स्वीकार: मानसिक आजाराचा….
सोलापूर
समुपदेशन प्रक्रियेच्या दरम्यान सीमा (नाव बदललेले आहे) व सीमाचे आई-वडील माझ्याकडे चिंताग्रस्त अवस्थेत मान खाली घालून बसले होते… अचानक सीमाच्या आईने रडायला सुरुवात केली….सीमा रागारागाने आईकडे बघत होती… सीमाच्या वडिलांना काय बोलावे हे कळत नव्हते… काल झालेल्या घरातील प्रकरणामुळे घरातील तिघांच्या वर्तनात कमालीचा बदल झाला होता..
सीमा ही मानसिक आजाराने गेल्या सहा वर्षापासून गंभीर मानसिक आजारामुळे (psychosis) मनोविकार तज्ञाकडे उपचार घेत होती…काल सीमाने अचानक वडिलांना शिवीगाळ केली व घरात सतत बडबड करीत असलेल्या सीमाने वडिलांनाही बेदम मारहाण करायला सुरुवात केली…
सीमाच्या आईने सीमाला प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला पण सीमाच्या बेभान शक्तीपुढे आईचे प्रयत्न निष्फळ ठरले… आजूबाजूच्या शेजाऱ्यांनी आरडा-ओरड ऐकताच सीमाच्या घरात प्रवेश करून सिमाला एका खोलीत बंद करण्यात यश मिळवले…
सीमाच्या आईने शेजाऱ्यांना कल्पना देण्याची गरजच नव्हती बहुतेकजणना सीमाच्या मानसिकतेबद्दल कल्पना होती… सीमाच्या आईने सर्वांचे आभार मानून घराचा दरवाजा बंद केला…
घरातील या सर्व प्रकारामुळे सीमाची आई अत्यंत संतप्त झाली होती…. बाजूला पडलेल्या लाकडी फळीला हातात घेऊन सरळ ती सीमाच्या खोलीत गेली व दरवाजा आतून बंद करून तीने सिमला चांगलेच झोडपून काढले…. व बाहेरून येऊन स्वतः रडायला सुरुवात केली…
कालच्या या प्रकरणामुळे सीमाच्या लक्षणात अजूनच वाढ झाली … असंबंध बडबड, हातवारे व शारीरिक हालचालींना मोठ्या प्रमाणात गती प्राप्त झाली होती…
सीमाची आई म्हणाली..
गेली सहा वर्षे आम्ही सिमाला सांभाळत आहोत.. आम्ही कसे दिवस काढले तिच्यासाठी आमचे आम्हाला माहित…आणि ही आम्हाला समजूनच घेत नाही…. आम्ही आता म्हातारे झालोय… आता सहन होत नाही आम्हाला सीमाला सांभाळायला…वडिलांनी काहीच बोलण्याचे टाळले ते फक्त रडत होते…
एकंदरीतच संपूर्ण कुटुंबाच्या केस हिस्ट्री व मुलाखतीतून हे स्पष्ट झाले की सीमाच्या आजाराचा व तिला सांभाळण्याचा ताण-तणाव मोठ्या प्रमाणात आई-वडिलांना झालेला होता….
मानसशास्त्रीय संकल्पनेत याला एक्सप्रेस्ड इमोशन (expressed emotions) असे म्हणतात…
सतत एखाद्या आजारी, अपंग, मतिमंदत्व वा वृद्ध अशा व्यक्तींना सांभाळताना आलेल्या मानसिक थकव्यामुळे काळजी घेणाऱ्या व्यक्तीचे वा कुटुंबांचे वर्तन अधिकच कडक व रुक्ष बनत जाते… आई-वडिलांनी सीमाला देत असलेली वागणूक बाबत विचारताना असे लक्षात आले की… आता एवढ्यात गेल्या सहा महिन्यापासून सीमाच्या आईने सीमाशी अधिकच कडक व आपुलकी विरहित वागायला सुरुवात केली होती…
पुढील तीन चार कौन्सिलिंग सेशनमध्ये आई-वडिलांना कौन्सिलिंग ची गरज आहे हे प्रामुख्याने लक्षात आले….
सीमाने इंजिनिअर बनावे ही सुप्त इच्छा सीमाच्या आजारपणामुळे आई-वडिलांची नष्ट झाली होती.. व त्यातूनच आईच्या मनामध्ये मोठ्या प्रमाणात नैराश्य व वैफल्यग्रस्तता निर्माण झाली होती.. सविस्तरपणे बोलल्यानंतर सीमाचा व तिच्या मानसिक आजाराच्या स्वीकारा बाबत कौन्सिलिंगची संकल्पना त्यांच्यासमोर मांडली… स्वीकारायचा विविध पायऱ्या व आईवडिलांची मानसशास्त्रीय तयारी करून घेण्यासाठी खालील बाबींवर साधारणतः दहा ते बारा कौन्सिलिंग सेशन घेण्यात आले…
(१) माझा पाल्य मानसिक आजाराने ग्रस्त आहे ही वस्तुस्थिती आहे
(२) माझ्या पाल्यास जीवन जगताना अनेक अडचणीचा सामना करावा लागेल.
(३) माझा पाल्य व इतरांची मुले यांच्या मध्ये तुलना करण्याचा प्रयत्नही मी करणार
(४) माझ्या पाल्यास जीवन जगताना नेहमीच आम्हाला सहकार्याची भूमिका वटवावी लागेल
(५) माझ्या आयुष्यात आलेले अपयश माझ्या पाल्यामुळे आलेले नाही
(६) आम्ही आमच्या पाल्याची काळजी उत्तमरित्या घेऊ शकतो
(७) माझा पाल्य स्वतःची काळजी स्वतः उत्तम रित्या घेण्यास समर्थ बनू शकतो
(८ ) आम्ही आमच्या पाल्यास उपचार, पुनर्वसन , समुपदेशन व मानसोपचाराच्या सर्व सुविधा देऊ
(९) माझा पाल्य जसा आहे तसा आम्ही त्याचा स्वीकार करण्याचा प्रयत्न करू ….
अशा एक ना अनेक बाबींवर समुपदेशन प्रक्रिया पार पाडण्यात आली… या संपूर्ण समुपदेशन प्रक्रिये मधून आई-वडिलांनी सीमाचा व तिच्या मानसिक आजाराचा मोठ्या प्रमाणात स्वीकार केला…. आज या घटनेला तीन वर्ष पूर्ण होत असून… सीमा स्वतःच्या पायावर उभी आहे… एका खाजगी ऑफिसमध्ये “ऑफिस -असिस्टंट” म्हणून काम करत आहे ….मनोविकारतज्ञ व औषधोपचार पहिल्या प्रमाणे चालू आहे… घरात कोंडून ठेवलेली सीमा आज समाजामध्ये आत्मविश्वासाने काम करीत आहे…बदल झालाय तो केवळ सीमाच्या आई-वडीलांच्या स्वीकारा मुळे… आणि म्हणूनच औषधोपचार प्रमाणेच मानसिक आजाराचा, अशा कुटुंबाचा व अशा पीडित व्यक्तींचा स्वीकार करणे उपचाराचाच एक भाग असायला पाहिजे……
Online Counseling साठी !
रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!
ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!
“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया“
.
चागल