तिला मी इतक्या वर्षात विसरूनच गेलेलो.
शुभम कोलगे
मी नुकताच कामातून निवृत्त झालेलो. नातवाला बागेत घेऊन जाईन म्हटलं तर त्याचा सकाळी सकाळी टीव्ही. मग आपण एकटेच जाऊ म्हटलं. शिवाय साठीत थोडा व्यायाम म्हणून चालत चालतच बागेत पोहचलो.
ही बाग मला तशी फार जवळची होती. मी एक दोन वर्षांचा असताना आईने मला या बागेत आणायला सुरुवात केलेली. नंतर मी एकटाच अभ्यास करायला नाहीतर मन रमवायला बागेत येत असे. चालून शीण आल्यामुळे मी आपल्या त्याच जुन्या बाकावर पायाची घडी मोडली. व सगळ्या जबाबदऱ्यांवर एक डोळे मिटून एक दीर्घ श्वास फेकून मारला.
मन थोडं शांत वाटल्यावर मी डोळे उघडले. आणि तेथील निसर्गसौंदर्यात हरवून गेलो. बागेत पहिल्यापेक्षा अधिक देशी-विदेशी फुलझाडांची लागवड केली होती. झाड झुडपांना देखील ठराविक आकारात कापून ठेवलेले. माश्यांसाठी एक छोटासा तलाव देखील तयार केला होता.
माझ्या वेळी इतके काही नसले तरी, ती बाग देखील मनाला खूप शांतता द्यायची. माळ्याने नुकतीच जमिनीवरील गवताला पाण्याची फवारणी केल्यामुळे जमीन व त्यावरील गवताच्या पाती मऊशार ओल्या झाल्या होत्या. मी चप्पल काढून पिशवीत ठेवली व मनातले सर्व विचार नाहीसे करून मोकळ्या हवेत चालू लागलो. त्या ओल्या पातींवर काही वेळ चालल्यानंतर मला ती दिसली.
कविता..
माझी बालपणीची मैत्रीण. माझी साठी असली तरी तिचा जन्म हा माझ्या वयाच्या बारा तेराव्या वर्षी झाला होता. त्यामुळे ती देखील आता सत्ते-अठठेचाळीशीची असावी. एकटीच बागडत होती बागेत.
पहिल्यापेक्षा अधिक बहरलेली होती. कैद आयुष्यातून तिला देखील मोकळीक मिळालेली. कधी तेथील फुलझाडांना स्पर्श करत होती तर कधी झाडांवरून मायेने हात फिरवत होती. माश्यांच्या तलावात पाय मोकळे सोडून आनंदात न्हाऊन निघत होती.
ती पण बऱ्याच वर्षांनी आली होती बागेत. तिचे मनसोक्त उंदडणे पाहून तिच्याशी बोलावेसे वाटले पण मी मनाला आवर घातला. तिच्या आनंदाचा भंग करणे टाळले. ती जशी जशी जशी पुढे जात होती. मी स्वतःला न आवरता तिच्या मागे मागे चालत राहिलो. आणि अखेरीस पुन्हा एकदा त्याच बाकावर येऊन बसलो. पुन्हा घट्ट डोळे बंद केले. आणि खिशातील डायरी व पेन काढून तिला मी डायरीत कैद करू लागलो.
बारा-तेरा वर्षाचा असताना अभ्यास करायला आल्यावर कंटाळा आला की मला कविता सुचत असे. मग मी ही वेळ न दवडता वहीच्या पाठच्या पानावर ती उतरवत असे. पण शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरी व जबाबदऱ्यांच्या ओझ्याखाली मी तिच्याकडे दुर्लक्ष केले. ती मध्येच मला सुख-दुःखात भेटायला आलेली. परंतु मी तिला माझी व्यस्तता दर्शवून तिला भेटण्यास स्पष्ट नकार दिला. आज कित्येक वर्षांनी मला ती भेटायला आलेली. मी स्वतःला थांबवू न शकलो.
आयुष्यात बऱ्याच वेळा जबाबदाऱ्या व नोकरी सांभाळता सांभाळता आपणही असे बरेच बालपण-तरुणपणातील सुख दुःखात साथ देणारे सखे सोबती हरवून बसतो. त्यांना निदान आता तरी कामातून मुक्त झाल्यावर भेटायला जायलाच हवे. विचारपूस करावी त्यांची आणि पुन्हा आपलेसे करावे. जबाबदाऱ्यांखाली गडून गेलेली ती मनमोहक चित्रे, कविता, टाकाऊ पासून टिकाऊ, शिलाईकाम, जुने छंद पुन्हा कृतीत आणावेत. मला माझी कविता भेटली होती.
व इथून पुढे माझ्या पत्नी इतकेच तिच्या वरही प्रेम करत राहण्याचा मी निर्णय घेतला आहे. ??
Online Counseling साठी !
रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!
ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!