Skip to content

लॉकडाऊन : चिंता, भिती, डिप्रेशन असणाऱ्यांनी कोठे जायचं??

अशांत शांतता


सौ. वृषाली निमकर-आठले.

(समुपदेशक व मानसोपचारतज्ञ)

Mail ID: vrushaliathale@gmail.com

दिनांक: ३१/३/२०२०


रविवार ची शांत सकाळ, लॉकडाऊन मुळे क्लिनिक बंद आहे तर रविवार हा दिवस निवांत असतो याची जाणीव झाली. एरवी अनेक वर्ष मी रविवारी क्लिनिक मध्ये व्यस्त असते. पण आता क्लिनिक ला जाण्याची धावपळ नाही म्हणून सवयीप्रमाणे स्वयंपाक, अंघोळ, पूजा, योगाभ्यास करून मोकळी झाले आणि विचार केला आज खूप वेळ मी ध्यानाला बसू शकते. ध्यानावस्थेत बसणं म्हणजे ध्यान-धारणेला बसणं, हि गेल्या दहा वर्षात स्वत:ला लावून घेतलेली सवय आहे. नियमितपणा नसल्यामुळे सवय म्हणण्यापेक्षा धडपड असं म्हणूया. साधारण अर्धातास बसून उठले तर नवरा फोन घेऊन घाईत आला. आमच्या एका मित्राचे १२ मिस्ड कॉल्स येऊन गेले होते. फोन केला तेव्हा त्याचा कमालीचा घाबरलेला आवाज, ” वृषाली ताबडतोब तुझी मदत हवी आहे. माझी एन्क्झायटी (Anxiety) वाढली आहे. मला पॅनिक अटॅक येऊन गेला. मी तुझ्या क्लीनिक ला आत्ता येऊ शकत नाही. हे सगळं सिरीयस झालं तर काय करू?”. बोलताना त्याला चक्क धाप लागली होती, इतकं घाईत आणि भरकटल्यासारखा तो बोलत होता. त्याच्याशी फोन वर च बोलून त्याला शांत करावं लागलं. त्याला समुपदेशनाची खरंच गरज होती.

अनेक लोकं कुठल्या ना कुठल्या अस्वस्थतेच्या आजाराने ग्रस्त आहेत (Anxiety Disorder). आता लॉकडाऊन मुळे त्यांची अस्वस्थता अजून च वाढली आहे. लॉकडाऊन मुळे मिळालेल्या शांततेचं काय करावं हे काही लोकांना कळेनासं झालं आहे. हल्ली सतत गुगल वर शोधत राहून लोकं स्वत:च ठरवतात कि आपल्याला डिप्रेशन (Depression) आलंय, आपल्याला क्लॉस्ट्रोफोबिआ (Claustrophobia) झाला आहे; आणि मग त्यांची भीती अजून वाढते. मुळात हे समजून घेण्याची गरज आहे कि, ‘You can get all information on Google, but you need an expert’s advice to know what is happening with you and how to handle it’.

लॉकडाऊनमुळे सुरुवातीला चार दिवस सगळ्यांना सुट्टी मिळाल्याचा आनंद झाला खरा, पण त्यानंतर हळू हळू कोणी कंटाळायला लागलं, कोणाची चिडचिड वाढली, कोणाची एन्क्झायटी वाढली, कोणाची भीती वाढली. वरकरणी जरी असं वाटलं कि ह्याला लॉकडाऊन कारणीभूत आहे, तरी ते सत्य नाही. ह्या समस्या लोकांना आधी होत्याच, परंतु लॉकडाऊनमुळे लोकांना त्याची जाणीव व्हायला लागली. रोजचं धावपळीचं आयुष्य म्हणजे अनेकदा आपल्याच अनेक प्रश्नांपासून आपणच केलेला पलायनवाद ठरू शकतो. असं अनेकांना वाटतं कि माणूस जितका व्यस्त तेवढं बरं असतं, मग असले आजार होतच नाहीत. पण वास्तविक हे आजार मुळातच असतात ते त्यांना जाणवत नाहीत. आणि अचानक मिळालेल्या मोकळ्या वेळेमुळे त्याचं गांभीर्य जाणवायला लागतं.

Anxiety Disorder किंवा Generalized Anxiety Disorder (GAD) हा जरी खूप गंभीर आजार नसला तरी, योग्य उपचार करून त्यातून बाहेर पडलं नाही तर माणसाचं आयुष्य अकारण पोखरलं जातं. अकारण म्हणण्याचं कारण असं कि, अकारण, आणि अवाजवी भीती आणि चिंता हीच त्याची प्रमुख लक्षणं आहेत. आपल्यापैकी प्रत्येकालाच कसली न कसली चिंता, काळजी, विवंचना, भीती असतेच. पण हि चिंता किंवा भीती जेव्हा सहन करण्यापलीकडे जाते आणि दैनंदिन जीवनावर परिणाम करू लागते तेव्हा विशिष्ट शारीरिक आणि मानसिक लक्षणं दिसतात. काही लोकांना घरात बसून राहावं लागत आहे म्हणून Claustrophobia जाणवतो आहे. म्हणजेच बंद जागांची भीती. घराबाहेर जाता येणार नाही म्हणून त्यांची Anxiety वाढते. घरात बसलं तर जीवाची घुसमट होते, अगतिक वाटायला लागतं, अस्वस्थता वाटायला लागते. असा भयगंड (Phobia) हा अनेकदा निरर्थक असतो, अवाजवी असतो हे ज्याचं त्याला कळतही असतं पण तरीही काहीतरी भयानक घडेल हि भीती त्याच्या मनानी घेतलेली असते.

अनेक लोकांना लिफ्ट ने जाणे, विमान प्रवास, ट्रेन मध्ये आत गर्दीत गेलं कि घुसमट होणे अशा स्वरूपाचा भयगंड असतो. तसेच मॉल्स चे बेसमेंट, बोगदा अशा जागांचा फोबिया असतो. Mysophobia/Germophobia – जंतूंची, जंतू संसर्गाची अवाजवी भीती, Agoraphobia – अनोळखी माणसं किंवा ठिकाणाची भीती, Aviophobia – विमानप्रवासाची भीती, Haemophobia – रक्ताची भीती, Thanatophobia – मृत्यू या संकल्पनेची भीती, Social Phobia, असे भयगंडाचे अनेक प्रकार आहेत.

एकदा का भीती वाढली कि ज्या गोष्टीची, किंवा प्रसंगाची भीती वाटते, काही तरी वाईट घडेल असे वाटते, त्यापासून लांब पळणे, किंवा स्वत:ला लांब ठेवण्याचा क्षणात प्रयत्न करणे, किंवा नुसतं त्या गोष्टीला सामोरं जाण्याच्या कल्पनेनेच खूप घाबरणे अशी लोकांची अवस्था होते.

Anxiety, Phobia आणि Panic Disorder मध्ये विशिष्ट प्रकारची शारीरिक (Physiological) आणि मानसिक/भावनिक (Psychological/Emotional) लक्षणं दिसतात. घाम फुटणं, हातापायाला कंप जाणवणं, छातीत धडधड वाढणं, चक्कर येणं, डोकं दुखणं, घशाला कोरड पडणं, छातीत दुखणं, अशी शारीरिक लक्षणं दिसतात. तसेच एखाद्या जागेतून पळून जावंसं वाटणं, मृत्यूची भीती वाटणं, रडू येणं, अचानक घरात येरझाऱ्या घालाव्याश्या वाटणं, अशी मानसिक लक्षणं दिसतात. बहुतांशी हि भीती काल्पनिक असते, तर काहीवेळा आपण आयुष्यात अनुभवलेल्या एखाद्या वाईट घटनेशी (जवळच्या व्यक्तीचा मृत्यू, जवळून पाहिलेला/अनुभवलेला अपघात) याचा संबंध असतो.लॉकडाऊनमुळे Claustrophobia किंवा Mysophobia/Germophobia या प्रकारची भीती/भयगंड असलेल्या लोकांना त्रास जाणवतो आहे.

Anxiety, Phobia आणि Panic Disorder यावर औषोधोपचार आणि सायकोथेरपीज अशा दोन्ही पद्धतीने उपचार करता येतात. काहीवेळा Anxiety/Phobia एवढंच आजाराचं स्वरूप असतं तर काहीवेळा अशी Anxiety/Phobia हा इतर मनोविकारांबरोबर आढळून येतो (Comorbidity). तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच त्याचे उपचार घेणं आवश्यक आहे. सायकोथेरपीज मध्ये सिस्टिमॅटिक डिसेंसटायजेशन थेरपी (systematic desensitization therapy), Cognitive Behavioural Therapy (CBT), अश्या स्वरूपाचे उपचार करता येतात.

परंतु ज्यावेळी आपण तज्ञांकडे जाऊ शकत नाही त्यावेळी आपल्या मनावरचं नियंत्रण अन्य कुठल्या मार्गाने मिळवता येईल हा विचार करणं गरजेचं असतं. मनावरचं नियंत्रण म्हणजेच आपल्या विचार आणि भावनांवरील नियंत्रण. म्हंटलं तर हि फार अवघड गोष्टं आणि म्हंटलं तर फार सोपी गोष्टं आहे. आपल्या पारंपरिक योगशास्त्राचा, योगाभ्यासाचा, प्राणायामाचा आणि ध्यान-धारणेचा खूप जवळचा संबंध स्थिर मनाशी आहे. माणसाचं मन स्थिर तेव्हाच असू शकतं जेव्हा ज्या परिस्थितीत माणूस आहे, तिथे तो शारीरिक, आणि मानसिकदृष्ट्या पूर्णपणे असतो. त्यावेळी त्याच्या मनात कधी एकदा ह्यातून आपली सुटका होणार आहे, कधी एकदा हे संपणार आहे, कधी एकदा काहीतरी सुरु होणार आहे… अशा प्रकारच्या अपेक्षा, मागण्या किंवा विचार आले कि माणूस जिथे जसा आहे तसा आनंदाने न जगता, जे नाहीये त्याचा मागोवा घ्यायला लागतो. आणि जे आत्ता घडत नाहीये किंवा जे आपल्याला मिळत नाहीये त्याचा हट्ट मन करायला लागतं आणि अश्या परिस्थितीत आपलं मन सदैव अशांत, अस्वस्थ आणि असमाधानी राहतं. भीतीचं हि असंच आहे.

भीती मध्ये प्रत्यक्षात न घडलेल्या गोष्टींचा विचार आपण करत असतो. अनेकदा वाईट शंका मनात येतात. संभाव्य धोके, वाईट शक्यता यांनी मन त्रस्त होतं. म्हणजेच भीतीपासून सुटका हवी असेल तर वाईटच काहीतरी घडेल हा कल्पनाविलास थांबायला हवा. तो तेव्हाच थांबेल जेव्हा आपण ज्या परिस्थितीत आहोत त्याचा आनंद घ्यायला शिकू. तसंच आपल्याला दुसऱ्या टोकाला जाऊन विचार करता यायला हवा कि जे काही वाईट व्हायचं ते होऊ दे, ती वेळ येईल तेव्हा मी समोर जाईनच. असा जर विचार आपण केला, तर आपण आपसूकच तो पर्यंत वर्तमानात त्याची काळजी करण्यापासून मुक्त किंवा परावृत्त होऊ शकतो. पुढे जे होईल त्याची वाईट कल्पना करण्यापेक्षा आत्ता आपण जसे जेथे आहोत तेथे पूर्ण असण्याचा आणि जगण्याचा प्रयत्न करणं ह्याचा सराव आपण करायला हवा.

सकारात्मक विचार करा असं म्हणून प्रश्न सुटत नाहीत. आधी नकारात्मक विचारांपासून पळ न काढता त्यांना सामोरे जाणे, वास्तववादी विचार करून त्याची शक्यता-अशक्यता पडताळून पाहणे, आणि कल्पना आणि वास्तव यातील फरक समजून घेणे असा प्रयत्न आपण जाणीवपूर्वक करायला हवा. मनोसोपचार तज्ज्ञांकडे जाऊन शास्त्रोक्त उपचार म्हणजेच समुपदेशन आणि सायकोथेरपी तसेच गरज असल्यास औषोधोपचार आवश्यक आहेतच. परंतु त्याच बरोबर स्व-मदतीची जोड जर मिळाली तर या अशांततेवर मात करून आपले आयुष्य आपल्याला शांतपणे आणि आनंदाने जगता येईल.

(हा लेख शेअर करण्याची इच्छा असल्यास कोणताही बदल न करता लेखकाच्या नावासकट शेअर करावा ही विनंती).



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!