Skip to content

जिथे आनंद-समाधान नांदत आहेत…त्या दिशेने जाऊया…

“उठा आणि जोरात सुटा”


जयश्री हातागळे


(हसलात ना? हसायलाच पाहिजे)

आयुष्य अनिश्चित आहे तरीही आपण एवढे निश्चिंत कसे? निवांत कसे? उदास, निराश, हताश कसे? एवढा वेळ आहे आपल्याकडे?

खरंतर, आपल्याकडे किती वेळ आहे हे जर आपल्याला माहित नाही… तर कशाला रडत बसायचं? कुढत बसायचं? प्रत्येक रात्रीनंतर दिवस येतो आणि प्रत्येक दिवस हा नवीन असतो…. एक नवीन उमेद घेऊन येतो…. आणि आपण!… आपण मात्र ‘काल’ मध्येच जगत असतो. जो दिवस सरून गेला आहे, जी वेळ निघून गेली आहे, जे घडून गेलं आहे त्याच गोष्टींचा विचार करून आपला आजचा दिवस ही नकळत खराब करत असतो,वाया घालवत असतो.
“रात गयी, बात गयी” हे तर तुम्ही ऐकलेच असेल ना? मग, द्या ना सोडून कालचं कालवर…. आणि नवीन सुरुवात करा. चुका झाल्या असतील पण अनुभव तर मिळालाच असेल ना?

कोणीतरी अपमान केला, कोणीतरी वाईट बोलले… लगेच आपण उदास होतो, निराश होतो. ती व्यक्ती आपल्याला असे का बोलली? आपण इतके वाईट आहोत का? पुढचे तीन-चार दिवस आपण हेच उगाळत बसतो. विनाकारण आपण त्या व्यक्तीला महत्व देत असतो. बोलणारी व्यक्ती बोलून जाते, आपण मात्र स्वतःला त्रास करून घेत असतो.
खरंतर, अशा गोष्टी एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून द्यायच्या असतात.
काही गोष्टी सोडून दिल्या ना… मन खूप हलकं होतं…. “खरंच”…. म्हणून नेहमीच त्रासदायक गोष्टींकडे आवर्जून दुर्लक्ष करायचं, आनंदी राहण्याचा एकच मंत्र…. “ओम् इग्नोराय नमः”…. आपण चांगले आहोत ना? मग, वाईट लोकांचा विचार कशाला करायचा? बोलू देत त्यांना काय बोलायचंय ते…. कुछ फर्क नहीं पडता…..

आज खूप उदास वाटतंय! असं जर कधी वाटलं ना? लगेच जागा बदलायची… घरात असाल तर सरळ कुठेतरी बाहेर निघून जायचं…. मस्त आवडीचं काहीतरी खायचं… मस्त हेडफोन लावून एखाद्या पार्कमध्ये बसून मनाला उत्साहाने भरतील अशी सुंदर गाणी ऐकायची… नाहीतर ऐकाल दुःखी गाणी, sad songs…. म्हणजे झालंच, डोळ्यातून गंगा-जमुना आल्याच समजा…. संगीत हे सुद्धा एक मेडिसिन आहे, औषध आहे…. आपल्या मनावर दोन्ही प्रकारे परिणाम कारक ठरतं… आनंदातही आणि दुःखातही….
शक्य असेल तर एखाद्या मूव्हीला जा…. एखाद्या मित्र- मैत्रिणीला फोन करा… छान वाटेल….

नाहीतर बेस्ट वे… आईशी बोला, तिला सांगा तुमची समस्या… ती नक्की काहीतरी सोल्युशन काढेल…. तिला तिच्या बद्दल विचारा…. तीलाही खूप छान वाटेल….आईशी बोलल्यावर देखील ही उदासी, ही निराशा कुठल्या कुठे पळून जाईल तुम्हालाही कळणार नाही….

बऱ्याचदा आपल्यामध्ये अनेक गोष्टींचा न्यूनगंड असतो. काहींना वाटतं, मी सुंदर नाही दिसत, माझी personality आकर्षक नाही म्हणून सहसा मी लोकांमध्ये मिसळत नाही, घरातून बाहेर पडणं टाळते/ टाळतो….

कोणती पर्सनॅलिटी? कुठलं सौंदर्य? हे सुंदर दिसणं वगैरे हे काही आपल्या हातात नसतं… त्यामुळे आपण जसे आहोत तसेच आपण स्वतःला स्वीकारले पाहिजे…. आपण स्वतः स्वतःवर प्रेम केले पाहिजे….. आपण जर स्वतःवर प्रेम करू शकलो नाही, तर इतरांवर काय करणार????

खरंतर प्रत्येक व्यक्ती ही युनिक असते. प्रत्येक व्यक्तीचं एक वेगळेपण असतं. ते जपता आलं पाहिजे.

सौंदर्याची व्याख्या एकच नाही. ती प्रत्येक व्यक्तिगणिक बदलते…. केवळ चेहरा सुंदर असून उपयोग नाही… आपले वर्तन देखील सुंदर असले पाहिजे…. आपले मनही तेवढे सुंदर असले पाहिजे… आपल्या वागण्यातील नम्रता हे खरे सौंदर्य! स्वच्छता, नीटनेटकेपणा हे खरे सौंदर्य!!!

काळ्या रंगाला काय म्हणतात माहिती आहे ना? “काळं म्हणजे मोत्याचं जाळं”

काळा-गोरा असा जर भेद होत असेल… तर एक विचार करा. काळ्या व्यक्तीच्या आणि गोऱ्या व्यक्तीच्या शरीरामध्ये असणारा हाडांचा सापळा हा कोणत्या रंगाचा असतो किंवा कसा असतो? खरंतर तो एकसारखा असतो त्या दोन्ही व्यक्तींच्या सापळ्यामध्ये यत्किंचितही फरक नसतो…. प्रत्येक व्यक्ती ही आतून एक सारखीच असते… तिथे कुठलाही वर्णभेद नसतो…. मग, बाह्य सौंदर्याला एवढं महत्त्व का द्यायचं????

खरंतर “सौंदर्य हे बघणाऱ्याच्या नजरेत असते….”…’जशी दृष्टी, तशी सृष्टी”…..

जर म्हटलंच तुम्हाला कोणी… तू कुरूप आहेस, सुंदर नाहीस… तर त्याला स्पष्ट शब्दात उत्तर द्या… बाह्य सौंदर्य हे वयासोबत संपुष्टात येणार आहे… एखाद्या अपघातामुळे ते नष्ट होऊ शकते… तुझ्या आणि माझ्या शरीरात असलेला हाडांचा सांगाडा, सापळा अगदी सेम टू सेम आहे… त्यामुळे बाहेरुन जरी आपण वेगळे असू तरी आतून प्रत्येक व्यक्ती केवळ एक हाडांचा सांगाडा आहे….

आहे की नाही गंमत? मग आज पासून सौंदर्य हा विषय गौण मानायचा… आपण आहोत तसेच छान दिसतो… हे स्वतःला पटवून द्यायचं….

बऱ्याच जणांना उंचीचा प्रॉब्लेम असतो… माझी उंची कमी आहे… म्हणून मी दुःखी आहे… असू द्या ना उंची कमी… काय फरक पडतोय? तुमच्या विचारांची उंची वाढवा… तुमच्या कामाची उंची वाढवा….
टेन्शन नहीं लेनेका….
बडे- बडे देशो में ऐसी छोटी- छोटी बातें होती ही रहती है!!!!

काय???? मी खूप जाड झालीये… मी खूप बेढब दिसते/दिसतो… आता या गोष्टीचा टेन्शन घेऊन बसणार आहात का? उपाय शोधा… प्रयत्न करा…. जीवनशैलीमध्ये बदल करा… सतत खाणं बंद करा…. आरोग्यदायी जीवनशैली स्वीकारा…. रोज चालायला जा… व्यायाम करा… योग्य आहार घ्या… निरोगी रहा….

खरंतर “आहार हेच औषध”हे तुम्ही वाचलं असेल, अनेकदा ऐकलंही असेल…. मग, विचार कसला करताय? Follow करा ते….
हल्ली “डॉक्टर दीक्षित डायट” खूप प्रचलित आहे. ते देखील तुम्ही फॉलो करू शकता…. अनेकांना या डायट मुळे प्रचंड फायदा झाला आहे… मी स्वतः हे डायट फॉलो करते…. डॉक्टर दीक्षित एक वाक्य नेहमी बोलतात, त्यांच्या व्याख्यानांमध्ये… ते म्हणजे ” या डायटला तुम्ही तुमची लाइफस्टाइल बनवा” फक्त दिवसातून दोन वेळा जेवायचं. तेही कडकडून भूक लागल्यावर आणि दोन जेवणांच्या मध्ये काहीही खायचे नाही… फक्त पाणी पिणे अथवा फार भूक लागली तर ताक अगर दोन फोडी टोमॅटोच्या खाणे… एवढंच ते सांगतात…
करुन बघा… सोप्पं आहे…

या डायट बद्दल सविस्तर माहिती हवी असल्यास… युट्युब वर जाऊन डॉक्टर दीक्षित डायट सर्च करा….

कोणतीही गोष्ट करताना त्यात सातत्य असणे गरजेचे आहे… या डायट सोबत पंचेचाळीस मिनिटांमध्ये साडेचार किलोमीटर चालणे देखील अपेक्षित आहे अथवा स्विमिंग करा, सायकलिंग करा….

हा लठ्ठपणाचा जो जागतिक प्रश्न आहे…. तो नक्की निकाली लागेल. स्त्री-पुरुष दोघेही हे डायट फॉलो करून या समस्येतून मुक्त होऊ शकतात.

आजच ठरवा…. आणि निरोगी होऊन मिरवा…. हसलात ना? हसायलाच पाहिजे…

आणखी एक…जरा…. मनात डोकावून बघा, काय काय दिसत आहे ते?… काय? खूप कचरा भरलाय ना? राग, मत्सर, द्वेष, घृणा, तिरस्कार, तुलना अजून काय काय??? तुमचं मन हे काय डस्टबीन आहे का? ज्याच्यात तुम्ही एवढी घाण भरून ठेवली आहे. कधी घर आवरलंय?…… कसं आवरता? नको असलेलं फेकून देता ना? धूळ बसली असेल कशावर तर झटकून, पुसून घेता ना? कामाच्या वस्तू ठेवून, न लागणाऱ्या अनावश्यक वस्तू कचर्‍यात फेकून देता ना? मग, मनाच्या बाबतीत असे का? सगळे वाईट, दुःखी प्रसंग का साठवून ठेवलेत मनात? कोळसा कितीही उगाळला तरी तो काळाच…. मग, किती वर्षे सांभाळणार आहात… उगाळणार आहात या दुःखी प्रसंगांना, किती दिवस चर्चा करणार आहात…? आपल्याला न् आवडणाऱ्या व्यक्तींबद्दल… त्रासदायक व्यक्तींबद्दल…..

काही गोष्टी या वेळेवरंच सोडून द्यायच्या असतात…. काही प्रश्न जर सुटत नसतील तर, ते प्रश्नच सोडून द्यायचे असतात…. काही गोष्टी सोडून देण्यात देखील एक वेगळाच आनंद असतो.

कशाला करता तुलना कोणाशी? कोणाची संपत्ती बघून, कोणाचं ऐश्वर्य बघून आपल्याला का त्रास व्हावा? ते त्यांच आयुष्य जगतात.. ते त्यांच्या विश्वात जगतात… ते येत नाहीत ना आपल्याशी तुलना करायला? मग, आपण का त्यांच्याशी तुलना करून विनाकारण दुःखी व्हायचं?

सगळं जर इथेच सोडून जायचं आहे तर…..तर या अवास्तव वस्तू जमविण्याच्या फंदात शहाण्या माणसाने पडू नये… सहज उपलब्ध होत असतील तर नक्की त्या वस्तूंचा उपभोग घ्यावा… फक्त पैशांच्या मागे पळणे आणि अमाप संपत्ती जमवणे म्हणजे जीवन नव्हे….. म्हणजे जगणे नव्हे…. जे आहे त्यातही माणसाला समाधानी राहता आलं पाहिजे.

मोठी- मोठी स्वप्न बघा, स्वप्न पूर्ण करा पण स्वप्नांच्या मागे धावताना जगणं विसरू नका. नाहीतर स्वप्न पूर्ण व्हायची आणि आपली जाण्याची वेळ जवळ यायची…

फक्त संपत्ती कमवायची आणि त्या संपत्तीचा उपभोग घेण्या आधीच आपली वेळ संपून जायची…. असं होऊ नये म्हणून जगता – जगता कमवा परंतु कमवता – कमवता जगू नका…..

अजून एक खूप मोठा न्यूनगंड- मला चार चौघात बोलता येत नाही, मला स्टेजवर बोलायला भीती वाटते… त्यात काय एवढं? बर्‍याच जणांच्या बाबतीत हे घडतं… जोपर्यंत आपण तानसेन नाही बनत…. तोपर्यंत आपण कानसेन बनायचं… बोलता येत नाही…. ऐकता येतं ना???मग, जायचं संमेलनं, शिबिरं अटेंड करायची निरीक्षण करायचं बोलणाऱ्या व्यक्तींचे…

हळूहळू थोड्या प्रमाणात चार-चौघांमध्ये बोलायचा प्रयत्न करायचा, हल्ली भाषणं कशी करावीत याचे देखील क्लासेस घेतले जातात… पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे क्लासेस घेतले जातात…. त्याठिकाणी जाऊन आपण आपल्या मध्ये खूप चांगले बदल घडवून आणू शकतो….. मग, लागा आजपासूनच कामाला….
हवं तसं घडवा स्वतःला….

हसताय ना? हसायलाच पाहिजे….!!!
“चला हवा येऊ द्या” मधलं हे वाक्य मला प्रचंड आवडतं…

माझ्या काही मैत्रिणी आहेत… “गावंढळ” बोलण्याची त्यांना लाज वाटते… म्हणून त्या बोलण्याचे टाळतात… चारचौघांमध्ये मिसळायला नको म्हणतात… आधी गावाकडे रहायच्या आता शहरात राहतात… जन्म जर गावात झाला असेल तर आपल्या बोलण्यामध्ये त्या ठिकाणच्या भाषेचा एक लहेजा असतो, लकब असते…. आपण काय बोलत आहोत हे समोरच्याला कळलं ना…. मग बास झालं… भाषेचा उपयोग तेवढाच… समोरच्याला आपल्या भावना कळणं…. मग, भाषा गावंढळ असो, अशुद्ध असो, नाहीतर शुद्ध असो… भावना पोहोचणं महत्वाचं…. आपण ज्या मातीत जन्मतो, त्या ठिकाणचे गुणधर्म नकळत आपल्यात रुजतात… सैराट पिक्चर पाहिला आहे ना? त्यातले सगळे डायलॉग पाठ असतील…. एक वेगळाच गोडवा असतो आपल्या बोलीभाषेत…
त्यामुळे आनंदी राहा….

अजून एक…. इंग्रजी – बिंग्रजी यायची तशी काहीच गरज नाही….. इंग्रजांना कुठे येते मराठी??? मग, टेन्शन नाही घ्यायचं….
आणि हो, हसताय ना? हसायलाच पाहिजे….!!!

वेळेला गृहीत धरू नका, आयुष्याला गृहीत धरू नका, आयुष्याचा काहीच भरोसा नाही… आज आहे तर उद्या नाही….. वेळेचा सदुपयोग करा, स्वतःवर प्रेम करा, इतरांवर प्रेम करा, वाईट बोलू नका, वाईट चिंतू नका, इतरांना मदत करा… केवळ घेण्यापेक्षा… देण्यामध्ये एक वेगळंच समाधान असतं…. आपल्याकडे असलेल्या अतिरिक्त वस्तू, अनावश्यक वस्तू ह्या एखाद्याची गरज असू शकतात… त्यामुळे वेळोवेळी त्या वस्तू एखाद्या गरजवंतापर्यंत नक्की पोहोचवा…. त्याची गरज भागेल आणि तुम्हाला समाधान मिळेल… सोबत आशीर्वाद देखील मिळतील…

आपण खूप बोलतो, विनाकारण बोलतो, अनावश्यक बोलतो, त्यामुळे बोलण्यापूर्वी विचार करा, विचार करून बोला, शब्दांना धार असते… माहित आहे ना? असं म्हणतात मारलेले व्रण बुजतात…. परंतु बोललेले व्रण, ओरखडे मनावर तसेच राहतात…. वर्षानुवर्षे…..

माणसाचा मेंदू हा खरंच खूप सुपीक असतो…. अनेक नव-नवीन कल्पनांचा खजिना असतो…. अनेक आश्चर्यचकित करणाऱ्या गोष्टी तुम्ही पाहिल्या असतील… ज्या मानवनिर्मित आहेत… अनेक इमारती, रस्ते, पूल, अनेक उपकरणं, अनेक कंपन्या, उद्योग- धंदे, निरनिराळे शोध हे सगळं माणसाच्या मेंदूची करामात आहे…त्यामुळे तुम्हाला सुचणाऱ्या कल्पनांना असंच वाऱ्यावर सोडू नका… त्या कल्पना प्रत्यक्षात उतरवण्याचा प्रयत्न नक्की करा…. एक आयडिया तुमचं आयुष्य बदलू शकते… हे माहित आहे ना? कोण जाणे एखादी भन्नाट आयडिया तुम्हाला यशाच्या उंच शिखरावर नेऊन ठेवेल… तुमचं संपूर्णआयुष्य बदलून जाईल…. त्यामुळे नेहमी नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न करत राहा… लिहून ठेवा तुम्हाला येणाऱ्या आयडिया, एखाद्या डायरीमध्ये आणि काम करा त्यावर… नेहमीच इतरांना फॉलो करण्यापेक्षा… आपल्यालाही इतरांनी फॉलो करावं… म्हणून तेवढ्या उंचीवर नेऊन ठेवा तुमच्या आयुष्याला….

हसत खेळत जगा, आयुष्याकडे कल्पकतेने बघा…. खरंच आयुष्य खूप सुंदर आहे…. वाईटातही चांगलं जेव्हा आपण शोधायला लागतो ना? तेव्हा आयुष्य अजूनच सहज आणि सुखकर होत जातं…..

पुनर्जन्म होईल न् होईल कोणास ठाऊक? परंतु या जन्मात खूप छान जगा… आयुष्याकडे सकारात्मकतेने बघा, स्वतः जगा इतरांना जगू द्या, चांगले कर्म करा, दान-धर्म करा… हसत रहा, हसवत राहा…. स्वतःची ओळख निर्माण करा… ध्येय ठरवा, ध्येय गाठा…..

इतर कोणी लिहिणार नाही, तुम्हीच लिहा तुमच्या आयुष्याचं एक सुंदर पुस्तक…. आणि एक आठवणींच सुंदर “मोरपंख” त्यात ठेवायला विसरू नका…

परतीचं तिकीट आपलं निश्चित आहे… त्यामुळे हा जीवनप्रवास अविस्मरणीय, अद्वितीय बनवणं आपल्याच हातात आहे….
हसताय ना? हसायलाच पाहिजे….!!!

“उठा आणि जोरात सुटा” हे शीर्षक देण्यामागचे कारण…. आपल्याला त्रासदायक वाटणाऱ्या गोष्टींपासून, आपला अपमान करणाऱ्या लोकांपासून जाणीवपूर्वक दूर जायचं…. आयुष्याला गृहीत न धरता…. प्रत्येक दिवस भरभरून आनंदाने जगायचा…. आपल्याकडे वेळ कमी आहे म्हणून उठायचं आणि जोरात सुटायचं….. जिथे आनंद आहे, समाधान आहे त्या दिशेने…

हा लेख कसा वाटला? जरूर कमेंट करा..


नवनवीन व्हिडिओसाठी YouTube चॅनेल

SUBSCRIBE करा!

??



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

क्लिक करून सामील व्हा!

??

3 thoughts on “जिथे आनंद-समाधान नांदत आहेत…त्या दिशेने जाऊया…”

  1. खूपच छान!. प्रेरणादायी व सकारात्मक

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!