Skip to content

असा क्षण येतो…’दुःख करावं की आनंद साजरा करावा?’

व्यसन


शलाका गोगटे बिनिवाले


सायलीने घरात पाय ठेवताच तिला वेगळीच प्रसन्नता जाणवली. आज घरात मद्द्याऐवजी उदबत्तीचा सुगंध दरवळत होता. तीने आपल्या बॅग्स हॉलमधेच ठेवल्या व ती घाईघाईतच आईला शोधायला आत गेली. जाता जाता तिची नजर देवघराकडे गेली. देवघरात लावलेला दिवा, त्याचा मंद प्रकाश मनाला वेगळीच उभारी देत होता. घरात एक प्रकारची शांतता होती. थोडं अस्वस्थही वाटत होतं पण ती शांतताही हवीहवीशी वाटत होती.

ती आपल्याच विचारात बेडरूममधे पोहोचली. आई खिडकीतून बाहेर बघत आरामखुर्चीत पाठमोरी बसली होती. “अरे ही तर बाबाची जागा. आईला कधीच मी इथे बसलेलं बघीतलं नाही. एकटं वाटत असेल का तिला? खरच बाबाची आठवण येत असेल?” सायलीच्या मनात विचार आला. तिने हळूच जाऊन आईच्या खांद्यावर हात ठेवला. बाजूला ठेवलेली खूर्ची खेचून आई जवळ बसली. खूर्चिचा चर्रकन आलेला आवाजही त्या शांततेत खूप मोठा वाटला. काळजीने हात हातात घेऊन ती काही बोलणार तितक्यात आईच म्हणाली “आलीस? अह..काही बोलू नकोस. खरं तर मला कळतच नाहीया तुझे वडील गेले म्हणून दु:ख करत बसू की खूप वर्षांनी मोकळ्या झालेल्या या श्वासाला स्वच्छंद बागडू देऊ.

खरं तर खूप हलकं वाटतयं ग.. मनावरच सगळं मळभ दूर व्हावं ना तस झालय माझं. लोकं येतायत, सांत्वन करतायत. पण खरं सांगू सगळंच खोटं वाटतय. न झालेल्या दु:खाला कशाला हवय सांत्वन. मधेमधे माझच मन मला खातय ग.. वाटतं नवऱ्याच्या जाण्याच काय हे असुरी समाधान? पण मग आयुष्याचा चित्रपट वेगाने डोळ्यासमोर येतो आणि माझं मन शांत होतं.

घरच्यांचा विरोध पत्करून, केवढा विश्वास ठेवून लग्न केलं होतं याच्याशी. माणूस म्हणूनही चांगला होता ग निलय. तूझा जन्म झाला तेव्हा किती आनंद झाला होता त्याला. पण कशी, कूठून, कधी ती दारू त्याच्या आयुष्यात आली आणि त्याच्यातली माणूसकीच हिरावून गेली. आत्ता पर्यंत प्रेमच प्रेम देणारा तो, आता हळूहळू सगळंच बिघडत चाललं होतं. व्यसनाच्या आहारी गेल्यावर त्याने मला बायको म्हणून तर सोडाच पण माणूस म्हणूनही वागवलं नाही. पाच वर्षांची मुलगी बाजूला झोपली असतांना, माझ्या मनाचा कुठलाही विचार न करता तो माझ्यावर तूटून पाडायचा. त्याला कसलंही भान नसायच. आणि मी तू उठू नयेस म्हणून तोंडातून अवाक्षरही न काढता घट्ट मिटलेल्या डोळ्यांमधूनच अश्रू गाळत निपचित पडून रहायचे.”

सायली स्तब्ध होऊन आईचा शब्द न शब्द ऐकत होती. तीला काही ठाउक नव्हते असे नाही पण आई इतकं भरभरून, मोकळेपणाने मूलीला मैत्रिण समजून पहिल्यांदाच बोलत होती. “सायली, तूला वाटत असेल ना ग.. इतकी कशी दुबळी तूझी आई? पण नाही घेऊ शकले ग मी काही निर्णय. कधी माहेरचे दरवाजे बंद झाले म्हणून, कधी समाजासाठी म्हणून तर कधी तुझ्यासाठी म्हणून.. स्वत:लाच कारणं देत बसले. पण नव्हती ग मी तेवढी खंबीर…

निलयच्या या सवयीने सासरची माणसंही तुटली. तूझ्या मैत्रिणींचही आपल्याकडे खेळायला येणं बंद झालं. शेजारच्यांसमोर तर रोजची शोभा ठरलेलीच होती. पण एक मात्र तेवढंच खरं की याची झळ तूला पोहोचू नये यासाठी मी आटोकाट प्रयत्न केले. आता माझं विश्व तूच तर होतीस. पण मनावर दगड ठेवून मी तूला बोर्डिंगला घालायचा निर्णय घेतला. तेव्हाही खूप कलह झाले पण माझ्यात एवढी हिम्मत कशी आली कूणास ठावूक. पण तू गेल्यावर तर निलयला काहीच धरबंध राहिला नाही. पण मग मिही माझा विरोध उघडपणे दर्शवू लागले. खूप प्रयत्न केला ग त्याला यातून बाहेर काढण्याचा. पण शेवटी रोगच तो. सगळे प्रयत्न व्यर्थ गेले. कालांतराने त्याच शरीर खंगत गेलं आणि माझं मन.

त्यादिवशी जेव्हा पोलिसांनी येऊन त्याच्या मरणाची बातमी दिली ना तेव्हा जीव पिळवटुन निघाला ग माझा. आपण ज्याच्यावर प्रेम केलं होत त्याला असा मृत्यु यावा? रस्त्याच्या नालीजवळ? पण तो भावनांचा पहीला आवेग ओसरला आणि मन शांत झालं. गढूळलेलं पाणी खाली बसून वर स्वच्छ पाणी येतं ना तसं झालय माझ्या मनाचं.”

अचानक खूर्चिवरून उठून ती खिडकीजवळ जाऊन उभी राहिली. एक सुस्कारा टाकून म्हणाली, “एखाद्या माणसाच्या नसण्याने इतरांच्या आयुष्यात असे सकारात्मक बदल घडू शकतात हे पटायला कठिण असलं तरी आपल्या आयुष्यातील सत्य आहे. असो. इतके वर्ष एकाच शहरात राहून तूला दुर ठेवाव लागलं सायु. पण आता नाही. या पूढे मी ठरवलय. आपणही स्वत:ला एक व्यसन लावायचं.. स्वच्छंदी जगण्याचं व्यसन. उशिरा का होईना एक नविन सुरुवात करायची. आयुष्यातला प्रत्येक क्षण जगायचा…या घराला घरपण देण्यासाठी.”

सायलीने आईला घट्ट मिठी मारली. दोघींच्या चेहरयावर एक वेगळच समाधान होतं. आईने कॉफी आणली. रेडिओ ऑन करून दोघी मायलेकी बऱ्याच दिवसांनी निवांत बसून वाफाळलेल्या कॉफिचा आस्वाद घेत होत्या. रेडिओवर गाणं सूरू होतं…

जिंदगीकी यही रित है
हार के बाद ही जित है
आज आसू है, कल हे हसी
आज गाम है तो कल है खूशी


नवनवीन व्हिडिओसाठी YouTube चॅनेल

SUBSCRIBE करा!

??



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

क्लिक करून सामील व्हा!

??

3 thoughts on “असा क्षण येतो…’दुःख करावं की आनंद साजरा करावा?’”

  1. समाजात अशा अनेक महिला आहेत त्यांचीही अशीच अवस्था आहे.

  2. अतिशय हृदयस्पर्शी आहे…. कित्येक कुटुंबांची व्यसनाधीनते मुळे वाताहात होते…. खरोखर असा मोकळा श्वास घेणं गरजेचं आहे…..

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!