
मुलगी तुझ्या प्रेमात पडली म्हणजे तू तीचा मालक झालास असे नाही.
तिने तुझे प्रेम नाकारले म्हणजे तिने तुझा अपमान केला असे नाही.
तिने तुझ्याबरोबर प्रेम संबंध ठेवले म्हणजे ती तू म्हणशील तेव्हा उपलब्ध आहे असे नाही.
मुलगी दुसऱ्या मुलाबरोबर डेटिंग करते म्हणजे तीने तुझ्याबरोबरही डेटिंग करावे असे नव्हे.
एखादे कपल सार्वजनिक ठिकाणी भान सुटून आकंठ प्रेमात बुडाले म्हणून त्या मुलीने तुझ्या इच्छेनुसारही तसेच वागावे असे नाही.
एखादी मुलगी अडचणीत आहे म्हणजे ती तुझ्यासाठी उपलब्ध आहे असे नाही.
छोट्या मुली वडीलकीच्या नात्याने जवळीक करतात याचा अर्थ त्या तुझ्याकडे आकर्षित होतात असे नाही.
छोट्या मुली तुझा वाह्यातपणा सांगायला घाबरतात किंवा त्या संकोचतात याचा अर्थ त्या तुला मुक संमती देतात असे नाही.
तू सत्तेमध्ये आहेस म्हणजे कॉन्स्टिट्यूअन्सी मधल्या हवे त्या मुलीचा तू हवे तसा वापर करू शकतोस असे नाही.
एखाद्या मुलीची खासगी गोष्ट तुला माहिती झाली म्हणजे तिला ब्लॅक मेल करायला तुला मोकळीक मिळाली असे नाही.
कायद्याच्या प्रत्येक कलमामध्ये तुला पळवाटा शोधायच्या असतात पण मुलीने न केलेल्या चुकांमध्ये सुद्धा चुका शोधून तुला तिला शिक्षा द्यायची असते याची तुला कायद्याने परवानगी नाही.
भारतीय पुरुषांना हा सुसंस्कृतपणा कोण शिकवणार आणि कसा शिकवणार? हा खरा प्रश्न आहे.
कायद्याने निर्भयाच्या चार क्रूर हैवानांना आज फाशी दिली.
इतका निघृण आणि गलिच्छ पद्धतीने वर्तणुक करणारे तरुण तयार होतात हा समाजाचा दोष आहे.
यावर मुळातूनच काम करण्याची आवश्यकता आहे.
निव्वळ कुमारिकांचेच नव्हे तर विवाहितांचे आयुष्य सुद्धा सुखी आणि समृद्ध होण्यासाठी पुरुषांचे प्रशिक्षण होणे आवश्यक आहे.
फाशी हे प्रश्नाचे तात्कालिक समाधान आहे.
यातून गुन्हेगार अधिक शातीर होऊ शकतात, कायद्याच्या कलमातील पळवाटांचा अभ्यास करून गुन्हे करू शकतात.
पुरुषांचे शिक्षण आणि त्यांना त्यांच्या स्वतःच्या मानसिक आणि लैंगिक व्यवहारांबद्दलचे प्रशिक्षणच कायमस्वरूपी समाजात स्त्रियांना सुरक्षितता देऊ शकते असे माझे मत आहे.
Online Counseling साठी !
रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!
ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!
“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया“
.

