Skip to content

आयुष्याच्या प्रवासात एकदा अपयश मला भेटलं…मजेशीर कविता !

अंबरीश
आयुष्याच्या प्रवासात एकदा अपयश मला भेटलं
नको असलेल्या त्या पाहुण्याला माझं मन खिन्नपणे भेटलं!
नजर माझी झुकल्या गेली, विश्वास थोडा कमी झाला,
का मला अपयश भेटले? विचार मला सतवून गेला!
मी त्याला टाळतोय हे अपयशाला लगेच कळले,
नजर रोखून माझ्यावरती अपयश माझ्याशी बोलू लागले,

मी तुला नको होतो जाणीव मला पूर्ण आहे,
अरे वेड्या तुझ्याच तर मी कर्माचे रे फळ आहे!
भेटण्याला माझ्या तू दैवावरती ढकलू नकोस
यशाच्या न भेटण्याला कारणे कोणतीच देऊ नकोस,
नजरेला नजर देणे माझ्या रे तू टाळू नकोस
स्वतः वरचा विश्वास तर अजिबातच तू ढळू नकोस

अपयशाच्या या वाक्याने भरून मला आले,
डोळ्यावरती अश्रुंचे ढग जमा झाले
पाहून माझी भावस्थिती अपयश पुढे म्हणाले
यशाच्या त्या शिखराची पायरी मी आहे
यशापर्यंत पोचविणारा शिक्षक मी आहे
यशाची आग चेतवणारा विस्तव मी आहे
किंमत त्याची समजवणारा गाईड मी आहे!

अपयशाचे शब्दबाण काळजात जाऊन भिडले
डोळ्यांमधून अश्रुंचे झरे वाहू लागले
त्याकडे दुर्लक्ष करत अपयश  पुढे बोलले
अशुद्धीना जाळणारा सोनार मी आहे
दगडाची मूर्ती घडवणारा शिल्पकार मी आहे
नेहमी तुझ्या सोबत राहील असा खजिना मी आहे
भविष्यात साथ देईल तो अनुभव  मी आहे

अपयशाची बडबड ऐकून वैतागून मी गेलो
बस कर तुझी बडबड आता! रागावून मी बोललो
किती मारशील प्रौढी आता बस कर! तुझे बोलणे
कंटाळलोय आयुष्याला नकोसे झालेय जगणे
बोलणे माझे थांबवून अपयश पुढे बोलले
मी तर तुझा मित्र आहे ओळखत नाहीयेस मला
नजरेत माझ्या नजर देऊन पाहत नाहीयेस मला

मी तुझे वर्तमान आहे स्वीकारून घे मला
भविष्य तुझे बदलण्यासाठी वापरून घे मला
भविष्यात जेव्हा यश येईल वर्तमानच तर सोबत राहील
भूत आणि भविष्याची चिंता पोखरून तुझे प्राण घेईल
वर्तमानाचा स्वीकार तू एकदा करून तर बघ
मी तुझा मित्र आहे हात माझा धरून तर बघ!

अपयशाचे ते बोलणे मला विश्वासार्ह वाटले
त्याच्या त्या बोलण्यात मला आशेचे किरण दिसले
अपयशाला तेव्हा प्रथमच मित्र मी मानले
नजरेत त्याच्या नजर देऊन जेव्हा मी पाहिले
अपयश माझा आरसा झाला, प्रतिबिंब त्या आरशाचे
लक्षपूर्वक पाहिले, माझेच सर्व अवगुण मला त्यात दिसले.

अश्रूंची ती नदी पुन्हा वाहू लागली
अपयशाची आग काळीज जाळू लागली
काळजातल्या त्या आगीने अवगुण सर्व जाळले
100 कॅरेट सोने त्यातून बाहेर पडले
यशाकडे जाणारा मार्ग मला दिसला
आगीचा तो प्रकाश लख्ख चमकून उठला
चमकणाऱ्या प्रकाशाला मशाल मी बनवले

यशाच्या मार्गावर चालणे सुरू केले
अपयश माझा मित्र जाणीव मला झाली 
कुठे आहे तो आठवण त्याची आली
रस्ता ज्याने दाखवला तो सखा कुठे गेला?
अरे माझ्या आयुष्याचा खरा शिल्पकार कुठे गेला?
अपयशाने बोललेले शब्द  पुन्हा आठवले

यशाकडे घेऊन जाणारा रस्ता अपयशातून गवसलेला होता
भविष्याच्या अंधकारात अनुभवाची मशाल बनून तो मित्रच तर सोबत होता
कोणताही निर्णय घेताना एक गुरू म्हणून तोच तर सोबत होता
स्वतःतील वाईट गुण दूर करण्याची प्रेरणा तोच देत होता
प्रवासाच्या सुरुवाती पासून हा माझा सखा नेहमीच साथ देत होता!

हा माझा सर्वात जवळचा मित्र आता कधीच भेटणार नाही?
माझे आयुष्य बदलवून मला एकटे सोडून गेला की काय?
या विचारात यशाचे ते शिखर जेव्हा मी गाठले
त्या यशोशिखरावर परत माझया त्या मित्राला मी पाहिले
भावविभोर होऊन त्याला मिठी मी मारली 
अरे तू तर अपयश होतास ना?

या माझ्या प्रश्नावर हसून तो म्हणाला
अरे वेड्या! आयुष्यात अपयश असे काही नसतेच
असतात ते फक्त धडे! तू माझ्यापर्यंत पोहचावास 
या साठी मीच तुला वेळोवेळी मदत करत होतो
तुला अनुभव देत होतो, रस्ता दाखवत होतो
तू मात्र मला अपयश समजून पाहिलेस
मी अपयश आहे असे मी तुला कधी सांगितले?

***
            लिहून आणि वाचून दडलेल्या भावना मोकळ्या होतात             
—– इतर लेख वाचा —–
________________________________________
मानसिक आजार व उपचार
________________________________________
प्रेरणादायी लेख/कथा
________________________________________
मुलांचं करीअर काउंन्सिलिंग
________________________________________
लैंगिक शिक्षण
________________________________________
वैवाहीक जीवन
________________________________________
सामाजिक जीवन
________________________________________
पालक – बालक
______________________________________________________
फेसबुक पेज    फेसबुक ग्रुप    YouTube    संचालक     WhatsApp
 _______________________________________________________
आपलेही प्रेरणादायी लेख आम्हाला ९१३७३००९२९ या व्हाट्सएप क्रमांकावर पाठवा. आपल्या नावासकट अत्यंत नम्रपणे ते प्रकाशित केले जातील.
“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!