
“तू अजून सिंगल का आहेस?”
अपूर्व विकास
(समुपदेशक आणि मानसशास्त्र तज्ज्ञ)
अवचित कुठून एक प्रश्न येतो. ज्या मनाला प्रश्न विचारलाय, ते मन मनात हसतं. प्रश्नकर्त्याकडे पाहतं. विचारणाऱ्या चेहऱ्यावरचे भाव टिपतं. “अजून” हा शब्द ऐकून आलेलं हसू ओठावर आणू न देता डोळ्यात साठवतं.
“कपल व्हायला सापडलं नाही कुणी,” शब्द व्यावहारिक सत्य सांगतात; “आणि सिंगल नसण्याचा अट्टहास मनावर गोंदवलाच नाही कधी!”
“पण, गरज वाटत नाही का?”
प्रश्न थांबत नाहीत.
“कशाची?”
डँबिसपणा सोडवत नाही.
“जवळिकीची? शेअरिंगची? प्रेमाची? आणि, शेवटी शरीर तर आहेच ना?”
आलेलं हसू प्रसन्न स्मितहास्यात बदलून, डोळे विचारांचा डोह दाखवतात.
“कुठल्याही ड्राम्याची हौस नाही. स्वत:ला कुठलीही characters रंगवण्याचा सोस नाही. दुसऱ्याने आपल्यासाठी कुठली characters रंगवावीत याच्या डिमान्ड्स नाहीत. शरीराच्या भूकेचं म्हणशील, तर कुठलीही भूक भागवण्यासाठी टू-मिनिट्स Maggy ची तडजोड मला पटत नाही. मला बिर्याणीच हवी असते; अन् त्यासाठी थांबायचीही माझी तयारी आहे.”
प्रश्नकर्ता तात्पुरता गोठून जातो; पण प्रश्नांची उबळ परतून येतेच.
“नाही समजत तुझं. कसले ड्रामे? प्रेम आणि caring म्हणजे ड्रामे वाटतात तुला?”
“अं-हं. मला नाही. दुनियेला.”
“म्हणजे?”
“नीट विचार कर. आजूबाजूला नजर टाक. काय दिसतं? बहुतेकांच्या गप्पा असतात प्रेमाच्या. Caring अन् Sharing च्या. पण खरंच यातलं काही घडतं? तमाम दुनियेच्या रिलेशनशिपबद्दलच्या संकल्पना आणि पार्टनरबद्दलच्या अपेक्षा कशा असतात? ऐकण्यासारखं असतं एकेकाचं. तो dashing हवा. ती प्रेमळ हवी. तो ambitious हवा. ती forward हवी. तो charming हवा. ती भावूक हवी. किंवा, याच्या अगदी उलटही, हं. गाण्यातले शब्द जसेच्या तसे मनावर गोंदलेले. समोरच्याने माझ्यासाठी चाँद-तारे तोडून आणावेत. मुझे झूमना है. नांचना है. Take my breath away. Take me on a trip around the moon. माझ्यासाठी समोरच्याने काहीतरी असं ‘भारीतलं’ करायला हवं. मी इथे असं बसून राहीन; पार्टनरने मला खूष ठेवायला हवं. माझा आनंद ही समोरच्याची रिस्पॉन्सिबिलिटी, बरं का. माझी नव्हे. Make me happy. हे झाले ड्रामे. लहानपणापासून मनावर संस्कारित झालेले. लोकांचं पाहून नि गोष्टीतलं वाचून. तर्काला झुगारल्यामुळे भावनांचा सावळा गोंधळ घालणारे. प्रत्यक्षात कधीही पूर्ण न होणारे.”
“आणि characters?” प्रश्नकर्ता आता समीक्षकाच्या भूमिकेतून नकळत समजून घेण्याच्या भूमिकेत येतो.
“ड्रामे आले की रोल्स आलेच. नाटक वठवायला भूमिका हव्यात. मनात खोल बुडून बसलेल्या असतात या भूमिका. जाणिवेचा हात पोचणार नाही अशा ठिकाणी. आयुष्याची आजवरची वैयक्तिक वाटचाल मनात बेमालूम प्रेरणा कैद करते; त्यातून काहींच्या भावनिक गरजा रचनात्मक असतात तर काहींच्या विध्वंसात्मक. त्यामुळे भूमिकांना कधी पॉजिटिव अपील असतं; तर कधी चक्क आत्मघाताचं भविष्य असतं. स्वत:च्या आणि पार्टनरच्या भूमिका परस्पर ठरवूनच रिलेशनशिपच्या रंगमंचावर एंट्री घेतात त्या. अनेक कपल्स बघ. किंवा एकाच व्यक्तीच्या आजवरच्या आजी-माजी सगळ्या रिलेशनशिप्स बघ. तीच-तीच characters रिपीट झालेली दिसतात, त्याच-त्याच थीम सकट. कुणी ‘मूडी’ या थीममध्ये असतं. तू रूठी रहे; मै मनाता रहूँ. कुणी म्हणतं, मी पोरागत बागडत बसणार; तू शहाण्या थोरल्याच्या रोलमध्ये. इतर ठिकाणी कधी ‘कारुण्य’ ही थीम असते. मी बळी, तू कानपिळी. मी बिच्चारं victim आणि तू नालायक bully. मी आयुष्यभर चुकीच्या व्यक्तीवर भाळणाऱ्या आंधळ्या प्रेमवीराच्या किंवा वीरांगनेच्या भूमिकेत असेन; आणि तू माझं शोषण करणाऱ्या व्हीलनच्या भूमिकेत. किंवा, मी victim आणि तू rescuer. मी by default कुठल्यातरी संकटात सापडायचं; तू येऊन माझी सोडवणूक करायची. किंवा उलट – मी rescuer होणार. म्हणजे, मी सतत दुनियेत जे कोण स्वत:च घातलेल्या घोळात अडकून बसलेत, त्यांच्या शोधात. एकाला बाहेर काढलं; आता दुसरं. सिनेमे, कथा-कादंबऱ्या, बालकथा, परीकथा, हे सगळं कुठे ना कुठे डोकावणारच. मी राजा, तू राणी. किंवा मी राणी, तू व्हीलन राजाचा सिक्रेटली माझ्यावर प्रेम करणारा सरदार. मी रोमिओ; तू ज्युलिएट. मी तुला गंडवणारी क्लिओपात्रा; तू गंडून घ्यायला तयार असलेला सीजर. तू प्रिन्स चार्मिंग; मी दु:खी कष्टी सिंड्रेला. मी वीरू, तू बसंती. मी पुढे जाणारा; तू पाय ओढणारी. मी आळशी; तू माझ्या मम्मीची कटकट करणारी रिप्लेसमेंट.”
“हं… दिसतं खरं हे असं. आणि यात तुला इंटरेस्ट नाही…”
समजावून सांगणारं मन आता डोळ्यात तेजस्वी चमकतं.
“रिलेशनशिप ही माझी इच्छा आहे. जरूर. पण गरज नाही.”
“गरज कशी नाही? माणसं एकमेकांना पूर्ण करतात; म्हणूनच तर रिलेशनशिप असते ना?”
तेजस्वी डोळ्यातली चमक इथे प्रखरते.
“आणि इथेच चुकतात माणसं. ‘एक बाई एका पुरूषाला पूर्ण करते’ आणि ‘एक पुरूष एका बाईला पूर्ण करतो’ हे दोन महामूर्ख विचार म्हणजे उदात्त सुविचार असल्याच्या थाटात एकमेकांच्या तोंडावर फेकत असतो आपण. कुणीही कुणालाही ‘पूर्ण’, ‘complete’ वगैरे करत नसतं. गुडघ्यावर बसून हात हातात घेऊन “You complete me,” हे आपल्या पार्टनरच्या तोंडाला फासण्याला ‘रोमँटिक’ समजतात लोकं. वास्तविक हे म्हणजे स्वत:तल्या कमतरता, आणि त्या आहेत म्हणून दुसऱ्यावर भावनिक अवलंबित्व, या दोन्हीला अनंतकाळासाठी परवानगी घेण्याचा बेमालूम खेळ आहे, दुसरं काही नाही. ड्रामे नि रोल्स तिथेच जन्माला येतात; माणसं फसतात. एक गोष्ट खूप महत्वाची आहे, लक्षात घे. शक्ती ही चीज़ कुणी कुणाला ‘देऊ’ शकत नाही. शक्ती ही आपल्या आत आपली आपण घडवायची गोष्ट आहे. आणि हे काम प्रत्येकाला स्वत:च्या पर्सनल स्पेसमध्येच जमवावं लागतं. सजगतेने. सावधतेने. डोळे उघडे ठेवून. अक्कल, विचार, विवेक आणि बुद्धी वापरून. भावनांमध्ये विवेक हरवू न देता, त्या भावनांना समजून घेऊन. स्वत:च्या आयुष्यातल्या पोकळ्या स्वत: घडवलेल्या आयुष्याच्या बांधणीनेच भरून काढायच्या असतात. दुसऱ्याने येऊन हे बांधकाम करून द्यायला, पार्टनर म्हणजे काय गवंडी आहे? आणि या पोकळ्यांत आपली आनंदाची हौसही आलीच. आपण आनंदी असणं ही आपली स्वत:ची स्वत:शी जबाबदारी असते; पार्टनरची नाही. दोन अपूर्णता एकत्र येऊन पूर्णत्व गवसण्याचा संबंधच येत नाही; उलट त्या अपूर्णतांची सरमिसळ होऊन आयुष्यातली disorder वाढण्याचीच शक्यता अधिक.”
…प्रश्नकर्ता विचारात गढून जातो. सावकाश स्वीकारार्थी मान हलवतो. “पटतंय…”
…इकडे हे मन शांत असतं; डोळ्यातली चमक रुप पालटते. अधिक गहिरी होते.
“दोन सक्षम जीवांच्या सक्षमतेचं मीलन असावी रिलेशनशिप. दोन ऊर्जांचं फलन असावं प्रेम. सकारात्मकतेच्या, स्वत:शी प्रामाणिक असलेल्या दोन प्रवाहांच्या एकीचं सेलिब्रेशन असावं, प्रीत म्हणजे. तिथे ड्रामे नसतील अन् भूमिका नसतील. तिथे सत्य गवसेल. तिथे निर्व्याज आनंद गवसेल. तिथे अपेक्षांचे डोंगर नसतील; कारण लढण्यातून आलेली, ‘आयुष्याचे योद्धे’ असण्याची समज दोन्हीकडे सारखीच असेल. अनुभवांच्या शिदोऱ्या दोन्हीकडे भरीव असतील; त्यासाठी कोण संघर्ष करावा लागतो याची जाण दोन्हीकडे सारखी असेल. मग आदर मागावा लागणार नाही – तो आपोआप मिळेल. तिथे निखळ इच्छांचे लाडिक भाव जरूर असतील; त्याचबरोबर आनंदपूर्तीसाठी आपल्याला दोघांना एकत्र चालायचंय, ही भक्कम समजही तितकीच प्रबळ असेल. ते हवंय मला. त्यासाठी हा पेशन्स. त्यासाठी आहे मी सिंगल. नाहीच कुणी मिळालं तरी हरकत नाही; स्वत:शी गोडीचं नातं आहे माझं. भूमिकांचे सोस नकोत मला. पण मला खात्री आहे… माझंही आहे कुणी; आकर्षणाचा नियम ओढेल आम्हाला एकमेकांजवळ. तोपर्यंत स्वत:ला बुलंद करत राहण्याची ही जबाबदारी निभावत राहीन मी.”
(लेख शेअर केल्यास आभार. शेअर करताना लेखकाच्या तपशीलासहित व मजकुरात बदल न करता करावा. धन्यवाद.)
Online Counseling साठी !
रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!
ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!
“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया“
.


नात्याचा अर्थ , सहजीवनाचा अर्थ खुप सोप्या आणि सुटसुटीत भाषेत समजावून दिला आहे….. लेख आत्मचिंतन करायला लावतो…..!
नात्याचा अर्थ , सहजीवनाचा अर्थ खुप सोप्या आणि सुटसुटीत भाषेत समजावून दिला आहे….. लेख आत्यचिंतन करायला लावतो…..!
खूप छान आणि आत्मपरीक्षण घडवणारा लेख ???