Skip to content

गेल्या पंधरा दिवसांपासून तो कोरोनाशी झुंज देत होता.

आता सगळं संपलं होतं…..


गणेश चरपे


गेल्या पंधरा दिवसांपासून तो कोरोनाशी झुंज देत होता. आज अखेर त्याचा लढा संपला होता व यामधून त्याची सुटका झाली होती आणि तो आता घरी परतला होता. घरी पोहचताच आपले हारफुलांनी स्वागत होईल, असे त्याला अपेक्षित होते. तो घराचे गेट जवळ आला परंतु त्याला तिथे कुणीच दिसले नाही. त्याची निराशा झाली आणि त्याला घरच्या लोकांचा राग सुद्धा आला, कि मी इतक्या दिवसानंतर घरी परत आलोय परंतु कुणालाच आनंद नाही, कुणीच माझ्या स्वागतासाठी आले नाही.

परंतु नंतर त्याला वाटले कि, बहुतेक हॉस्पिटल वाल्यांनी आपले घरी कळविले नसावे त्यामुळे घरच्या लोकांना माहित नसावे कि मला आज सुटी झाली आहे आणि आज मी येणार आहे. इतक्यात आतून रडण्याचा आवाज त्याच्या कानावर आला. तो गेट उघडून आत गेला, तर त्याची पत्नी आक्रोश करीत होती, किंचाळत होती, जोर जोराने रडत होती, व त्याची आई तिला सांभाळत होती, समजविण्याचा प्रयत्न करीत होती, आईचे डोळ्यातूनही अश्रू वाहत होते, पण घरात ती मोठी होती. स्वतःसोबत ती सुनेला व नातीला हि सांभाळत होती. लहान भाऊ सुद्धा अश्रू लपविण्याचा प्रयत्न करीत होता.

हा दवाखान्यात होता तोवर घराची संपूर्ण जबाबदारी भावा वर होती. बाबांचे डोळे सुद्धा भिजलेले होते. त्याचा मुलगा चिराग बाबांच्या मांडीवर बसला होता. नकळतं वय होतं त्याचं, काय झालं हे त्याला कळत नव्हतं परंतु घरातील सगळेच रडत आहे, हे बघून तो सुद्धा रडत होता. त्याच्या पत्नीच्या बाजूलाच त्याची लाडकी चिऊ आक्रोश करीत होती, जोरजोराने रडत होती. नेमकं काय झालं असावं हे त्याला कळत नव्हतं, कारण १५ दिवसानंतर आज तो घरी परतला होता. या कालावधीत काय झाले असेल घरी, तो कल्पना करत होता. परंतु त्याला काहीच कळत नव्हते.

चिऊच्या रडण्याच्या आवाजाने तो भानावर आला, आज पहिल्यांदा तो त्याच्या लाडक्या चिऊच्या डोळ्यात अश्रू बघत होता. पण हे सर्व त्याला बघवत नव्हतं… त्याने जोराने आवाज दिला, “चिऊ बेटा रडू नकोस, मी आलोय आता… ” आणि तो हॉलमध्ये आला, परंतु कुणावरही काहीच फरक पडला नाही. त्याच्या येण्यामुळे कुणालाच आनंद झाला नाही.

हॉल मध्ये सगळे रडत होते, आक्रोश करत होते. तो आता जाम घाबरला होता, काहीतरी मोठा अनुचित प्रकार घडला आहे, याचा त्याला अंदाज आला होता. नाहीतर इतक्या आनंदाचे क्षणी सर्व जण इतका आक्रोश का करतील. त्याला तर अपेक्षा होती कि सर्वजण आपले हारफुलांनी स्वागत करतील. सर्व जण मी आल्याचा आनंद साजरा करतील. माझी चिऊ, माझा चिराग अगदी सगळ्यांचे आनंदी चेहरे आज मला बघायला मिळतील. परंतु घरी येताच… त्याची घोर निराशा झाली होती. तो सोफ्यावर बाबांचे बाजूलाच बसला होता. बाबांना तो विचारत होता, “बाबा काय झाले ? हे सगळे इतके का रडत आहे ?” परंतु बाबा काहीच बोलले नाही. बहुतेक त्यांना ऐकू गेले नसेल, कारण त्यांचं वय झालं होतं.

तो उठला भावाजवळ गेला, परंतु हा जाता क्षणी, तो हि उठला आणि बाहेर निघून गेला आणि बाहेर एका कोपऱ्यात जाऊन ढसाढसा रडू लागला. तो पुन्हा उठला आणि त्याच्या पत्नीजवळ गेला. रडून रडून तिचा घसा कोरडा झाला होता, तिच्या डोळ्यातील अश्रू आता आटले होते. ती रडत नव्हती, भान हरपून फक्त एकटक बघत होती. त्याने तिचा हात आपल्या हातात घेण्यासाठी उचलला परंतु तिचा हात त्याच्या हातात येई ना,एकदा, दोनदा, तीनदा, त्याने बऱ्याचदा तिच्या हातांना स्पर्श करण्याचा प्रयत्न केला परंतु तो तिचा हात हातात घेऊ शकत नव्हता, तो शॉक झाला, असं का होतंय माझेसोबत.

तो जोराने ओरडला, परंतु त्याच्या ओरडण्याचा कुणावरच काही फरक पडला नाही. तो चिऊ जवळ गेला, तिच्या डोक्यावरून हात फिरवण्याचा प्रयत्न करू लागला, तिचे डोळे पुसण्याचा प्रयत्न करू लागला, परंतु त्याच्या लक्षात आले कि आपण तिला स्पर्श करू शकत नाही, आणि आपला आवाज आता ह्यांचेपर्यंत पोचत नाही. नेमका प्रकार आता त्याच्या लक्षात आला होता. त्याच्या मनावर जोरदार आघात झाला, तो जोरजोराने ओरडू लागला, आक्रोश करू लागला, परमेश्वरापुढे हात जोडू लागला, विनंती करू लागला, “देवा एकदा तरी माझे शरीर मला परत दे, काही वेळापुरतेच दे, मला माझ्या चिऊशी, माझ्या मुलाशी, पत्नीशी आई बाबा सर्वांशी एकदा भेटू दे, बोलू दे….

परंतु आता वेळ गेली होती….. नियतीने तिचा डाव साधला होता…. आता सगळं संपलं होतं ….

मित्रांनो हि तर काल्पनिक कथा आहे, परंतु अशी वेळ जर स्वतःवर येऊ द्यायची नसेल तर, घरी राहा…. सुरक्षित राहा….. मानव जन्म अनमोल आहे…..

काम, क्रोध, मोह, लोभ, मद, मत्सर या षड रिपूंचा त्याग करा, आणि जीवनातील प्रत्येक क्षण आनंदाने जगा….


नवनवीन व्हिडिओसाठी YouTube चॅनेल

SUBSCRIBE करा!

??



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

क्लिक करून सामील व्हा!

??

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!