद्याने मध्यम , काळासावळा, पायजमा आणि पांढरा सदरा वर डोक्यावर गांधी टोपी पण शेतात काम करून करून पांढरा सदरा पांढरा राहिला नव्हता. नेहमी तंबाकू चा तोबरा भरलेला, गळ्याभोवती नारंगी रंगाचं उपरणे. थोडावेळ उभा राहिल्यावर जसं मांजरीने तिच्या पिल्लांना एक ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी दातात अलगद उचलावे तसाच अलगद तोंडातला माल दोन बोटांनी बाहेर काढत म्हणाला पोरांनो तुम्हाला एक जादू दाखवू का?
आमच्या ताणलेल्या उत्कंटेने आम्ही जादू बघायला उत्सुक झालो. बघा हा इकडं आता कुणी काहीही न करता एक जण इथं लै फटके खाणार आहे. कुणाला तरी मार बसणार म्हणल्यावर आम्हाला आतून गुदगुल्याच व्हायच्या. मला वाटलं बबल्याला फटके पडतील बहुतेक.
दोन तीन मिनिटं गेली तरी काहीच नाही म्हणून बाबल्या म्हणाला जा लका आमी नसतू मार खात. त्याच बोलणं संपायच्या आत वर विहिरीत उडी मारायला गेलेला अप्पा ओरडला “लका म्हैश्या पळ लका म्हातारं आलं तुला हुडकीत”. हे कानावर पडताच मी न बबल्यानी तिथून धूम ठोकली.
केशव नि तो पर्यंत तंबाकू चा दुसरा बार मळत अप्पाला एक कच्चून शिवी हासडली लका जरा मजा घेतली असती की लेकरांची. अप्पानी पुन्हा वरून उडी मारून काढलेलं इंद्रधनुष्य बघायला सुद्धा आता माग बघायची हिम्मत नव्हती.
त्या वेळी पैसा नसेल पण वेळ आमची होती.
काळ बदलला , कैऱ्या, चिंचा, बोरं, भोकरं हे झाडावरून तोडून खायचं असत हे सुद्धा आजकालच्या मुलांना कळणार नाही. गुलमोहराच्या फुलात राजा आणि सैनिक असतात असं सांगितलं तर हसतील आपल्याला. मिळत जाणाऱ्या प्रत्येक गोष्टींनी माणसाचं आयुष्य आरामदायी झालं पण आनंददायी झालं का? हा प्रश्न अजूनही मला पडतो.
नवनवीन व्हिडिओसाठी YouTube चॅनेल
SUBSCRIBE करा!
??
Online Counseling साठी !
रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!
ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!
“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया“
क्लिक करून सामील व्हा!
??



