Skip to content

“आत्मविश्वास नसताना मी पुढे जाऊच कसं?”

“आत्मविश्वास नसताना मी पुढे जाऊच कसं?”


अपूर्व विकास

(समुपदेशक आणि मानसशास्त्र तज्ज्ञ)


– “मला पॉजिटिव राहायचंय.”
– “थांबवलंय कुणी?”
– “मीच.”
– “का?”
– “निगेटिव वाटतंच, कितीही केलं तरी.”
– “कॉन्ग्रेचूलेशन्स !”
– “तुला थट्टा सुचतीये?”
– “निगेटिव वाटतंय ना? आवश्यक मटेरिअल आहे तुझ्याकडे.”
– “मनाला वेदना होणं हे आवश्यक मटेरिअल?”
– “दुसरं काय?”
– “उगाच फालतूगिरी नको. हे बघ, मला खरंच निगेटिविटी हटवायचीये. यशप्राप्तीसाठी.”
– “अक्कल दरिद्री आहे तुझी.”
– “काय…??”
– “अन्नाच्या शोधात निघायची प्रेरणा कशाने मिळते? भरल्या पोटी? का भूकेने?”
– “म्हणजे?”
– “तुला जर आधीच पॉजिटिव वाटत असेल तर तू कशाला पॉजिटिविटी मिळवण्यासाठी प्रयत्न करशील?”
– “हां…??”
– “नाही झेपलं ना?”
– “मी… मला कळत नाही काय बोलू ते.”

– “नकोच बोलू. आधी समजून घे. तुझी निगेटिविटी हा अडथळा नाहीये तुझ्या मार्गातला. हे इंधन आहे, तुझ्या गरजेचं. ही ऊर्जा आहे. उत्तेजन आहे. मोटिवेशन आहे. रॉकेट जागचं तेव्हाच उठतं जेव्हा बुडाखाली आग लागते. तुला हवं ते आज तुझ्याकडे नाही, हे सतावतंय तुला. सतावायलाच हवं. त्याशिवाय त्या दिशेने झेपावणार नाहीस तू. झेपावल्यावर कळतं की आपल्याकडे आवश्यक त्या क्षमता नाहीत. Skills नाहीत. त्याने आणखी हृदय पिळवटतं. त्यानेच उत्तेजना मिळते, जाऊन त्या क्षमता मिळवण्याची. हा पीळ, हा राग, ही वेदना जाणवणंच बंद झालं तर तू यशप्राप्तीसाठी बूड हलवशीलच कशाला?”

– “हे पहिल्यांदाच लक्षात येतंय… पण मला सतत वाटत राहतं, की मला जमणार नाही; झेपणार नाही; मी तोंडघशी पडेन. आपल्यात आत्मविश्वास नाही असं जाणवतं.”

– “आणि तुझे पाय थबकतात. बरोबर?”

– “हो…”

– “थांबणं हीच चूक होते; कारण थांबलेली ऊर्जा तुलाच जाळते. पंखा अॉन केलास आणि पातं धरून ठेवलंस तर पंख्याची मोटर जळते. वीजेचा वापर न झाल्यास ती उष्णतेत बदलते. रोजचं हे जळणं तुला भाजतं.”
– “पटतंय; पण आत्मविश्वास नसताना मी पुढे जाऊच कसा?”

– “आत्ता सुरुवातीला आत्मविश्वास असण्याचा संबंधच कुठे येतो?”

– “हां…??”

– “आत्मविश्वास आज नाही – असायलाही नको. काडीची skills नसताना आत्मविश्वास असणं म्हणजे अतिआत्मविश्वास. तो नडेल. आत्मविश्वास क्रियाशीलतेनंतर येईल; आत्ता नाही.”

– “हे नवीन आहे माझ्यासाठी.”

– “आत्मविश्वास नसणं हा तुझा प्रॉब्लेमच नाही. तुला आत्ता पहिल्याच पावलावर यश मिळण्याची घाई झाल्ये; कारण अपयशात असण्याच्या स्थितीची तुला भीती वाटते. तुला यश सहज मिळायला हवंय. आणि हेच नडतंय तुला. एका मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर एका पायरीत जाता येत नाही रे; त्यासाठी अख्खा जिना चढावा लागतो. त्यातल्या प्रत्येक पायरीवर असताना, अपेक्षित ठिकाणी नसण्याचं कचकचीत सत्य आपल्याला वेडावून दाखवतंच. पण त्यावरून कचकच करण्यापेक्षा, त्या-त्या प्रत्येक पायरीमुळे अपेक्षित ठिकाणाच्या अधिक जवळ जातोय आपण, हे लक्षात घेण्याचं निवडू शकतो आपण. आपण फोकस कशावर करतो, ते महत्वाचं.”

– “हं… दृष्टिकोन…”

– “तू म्हणतोस ‘निगेटिविटी ठार मारता येईल का?’ नाही – कारण ऊर्जा नष्ट होत नाही हा भौतिकशास्त्राचा बेसिक नियम. पण त्याच शास्त्राने ऊर्जेचं रुप पालटण्याची सोय देऊन ठेवल्ये. तुला गरज आहे, ती ऊर्जा वापरण्याची, त्यातल्या नकारात्मक भावनेची भीती न बाळगता. आपल्याकडे जे नाही त्याचा डेटा जमव. त्याबद्दल वाटणाऱ्या वेदनेलाच इन्स्पिरेशन म्हणून वापर – ऊठ आणि क्षमता मिळवायला घे. सुरूवात छोटी कर; आजचं काम आजच्या क्षमतेला साजेसं असूदे. यशप्राप्ती म्हणजे क्षमता पूर्णत्वाने वापरणं. रोज कालच्यापेक्षा एक पाऊल अधिक पुढे टाक. एवढं केलंस, की क्षमता वाढवणं निसर्ग पाहील. पॉजिटिव विचार, सक्षम भाव, आत्मविश्वास, हे input नव्हे; output असतात, क्रियाशीलतेचे. वापरलेल्या नकारात्मक ऊर्जेतूनच सकारात्मकतेची मिळकत होते.

सूत्रबद्ध काम सातत्याने कर; क्षमता वाढलेल्या दिसल्या की वेगळ्या मोटिवेशनची गरज उरत नाही. स्वत:ची ही उत्क्रांती तुलाच तुझ्या अपेक्षित यशात बदलवेल.”



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

.

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!