प्रेम
” प्रेम ” ही चिरंतन भावना आहे. याची कोणतीही व्याख्या नाही करता येत. मुळात चौकटीत नाही बसवता येत. प्रेम ही वैश्विक भावना आहे. सर्व प्राणी मात्रांवर प्रेम हवं.
प्रेम हा शब्द उच्चारला की फक्त स्त्री-पुरूष प्रेम एवढीच संकुचित समाजाची आपली व्याख्या आहे. त्यातही फक्त शारीरिक प्रेम.. मग आपण कोणाहीबद्दल कसेही मत व्यक्त करू शकतो. शारिरीक जवळीक ही फक्त प्रेम व्यक्त करण्याचे एक माध्यम आहे. कारण जिथे शब्द संपतात तिथे स्पर्शाची भाषा सुरू होते. मग ते आलिंगन असो किंवा पाठीवर शाबासकीची थाप किंवा डोक्यावरून मायेनं फिरवलेला हात.. हा गरजेचा तितकाच नैसर्गिक असतो. पण आपल्या समाजाची याकडे पाहण्याची नजर फारच क्षीण आहे.
प्रेम अगदी पहिल्या नजरेत होतं की हळूहळू सवयीने होतं.. हा वेगळा मुद्दा आहे. केवळ 24 तास एकत्र राहत असलो तरीही , समाजाची संकुचित मान्यता असली तरीही प्रेम असेलच असे नाही.. या ह्रदयीचे त्या हृदयी असे धागे असतील तरच प्रेम अस्तित्वात येतं. वृद्धींगत होतं. त्याकरिता मनं जुळावी लागतात. अगदी सगळ्या नात्यात हे घडतं. आपल्या आजूबाजूला एवढी नाती असतात सगळ्यांशीच आपलं नाही जमत. जिथे ही नाळ जुळते ते प्रेम..
एक स्त्री म्हणून मला जाणवलेली महत्वाची गोष्ट म्हणजे स्त्री ला मनापासून प्रेम , कौतुक , माया हे सगळे हवं असतं. कारण ती मातृत्व लेऊनच आलेली असते. या भावना तिच्या इतक्या कोणीच जाणू शकत नाही. त्यामुळे तिला या हव्या असतात. पण गरज असणे आणि हवं असणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. कोणत्याही नात्यात स्त्री ला प्रेम हवंच असत पण तिला सन्मान ही हवा असतो. तिच्या स्त्रीत्वाचे आकर्षण प्रेम वाटणे स्वाभाविक आहे पण एका पातळीवर तिला एक व्यक्ती म्हणून सन्मान मिळावा असे नक्कीच वाटतं. स्त्री ने स्वतःचा स्वाभिमान पायदळी तुडवून प्रेमाची याचना करू नये. प्रेमात विश्वास आणि आदर या महत्वाच्या बाबी आहेत. आणि त्या दोन्हीकडून समान पातळीवर यायला हव्यात.
एकमेकांना आहे तसं स्वीकारणं , एकमेकांना स्वतःची स्पेस देणं , समजून घेणे , वेळप्रसंगी पालक होता येणं , विश्वास , आदर , योग्य वेळी कौतुक हे सगळे प्रेमाचे विवीध स्तर आहेत.
यापैकी एकातही न्यून असलं तरी नाजूक नात्यात तडा जाऊ शकतो. प्रेम असतं किंवा प्रेम नसतं… प्रेम तुम्हाला माणूस म्हणून प्रगल्भ करतं. नवीन आव्हानाना सामोरं जाण्याचं धाडस देतं. तुमचा आत्मविश्वास वाढवतं. मग ती व्यक्ती तुमच्या जवळ नसली तरीही. तुमच्या आयुष्यात नसली तरीही. तुम्हाला सतत प्रेरणा मिळत राहते. ज्याची आयुष्यभर जपणूक केली जाते ते खरं प्रेम. जे तुम्हाला माणूस म्हणून समृध्द करतं..
प्रेमाला एका चौकटीत बसवता येत नाही.. प्रेम म्हणजे राधा-कृष्ण .. प्रेम म्हणजे ही चराचर सृष्टी … प्रेम म्हणजे तुम्हां आम्हां सर्वात वसत असलेला परम ईश्वर…….
वर्तमान सुसाह्य होईल येईल.


लेख आवडला
खुपचं मस्त कारण काही वेक्तीना प्रेम म्हणजे काय असतं हे काही माहित नाही काही वेक्ती शारीरिक आकर्षण होत त्याला प्रेम समजून बसतात आणि आयुष्याच नुकसान करून घेतात खूपच छान लिहिला आहात तुम्ही ??