Skip to content

प्रेम, सेक्स आणि लग्न हे लोणच्यातले मसाले.

रिलेशनशिपचं लोणचं घालण्यापूर्वी…!


अपूर्व विकास
(समुपदेशक व मानसशास्त्र तज्ज्ञ)


रिलेशनशिपचं लोणचं घालताय? छान ! आधीच घालून झालंय? छानच ! पण लोणचं घालण्यापूर्वी चवीचा अंदाज घेतलाय? चला घेऊया.

प्रेम, सेक्स आणि लग्न हे या लोणच्यातले मसाले. विवाहपूर्व, वैवाहिक, आणि विवाहबाह्य संबंध या त्यात ओतलेल्या फोडण्या. आणि आपले स्वभाव म्हणजे लोणच्यात मुरायला घातलेले आंबे ! आजवर या लोणच्यावर बरंच बोलून अन् लिहून झालंय. त्या फोडण्यांवरून भांडूनही झालंय. “प्रेम, सेक्स आणि लग्न या मसाल्यांचा परस्परांशी काहीही संबंध नाही,” हा एक वाद. तर, “यांचा फार मोठा संबंध आहे,” हा दुसरा वाद. तुम्हाला सजगता हव्ये? वादातून बाहेर पडा; कारण वाद घालणारे प्रत्येक गोष्टीच्या सर्वव्यापी (objective) व्याख्या देत सुटतात. पण लोणच्याची चव तुमच्या जिभेला घ्यायच्ये; आणि चवी व्यक्तिनिहाय (subjective) असतात. तेव्हा, याबाबतीत सजगता आणणं, म्हणजे :-

१. प्रेम, सेक्स आणि लग्न या मसाल्यांना एकेकटं समजून घेणं;
२. आणि त्याचवेळी त्यांच्यात परस्परसंबंध लावताना तो *आपल्या चवीनुसार* लावणं.

प्रेम एकटं समजून घेताना…
– प्रेम म्हणजे दोघांना एकमेकांबद्दल वाटणाऱ्या आवडीचा स्वीकार. त्याला आदराने दिलेला आकार. जवळिकीच्या इच्छेने, ममतेने, एकमेकांच्या सकारात्मकतेसाठी घेतलेला पुढाकार. ही निव्वळ जिवंत राहण्यापलीकडली सकस जीवनाची मानसिक गरज आहे.
फक्त प्रेम, म्हणजे Platonic love या प्रकारातील नातं मानसिक साथ या मर्यादेत राहतं; ते सेक्सकडे जातंच असं नाही.

सेक्स एकटा समजून घेताना…
– वंश पुढे नेण्यासाठी माणसाने प्रयत्न करावेत म्हणून निसर्गाने माणसाला दिलेलं आमीष, म्हणजे शारीरिक समाधान. त्याची पूर्ती, ही शरीराची एक मूळ गरज. पण फक्त प्रजोत्पादन एवढाच हेतू नव्हे; कारण सेक्स समलिंगीही असतो. शरीरांच्या नग्न मीलनाच्या माध्यमातून, स्वत:च्या uncensored मूळ स्वरूपाला दुसऱ्याने स्वीकाराची पावती द्यावी, ही माणसाच्या अस्तित्वाची गरज. तोच हा सेक्शुअल ड्राईव्ह.
फक्त सेक्स, म्हणजे Infatuation या प्रकारातील नातं no strings attached किंवा friends with benefits या मर्यादेत राहतं; ते भावनिक होतंच असं नाही.

लग्न एकटं समजून घेताना…
लग्न हा व्यवहार आहे. एका सकारात्मक शक्यतेला दिलेला तो हुंकार आहे. दोघांची मानसिक/शारीरिक साथीची गरज भागवता आली तर पाहावी; झालंच तर परस्परांना आर्थिक आणि लौकिक आधार देता यावा; जमलंच तर एका सुरक्षित वातावरणात मुलं जन्माला घालून त्यांना सुयोग्य बौद्धिक-भावनिक-शारीरिक संगोपनाची संधी मिळावी, ही ती शक्यता.

लक्षात घेण्याची गोष्ट ही, की हा एक रस्ता आहे; जो प्रेम, सेक्स आणि सुरक्षा यांची फक्त उपलब्धी देतो. रस्ते कुठेच जात नसतात; आपल्याला त्यावरून चालावं लागतं. हवं असलेलं तेव्हाच मिळतं, जेव्हा दोघंही या चालीला स्वीकारतात आणि आचरतात.

आता, या मसाल्यांचे परस्परसंबंध कसे असू शकतात, ते पाहू.

प्रेमापासून सेक्सपर्यंत…

इथे आवडीला जोड मिळते आकर्षणाची. ही जोड निव्वळ मानसिक साथीत शारीरिक समाधानाची बेरीज म्हणून असू शकते. “आधी न केलेलं नवं काही करून पाहूया,” हा भाव असू शकतो. किंवा प्रेमाचाच एक उत्कट आविष्कार या अर्थानेही सेक्सचा एक माध्यम म्हणून स्वीकार असू शकतो – म्हणूनच इंग्लिशमध्ये अशा सेक्सला “making love” म्हणतात.

सेक्सपासून प्रेमापर्यंत…

कधीकधी निव्वळ शारीरिक पातळीवरची जवळीक एकमेकांच्या मनाचे थांग देऊन टाकते. खासकरून प्रणयात, climaxच्या वेळ थांबवणाऱ्या बेधुंद क्षणी, दोघांना orgasm एकाच वेळी आल्यास, निसर्ग शारीरिक पातळीची ही compatibility मानसिक पातळीवरही असेल का, हे तपासायला सुचवतो दोघांतल्या एकाला. किंवा कधीकधी शारीरिक आनंदासाठी सुरू केलेलं dating, पुन:पुन्हा होणाऱ्या जवळिकीतून, एकमेकांच्या स्वभावाचे परस्परांना आवडू शकणारे भाग दाखवतं. तेव्हा सेक्सपासून प्रेमापर्यंत प्रवाह घडतो.

प्रेम, सेक्स आणि लग्न…

इथे अर्थातच तीन दिशा आहेत, जिथून प्रवास सुरू होऊ शकतो; आणि अनंत दिशा आहेत, जिथे मुक्काम होऊ शकतो. प्रेमापासून लग्नापर्यंत; किंवा लग्नापासून लग्नोत्तर झालेल्या प्रेमापर्यंत. सेक्सपासून व्हाया प्रेम लग्नापर्यंत; किंवा लग्नोत्तर सेक्सपर्यंत. आणि हो, यातलं काही एक गळूनही जाऊ शकतं. एखादं लग्न सेक्सविना Platonic प्रेमापर्यंत मर्यादित राहू शकतं. एखादं लग्न प्रेम नसलेली निव्वळ शारीरिक घसट या ‘सोयी’त बदलू शकतं. किंवा कधी प्रेम आणि सेक्स दोन्ही नसून, फक्त एक सामाजिक सुरक्षा उरते. किंवा तीही न राहता फक्त एक ड्रामा, या पातळ्याही आढळतात.

रिलेशनशिपमध्ये समाधान मिळवणं, म्हणजे या लोणच्यात आपल्याला कोणत्या चवी हव्या आहेत ते ओळखणं; त्यांच्याशी प्रामाणिक राहून पार्टनरशी संवाद साधणं; आणि जिथे दोघांनाही सेम चवी हव्या आहेत, तिथे लोणचं मुरवायला घेणं.

यापुढे विवाहपूर्व, वैवाहिक आणि विवाहबाह्य संबंधांच्या फोडण्या येतात. आपल्या गरजा, त्यासाठीचं माध्यम, त्याच्या परिणामांची माहिती, आणि या साऱ्याचा स्वीकार, यात संलग्नता हवी. तीच ही सजगता. यात चूक आणि बरोबर हे व्यक्तिसापेक्ष असतं. स्वत:शी सजगता आणि दुसऱ्याशी संवाद नसल्यास नुकसान, फसगत किंवा शोषण होऊ शकतं. तिथे आपण चूक. सजगता आणि संवादाने एकवाक्यता असेल, तिथे आपण बरोबर. विषय सरळ आहे हा.

“मी विनालग्न संबंध ठेवू का?”

– कशासाठी ठेवायचेत? फक्त सेक्स म्हणून? फक्त प्रेम म्हणून? प्रेम आणि सेक्स म्हणून? या दोघांतल्या कोणत्या टप्प्यावर आहोत आपण? लग्नाची शक्यता राखायच्ये? ती शक्यता तपासण्यासाठी म्हणून हे संबंध? का अशाने विवाहाची निश्चिती होईल असं वाटतंय म्हणून? का लग्नाचा संबंधच ठेवायचा नाहीये? का “मी हे नंतर सांगू शकेन,” असंय?

– जे काही असेल, त्याचा संवाद स्वत:शी आणि पार्टनरशी त्या-त्या प्रत्येक टप्प्यावर व्हायला हवा. “लग्नाचं आमीष दाखवून बलात्कार” या बातमीतले पीडित आणि खलनायक यांच्या भूमिकेत आपण नको, असं वाटतंय? मग जरूर हा विचार करा.

“मी लग्न करू का?”

– कशासाठी? प्रेम आहे म्हणून? नंतर मिळावं म्हणून? मिळण्याबरोबरच द्यायचीही इच्छा आहे म्हणून? त्याचबरोबर सेक्स म्हणून? की फक्त सेक्सची सोय म्हणून? सामाजिक नियम म्हणून? की फक्त घरचे मागे लागलेत म्हणून? आपले लग्नाआधी दुसऱ्याशी संबंध होते? समोरच्या व्यक्तीचे असल्यास चालणारेत? मुलं हवीत की नको? आचारापासून आहारापर्यंत जगण्याच्या कल्पना काय आहेत? आर्थिक नियोजन कसंय?

– पुन्हा तेच. स्वत:शी आणि पार्टनरशी संवाद. लक्षात घ्या; या प्रत्येक मुद्द्यात तुमचं स्वत:चं मत असू शकतं. अगदी लग्नाआधीच्या virginity सहित. तुम्हाला अधिकार आहे, मत असण्याचा. आणि त्याच्या व्यक्ततेचाही. कायद्यानुसार “तू virgin आहेस का?” असं आपण विचारू शकत नाही. पण “नसल्यास मला चालेल का,” हे तर आपण निश्चित सांगू शकतो; जेणेकरून समोरच्या व्यक्तीलाही तिचे निर्णय घेता येतील. आणि हो, यावरून कुणी कुणाचं समीक्षण करू नये. जो तो आपापल्या जागी बरोबर असतो.

“मी विवाहबाह्य संबंध ठेवू का?”

– का? लग्नात उपलब्ध नसलेलं काय बाहेर शोधताय? सेक्स? प्रेम? स्वीकार? घरात कुणी समजून घेत नाही? बोलायला कुणी नाही? बौद्धिक गरजा? पैसा? करिअरचे हिशेबी हितसंबंध म्हणून? का आयुष्यात एक थ्रील हवंय म्हणून?

– इथे एक स्पष्टता हवी. लग्नाच्या पार्टनरमध्ये ढीगाने कमतरता असतील. पण डिवोर्स न घेण्याची निवड आपलीच आहे ना? कारणं अनेक असतील – सामाजिक प्रतिष्ठा सांभाळण्यापासून पोराबाळांच्या आर्थिक सुरक्षेपर्यंत काहीही. मुद्दा हा आहे की लग्नाबाहेर मिळणाऱ्या गोष्टींबरोबरच, बिघडलेल्या लग्नातही असं काही आहे, जे आपल्याला हवंय. म्हणजेच आपल्याला दोन दरडींवर पाय ठेवायचाय; कारण चवीची मिळकत दोन्हीकडे आहे आणि ती आपल्याला हव्ये. इथे सजगता ही, की मिळकतीची किंमत असतेच. यातून जे काही परिणाम घडतील, त्याची जबाबदारी संपूर्णत: आपली आहे. मग त्यात भविष्यात बिंग फुटल्यास व्यभिचाराच्या शिक्क्यापासून लग्नाच्या पार्टनरच्या मानसिक आघातापर्यंत सारंच आलं.

ज्याच्याकडे स्वत:ला आवडणाऱ्या चवींची जानकारी आहे आणि त्या संवादात स्पष्टपणे मांडण्याची दिलदारी आहे; आणि हो – आपल्या चवीत दुसऱ्याच्या चवी मिसळून घेण्याची अदाकारी आहे, त्याच्या रिलेशनशिपचं लोणचं झकास होतं !

{कृपया लेख शेअर केल्यास लेखकाच्या तपशीलासहित करावा, ही नम्र विनंती. शेअरिंगबद्दल आभार ! आवडल्यास जरूर कळवा !}



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram

5 thoughts on “प्रेम, सेक्स आणि लग्न हे लोणच्यातले मसाले.”

  1. Santosh s kanse

    खूप मस्त वाटलं काही तरी समजण्या साठी विषय आहे अति सुंदर लेख आहे

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!