Skip to content

या नवीन वर्षात स्वतःचं मानसिक स्वास्थ्य असं जपा!

या नवीन वर्षात स्वतःचं मानसिक स्वास्थ्य असं जपा!


राकेश वरपे

(मानसशास्त्र तज्ञ, करीअर काउंन्सिलर )
संचालक, आपलं मानसशास्त्र


असंख्य व्यक्ती जगण्याच्या या उत्तुंग धावपळीत नुसतं धावत सुटलेत, कुठे जायचं आहे..माहीत नाही! कुठे पोहोचायचं आहे.. माहीत नाही! पण प्रत्येकाच्या मनात एकमेव असणारं उत्तर म्हणजे….

आम्हाला यशस्वी व्हायचं आहे, आम्हाला आनंदी रहायचं आहे…!

पण यश आणि आनंदी राहणं म्हणजे काय ??? तर माहीत नाही!!

४० एकर जमीन आहे, मध्यवर्ती शहरात २ फ्लॅट आहेत, करोडोचा बँक बॅलन्स आहे, पुढच्या दोन पिढ्या बसून खातील इतकं सोनं आहे…

पण पठयाला अवघं ४० शी सुद्धा लागली नाही, तर बीपी आणि शुगरचा त्रास आहे, बायको ऐकत नाही..वेळ देत नाही अशी सारखी तक्रार करते आणि मुलं तर शेवटचं कधी पप्पा बोलले होते, हे सुद्धा पठयाला आठवत नाही..इतकं यश आणि आनंदी राहण्यासाठी पठयाने स्वतःची झिजवली.

त्या बदल्यात पठयाला बीपीच्या २ गोळ्या (सकाळ-रात्र) आणि शुगरच्या ३ गोळ्या (सकाळ-दुपार-रात्र) असा गोड महाप्रसाद मिळाला.

अशा या सगळया सावळ्या गोंधळात आपली पुढची पिढी आपलं सूक्ष्म निरीक्षण करत आहे…

मग यावर उपाय काय??

कशासाठी महागडे फ्लॅट आणि बंगले

ज्या व्यक्तींचं स्वप्न फ्लॅटमध्ये राहण्याचं आहे आणि त्यासाठी ते धडपडत आहेत, अशा सर्वांना एक कळकळीची विनंती. तुम्ही फ्लॅटमध्ये जरूर जा, स्व अनुभव घ्या. पण त्यासाठी स्वतःचं आणि कुटुंबाचं मन मारून काटकसर अजिबात करू नका.

जगण्याची मोठी स्वप्ने पहा

तुमच्या आवडीची एखादी गोष्ट दररोज कसे करता येईल, याकडे ऊर्जा खर्च करा. तसेच त्याचा आनंद इतरांनाही द्या. इतरांच्या आवडीनिवडीत सुद्धा सहभागी व्हा. पुढच्या काही महिन्यात किंवा वर्षात अशा काही प्रेक्षणीय ठिकाणी जा, ज्याचा तुम्ही कधीतरी काटकसर करायचीये म्हणून विषय बाजूला ठेवला होता.

बचतीपेक्षा कमविण्याकडे भर द्या

आपण सर्वसामान्य माणसं बचतीच्या नावाखाली काय-काय काटकसर करत असतो, याचा काही नेम नाही. आलेला एक मजेशीर पण गंभीर अनुभव सांगतो. एक गृहस्थ आपल्या बायको आणि मुलीसोबत पाणीपुरी गाडीवर माझ्या अगदी शेजारी उभे होते. गृहस्थाने मुलीला आणि बायकोला विचारलं काय खाणार…दोघेही उत्तरल्या..शेवपुरी! यावर यजमान म्हणाले एक शेवपुरी २५ ची आहे आणि पाणीपुरी १५ ची म्हणून दोन शेवपुरी घेण्यापेक्षा एक शेवपुरी आणि पाणीपुरी असं मागूया…अशी बरीचशी मनं आपण मारत असतो, कारण आपल्याला बचत महत्वाची वाटते.

उद्या काय होईल या अतिविचारात वेळ घालवू नका!

भविष्याची चिंता जितकी कराल तितकं भविष्य तुम्हाला गोंधळात टाकत राहणार. कारण जितका विचार कराल तितकी प्रत्यक्ष कृती करण्याची ऊर्जा नष्ट होते. म्हणून वर्तमान सुधारा. इतरांमध्ये दोषच दिसत असतील तर काहीही टोकाकडचे निर्णय घेऊ नका. कारण ही तुमची समस्या आहे, याचा अगोदर स्वीकार करा.

स्वतःच्या प्रेमात पडा.

स्वतःची इतरांशी मुळीच तुलना करू नका. तुम्ही सुद्धा एक स्वतंत्र व्यक्ती आहात, कधीतरी तुमच्याकडे सुद्धा अनेक पोसिटीव्ह विचार आले असतील, त्यांना उजाळा द्या. तुमची भक्कम बाजू जगाला दाखवा. ज्या व्यक्ती नुसत्या किरकिर करतात ते स्वतःच्या प्रेमात कधीच पडू शकत नाही आणि दुसऱ्याच्या प्रेमात पडण्याचा तर विषयच नाही. म्हणून इतरांना काय वाटेल, हा विचार कचऱ्याच्या डब्यात फेकून द्या आणि तुम्हाला स्वतः विषयी काय वाटतंय यावरची धूळ झटकून स्वतःमध्ये बदल घडवा.

रोज मेडिटेशन करा, आतला आवाज ऎका

भविष्यात गोळ्या खायची वेळ येऊन नये, असं ज्यांना वाटतंय त्यांनी फक्त रोज नित्यनेमाने मेडिटेशन करा. मला वेळ मिळत नाही, बघू कसं जमतंय हे विचारांचं घाणेरडं वर्तुळ खोडून टाका.

तुमच्या देवाची वास्तव कल्पना मांडा

छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राणी लक्ष्मीबाई, महात्मा गांधी, मदर टेरेसा, बाबा आमटे, तुकाराम महाराज अशा थोर आणि महान व्यक्तींविषयी खूप वाचन करा. एक सांस्कृतिक वारसा किंवा परंपरा म्हणून मूर्तिपूजन जरूर करा, पण त्यापेक्षाही जास्त अशा व्यक्तींचा इतिहास समजून घ्या, आचरणात आणा.

स्वतःचा वेळ आणि ऊर्जा कुठे वाया जात आहे, हे शोधा

मोबाईल, टीव्ही, सोशल मिडिया, विनाकारण चौकश्या, इतरांचा द्वेष या सगळ्या आकर्षक गोष्टी तुमचा वेळ आणि ऊर्जा वाया घालवत आहेत. खूप वेळ यामध्ये अडकल्यानंतर महत्त्वाचे काम सुदधा करायची इच्छा राहत नाही, कारण २ तास अगोदर अशा क्षुल्लक गोष्टींमध्ये वेळ वाया गेलेला असतो. म्हणून वेळ आणि ऊर्जा वाया जाणाऱ्या गोष्टी शोधून त्यावर काम करा.

अजून खूप काही लिहिण्यासारखं आहे, कारण विषयच असा आहे की तुम्ही शेवटपर्यंत वाचाल. पण इथेच थांबतो. जर सर्वच सांगितलं तर मग तुम्ही काय कराल. जसं मगाशीच उल्लेख केला होता की नुसतं वाचत रहाल तर काहीतरी करण्याची ऊर्जा ही नष्ट होते…

म्हणून सुरू झालेल्या या वर्षात स्वतःचं मानसिक स्वास्थ अगोदर जपा. कारण शेवटी तेच महत्वाचं आहे…

ते जर टिकून राहिलं तर १० बाय १० च्या खोलीत सुद्धा राजासारखे जगता येते…



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

.

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!