Skip to content

जन्माचं सार्थक करणं हे ज्याच्या-त्याच्या हातातच!

हिच ती वेळ, हाच तो क्षण


सौं सुरेखा अद्वैत पाटील

पाचोरा.


म्हंटल तर मनुष्य जन्म हा एकदाच मिळतो.या पृथ्वी वर जन्माला येणारा प्रत्येक जण स्वतः सोबत त्याची सुख दुःख आणि संकट सोबत घेऊन च जन्माला येत असतो. जन्म कुणाच्या पोटी घ्यावा हें आपल्या हातात नसतं पण जन्माला येऊन जन्माचं सार्थक करणं आपल्याच हातात असतं. म्हणून हा जन्म होता होईतो सार्थकी लावावा.

पण तोही आपण सत्कारणी नाही लावला तर वेळ आणि आयुष्य या दोघांचा ताळमेळ घालणं कठीण होऊन बसतं.

काल रात्री आम्ही सहकुटुंब जेवण, ध्यानधारणा आटोपून अंगणात बसलो होतो. साधारण रात्रीचा मध्यान्ह असावा अचानक सहज म्हणून समोर रोडवर नजर गेली तर कुणाची तरी हालचाल जाणवली. बघते तर तिकडे साधारण 80च्या आसपास वय असलेले आजोबा सरकत सरकत येतांना दिसलेत. अतिशय शांतता होती, काहीवेळा साठीं मनात माझ्या भीतीने स्थान निर्माण केलच तितक्यात माझा मुलगा आणि भाचे त्या आजोबानपर्यंत पोह्चलीत सोबत आमचे हें देखील आजोबा ना विचारपूस केली असतां, ते सांगायला लागलेत मी औरंगाबादचा आहें. मुलगी आहे ती सासरी नांदतेय. आणि पत्नी देवाघरी गेलीय. दोन भाऊ आहेत पण ते त्यांच्या संसारात रमलेत.

आजोबा ना बोलतं केल तर म्हणालेत दोघें पाय अधू झालेत, Dr. कडे गेलो तर त्यावर उपाय नाही होणार सांगितले.. ऐकून मन खिन्न झालं.. त्यांना खायला दिल तर पूर्ण अन्न देखील ते खाऊ शकले नाहीत, व पुरेसं पाणी देखील पिऊ शकले नाहीत. पाणी पितापिता त्यांना झोपही लागली.. आजोबांना बघून मनात एकाच वेळी अनेक विचारांनी गर्दी केली.

पत्नी जिवन्त असती तर आजोबांना असें हालहाल जीवन भोगाव नसतं लागलं.. कारण म्हणतात ना स्त्री हि क्षणाची पत्नी तर अनंत काळाची माता असते.. या एका वाक्यानं माझं समाधान होणारं नव्हतं.. विचारांच्या गर्तेत नाना विचार माझ्या ध्यानी मनी येत होतेच… मनुष्य जन्माला येऊन त्याला सुख लाभलं तर त्याला भाग्यवान म्हणायचं. आणि ज्याची अवस्था अशी विषन्न दशा झालीय त्याला अभागी म्हणावं का? की त्यांच कर्मफळं म्हणावीत?

तारुण्यात तारुण्याच्या मस्तीत मनुष्य मशगुल असतो, त्यावेळी त्याला जग ठेंगणं वाटतं, पण केलेल्या कर्माची फळं जे पेरलं तेच उगवणार हेच खरं !

मुळात शरीर हें सुंदर नसतंच, सुंदर असतं ते व्यक्तीच मन. आजोबा काही क्षणासाठी आलेत आणि मला मात्र जगणं शिकवून गेलेत..
माणसाचं कर्म त्याचे आचार विचार, बोलणं इतरांशी असलेले व्यवहार, त्याच्यावरचे संस्कार आणि त्याचं त्यानं निर्माण केलेलं चारित्र्य.. जेव्हा हें सर्व गुण व्यक्ती मध्ये आढळतात तेव्हा त्याला हि दुनिया आदर्श व्यक्ती संबोधतात.

आपल्या पूर्व प्रारब्धानुसार व या जन्मातील कर्मानुसार
आचार विचार व संस्कार, निर्माण केलेल्या संबंधामुळे सुख दुःखाची प्राप्ती होत असते. जर योग्य वेळी माणसाला त्याच्या चुकांची जाणीव झाली तर तो हें समग्र आयुष्य जिंकला म्हणूयात. काही वेळा खरी फसगत माणूस स्वतः च स्वतः चीं करून घेत असतो. आपल्या पुढे काय वाढून ठेवलंय कुणालाच कुणाच ठाऊक नसतं. पण आपण या देहरूपी आत्म्याला नक्कीच सावरणं आपल्याच हातात असतं.

पूर्वायुष्यात झालेल्या चुकांची फळं भोगल्याशिवाय या धर्ती वरून सहज सोपं जाण होऊच शकत नाहीत. केलेल्या कर्माची फळं कधी कुणाच सुखानं वार्धक्य जातं तर कुणाच कर्मभोग म्हणून त्यांच्यावर अशी विपन्न दशा येत असावी. बऱ्याचदा आई वडिलांशी न पटणे. किंवा मी पण, दुसऱ्याला तुच्छ लेखणं किंवा कुकर्म हातून घडणं या गोष्टींचे पडसाद माणसाच्या जीवनाच्या शेवटी त्याला भोगावेच लागतात हें मात्र खरं..

माणूस कुठे राहतो काय खातो किंवा किती पैसे कमवितो यापेक्षा तो माणसांशी कसा वागतो, जगतो यावर त्याचं पुढील आयुष्याच जगणं ठरतं. मी मात्र ठरवलं कीं आतापर्यंत आई वडिलांनी केलेल्या संस्कारामुळं आपल्या हातून चांगलंच घडतंय. पण यापुढे चुकूनही कुणाचं आपल्यामुळे मन किंवा भावना दुखावेल असं वागायचं नाही. आपल्या कडे जे आहे ते दुसऱ्याला आपण देऊ करायला शिकलं पाहिजे. सोबत होता होईल ते प्रेम जिवन्त माणसं प्राणी पक्षी यांच्यावर केलं पाहिजे यासाठी दरवेळी पैसे च मोजावे लागतील असं अजिबात नाहीं. आपल्या कडील थोडं पाणी कितीतरी पक्ष्यांची तहान भागवू शकतं. सुरवातीला कोणताच पक्षी येणार नाहीं पण एकदा का त्यांना सवय झाली कीं त्यांच्या आवाजांनी आपल्या आजूबाजूच् वातावरण प्रसन्न होईल. वेगवेगळे आवाज कानी पडतील. पाणी पिताना पक्षी पाहिलेत तर त्या सारखा आनंद शब्दात मांडणं ते समाधान काही औरच.. गुरांसाठी आपल्या अंगणात पाणवठा लावू शकतो. त्यामुळे मोकाट गुरांची तहान भागविण्याचं पुण्य कदाचित भविष्याची शिदोरी होऊ शकते. हिंदू धर्मात आपण गाईला देव मानतो त्यामुळे गाईला पोळी घराघरातून खाऊ घालतात. पण कुत्र्याला कुणी अशी दररोज पोळी बनवून खायला घातलं तर बरं होईल. गाईला गवत, चारा पशुखाद्य खायला असतं. पण रस्त्यावरील कुत्र्यांना खाऊ घालणं म्हणजेच भुकेल्याची भूक भागवणं होऊ शकतं..

ऐलतिरी नांदे सुखं, पैलतीरावर दुःख, मध्ये वाहते जीवन ऐसे संसाराचे रूपं….

अडचणीच्या वेळी पूर्वायुष्यातील आपला प्रामाणिक पणा व सध्यपरिस्थिती विषयी आशावादी दृष्टीकोन या दोनच गोष्टी आपली साथ देतात. भावनेच्या भरात किंवा रागाच्या भरात कोणतेही अपकृत्य होणार नाहीं. तसच राग व्यक्त करतांना संयम व शांतता राखायची, शेवटी कर्म चांगले तर जीवन चांगलं. कुकर्म केव्हा पण गोत्यात आणू शकतं. भलेही कमी जास्त पण समस्या सर्वाना असतातच, बिना समश्येशीवाय कोणीच नाही. पण जे लोक धार्मिक कार्य करतात किंवा वेळप्रसंगी दुसऱ्याला मदतीला धावून जातात, त्यांच्याआयुष्यातील समस्या त्यांच्या पासून अलिप्त राहतात. हें तर मला समजलं.. यानिमित्तानं चार ओळी आठविल्यात त्या इथे.

ऋतू परत्वे, झडून गेलीत कोवळी हिरवी पाने, पोटापुरत्या दाण्यापायी बाबांचे भुकेले राहणे, ओस त्या बाबांच्या मनावर, आठवणी अबोल होई. व्याकुळलेल्या भुकेपायी, उन्हात जीवाची लाही, कारे देवा कठोर होऊन जोडीदार त्यांचा हिरावला? थकून गेले पाय अन डोळेहि, आता पोटचाही दुरावला, मनाचीही कूस वांझोटी, कोरडीच कळ येई. पोटा नाही दाणे, म्हणून पंखातही बळ नाहीं. नातेही सुतकी पडले, नाहीं मायेचा उमाळा, जगणं झालं उन्हासारखं झाला आयुष्याचा हि उन्हाळा…

(म्हणून हिच ती वेळ चांगलं कर्म करण्याची आणि हाच तो क्षण जगणं शिकण्याचीव आहे ते जीवन सुसह्य करण्याची. ).



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!