Skip to content

चुकताय म्हणजेच जिंकताय……!

चुकताय म्हणजेच जिंकताय……!


अपूर्व विकास


काही रागात आहेत.
काही दु:खात आहेत.

रागात असलेल्यांना दुनियेला कानफटवून काढायचंय; कारण दुनियेने यांच्या मार्गात काटे ठेवले.

दु:खात असलेल्यांना स्वत:च्याच कानसुलात लावून घ्यायच्ये; कारण त्यांनी स्वत:च स्वत:च्या मार्गात काटे ठेवले.

या दुसऱ्या category वाल्यांच्या म्हणण्यानुसार,

त्यांनी स्वत:ला हरवलं.

आयुष्याचे हिशेब चुकवले.
सत्यतेला चुकीचं जोखलं.
वेळेत लक्षात नाही आलं काही.
शेवटास नेता न येणारे प्रवास आरंभले.
काहींनी, ज्यातून पुढे उपयोगाचं काही आरंभता येत नाही, अशा रस्त्यांच्या शेवटास स्वत:ला उभं केलं.
खात्रीशीर सृजनं वांझोटी ठरली.
कष्टांचे ढीग उपसले गेले; पण दिशाहीन संघर्षांचे सामने अनिर्णीत ठरले.

परिणाम?

करिअर्स, जी अज्जून उभी राहीली नाहीत.
रिलेशनशिप्स, ज्यांच्या पाकळ्या उमलण्याआधीच कोमेजल्या.
जवळची नाती, जी वेदनेत हरवली.
ध्येयं, जी अद्याप स्वप्नवतच राहीली.
एक आत्मक्लेष, एक वेदना, जी स्वत:बद्दलच्या नकारात्मकतेत कायमसाठीच विसावली.
विश्वास, ज्याचा स्वत:हूनच घात झाला.
एक विचार दरदरून वर आला, “माझ्यात मुळातच काहीतरी कमी आहे. अगदी मेंदूमध्येच काहीतरी खोट आहे. मी निव्वळ मूर्खच नव्हे; माझ्यात manufacturing defect आहे, बेसिकली.”
बहुतेकांच्या मतानुसार, अशा “अशक्य” मूर्खपणाच्या चुका केलेले ते दुनियेत एकटेच आहेत.

तुम्ही आहात त्यापैकी एक?

बरोबर आहात तुम्ही.

खरंच वेडे आहात तुम्ही.

प्रश्न हा आहे, की इथे सालं कोण वेडं नाहीये?
कुणाला बाता मारताय?
तुम्हाला खरंच असं वाटतंय, की आज जे त्यांना हवं त्या ठिकाणी पोचलेत, त्यांनी “योग्य वेळी योग्य निर्णय” घेतला म्हणून ते तिथे पोचलेत?

बापहो, “योग्य निर्णय” वगैरे काहीही नसतं. भविष्य ओळखून आराखडे बांधताना असे अगणित पैलू (factors) असतात, जे संपूर्णपणे ध्यानात घेणं इथे कुणालाही शक्य होत नसतं. बंद करा ते आत्मक्लेषाचं कुजकट कुढणं. त्या सगळ्या पैलूंच्या अब्जावधी बेरजा मांडून अचूक उत्तरं काढायला तुमचा मेंदू म्हणजे काय “सूपर कंप्युटर” आहे? कुणाचाही नसतो. आपल्यातला प्रत्येकजण आयुष्यात चुकवलेल्या गणितांच्या चुकलेल्या आकड्यांची ओझी निर्माण करतच असतो. कुणीही त्या गुन्ह्यातून निरपराध सुटत नाही. कुणीही. घ्या ती झोळी पाठीवर अन् पुढे चालू पडा.

“मग जे जिंकलेत ते कसे जिंकलेत?” विचारताय? हाड चघळण्याच्या ध्यासाने झपाटलेलं कुत्रं पाहीलंय कधी? पाहून घ्या एकदा. दुकानात दिसलेलं खेळणं मिळालंच पाहीजे म्हणून घर उरावर घेणारे लहानपणचे हट्ट आठवा. जे हवंय ते मिळवण्याची तिखटजाळ झणझणीत जळजळ उद्दिष्टापर्यंत नेते. विषय संपला. “योग्य निर्णय आणि योग्य प्लान” – विसरा. क्षणोक्षणी बदलत्या परिस्थितीच्या रणांगणात अगोदरचे आराखडे केविलवाणे होतात; जिवंत राहू देतात ते फक्त परिस्थितीनुसार खेळ बदलण्याचे, improvisation चे डावपेच.

इच्छेची ती प्रखर जळजळच ते डावपेचही सुचवते. जे जिंकलेत त्यांना “आपण पर्फेक्ट नाही” हे व्यवस्थित माहीत होतं. स्वत:च्या मेंदूतलं तुम्हाला जाणवणारं पंगुत्व त्यांनाही कळलेलं होतं. मुद्दा हा होता की जिथे मेंदू कमी पडला तिथे हात चालू लागले; जिथे हात थकले तिथे जीभ उपयोगाचं बोलू लागली; जिथे चालणं शक्य नव्हतं तिथे पोहणं सुरू झालं; जिथे रस्ता चुकलाय हे कळलं तिथेच आडमार्ग तुडवून उद्दिष्टापर्यंत धावणं सुरू झालं – कारण रस्ता महत्वाचा नव्हता; हवं तिथे पोचणं महत्वाचं होतं. एकदा पोचलात की रस्ता कसा होता हा प्रश्नच निकालात निघतो, हे त्यांना कळलं होतं. त्यांनी ओळखलं होतं – होऊ देत चुका. चुकांसकट चालायचं; कारण हेच आयुष्य आहे आणि असं चालतच राहणं हाच एक पर्याय आहे. नाही मागे वळता येणार. आपण आत्ता इथे आहोत. Here and now. आणि काय करू नये तेवढं चुकांनी शिकवलंय. आणखी शिकू. शेवटी बरोबर काय तेवढं उरेलच.

चुकलेल्या दिशांपुढले चुकलेले हिशेब गाठोड्यात गु़ंडाळून तसंच चालत राहायचंय पुढे. थांबायचंच नाही. पावलं पुढे पडत राहणं, हेच उत्तर आहे; हीच चावी आहे आयुष्याची बंदिस्त कुलपं उघडण्याची. Go relentless. त्याच चुकांना उरावर मुकुटाप्रमाणे ठेवून पुढे जाण्याचा निर्लज्जपणा हवा. का? कारण त्याच चुकांनी शहाणपण दिलंय; त्याच अनुभवाने विवेक दिलाय; अमू्ल्य आहेत त्या चुका ! हे पाठीवरचं ओझं शिखरावर पोचल्यावर उतरवू; पण विसरणार नाही. कारण त्यात परत कधीही न करण्याच्या चुकांचं उपयोगाचं शिक्षण आहे.

वेदना जाणीवेचा हट्ट धरते.

मग घ्या जाण त्या वेदनेची. आत, खोल घुसू दे तिला. मार्गदर्शन करेल ती वेदना. दुखण्यावर उपाय काढण्याची प्रेरणा दुखणंच देऊ शकतं. त्यासाठीच दिलंय निसर्गाने ते. टाळू नका. लांब जाऊ नका. घट्ट मिठी मारा या अनुभवाला. तुमचा आहे तो.

तुमच्या दुखण्याला तुमची सर्वोच्च शक्ती बनवा.

शक्ती कशाला म्हणतात?

वजन पेलण्याच्या आणि उचललेल्या वजनासकट पुढे जाण्याच्या बुलंदतेला शक्ती म्हणतात. कोण अधिक शक्तिवान होईल? ज्याने फक्त दुनियेने दिलेल्या दु:खाचं वजन पेललंय तो? का, ज्याने त्या वजनाबरोबरच, स्वत:च्या चुकांचंही वजन बाहूंमध्ये कवटाळत पुढे चालत राहण्याची वृत्ती अस्तित्वात बाणवेल, तो?

तुमच्या चुका लक्ष्यापर्यंत पोचू देणार नाहीत, असं आत्ता भासतंय. मजा हीच, की फक्त त्यांच्यामुळेच लक्ष्यभेद शक्य होईल.



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

.

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!