Skip to content

मुलगी… खरंच ग्रेट असते….

मुलगी… खरंच ग्रेट असते.


गणेश चरपे


राकेश मुंबईत एका मल्टी नॅशनल कंपनीत चांगल्या पदावर नोकरीला होता. सुखवस्तू कटुंबातील एकुलता एक आणि दिसायला सुद्धा देखणा. त्याचे एका मुलीवर प्रेम होते पण एकतर्फी, तिचे नाव प्रज्ञा, त्याच्याच कंपनी मध्ये इंजिनिअर म्हणून २ महिन्यांआधी रुजू झाली होती, ती दिसायला खूप देखणी होती, नाजूक सडपातळ बांधा, गव्हाळ वर्ण आणि महत्वाचा म्हणजे तिचा शांत स्वभाव, तिला पाहताच राकेश तिच्या प्रेमात पडला होता, परंतु आजवर तिला प्रपोज करू शकला नव्हता कारण ती थोडी अबोल होती, कामाव्यतिरिक्त कुणाशी जास्त बोलत नसे. तरी सुद्धा राकेशने हळूहळू तिच्याशी ओळख वाढविली होती, कारण ती दोघेही एकाच बस ने प्रवास करीत असल्यामुळे कामापुरते हसणे बोलणे होते.

गर्दीच्या वेळी तो तिला जागा करून द्यायचा, तिची काळजी घ्यायचा. परंतु तिला प्रपोज करायची हिम्मत मात्र आजवर झाली नव्हती. गावाकडे त्याचे आई वडील त्याच्या लग्नासाठी घाई करीत होते, त्यांनी मुली बघणे पण सुरु केले होते, म्हणजे यंदा कर्तव्य होतेच, बाबांचा फोन आला कि तो लग्नाचा विषय टाळत असे, पण असे किती दिवस चालणार, तो एकप्रकारे कोंडीत सापडला होता, कारण तो प्रज्ञावर मनापासून प्रेम करत होता, तिला बघितल्यापासून ‘मेड फॉर इच इदर’ ची फीलिन्ग त्याला जाणवत होती, कालच बाबांचा त्याला फोन आला होता, ते म्हणत होते, कि येत्या रविवारी गावाला ये, मुलगी बघण्याचा कार्यक्रम ठरवलाय, तो बाबांशी जास्त काही बोलला नाही, त्याने आपला नाराजी होकार त्यांना कळविला, त्याला यावेळी गावी जाणे भाग होते.

त्याला काही सुचेना कि आता काय करावे ? या विचारातच तो ऑफिससाठी निघाला, बस स्टॉप वर येताच त्याला प्रज्ञा दिसली, नजरानजर होताच दोघांनीही एकमेकांना स्माईल दिली, काही वेळात बस आली, दोघेही बसमधे चढले परंतु बस मध्ये आज खूप गर्दी होती, दोघेही एकमेकांपासून लांब उभे होते, राकेश आज तिला निरखून पाहत होता, तिचे लक्ष जाताच नजर फिरवून घेत होता, एक दोनदा असे झाले, तिच्याही ते लक्षात आले, स्टॉप येताच दोघेही उतरले आणि ऑफिस कड़े जायला सोबत निघाले. राकेशच्या डोक्यात काहीतरी सुरु आहे, हे तिने त्याचा खिन्न चेहरा बघून जाणले, पण ती काही बोलली नाही, आज राकेश शरीरानेच कामावर होता, कामात मात्र त्याचं मन नव्हतं, तो ५ वाजण्याची वाट बघत होता…., आणि ठीक ५ वाजता बेल वाजली आणि राकेश ला हायसं वाटलं, तो मोठ्या स्फूर्तीने बाहेर पडला, आणि प्रज्ञा ची वाट पाहत थांबला, ती येतांना दिसताच त्याने तिला हात दाखविला, तिनेही मान हलवून स्माईल केलं, ती जशी जशी जवळ येत होती, तसे त्याच्या हृदयाचे ठोके वाढत होते.

“चला निघू या…” प्रज्ञा म्हणाली

“हो….निघू या…” हडबडत राकेश म्हणाला

थोडं पुढे जाताच तो तिला म्हणाला, “प्रज्ञा बस यायला अजून वेळ आहे, त्या वेळात आपण कॉफी घेऊ या का ?”

तिने होकारार्थी मान हलवून, “चालेल… घेऊ या” प्रज्ञा म्हणाली

जवळच्याच कॉफी हाऊस मध्ये ते शिरले, आणि बसण्यासाठी नेमका शेवटचा टेबल त्याने निवडला, दोघेही बसले, राकेशने कॉफी ऑर्डर केली,

आणि हलकेच म्हणाला, “प्रज्ञा मला तुझ्याशी काही महत्वाचं बोलायचं आहे.”

ती म्हणाली, “बोला ना..”

त्याच्या हातांना कंप सुटला होता, काय बोलावे, कशी सुरुवात करावी, त्याला काही कळेना….

शरीरातील सर्व शक्ती एकवटून तो बोलला, “प्रज्ञा, तू मला आवडतेस, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, आणि मला तुझ्याशी लग्न करायचंय….. ” राकेश एका दमात बोलून गेला, प्रज्ञा राकेशकडे बघतच राहिली, ती आतून थोडी धास्तावली होती, कारण हे सर्व तिच्याकरिता अनपेक्षित होतं.

राकेशला आता तिच्या उत्तराची अपेक्षा होती… तो आतून बेचैन होता, तिला वाईट तर वाटले नसेल ना. ती आपल्याबद्दल काय विचार करीत असेल, तो अधून मधून तिच्याकडे बघत होता आणि तिच्या expressioin वरून आढावा घेत होता. इतक्यात वेटर कॉफी घेऊन आला,

दोघांनीही कप हातात घेतले. काहीवेळ कुणीच काही बोलले नाही,

थोड्या वेळाने प्रज्ञा बोलली, ” राकेश मला माफ करा, मी तुमच्याशी लग्न नाही करू शकत.” तिने स्पष्टपणे आपला नकार त्याला कळविला होता. तिने कॉफी संपवली आणि कप टेबल वर ठेऊन, “मला आज थोडं मैत्रिणीकडे जायचे आहे, असं बोलून निघून गेली.

तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे राकेश बघतच राहिला त्याला काहीच कळेना काय करावे, त्याने काउंटर वर बिल पेड केले आणि बस स्टॉप कडे निघाला, तिचा नकार ऐकून तो खूप उदास झाला होता, त्याला अपराधीपणा जाणवत होता, आपले काय चुकले, उलटसुलट विचार त्याच्या मनात येत होते, थोड्या वेळात बस आली आणि तो बसमधे चढला आणि रूम वर आला, त्याचं कशातच लक्ष लागत नव्हतं, न जेवताच तो बेडवर आडवा झाला, परंतु झोप हि आज त्याला साथ देत नव्हती, सतत विचारांमुळे डोकेसुद्धा दुखत होते, तिने नकार का दिला ?

या प्रश्नाचे उत्तर त्याला सापडत नव्हते, दुसऱ्या दिवशी बस स्टॉप वर प्रज्ञा त्याला दिसली नाही, त्याचे विचारचक्र अजून जोरात सुरु झाले, ती आज का आली नाही, काय झालं असेल, विचारांनी त्याचं डोकं भांबावलं, त्याचे स्टॉप कधी आले हे पण त्याला कळले नाही, तो ऑफिस मध्ये आला, येताच सर्वप्रथम त्याचे लक्ष प्रज्ञाच्या टेबलकडे गेले आणि तो अवाक झाला, प्रज्ञा त्याच्या आधीच आली होती आणि आपली कामात मग्न होती, त्याला थोडं बर वाटलं तो खुर्चीत बसला, कॉम्पुटर सुरु केले, पण आज त्याचे डोके, हात बधिर झाले होते, रात्री झोप झाली नव्हती आणि सतत विचारांमुळे डोके ठणकत होते….

परंतु नकाराचे नेमके कारण समजल्याशिवाय तो शांत बसणार नव्हता, ५ ची बेल वाजली तो बाहेर पडला आणि प्रज्ञाची वाट बघू लागला, प्रज्ञा आली पण तिने आज त्याच्याकडे दुर्लक्ष केले आणि चालू लागली, थोडं पुढे गेल्यावर राकेश तिच्या बरोबरीत चालायला लागला, आणि तिला म्हणाला, “प्रज्ञा मी तुला लग्नासाठी बोललो, परंतु तू मला स्पष्टपणे नकार दिला, मला माहित नाही तू माझ्याबाबत काय विचार करते ते, परंतु तुला माझ्याबाबत सर्व माहिती आहे, एका मुलीला योग्य जोडीदार म्हणून ज्या अपेक्षा असतात त्यामध्ये मी कुठे कमी पडतो ते मला जाणून घ्यायचे आहे, तुझ्या नकारामागे काहीतरी कारण निश्चित आहे, ते मला जाणून घ्यायचे आहे.

कालपासून माझी काय अवस्था झालीये तुला कल्पना नाही, प्लीज प्रज्ञा एक मैत्रीण म्हणून तरी तू मला सांगू शकतेस ना, प्लिज…प्रज्ञा काहीतरी बोल ना ग.” प्रज्ञा थांबली आणि म्हणाली, “हे बघा राकेश तुम्ही जे काही समजताय तसं काहीच नाही, तुम्ही कोणत्याही मुलीसाठी एक योग्य जोडीदार म्हणून परफेक्ट आहात पण मी तुमच्याशी लग्न नाही करू शकत.” राकेश अजूनच गोंधळला. आणि म्हणाला, “पण का ?, मला कारण तरी कळेल का ?” राकेश तिला वारंवार विनंती करीत होता.

प्रज्ञा शांत होती, राकेश खूपच अपसेट झाला आहे. हे त्याच्या चेहऱ्यावरून तिला स्पष्ट जाणवत होते. ती त्याला म्हणाली, “चला आपण कॉफी घेऊ”. कालच्याच हॉटेल मध्ये ते शिरले, राकेशने कॉफी ऑर्डर केली. राकेश तिच्या उत्तराची वाट पाहत होता.

प्रज्ञा बोलायला लागली, “हे बघा राकेश, मला तुमचे मन दुखवायचे नाही. परंतु माझी विवशता आहे, प्लीज मला समजून घ्या.”

त्यावर राकेश म्हणाला, “प्रज्ञा मी समजू शकतो, तुझ्या नकारामागे निश्चितच काही तरी कारण असेल, कमीत कमी एक मित्र म्हणून तू तुझा प्रॉब्लेम माझेशी शेयर करावा असे मला वाटते.”

“ठीक आहे राकेश” ती म्हणाली, “माझे घरी माझे म्हातारे वडील आणि मी आम्ही दोघेच राहतो. आई ला जाऊन बरेच दिवस झालेत, मला दोन भाऊ आहेत त्यांचे हि लग्न झालीत व ते वेगळे राहतात. बाबांना मागील वर्षी पॅरालीसीस चा अटॅक आला, ते पूर्णवेळ अंथरुणावरच असतात, ते स्वतःहून जेवणही करू शकत नाही, माझे भाऊ अधून मधून बाबांना भेटायला येतात आणि निघून जातात, परंतु बाबांची जबाबदारी घ्यायला कुणीच तयार नाहीत. त्यामुळे त्यांची पूर्ण जबाबदारी माझेवरच आहे, मी लग्न केल्यावर त्यांचे काय होणार. मी लग्न केल्यावर माझा होणारा नवरा त्यांचा स्वीकार करेल का ? त्यांची जबाबदारी घेईल का ? त्याचे घरचे लोक हे मान्य करेल का ? आता तुम्हीच मला सांगा माझे ठिकाणी जर तुम्ही असता तर तुम्ही काय केले असते.” आणि बोलता बोलता तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले,

राकेश शांतपणे ऐकत होता. तो निशब्ध झाला. थोडावेळ कुणीच काही बोलले नाही. राकेश मनोमन विचार करीत होता, आपल्या कर्तव्याची जाण जर तिच्या भावांना असती तर आज प्रज्ञा सुद्धा आपल्या वैवाहिक जीवनात सुखी असती. किती मोठा त्याग करत होती ती. खरंच एक मुलगीच हे करू शकते. त्याला तिच्याविषयी अभिमान वाटला. आणि तो म्हणाला, “प्रज्ञा खरोखर तू ग्रेट आहेस, मला गर्व आहे कि माझी निवड योग्य होती. एक मुलगा म्हणून मी बाबांची जबाबदारी घ्यायला तयार आहे. आता तरी लग्न करशील ना माझ्याशी ?” त्याने तिच्या नजरेत पाहत विचारले…

ती लाजली आणि हसून नजरेनेच त्याला होकार कळविला. त्याने तिचा हात आपल्या हातात घेतला, कायमचा …. कॉफी हाऊस मधून दोघेही बाहेर पडले आणि हातात हात घालून चालू लागले…. आयुष्याच्या नव्या वाटेवर एकमेकांच्या साथीने…


नवनवीन व्हिडिओसाठी YouTube चॅनेल

SUBSCRIBE करा!

??



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

क्लिक करून सामील व्हा!

??

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!