Skip to content

कितीही ‘नाही’ म्हटलं तरी या एका गोष्टीला आपण सर्वच घाबरतो!

कितीही ‘नाही’ म्हटलं तरी या एका गोष्टीला आपण सर्वच घाबरतो!


विक्रम इंगळे

8 एप्रिल 2020


मरण कल्पनेशी थांबे तर्क जाणत्याचा

मला नेहमी वाटतं की माणसाचे मरण ही एक सापेक्ष घटना आहे. काही माणसे लोळागोळा होऊन खितपत पडलेली असतात, दुर्धर आजाराने त्रस्त असतात, जीवन जगण्याच्या स्थितीत नसतात तरी पण जीवंत असतात. त्यांना बघून खूप जणांना वाटते, अरे! ह्यांना का मरण आले नाही अजून.

काही माणसे जीवंत नसतात. पण ती सर्जनशील होती, चांगली होती, त्यांच्या राहण्याने समाजात फरक पडला असता, जे संशोधक ही असतिल त्यांना बघून खूप जणांना वाटते, अरे! ह्यांना का मरण आले इतक्या लवकर.

मला हे पण वाटतं की मरण व्यक्तिसापेक्ष पण आहे. आपल्या जवळील, आपल्या नात्यातील, मित्रपरिवारातील कुणाचा मृत्यू झाला तर ते, दुःखद निधन, देवाज्ञा असते.

अनोळखी माणसांबद्दल हे ‘कोण खपलं’,’ कोण मेलं’ अस असत.
अणि मारणारा जर शत्रू असेल तर हीच भाषा ‘तो चचला’, ‘बर झालं तो खपला ते’, ‘त्याची मारायचीच लायकी होती’ अशी होते.

मरण ही कधी ना कधी घडणारी घटना आहे असे वाटणार्‍या समजूतदार लोकांचा एक दृष्टीकोन असतो. ‘काही नाही! ते थोडे आजारी होते. वयही झालं होतं. उगाच जास्त दिवस खितपत पडण्यापेक्षा सुखाने लवकर सुटले. अणि शांतपणे मरण आलं. आपला माणूस कुणाला नको असतो, पण त्या जीवाचे हाल होण्यापेक्षा, आत्म्याला शांती मिळालेली बरी.’ त्यावेळी मला आठवतं, ‘जीवासवे जन्मे मृत्यू, जोड जन्मजात’

मृत्यू ही एक नैसर्गिक घटना नसून तो एक अपघात आहे असे समजणार्‍या लोकांचा एक वेगळाच दृष्टिकोन असतो. ‘अरे पंच्याऐंशी वर्षांचे झाले तरी काय झालं, ते माझे आजोबा होते. हां! आता अंथरुणाला खिळून होते, पण काय झालं, आम्ही होतो ना त्यांच सगळं करायला.’ ह्यांना कसं पटवून द्यायचं की तुम्हाला वाईट वाटणार माणूस गेल्याचे पण असते तर त्या जीवाचे किती हाल झाले असते. अशा वेळी मला आठवतं, ‘दिसे भासते ते सारे विश्व नाशवंत, काय शोक करीसी वेड्या स्वप्नीच्या फळांचा’

मी खूप जणांना विचारले की माणसाच्या मृत्यू नंतर, त्याचे आपले का रडतात? ‘वाईट वाटते’ हे अगदी सर्वमान्य उत्तर. ह्याच संदर्भात एक कोरडा, रोखठोक माणूस मला भेटला. म्हणाला, ‘काही नाही रे! जो गेलाय त्याची पोकळी ह्यांच्या आयुष्यात निर्माण झालीय आणि त्याच्यामुळे ह्या लोकांच अडणार आहे, ह्या लोकांची अडचण होणार आहे, म्हणून रडतात’

‘म्हणजे?’ मी जरा वेडा झालो होतो

‘हे बघ! असं समज, एका मुलीची आई मेली. ती मुलगी इतके दिवस आईकडे सगळे बोलत होती, आता ती नाही मग कुणाशी बोलणार? ती आईकडे हट्ट करत होती. आता कोणाकडे करणार? ही पोकळी तिच्या आयुष्यात आली, ह्या जाणिवेने ती रडती. नीट विचार केला तर लक्षात येते की तिच्या ह्या रडण्यात स्वार्थ आहे, तिचे वैयक्तिक नुकसान झाले म्हणून ती रडतीय’ त्याच्या ह्या बोलण्याने मी खरंच चक्रावून गेलो.

एकाने सांगितले, जाणाऱ्या व्यक्ती बद्दल प्रेम , विरह तर असतोच, पण आता त्या व्यक्ती शिवाय आपलं आयुष्य कसं असेल, त्या व्यक्ती कडून ज्या अपेक्षा पूर्ण होत होत्या जे काही भावनिक, भौतिक सुख मिळत होतं ते आता मिळणार नाही ही टोचणीही असतेच. शिवाय कुणाचं असं कायमचं नसणं स्विकारण्याची मानसिक तयारी नसल्याने तो धक्का लगेच पचवता येत नाही. या सगळ्याला रडण्यातूनच वाट मोकळी करून दिली जाते.

वाईट वाटणे अगदी स्वाभाविक आहे, नैसर्गिक आहे. पण काहीजण फार शोकाकुल होतात. चार पाचशे वर्षांपूर्वी समर्थांनी म्हणुन तर लिहिलं नसेल ना, ‘मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे’

केवढ्या सुंदर अणि नेमक्या शब्दात तुमचं अणि माझं काय होणार हे सांगितलंय. ही उक्ती समजून घेतली तर मृत्यू विषयक सगळ्या कल्पनाच बदलून जातात. मला कोणाच्या मृत्यू झाल्याचे कळले की मला क्षणभर वाईट वाटते पण नंतर असा विचार येतो की ‘जीव तापत्रयातुन सुटला’. मला प्रश्न पडतो की मी वेगळा विचार करतोय अणि मन संतुलित ठेवतोय का मी एक दगड झालोय.

मी बर्‍याच लोकांना हा प्रश्न सुद्धा विचारला की लोकं मृत्यूला का घाबरतात? कोणीच समर्पक उत्तर दिले नाही. मला वाटतं, आपल्याला मृत्यू म्हणजे काय हे नक्की माहित नसतं. कारण आपण जगणं अनुभवलय, सुख अनुभवलय, दुःख अनुभवलय, म्हणून हे सगळे माहित आहे. पण आपण मृत्यू कधीच अनुभवला नाही. माणसाच्या आयुष्याची कसली भन्नाट गंमत आहे बघा! आपण जन्मलो तो अणि मृत्यू पावलो तो, दोन्ही अनुभव सांगू शकत नाही!!!
मग जर मृत्यूचा अननुभव नाही तर त्याला का घाबरायचं. सर्वसाधारणपणे घाबरणे हे भीतीशी निगडित आहे. मग मरण अनुभवलंच नाही तर त्याची भिती कसली? ते छानहि असू शकते.

माझं मत आहे की आयुष्याचं मूलभूत तत्त्व म्हणजे बदल. बदल घडून येण्यासाठी पहिली गोष्ट आधी मृत्यू पावली पाहिजे. मृत्यू म्हणजे अल्प विराम, शेवट नाही. आपल्या संस्कारांमधे पाप पुण्य, स्वर्ग नरक ह्या गोष्टी मनावर एवढ्या बिंबवल्या जातात की मरताना माणसाला आपल पुढे (मृत्यू नंतर) काय होणार, नर्क मिळाला तर वगैरे. मग ह्या गोष्टी पासून पळवाट म्हणजे मरण नकोच. मग त्यातून इथेच आणखीन अडकणं सुरू होते अणि मरणाबद्दल भीती आणखीन वाढत जाते.

मला नेहमी असं वाटतं की माणूस मरणाला घाबरत नाही. तर, मृत्यूची जाणीव झाल्यापासून प्रत्यक्ष मृत्यू येई पर्यंतच्या प्रवासाला घाबरतो.



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

.

2 thoughts on “कितीही ‘नाही’ म्हटलं तरी या एका गोष्टीला आपण सर्वच घाबरतो!”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!