Skip to content

लैगिक शिक्षण नसल्याने घटस्फोटाचे प्रमाण अधिक !!

लैगिक शिक्षण नसल्याने घटस्फोटाचे प्रमाण अधिक !!


अनिल भागव


लैंगिक शिक्षण या विषयाचा जेवढा अभ्यास गेल्या अनेक वर्षांत केला आहे त्याप्रमाणे सांगतो. लैंगिक शिक्षणाला केव्हा सुरुवात करावी? लैंगिक कुतूहल मुलाच्या मनात जागृत होईल तेव्हा. या प्रश्नाचं उत्तर सहा महिने वगैरे अविश्वसनीय असतं, हे नीट विचार केला की लक्षात येईल. दोन वर्षांच्या पुढे मुलं साधारणपणे अवघड प्रश्न विचारायला सुरुवात करतात.

मी आणि बायको शोभा वैद्यकीय शाखेतले नाही. पण आम्ही अनेक वर्षांपासून पालक-शिक्षणाचे वर्ग घ्यायचो. पुढे अभ्यास करून काही वर्षांत आम्ही लैंगिक शिक्षण द्यायला लागलो. काही लोकांच्या मनात असा प्रश्न असेल की, शारीरिक, लैंगिक संबंधांविषयी लेख लिहिण्याजोगं काय आहे? ते सगळं आपोआप समजतंच. एका दृष्टीने हा मुद्दा खरा आहे. संपूर्ण लैंगिक संबंधांचं वर्णन एका वाक्यात करून हा विषय संपवता येईल. पण शरीरसंबंधांच्या प्रक्रियेसाठी खूप मोठं रामायण डोक्यात चालू असतं. त्याविषयीची समज नसली तर महाभारत होतं, त्यासाठी हे लिखाण. आम्ही शरीररचनेविषयी काही न बोलता मानसशास्त्रीय भागावर अधिक बोलायचो. ते लोकांना आवडत गेलं आणि हळूहळू आमचाही अभ्यास वाढला, कार्यक्रम वाढले. सध्या जी परिस्थिती आहे त्यात पाण्यात पडलं की नाकातोंडात पाणी जातं, हेच खरं आहे. लैंगिक शिक्षणाला काही पर्याय नाही. मानव हा एकटाच प्राणी कपडे वापरतो. तसंच मानव हा एकटाच प्राणी लैंगिक संबंधाच्या वेळी एकांताचा हट्ट धरतो. या अटी आल्या की त्याचं शिक्षण ओघानेच येतं. योग्य वागण्यासाठी आणि अयोग्य ते टाळण्यासाठी.

पुरुष लग्नं करतात त्यामागे मनाजोग्या स्त्रीशी हक्काने करता येणारा लैंगिक संबंध हेही महत्त्वाचे कारण असते आणि वंश पुढे चालवणे हाही. स्त्री मात्र लग्न करते ती सुरक्षिततेसाठी, समाजमान्यतेसाठी, स्त्रीत्वाच्या सिद्धतेसाठी, साथ देणाऱ्या साथीदारासाठी, आणि या सगळ्याबरोबर लैंगिक संबंधासाठीही. यातला सामायिक दुवा म्हणजे फक्त लैंगिक संबंध! या नाजूक विषयावर शिस्तशीर शिक्षण द्यावं का नाही, याबद्दल अनेक पिढय़ा, अनेक र्वष वाद चालूच आहेत.

खरी गोष्ट अशी की, संपूर्ण वैवाहिक आयुष्यातल्या वेळेचा हिशेब मांडला, तर बाकीच्या इतर गोष्टींतला वेळ आणि लैंगिक संबंधात घालवलेला वेळ फारच क्षुल्लक असतो तरी तो सर्वात महत्त्वाचा ठरतो. तर्कबुद्धीने विचार केला की मुळातच एक प्रश्न पडतो. समाजामध्ये मातृत्व पूज्य, विवाहाशिवाय मातृत्व समाजाला मान्य नसल्यामुळे विवाह पूज्य, पण मातृत्वासाठी जरूर असलेले शरीरसंबंध मात्र अश्लील. हे कसं?

याउलट भारतातल्या साधारण १० टक्के जोडप्यांना लग्नानंतर स्त्री-पुरुष संभोगक्रिया नीट माहिती नसते. घाईत, अंधारात, काही तरी करून संभोग संपवून नवरा-बायको आपापल्या जागी जाऊन झोपतात. बायकोला याबाबतीत संपूर्ण अज्ञान असल्याने ती काहीच बोलत नाही. भलतीकडे वीर्य पडल्यामुळे साहजिकच गर्भ राहात नाही. मग चिंता, शंका, नैराश्य, चिडचिड, आरोपाआरोपी, अशा दुष्टचक्राला सुरुवात होऊन कधी कधी प्रकरण घटस्फोटापर्यंतही पोचतं. कौटुंबिक दबावामुळे अर्ज केला नाही पण संसार निर्थक बनला, अशी उदाहरणंही खूप असतात. म्हणूनच याबाबत नीट विचार होणं गरजेचं आहे. काय केलं पाहिजे हे ठरवणं गरजेचं आहे.

लहान मुलांच्या अवघड प्रश्नांना पालकांनी उत्तरं कशी द्यावीत याबद्दल केवळ आई-बाबांसाठी कार्यशाळा आवश्यक ठरते. त्या पालकांची मुलं निरनिराळ्या वयाची असतात. सर्वसाधारण भारतीय घरांत लहान मूल जरा दोन-तीन वर्षांचं झालं की मुलांच्या मनात स्त्रीचं शरीर आणि पुरुषाचं शरीर याबद्दल विचार चालू असतात.आपण मुलगा आहोत म्हणजे काय आणि आपण मुलगी आहोत म्हणजे काय हे त्यांना कळतच नाही. आपल्या समाजात शिल्लक राहतो तो एक प्रश्न म्हणजे हे आजी-आजोबांच्या पिढीला कसं समजावून सांगायचं. त्यासाठी समुपदेशकाची मदत लागू शकते

१०-१२ वर्षांच्या पुढच्या मुलामुलींसाठी सगळं निराळे असतं. प्रत्यक्ष मुलग्यांशी आणि मुलींशी बोलायचं असतं. खरं म्हणजे या मुलांशी त्यांच्या पालकांनीच घरी बोलावं, अशी कल्पना आहे. या वयाच्या मुलामुलींना समजत नाही असं काहीही नसतं.

१२-१६ वर्षांची मुलं-मुली यांचा शरीरसंबंध येऊ शकतो. मुल हस्तमैथुन करण्याचं प्रमाण मुलींपेक्षा जास्त असतं.

१६ वर्षांच्या पुढे मुलं-मुली प्रेमात पडतात. बऱ्याच वेळा ते प्रेमात पडण्याच्या कल्पनेवरचं प्रेम असतं. त्यात वाईट काही नाही.

पुढच्या अवस्थेत १८-२० वयाच्या आसपास लग्नं ठरायला सुरुवात होते. काही मुलामुलींचं लग्न ठरलेलं असतं, साखरपुडा झालेला असतो, पण लग्न झालेलं नसतं. अशा परिस्थितीतले मुलगा-मुलगी वारंवार भेटतात, अनेक स्पर्श होतात. मनाचे सापळे मात्र नक्की तयार होतात. चुकून मोडावंसं वाटलं तरी त्यामुळे लग्न मोडणं शक्य होत नाही.

लग्न झाल्यानंतरचा काळ खूप महत्त्वाचा असतो. संपूर्ण समाजाच्या, कुटुंबाच्या संमतीने संभोग करायचा असतो. त्या दिवसापासून पुढच्या सबंध आयुष्यावर त्या पहिल्या रात्रीचा परिणाम होणार असतो. त्या पहिल्या रात्रीपासून बायकोला गर्भ राहीपर्यंतच्या काळाविषयी, संभोग किती वेळा होतो यावरून त्या दोघांचं जुळतं किंवा जुळत नाही. त्या सरासरीची नीट माहिती मात्र असावी.

मुलं झाली की नवरा-बायकोच्या शरीर संबंधाच्या प्रमाणात एकदम खूप बदल होतात. मुलांमुळे जागरणं, त्यांची आजारपणं, आई-वडिलांच्याच पलंगावर झोपण्याचा हट्ट अशा अनेक कारणांनी ते प्रमाण कमी होऊ शकतं. पुढे एकमेकांचा कंटाळा आल्यासारखा वाटला तर समुपदेशकाला भेटलेलं चांगलं.

एकूणच भारतीय स्त्री-पुरुषांची अवस्था अशी आहे की, खोलीत धूर कोंडला आहे. श्वास घ्यायला त्रास होतोय, पण खोलीबाहेर जाता येत नाही. त्यामुळे याबाबतीत आपल्या समाजाने शेकडो र्वष अशक्त मनं तयार केली आहेत. विशेषत: पुरुषांना जास्त विकृतीकडे ढकललं.

एरवी मागास समजल्या गेलेल्या आदिवासी समाजाची परिस्थिती याबाबतीत फारच चांगली आहे असं वाचलंय, ऐकलंय.

सगळ्याचा सारांश असा – ‘मुलींना, स्त्रियांना लैंगिक शिक्षणाची गरज आहे ती विकृत पुरुषांपासून बचाव करण्यासाठी. मुलग्यांना, पुरुषांना लैंगिक शिक्षणाची गरज आहे ती त्यांच्यात विकृती येऊ नये म्हणून.’ हे कितीही कटू वाटलं तरी हेच आपल्या सरासरी समाजाचं चित्र आहे. वय वाढलं तरी हे सगळं जवळजवळ सगळ्यांना लागू असतं.

कौटुंबिक विसंवादासाठी जेव्हा जोडपी समुपदेशनाला येतात तेव्हा अनेक विषय निघतात. कित्येक वेळा असं लक्षात येतं की, खरं कारण लैंगिक अतृप्ती हे आहे. अशा जोडप्यांनी एवढं जरी ठरवलं की लैंगिक संबंध हा शिकण्याचा विषय आहे आणि त्यामध्ये एकमेकांकडून आनंद घेण्याची नाही तर एकमेकांना आनंद देण्याची कला शिकायचीय तरी आपलं काम झालंच की.


दैनंदिन जीवनाला त्रासले आहात का ?

क्लिक करा


आपले सुद्धा प्रेरणादायी लेख आम्हांला ९१३७३००९२९ या व्हाट्सएप क्रमांकावर पाठवा. आपल्या नावासकट अत्यंत नम्रपणे ते प्रकाशित केले जातील.

“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया !

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!