पर्यावरण जपायला हवं!
संगीता वाईकर
नागपूर.
आपल्या सभोवताली असणाऱ्या सर्व गोष्टी म्हणजे जसे ही झाडे,प्राणी, पशू पक्षी,डोंगर, वारा,जमीन हे सर्व म्हणजेच पर्यावरण.
आपले जीवन सुखी संपन्न करायचे तर हे पर्यावरण शुद्ध असणे अत्यंत आवश्यक आहे.या पर्यावरणाचा आपल्या जीवनाशी प्रत्यक्ष संबंध येतो आणि त्यामुळेच आपल्या आरोग्यावर त्याचा चांगला किंवा वाईट परिणाम दिसून येतो.
माणूस हा देखील पर्यावरणाचाच एक भाग आहे आणि म्हणूनच पर्यावरणाचे रक्षण किंवा पर्यावरण नष्ट करणे आपल्याच हाती आहे.
माणूस हा एक बुद्धिमान प्राणी आहे असे असले तरी आपल्या सुखसुविधा साठी तो कळत नकळत या पर्यावरणाला हानी पोहचवत असतो .आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे प्राणी पक्षी मात्र पर्यावरणाला जपण्याचे किंवा त्याचे संवर्धन करण्याचे काम करत असतो.
गेल्या काही वर्षांत मानवाच्या करणीनेच पर्यावरणाचा समतोल बिघडला आहे.त्यामुळे निसर्गातील सर्वच घटकांना अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे.जंगल तोड करणे,चौपदरी रस्ते ,उड्डाणपूल , मोठमोठ्या इमारती बांधणे याचे काम विकासाच्या नावाखाली काही वर्षांपासून अत्यंत वेगाने सुरू आहे.
याचा दुष्परिणाम म्हणजे सातत्याने वाढणारे तापमान,कमी होणारा पाऊस,कधी दुष्काळ तर कधी महापूर,अवकाळी पाऊस या मूळे अनेक समस्या निर्माण होत आहेत.
प्लास्टिकचा अतोनात वापर आपण आपल्या सोईसाठी करतो पण त्यातून निर्माण होणारी कचरा निर्मिती हे प्रदूषणाचे एक गंभीर कारण आहे.प्लास्टिक चे विघटन होत नाही ते जाळले तर विषारी धुरामुळे वातावरण प्रदूषित होते.
आणि मातीतही त्याचे विघटन ही होत नाही.या सर्वांचा थेट परिणाम आरोग्यावर होत आहे.नित्य नवे रोग आज दिसून येत आहे.हृदयविकार, श्वसन विकार,मेंदूचे विकार आणि अनेक नव्या व्याधी समोर येत आहे.
प्रदूषणामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे.मानवी जीवनाचा नाश होत आहे तसेच अनेक प्राणी पक्षी देखील नामशेष होत आहे.
निसर्ग चक्रातील सर्वच घटक अत्यंत महत्वपूर्ण आहे निसर्गातील या साखळीचा एकही घटक नाश पावला तर संपूर्ण निसर्ग चक्रच बिघडते आणि त्याचे परिणाम सर्वांना च भोगावे लागतात.निसर्ग निर्मित सर्व घटकांचे विघटन होते पण मानव निर्मित घटकांचे मात्र होत नाही .
पूर्वी निसर्गाच्या सान्निध्यात राहून साधी राहणी आणि उच्च विचारसरणी अवलंबिली जात होती तर आज मात्र आधुनिकतेच्या नावाखाली योग्य काय अयोग्य काय याचा तिळमात्रही विचार केला जात नाही .याचे गंभीर परिणाम पर्यवणाचे संतुलन बिघडण्यात होत आहे.आणि भविष्यातील संकटांची ही नांदी आहे.
भूगर्भातील पाण्याची पातळी कमी होत आहे,जीवघेणी वादळे ,भूकंप, अवर्षण,महापूर तसेच जंगल तोड केल्याने वन्य प्राणी नष्ट होत आहे,त्यांना अन्न पाणी न मिळाल्याने ते शहरात प्रवेश करत आहे आणि त्यांच्या दहशतीने त्यांचा जीव घेतला जात आहे.
हे सर्वच भयावह आहे.सर्वानाच जगण्याचा अधिकार आहे.कारखान्यातील प्रदूषण,शहरातील वाहनांची वाढती संख्या यामुळे शहरातील प्रदूषण वाढले आहे.
पर्यावरण जपण्याचा सर्वांनीच प्रयत्न केला पाहिजे.ती आपली प्रथम जवाबदारी आणि आपले आद्य कर्तव्य आहे.प्लास्टिकचा वापर न करणे ,वृक्ष लागवड,संवर्धन करणे,कचरा नियोजन,वीज पाणी बचत ,दुचाकी चारचाकी ऐवजी सायकल चा वापर , इलेक्ट्रोनिक वस्तूंचा कमीत कमी वापर,साधी राहणी या सर्वातून आपण सातत्याने होणारे प्रदूषण निश्चित कमी करू शकतो.
पर्यावरण दिवस हा एकच दिवस साजरा न करता प्रत्येक दिवशी पर्यावरण जपणे आपल्याच हिताचे आहे.आपत्तींची पेरणी थांबवायची असेल तर या पर्यावरणाला जाणीवपूर्वक जपणे ही आपली आजची अत्यंत महत्वाची गरज आहे.
त्यासाठी आपली जीवनशैली बदलणे गरजेचे आहे.माणूस ,निसर्ग आणि पर्यावरण यांच्यातील द्वैत मोडून या सर्व बाबींचा साकल्याने आणि समग्रतेने विचार करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
Online Counseling साठी !
रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!
ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!