Skip to content

ती एक आई, पत्नी आणि मुलगी…

आई, पत्नी, मुलगी ……


श्रीकांत राजे

ठाणे.
(८ मार्च २०२०)


काय होतंय, आपण सारे आपल्याच विश्वात इतके गुरफटले गेलो आहोत कि आपल्यालाच कळत नाहीये कि आपल्या आजूबाजूला कोण आहे, काय घडतंय, काय बिघडतंय?

हो मी काही नाहीये समाज सुधारक किंवा समाजात घडणाऱ्या गोष्टींवर भाष्य करून काही सवंग लोकप्रियता मिळवण्यासाठी धडपडणारा एखादा अर्ध्या हळकुंडाने पिवळा झालेला पत्रकार.

कॉलेजच्या जीवनांत (मिसरूड फुटायच्या दिवसात), आम्ही मित्र टवाळकीच्या गप्पा मारतांना एका ज्येष्ठ मित्राने विषयाला धरून पण धाडसी प्रश्न आम्हा लहानग्यांना विचारला. वेश्या व्यवसाय असावा कि नसावा? आम्ही सारेच गांगरून गेलो. आधी हा शब्द उच्चारणे हा गुन्हा आणि त्यावर नुसते बोलणे किंवा चर्चा करणे म्हणजे महादिव्य. मग तोच मित्र समजावणीचा सुरात म्हणाला ‘त्या नसतील तर आपल्या आया, बायका, बहिणी रस्त्याने निर्धास्तपणे फिरू शकतील का? जे पुरुष एकटे राहतात, ज्यांना आपली भूक भागवता येत नाहीत ते कुठे जातील?’

किती गहन विचार होता त्या काळात. किंबहुना हा व्यवसाय पूर्वापार चालत आला आहे. याला राजमान्यता नसेल पण राजाश्रय होता, हे इतिहास सांगतो. ऐतिहासिक गोष्टीत रमण्यापेक्षा सरळ विचार मांडणं चांगलं …. अगदी तीस-चाळीसेक कदाचित पन्नास वर्षांपूर्वी पर्यंत बलात्कार हा चित्रपटांत पाहण्यापर्यंतच मर्यादित होता. तो घरात पोहोचला नव्हता. पिवळ्या वेष्टनातल्या पुस्तकांपर्यंत मर्यादित असणारी उत्सुकता प्रगट होता होता मनाची प्रगल्भता मागे पडू लागली आणि मग विचारांवर विकारांनी मात केली गेली. मला आठवतंय, जेव्हा चित्रपटातला बीभत्सपणा वाढीस लागत होता तेव्हा एका प्रथितयश दिग्दर्शकाने त्याच्या मुलाखतीत मत व्यक्त करताना म्हटले होते – ‘तीन वर्षाच्या मुलीला बाप समोर आल्यानंतर काय झाकायचे ते कळते, पण नवनवीन निर्मात्यांना किती उघडे ठेवायचे ते कळत नाही त्याला कोण काय करणार?’

उंबरठ्याच्या आत असणारी स्त्री केव्हांच घराबाहेर पडली त्याला शतक लोटले होते. डोक्यावर पदर घेऊन वावरणारी स्त्री आता नवनवीन पाश्चात्य वेशभूषेत वावरू लागली होती. यात भर घातली आधुनिक विचारांनी आणि नव्याने उपलब्ध होत जाणाऱ्या माध्यमांनी. सौंदर्याच्या व्याख्या बदलू लागल्या. डोक्यावरचा पदर खाली उतरला होता. मॅक्सिची, मिडी आणि मिडीची मजल मिनी पर्यंत गेली होती. उघड्या खांद्याचे दर्शन सूर्याला होत नसे ते सहज होऊ लागले होते. हिंदुस्थानी संस्कार आधुनिकतेने नटलेले होते ते पाश्चात्य विचारांनी पोखरले जाऊ लागले होते.

तरुणाई नवविचारांनी घडत-बिघडत होती. एकटा पडलेला तरुण-पुरुष तहान कशी भागवावी याचा मनाशी विचार न करता बहकत जात होता, मग समोर होती संस्कार विसरायला लावणारी माध्यमे आणि उंबरठ्याबाहेर पडलेली अबला ….. आई, पत्नी, मुलगी ….

तहान लागल्यावर कुठलेही पाणी चालते, वय, पैसा आणि नातं या सद्सद्विवेकाचा विसर पडतो एकदा तहान लागली कि….. पण विचार करतांना एक गोष्ट लक्षात येत नाही की, संस्कार मागे पडताहेत की विचार विकारांवर सर्रास मात करत आहेत ….. विकारालाही वय नसतं ….. रस्त्यावरून जाताना, मंडईत फिरतांना, गर्दीत घुसल्यावर असे विकारी अनुभवायला येतात. विकारी अनुभव येताक्षणी तिचा प्रतिकार होत नाही हा एक मोठा चुकीचा इशारा समाजात पसरत जाणे दुर्दैवाचे आहे. समाज विस्कळीत झालाय हे खरं आहे. माझ्या अंगाला हात लावत नाही मग झालं. पण शेजारची मुलगी, गर्दीतली तरुणी, कार्यालयातली स्त्री कधीतरी या विकाराची शिकार होतच असते. कुणी बोलतं कुणी ओरडतं पण ऐकणारा सजग आणि सुज्ञ असावा लागतो ते ऐकून प्रतिकार करणारा …..

उत्तम संस्कार होणं हे गरजेचे नाही तर आवश्यक आहे. शिक्षण माध्यमे यावर विचारपूर्वक निर्णय घेऊन बालमन आणि तरुणाई शिक्षित, संस्कारी आणि सक्षम बनवतील हि काळाची गरज आहे. आंतराष्ट्रीय महिला दिवसाचा पुकार १९१० साली झाला पण गेल्या ११० वर्षात किती प्रमाणांत स्त्रिया सुरक्षित राहिल्या? अजूनही आपल्या सरकारात खासदार स्त्रियांचे प्रमाण ३५ % करण्याचा कायदा संमत झालेला नाही. न्याय सर्वांना समान असावा आणि बचावाची संधी प्रत्येकाला मिळाली पाहिजे म्हणून टोकाची भूमिका घेत न्यायासनाला वेठीस धरण्याची किमया करणाररी मंडळी महिला दिनी स्त्री सबलीकरणावर व्याख्याने देत फिरतील …..

पण दोन आणि तीन वर्षांच्या मुलीपासून एकट्याने ते सामूहिक बलात्कारी राक्षसांना विनाविलंब आणि कठोरातील कठोर शासन कां होत नाही किंवा त्यासाठी कायद्यात बदल का केले जात नाही? स्त्री सुरक्षित राहावी म्हणून तीला संरक्षणाचे धडे देण्यासाठी आणि तत्पर सेवा उपलब्ध व्हावी यासाठी कार्य होणे ही काळाची गरज आहे. ऐकले आहे, काही देशात अशा गुन्ह्यांना इतकी कठोर शिक्षा आहे कि पुन्हा गुन्ह्याचा विचार करणे पण दुरापास्त व्हावे ….. पण हिंदुस्तानांत मात्र एकही निर्दोष दोषास पात्र होऊ नये व सर्वांस न्यायाची सामान संधी मिळाली पाहिजे या नावाखाली कृतघ्न नरराक्षसांना वाचवण्याकरता आकाश पातळ एक केले जाते …..

स्त्रीचा सन्मान हा उंबरठ्याच्या आत ठेवला गेला तर समाज तिला सन्मानाने वागवेल…. समान वाटणीत भाऊ बहिणीला तिचा हक्क न मागता देईल …. स्त्रीच्या कर्तृत्वाचा आलेख योग्यतेने मांडून तीला समाजमान्यता मिळेल …. मुलगी असो पत्नी तीला उपभोग्य वस्तू न मानता पुरुषमन तीचा आदर करेल ….. तीला देव्हाऱ्यात ना बसवता मनाच्या कोंदणांत बसवेल ….. तीला विहंगाप्रमाणे विहरु देईल, चाफ्यासारखे दरवळू देईल ….. फक्त ८ मार्चला महिला दिन साजरा न करता ३६६ दिवस आदरेल ….. तेव्हाच आई, मुलगी, पत्नी यांचा वार्षिक दिन साजरा करायची गरज राहणार नाही …..



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!