
प्रेमात फसवणूक होते तेव्हा….
राकेश वरपे
(मानसशास्त्र तज्ञ, करीअर काउंन्सिलर )
संचालक, आपलं मानसशास्त्र
अनन्याला अचानक जाग आली. तिने घडाळ्यात बघितलं. पहाटेचे ४.३५ वाजले होते. रात्रीचा अतिविचार काही थांबला नव्हता. विचार करून करून डोकं आणखीन जड झालं होतं.
अनन्याला राग आवरेना. रागात पुन्हा हमसून-हमसून रडायला लागली. मोबाईल हातात घेतला. झोप येत नाही म्हणून फेसबुकवर वेळ घालवून उजेड होण्याची वाट पाहत होती. हे तिचं असं महिन्याभरापासून सुरूच होतं.
स्वतःकडे लक्ष नाही, भुकेकडे लक्ष नाही आणि अभ्यासाकडे सुद्धा लक्ष नाही. होय अभ्यास. फार मोठी नव्हती ती. इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षाला शिकणारी, एक अल्लड, लाडावलेली पापा की परी होती ती..पटकन राग व्यक्त करणं, स्पष्ट राहणं, जिथल्या तिथे एखाद्याची उतरवणं ही तिची अदा लक्षात घेऊन कोणीही मुलं तिच्याशी तसल्या भानगडीत पडायची नाहीत….
पण एकाने हे चॅलेंज घेतलं होतं….अरुण..त्याचं नाव. ज्याच्यासाठी महिन्याभरापासून ती घुटमळत राहीली..
कारणही तसंच विशेष आहे…..
दोघेही ४ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये ‘अडकून’ होते…अरुणने अत्यंत भावनिक करून (तिची नाळ ओळखून) तिच्यावर कब्जा केला होता. पण तिच्यासाठी तो आता प्राणप्रिय बनला होता आणि याच प्राणप्रियाचं दुसरं लफडं तिला मागच्या महिन्यात समजलं.
अगोदर खूप रागावली, आक्रस्ताळेपणा केला. त्याची चौकात अब्रू काढली. पण शेवटी बाहेरून मुली कसेही असू द्या, आतून एक भावनिक ज्योत सर्व मुलींची तेवत असते. याचा चुकीचा अर्थ घेऊन केवळ भावनांशी खेळणारे अरुण सारखे माथेफिरू जागोजागी आहेतच.
भर चौकात घुडके टेकवून, त्याने माफी मागितली. चुकीची कबुली केली. त्यादिवशी अनन्या तेथून निघून गेली.
दिवस सरत गेले…रात्रही खुणावत राहिल्या… वजन घटलं. पापाची परी आता परी राहिली नव्हती आणि त्या पापाला सुद्धा काडीमात्र कल्पना नव्हती…
पाच दिवसा अगोदर अनन्याला ‘ति’चा नंबर मिळाला होता. ‘ती’ कोण ?
सुनीता….
अरुणने जीच्याबरोबर लफडं ठवलं होतं, तीच ती!
चार दिवसांपासून अनन्या सुनीताला भेटायचं आहे, म्हणून विनवण्या करत होती. खूप विनंती केली, तेव्हा कुठंतरी सुनीता यायला तयार झाली.
आज सायंकाळी ६ ची वेळ ठरली होती भेटायची.
बघता बघता पहाट झाली…आता मात्र अनन्याला डोळा लागला.
पोरगी १२.३० ला उठली. आवरलं सर्व. जेवली आणि सुनीताला कन्फर्म करण्यासाठी एक फोन केला.
रंकाळा तलाव भेटण्याचं ठिकाण ठरलं…
४ वा. हिने स्कुटी काढली. घरी थातूर-मातूर काहीतरी कारण सांगितलं आणि पाऊण तासात रंकाळ्यात पोहोचली.
१० मिनिटात सुनिताही आली, ऑटोचे पैसे दिले आणि अनन्याला फोन करून ओळख कन्फर्म केली.
अनन्याने सुनीताला पाहिलं आणि फार मोठ्या प्रश्नात अडकली.
अरुणने हिच्यात काय बघितलं असं…..?
चेहऱ्याने कुरूप, साधा पंजाबी ड्रेस, दोन वेण्या आणि नो मेकअप…
हा प्रश्न मनात ठेवून दोघीही बोलण्यासाठी कठड्यावर बसल्या….
जवळजवळ दिड तास बोलून झाल्यावर सुनीताला आईचा फोन आला….
‘हो आई, निघतेय आता…अनन्या आहे सोबत, तू काळजी नको करू, मी तिला घडलेलं सगळं सांगितलंय’
सुनीताने अनन्याला शेवटी एक मिठी मारली आणि तेथून ताबडतोब रिक्षात बसून निघून गेली….
अनन्या मात्र एकदम स्तब्ध…..तिला कळून चुकलं.. जसं मला त्यानं फसवलं तसं सुनीतालाही…
अत्यंत मध्यम कुटुंब, वडील दोन वर्षांपूर्वी अपघाताने गेले. घरी फक्त सुनीता आणि आईच. आई बाहेर भांडीकुंडी करते आणि ही स्टेशनरीत झेरॉक्स काढण्याचं काम करते. वर्षभरापूर्वी स्टेशनरीत अरुणची आणि तिची भेट झाली. बोलण्यातला विनोदीपणा दाखवून दाखवून एक दिवस तिला अरुणकडून भविष्याचं वचन मिळालं…आणि त्या वचनाने ती पार मोहक झाली आणि गुंतत गेली. आता काय चुकीचं आहे आणि काय बरोबर याबद्दल ती बेभान झाली होती. काही गोष्टी खटकल्या. पण…सर्वस्व अर्पण केलं…
अनन्याला प्रश्नाचं उत्तर मिळालं, छाती आकर्षक असणाऱ्या सुनीताला अरुणने भुलवलं होतं आणि मलाही…
रंकाळ्यातुन सुनीता तिच्या नवीन दिशेकडे केव्हाच रवाना झाली होती. अनन्याला एक ठोस असा अर्थ शोधून निघायचं होतं…चारही बाजूने अंधार हळूहळू पसरत होता….
आणि तो अर्थ तिला कदाचित मिळाला…
अशी मुलं भावनांशी खेळतात ही समस्या नाहीये, तर आपण त्यांना खेळू देतो ही आहे….
अगोदरपेक्षा अनन्याला खूप रिलॅक्स वाटत होतं. तिने एक मोठा मोकळा श्वास घेतला आणि उत्साहात स्कुटीचं स्टार्टर प्रेस केलं……अक्खा महिन्याभराचा ताण नाहीसा झाला होता. केवळ सुनीताच्या भेटीने.
यापुढे अनन्या आणि सुनीता एकमेकांना भेटतील की नाही, माहीती नाही. पण अरुण सारख्या मुलांना आयुष्यात कधीच येऊ द्यायचं नाही. हा त्या दोघींनी घेतलेला सर्वात मोठा धडा…
पण इथे दोघींनाही फसवण्यात आलं होतं. दोघींच्या आयुष्यात अचानकपणे आलेल्या या मानसिक वेदना त्यांच्यासाठी कधीही न विसरणाऱ्या होत्या.
लहानपणापासून लाडावलेल्या सर्व सुखसोयी जागच्या जागी मिळणाऱ्या अनन्याचं या एका महिन्यात काय झालं, हे आपण पाहिलं. पण आई सोबत मिळून घर चालवणारी आणि काम करून शिक्षण घेणारी सुनीता यातनं कशी सावरत असेल? हे तिचं तिलाच माहीत.
पण तरीही अनन्याला भेटायला तिने का होकार दिला असेल, हे फार मोठं सकारात्मक कोडं आहे.
या सर्व प्रसंगानंतर पडद्यामागची ही सुनीता जर कोणाला गवसली असेल तर कोणत्याही मुलींकडून अशा चुका होण्याची शक्यता फार कमी आहे.
बघा गवसतीये का?
Online Counseling साठी !
रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!
ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!
“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया“
.


Yes I got betrayed by a girl. Because she wants a rich guy
Why boys are accused and girls are victims always…such things also happens with boys too … They also have feelings
All articles like,
Very fine
खुप छान
Very nice