Skip to content

नातं असेल तर ‘आपलं’ असं आहे आणि ‘आपलं’ असेल तरच नातं आहे !

शीतल दिवेकर
नात्यांची घट्ट वीण…
जन्मापासून नात्याचा सुरू झालेला सुंदर प्रवास आपल्या शेवटच्या क्षणापर्यंत अविरत राहतो . जन्माला  आलेल्या प्रत्येक प्राण्याचे नाते नाळेबरोबर जोडले जाते . नऊ महिने रक्तमासावर पोसलेला जीव केवळ जन्मदात्रीशीच जोडला जातो असे नाही तर जन्माला आल्यानंतर या जगाशी नाते जोडताना या बाहेरच्या दुनियेत श्वासासाठी झगडत राहतो . जन्मानंतर त्याला भेटणारी अनेक नाती त्याचं जगणं समृद्ध करून जातात.
नात्याची वीण अगदी हळूवार , नाजूक , रेशमी ,मुलायम असते . कधी कधी त्यात कठोरतेची धारही असते . जन्माला आल्यानंतर अंगाई गाऊन जोजवणारी आई वळण लावताना कठोर होते . पण तिने रेखाटलेल्या या चित्रात रंग भरते . आई पाया रचते तर पिता शिखर दाखवतो .. शिखरापर्यंत पोचण्यासाठी आत्मबळ देतो आणि जगाशी नात्याची वीण घट्ट करतो .. अनेक धागे एकत्र येऊन वस्त्र बनते त्याप्रमाणेच नात्यांचे धागे जुळून येत असतात .. पाठीशी घालणारे आजी आजोबांचे नाते आज वृद्धाश्रमात शोधावे लागते ही आजच्या मोबाईल जगाची शोकांतिका आहे . परिकथेतील जगाशी ओळख करून देणारे , गोष्टीतून पक्षी , प्राणिजगताशी नातं जोडून देणारे आजी आजोबा घरात हवेत हे नक्की! अश्रूंचा भार ज्या खांद्यांवर निवांत विसावून हलका करू शकतो ते नातं म्हणजे मैत्रीचं !
गुरू  शिष्याचं नातं तितकंच तरल ! गुरूने कानमंत्र द्यावा नि जगणं सहज होऊन जावं असं सृजनाचं असं हे नातं .. कळत नकळत कितीतरी नात्यांची ओळख होत जाते . एकाला काटा बोचला तर दुसऱ्याच्या डोळ्यांत पाणी उभं राहावं अशी काही नाती असतात . एखादी स्त्री अनेक मुलांची आई होते .. त्यांचं जीवन घडवते… कुशीतून जन्म न देताही नातं जुळून येतं. तिच्या कुशीवर , तिच्या मातृत्वावर अविश्वास नको . काही नाती का नि कशी जुळून येतात ते एक कोडंच आहे .. दोन व्यक्तींना जवळ आणण्यामागे त्या विधात्याची काही इच्छा असणार .. ती नाती मोडून तोडून , छिन्नभिन्न करून टाकण्याचा आपल्याला अधिकार नाही .. नाती टिकत असतात ती समजूतीवर , समजदारपणावर .. कारण ते नातं असतं मनामनाचं .. एकाने परवलं तर दुसऱ्याने आवरावं असं ते नातं असतं! झाडावरून गळून पडणारं पानही त्या झाडाशी नातं सांगत असतं .
एकटेपणा वाटला , असुरक्षित वाटलं  तर साऱ्या चिंता , ताण विसरून टाकणारं असं एक विलक्षण नातं असतं ते म्हणजे कुशीचं ! कुशीत शिरलं की अमर्याद जग अगदी इतकं छोटं होऊन जातं की कुठलं भय राहतच नाही .. आठवणींनीही डोळ्यात पाणी आणणारी नाती हृदयात नि हृदयापासून जपून ठेवली तर ही वीण कधीच सैल होणार नाही .. कारण नातं असेल तर ‘ आपलं  ‘ असं आहे आणि ‘ आपलं ‘ असेल तरच नातं आहे !

***
            लिहून आणि वाचून दडलेल्या भावना मोकळ्या होतात             
—– इतर लेख वाचा —–
________________________________________
मानसिक आजार व उपचार
________________________________________
प्रेरणादायी लेख/कथा
________________________________________
मुलांचं करीअर काउंन्सिलिंग
________________________________________
लैंगिक शिक्षण
________________________________________
वैवाहीक जीवन
________________________________________
सामाजिक जीवन
________________________________________
पालक – बालक
______________________________________________________
फेसबुक पेज    फेसबुक ग्रुप    YouTube    संचालक     WhatsApp
 _______________________________________________________
आपलेही प्रेरणादायी लेख आम्हाला ९१३७३००९२९ या व्हाट्सएप क्रमांकावर पाठवा. आपल्या नावासकट अत्यंत नम्रपणे ते प्रकाशित केले जातील.
“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!