Skip to content

आज मानसशास्त्रीय अंगाने ‘कोरोना’ समजून घेऊया!!

कोरोना एक मानसिक भीती आणि वास्तव परिस्थिती.


डॉ. आर. आर. पाटील
मानसशास्त्र विभागप्रमुख
कला, शास्त्र आणि वाणिज्य महाविद्यालय, चोपडा


करोना एक मानसिक भीती आणि वास्तव परिस्थिती
गेल्या सतत 2,3 महिन्यापासून जगावर एक महाभयंकर रोग म्हणजे कोरोना धुमाकूळ घालत आहे व भारताचा विचार केला तर गेल्या वीस-पंचवीस दिवसापासून भारतात याची लागण झालेली दिसून येते.

कोरोनासंदर्भात आपण सोशल मीडिया, न्यूज चॅनल व इतर प्रसारित होणाऱ्या माहितीवरून कोरोना संदर्भात आपल्याला माहिती मिळत आहे व त्या माहितीच्या आधारे प्रत्येकामध्ये अप्रत्यक्षपणे एक मानसिक भीती निर्मिती झालेली दिसून येत आहे. ती म्हणजे स्व अस्तित्वाची, माझं कसं होणार, कुटुंबाचे कसं होणार, भविष्याचं कसं होणार असे अनेक प्रश्न नकळत मनात निर्माण होतात . कारण अनेक योग्य अयोग्य माहितीच्या आधारे प्रत्येक व्यक्ती कोरोना संदर्भात स्व दृष्टिकोन तयार करीत आहे. यात बहुतांशी भाग हा नकारात्मकतेचा आहे.

खरंच एवढा महाभयंकर रोग आहे का?

या प्रश्नाचे उत्तर शेक्सपीयरच्या भाषेत सांगायचे झाल्यास टू बी ऑर नॉट टू बी म्हणजे स्वतःची काळजी घेतली ,जबाबदारीने वागले ,शासन नियमांचे तंतोतंत पालन केले तर हा रोग नाहीत जमा आहे. परंतु निष्काळजीपणे वागले तर मात्र तो महाभयंकर आहे.

कारण तो एक संसर्गजन्य रोग आहे म्हणून जो जबाबदारीने , संयमाने ,वागेल त्यांना त्यापासून काही धोका नाही परंतु आपण पाहत आहोत की शासन स्तरावर वेळोवेळी सूचना करून देखील लोक त्याकडे दुर्लक्ष करतांना दिसत आहे. परिणामी रोज गुणाकार पद्धतीने कोरोना बाधीताची संख्या वाढत आहे .

लोक का ऐकत नाही?

या प्रश्नाचे उत्तर डॉ.सिग्मंड फ्रॉइड मनोविश्लेषण तज्ञ यांनी सांगितलेल्या व्यक्तिमत्व संरचना यात मिळते . डॉ. फ्रॉइड यांनी व्यक्तिमत्त्वाच्या संरचनेत एकूण तीन भाग सांगितले आहेत ते म्हणजे

१) इदम्-Id २) अहम् -Ego ३) पराहम् – Super ego

प्रत्येक व्यक्तीच्या प्रत्येक वर्तनात यांची भूमिका असते ते पुढील प्रमाणे समजून घेता येईल.

१) इदम्-Id:

व्यक्तीच्या मनात इच्छा प्रेरणा निर्माण होतात व कोणत्याही पद्धतीने त्या पूर्ण कराव्यात असे वाटते असा व्यक्तिमत्त्वाचा भाग म्हणजे इदम्-Id होय. सर्वप्रथम व्यक्तीमध्ये इदम्-Id विकास होतो. इदम्-Id चे कार्य सुखतत्वानुसार (Pleasure Principle) चालते.म्हणून लहानपणी कोणतीही इच्छा निर्माण झाल्यानंतर त्या पूर्ण करण्यासाठी मुल प्रयत्न करते त्या मागणीमध्ये योग्य,अयोग्य, चांगले ,वाईट, नैतिक अनैतिक काय आहे हे मुलाकडून बघितले जात नाही. अबोध मनाच्या पातळीवर इदम्-Idचे कार्य सुरू असते. तसेच इदम्-Id अहम् -Ego वर दबाव आणण्याचा प्रयत्न करून आपले आनंद मिळवण्याचे ध्येय साध्य करण्याचा प्रयत्न करीत असतो. उदा.आजही काही लोक देशात संचारबंदी सुरू असताना लहान मुलासारखे हट्ट करून विनाकारण घराबाहेर पडून आनंद मिळवण्याचा बालिशपणा करताना दिसतात.

२) अहम् -Ego :

व्यक्तिमत्व संरचनातील दुसरा भाग म्हणजे अहम् -Ego होय. अहम् -Egoचे कार्य हे वास्तव तत्वानुसार(Reality principle ) चालत असते तसेच ते बोधमनाच्या पातळीवरील सुरू असते. व्यक्तीच्या वर्तनाला चालना देण्याचे काम अहम करीत असतो सामाजिक नीतीनियम चालीरीतींचा परिणाम व्यक्तीच्या विकासावर होतो. सभोवतालच्या परिस्थितीला अनुसरून इदम्-Id दर्शविलेली इच्छा, गरज पूर्ण करणे किंवा करू नये हे अहम् -Egoची भूमिका असते. तो कार्यकारी व्यवस्थापक म्हणून देखील त्याला ओळखले जाते. त्याच्यावर इदम्-Idजरी दबाव असला तरी एखादी गोष्ट करावी किंवा करू नये यासाठी त्याला पराहम् -म्हणजेच Super ego ची गरज पडते व Super ego सद्सद्विवेकबुद्धी चा उपयोग करून ती गरज पूर्ण करावी किंवा नये याचा विचार करून अहमला मार्गदर्शन करीत असतो व त्या पद्धतीने अहम कार्य करीत असतो.

परंतु बरेचदा व्यक्तीमध्ये Super ego म्हणजे सद्सदविवेक बुद्धीचा अभाव असल्यामुळे व्यक्ती भावनेच्या आहारी जाऊन चुकीची कामे करतो. कारण व्यक्तीवर (अहम् -Ego) इदम्-Id अधिक प्रभाव दिसून येतो.

उदाहरणार्थ आज आपण पाहतोय कोरोना संदर्भात लोकांनी दक्षता घेण्यासंदर्भात शासनस्तरावर विविध सूचना वेळोवेळी दिल्या जातात. परंतु व्यक्ती केवळ एक मनोरंजन किंवा आनंद मिळाला पाहिजे म्हणून कारण नसताना घराच्या बाहेर निघतात याचाच अर्थ त्यांच्या सद्सदविवेक बुद्धीचा उपयोग ते करत नाही किंवा त्यांच्या सद्सदविवेकबुद्धीचा विकास झाला नाही असे म्हणावे लागेल.

३)पराहम् – Super ego:

व्यक्तिमत्व रचनेतील तिसरा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे पराहम् – Super ego ज्यामुळे खऱ्या अर्थाने व्यक्तीचे व्यक्तिमत्व घडते त्यालाच सद्सदविवेकबुद्धी असे म्हणतात पराहमचे कार्य नैतिक तत्त्वानुसार (Moral Principle ) चालत असते. योग्य-अयोग्य नैतिक-अनैतिक यामधील फरक करण्याची क्षमता म्हणजे पराहम् – Super ego हा आपल्याला संस्कारातून आपल्यामध्ये विकसित होतो म्हणजे आपण एखाद्या क्रियेला प्रतिक्रिया करीत असताना नकळत आपण आपले संस्कार दाखवत असतो म्हणजेच आपण कसे आहोत हे सांगण्याची गरज पडत नाही कारण आपल्या वर्तनातून ते लक्षात येते.

म्हणून आज खऱ्या अर्थाने प्रत्येकाने आपला पराहम् – Super ego जागृत ठेवणे गरजेचे कारण शासन यंत्रणा (डॉक्टर, पोलीस) जे काही आज करत आहेत ते केवळ मानवी अस्तित्वासाठी एक मानव म्हणून आपण प्रत्येकाने आपले कर्तव्य पार पाडले पाहिजे ते म्हणजे घरी बसणे.

शासनाने तयार केलेले नियमांचे तंतोतंत पालन करणे कारण आज प्रत्येक नागरिक हा एक सैनिक आहे. म्हणून प्रत्येकाने आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवून स्वतःला, कुटुंबाला, समाजाला ,शासनाला सहकार्य करावे ही नम्र विनंती व आपण ते सहजतेने करू शकतो.

कारण आपल्यावर चांगले संस्कार झाले आहेत त्यामुळे आपली सद्सद्विवेकबुद्धी ही जागृत आहे फक्त तिला चालना देणे एवढेच आपले कर्तव्य आहे व भारतीय माणूस कर्तव्यनिष्ठ माणूस म्हणून खरंच जगभर प्रसिद्ध आहे. खरंच हीच ती वेळ आपली कर्तव्यनिष्ठा जागृत करण्याची व हीच खरी आज आपली वास्तव परिस्थिती आहे की आपण कोरोनाशी सहजतेने लढून यशस्वी होऊ शकतो.

कारण यातील सकारात्मक बाजू म्हणजे 100% यांपैकी जवळजवळ 98% लोकांची सद्सद्विवेकबुद्धी ही जागृत अवस्थेत आहे फक्त प्रश्न हा २% लोकांचा आहे व ही २% लोक ही 98 % लोकांना अडचणीत आणू शकतात. म्हणून प्रत्येकाने आपल्या आजूबाजूला असलेली अशा २% लोकांची सद्सद्विवेकबुद्धी कशी जागृत करता येईल त्यासाठी प्रत्येकाने आपल्या स्तरावर प्रयत्न करणे गरजेचे आहे.



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

.

3 thoughts on “आज मानसशास्त्रीय अंगाने ‘कोरोना’ समजून घेऊया!!”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!