
अरेंज मॅरेज की लव्ह मॅरेज..
‘तुमची मुलगी एखाद्या रिक्षावाल्या सोबत पळून गेली तर चालेल का?’ असा प्रश्न सगळ्यांना उद्देशून आज एका व्हाट्सएप ग्रुपवर मी वाचला..
मागे ‘व्हॅलेंटाईन डे’ च्या दिवशी एका शाळेने प्रेम विवाह न करण्याची विद्यार्थ्यांना शपथ दिली होती, त्यातली एक मुलगी प्रियकरासोबत पळाली, अशी बातमी टीव्ही9 वर आलेली मी एका व्हाट्सअप ग्रुप वर शेअर केली होती, तिथं “अरेंज मॅरेज की लव्ह मॅरेज” याबाबत डिस्कशन चालू होतं.. वादविवादाच्या भरात “यात खुश होण्यासारखे काय आहे, तुमची मुलगी समजा एखाद्या रिक्षावाल्या सोबत पळून गेली तर तुम्हाला चालेल का?” असा प्रश्न एकाने उपस्थित केला होता..
याचं उत्तर समजून घ्यायचं असेल तर या प्रश्नाच्या मुळात जायला हवे..
पहिलं म्हणजे , विवाह एक वैयक्तिक/कौटुंबिक/सामाजिक ‘सोय’ आहे.. ही ‘मानवनिर्मित’ आहे.. म्हणजे विवाहसंस्था ही कृत्रिम आहे, नैसर्गिक नाही ! आपल्या संस्कृतीत विवाह नावाचा करार हा देवा-ब्राह्मणांच्या आणि समाजाचा साक्षीनं देणंघेणं ठरवून करायची प्रथा होती/आहे.. याला अरेंज मॅरेज म्हणतात.. त्यामुळे तो करार जुळवताना जात/धर्म/पैसा/प्रतिष्ठा/ सोशल स्टेटस म्हणजे घराने की इज्जत वगैरे, या गोष्टी प्राधान्याने विचारात घेतल्या जायच्या.. खूप आधी तर वधूवराच्या एकमेकांच्या पसंती नापसंतीचा प्रश्नच नव्हता.. त्या काळाच्या एकत्र कुटुंबपद्धतीत नवरा-बायकोचं एकमेकांशी भावनिक शेअरिंग, निर्णयस्वातंत्र्य, वागण्या-बोलण्यातली मोकळीक, आणि मतभेदांचा आदर वगैरे भानगडीच नसायच्या.. ती लग्नेही सर्रास टिकून राहत असत.. कारण तीच रीत होती, दुसरा पर्यायच नव्हता.. नवऱ्याने सांगायचं आणि गपगुमान बायकोने ऐकायचं यालाच संस्कार आणि घरंदाजपणा म्हणलं जायचं.. कुलाचार , सणवार, रितीरिवाज यांतून ‘संसार हेच सुख, आणि पतिपरमेश्वर हेच सर्वस्व’ हेच ठसवलं जायचं.. म्हणून एकमेकांशी ‘न पटायचं’ काही कारण नव्हतं.. आणि जरी नसेल पटत तरी, सामाजिक/कौटुंबिक दबावामुळे आहे ते सहन करत लग्न निभावून देण्याकडे जास्त कल होता.. भावनिक घटस्फोट केंव्हाचाच झालेला असला तरी ते दोघं रडतखडत, कुढत एकमेकांसोबत आयुष्य काढायचे आणि यालाच ‘संस्कृती’ म्हणायची पद्धत होती.. आणि वर , “आमच्या काळात नव्हते बाबा एवढे घटस्पोट” याचा अभिमानही मिरवला जात होता.. यालाच अरेंज मॅरेजेसची ‘सफलता’ समजली जायची.. म्हणजे माणसाच्या मतांना, विचारांना, भावनांना काही किंमत नाही, त्यांचं आयुष्य करपलं तरी चालेल, पण ‘घराने की इज्जत’ मात्र वाचली पाहिजे!! दोघे (अजूनही) एकाच छताखाली रहाताहेत, वर घरात पाळणा देखील हाललाय, म्हणजे लग्न सफल झालंय, अशी सुटसुटीत व्याख्या होती..
नंतर काय झालं, एकत्र कुटुंबपद्धती नष्ट व्हायला सुरुवात झाली. नोकरी व्यापार या निमित्ताने लोक आपलं मूळ गाव सोडून वेगवेगळ्या गावात राहू लागले. त्यामुळे अर्थातच कौटुंबिक आणि सामाजिक प्रेशर कमी झालं. (पण ते अजून संपलं नाही). मुलींचंही कार्यक्षेत्र विस्तारलं, त्या आर्थिक आत्मनिर्भर व्हायला लागल्या, त्यामुळं विवाह ठरवताना मुलामुलींच्या वैयक्तिक आवडीनिवडीला देखील नंतर प्राधान्य देऊ लागले.. सिनेमाचा प्रभाव, आधुनिकीकरण आणि इतर संस्कृतींशी सरमिसळ या गोष्टींच्या प्रभावामुळे अगदी अरेंज मॅरेज मध्ये देखील मुलामुलींना वेगळे जाऊन बोलायची ‘संधी’ देण्यात येऊ लागली.. आणि होकार-नकाराचा अधिकार देखील काही अंशी मुलामुलींच्या हातात देण्यात येऊ लागला..
हा संक्रमणाचा काळ होता.. इथेच लग्नाच्या निवडीचा ॲक्सिस (axis) वाडवडिलांच्या हातातून मुलांच्या हातात जायला सुरुवात झाली.. आईवडील (किंवा नातेवाईक) स्थळं आणू लागले, आणि त्यावर निर्णय मुलं पण देऊ लागली..
ज्या कुटुंबात मुलांना अधिकच मोकळीक आहे, अशा कुटुंबात मुलं आपल्या पसंतीनं स्वतः मुलगा/मुलगी निवडू लागले, आणि आईवडलांच्या परवानगीने त्यांची अरेंज मॅरेज होऊ लागली.. अर्थात जात, शिक्षण, आणि सामाजिक स्टेटस आईवडिलांना पसंत असेल तर होकार मिळायला सोपं जाई, अन्यथा नाही..
मग जर आई-वडील आपल्या निवडीला ‘नाहीच म्हणतील’ याची गॅरंटी असेल, तर काही धाडसी मुलं-मुली आधी लग्न करून मग घरी सांगू लागले किंवा घरातून पळून जाऊन लग्न करू लागले.. गोष्टी इथपर्यंत आल्या..
हे असे विवाहाच्या निर्णय पद्धतीत झालेले बदल थोडक्यात आपण पाहिले..
आता मूळ प्रश्नाकडे येऊ..
तो म्हणजे, तुमची मुलगी एखाद्या रिक्षावाल्यासोबत पळून गेली तर तुम्हाला चालेल का?
मला सांगा, मुलांना घरातून पळून जाऊन लग्न का करावं लागतं/वाटतं?
एक म्हणजे, आईवडील ऐकणारच नाहीत आपल्याला समजून घेणारच नाहीत अशी मुलामुलींची खात्री असते तेव्हा.. आणि दुसरं म्हणजे, मुलांना घरात वैचारिक मोकळीक नसते तेंव्हा.. बऱ्याच घरांत मुलांनाही वेगळी मतं असू शकतात, त्यांच्या भावनांना पण आदर द्यायचा असतो, याचं भान/ज्ञान नसतं.. मुलं सज्ञान झाल्यावर त्यांच्याही भावना विचारात घ्याव्यात अशी काही पद्धतच नसते.. मुलं ही आपली प्रॉपर्टीच असतात असं मानायची सवय आपल्या संस्कृतीत खोलवर मुरलेली आहे.. इतकी की त्यात आपल्याला वावगं असं काही वाटतच नाही.. “स्वतःचं भलंबुरं कशात आहे हे कळण्याची त्याची/तिची अक्कलच नाही, त्यामुळं त्यांचे निर्णय आम्हीच व्यवस्थित घेऊ शकतो”, असा विचार करणाऱ्या पालकांना जराही वाटत नाही की वयाच्या विशीपर्यंत जर आपल्या मुलांना सो कॉल्ड ‘अक्कल’ येत नसेल, तर वीस वर्षे आपण काय झोपा काढल्या का? आपल्यातील पालकत्व कमी पडलं असं वाटत नाही का वाटत आपल्याला? म्हणून मग मुलं सज्ञान झाल्यावर ‘तू तुझं तुझं बघ’ म्हणण्यापेक्षा त्यांचे सगळे निर्णय पालकच घेत असतात.. निसर्गात असं फक्त मानव प्रजातीतच होतं बरका!
आता दुसरा प्रश्न.. मला सांगा, मुलांनी केलेल्या निवडीला पालक पसंती का देऊ शकत नाहीत?
याची तीन कारणं आहेत.. एक म्हणजे, मुलांच्या प्रेमाधारीत निवडीपेक्षा पालकांचे निवड क्रायटेरिया वेगळे असतात.. त्यांना जात/धर्म/पैसा/प्रतिष्ठा या गोष्टी जास्त महत्त्व देण्यासारख्या वाटत असतात..
दुसरं म्हणजे, आपल्या पाल्याची निवड चुकीची आहे, अथवा ती चुकीच्या क्रायटेरियांवर बेतलेली आहे, असं वाटत असतं किंवा हे स्पष्ट दिसत असतं तेव्हा..
आणि तिसरं कारण म्हणजे, आपला मुलगा/मुलगी आवडीनिवडीच्या अथवा निर्णयक्षमतेच्या बाबतीत अजिबात सक्षम नाही असं वाटत असतं तेव्हा, पालक मुलांनी केलेल्या निवडीला पसंती देऊ शकत नाहीत..
आता येऊ, माझी मुलगी रिक्षावाल्या सोबत पळून जाण्यावर..
इथे दोनच गोष्टी पालक म्हणून मला करायचेत-
पहिली म्हणजे, काहीही इश्यू काहीही असो, आपल्या आई-वडिलांसोबत आपण freely बोलू शकतो, शेअर करू शकतो, आणि सारे मिळून चर्चेने तोडगा काढू शकतो, हा विश्वास मला तिच्या मनात निर्माण करायचाय.. (असा विश्वास निर्माण करायची सुरुवात ही लहानपणापासूनच होत असते, आणि लहानसहान गोष्टीतून होत असते).. आपल्या पाल्याला जेव्हा भावनिक शेअरिंग साठी आईवडिलांपेक्षा काका मामा मावशी आत्या असे इतर नातेवाईकच भरवशाचे वाटत असतात, तीच ‘पालक’ म्हणून आपली हार असते! आपलं काहीतरी चुकलेलं असतं..
जेव्हा माझ्या आणि माझ्या मुलीत भावनिक मोकळीक आणि विश्वास असेल तेव्हाच आयुष्याचा असा काही निर्णय घेण्याआधी ती मला नक्की सांगेल की, अमुक एक रिक्षावाला मला आवडू लागला आहे.. ती डायरेक्ट त्याच्यासोबत पळून जाणार नाही..
आता दुसरी गोष्ट मला ही करायचीय की, तिच्या निवडीबाबत मला तिला सक्षम बनवावं लागेल.. वयात येतानाच ‘लग्न म्हणजे काय असतं’, संसारासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक असतात, प्रेम आणि लग्न यात संबंध काय असतो, अशा अनेक प्रश्नांची मला तिला ओळख करून द्यावी लागेल.. दोन भिन्न सामाजिक/आर्थिक परिस्थितीतली आणि भिन्न मतांची माणसं एकत्र राहणं, ही साधी गोष्ट नसते, आजूबाजूच्या उदाहरणांतून दाखवावं लागेल.. शारीरिक आकर्षण आणि लैंगिक उर्मी या गोष्टी व्यवहाराच्या पातळीवर ‘लॉंग टर्म’ राहण्यासाठी भावनिक गुंतवणूक होणं, आणि भावनिक गुंतवणूक होण्यासाठी विचार जुळणं किती महत्वाचं असतं, ते चर्चांतून आणि उदाहरणांतून दाखवून द्यावं लागेल..
अरेंज मॅरेजला विरोध करणाऱ्या प्रत्येकाला ‘मग तुमची मुलगी कोणा ऐऱ्यागैऱ्या बरोबर पळून गेली तर तुम्हाला चालेल का?’ असा प्रश्न विचारून नामोहरम करण्याचा नेहमीच प्रयत्न केला जातो.. पण त्यासोबतच तिनं तसं करू नये म्हणून, पालक म्हणून प्रत्येकानं करावयाच्या संस्कारांच्या बाबतीतली जबाबदारी मात्र झटकली जाते..
आपल्या मुलीला ‘मवाली टाईप’ मुलं आवडताहेत का? सिनेमातल्या मवाली हिरोंचं आपण नको तितकं उदात्तीकरण घरात करतोय का? सणांच्या किंवा कुठल्याही कारणाखाली चाललेल्या गल्लीतल्या टगेगिरीवर आपण पांघरून घालतोय का, हे बघायला नको का? मुलीपुढं बेदरकारपणा अन डॅशिंगपणा याऐवजी जबाबदारी अन समंजसपणा महत्त्वाचा असल्याचं ठसवणे, हे आपलं काम नाही का? असो..
समजा इतकं करून देखील जर ती ऐकतच नसेल, तर “भावनेच्या भरात लग्नाचा निर्णय घेण्याआधी तुम्ही काही काळ एकमेकांसोबत घालवा, एकमेकांना पूर्ण समजून घ्या, मग वर्ष दोन वर्षे गेल्यानंतर देखील तुमची एकमेकांबद्दलची ओढ अजूनही टिकून असेल, तर मग एकमेकांबरोबर आयुष्य घालवायला हरकत नाही”, असा सल्ला मी देईन.. प्रत्येक पालकाला हेच वाटतं की आपला मुलगा किंवा मुलगी सुखात राहावी.. पण म्हणून आपण त्यांच्यासाठी निवडलेल्या सुखाच्या व्याख्येत ते ‘समाधानी’ राहणार नसतील, तर मग त्या सुखाला तरी काय अर्थ आहे?
रिक्षावाला असो किंवा खालच्या जातीचा दुसऱ्या धर्माचा असो, हे विषय गौण आहेत (निदान माझ्यासाठी तरी!).. त्याच्या आतला ‘माणूस’ महत्त्वाचा आहे.. आपलं कोणाचंही आजचं सोशल स्टेटस हे आपल्या पूर्वजांच्या पुण्याईमुळंच असतं ना? समजा, उद्या जर काही कारणाने मी रस्त्यावर आलो, तर माझ्यावर कोणी प्रेमच करू नये का? पिक्चरमधल्या गरीब हिरो ने अमीर खानदानातली मुलगी पटवली अन मुलीचा बाप त्याला विरोध करत असेल तर आपण आपसूकच त्या प्रेमी युगुलाच्या बाजूने असतो आणि मनातल्या मनात त्या बापाला व्हिलन करून टाकतो.. आपल्यालातल्या कित्येकांना श्रीमंत किंवा हायफाय मुलगी पटल्याची कल्पना करकरून देखील शहारून येते.. तर मग प्रश्न जेंव्हा आपल्याच मुलीचा/बहिणीचा येतो, तेंव्हा मात्र आपण वेगळी भूमिका का घेतो?! याला दुटप्पीपणा नाही तर मग काय म्हणणार? प्रेम, लफडी, विवाहबाह्य संबंध, आरक्षण, वशिलेबाजी, लाचखोरी, श्रीमंती अशा अनेक गोष्टी आपल्या आजूबाजूला आहेत ज्याचा आपण विरोध करत असतो किंवा त्याविरुद्ध तावातावाने बोलत असतो, पण त्या गोष्टी आपल्याला मिळत असल्या तर मात्र आपल्याला त्या हव्याच असतात.. म्हणजे आपण ‘श्रीमंती’वर जळत नसतो, आपण श्रीमंतांवर जळत असतो, आपण श्रीमंत झालो, तर ते आपल्यालाही हवेच असते! दुसऱ्याने वशिला लावला तर आपल्याला राग येतो, पण आयुष्यभरात कित्ती काम आपण ओळखी वापरून केलीत किंवा ओळखीच्यांची केलीयेत हे मात्र आपण सोयीस्करपणे विसरून जातो.. (अर्थात, याला अपवाद आहेतच).. आपल्याला मिळत नाही तर ते दुसऱ्याला मिळणं अनैतिक किंवा गैरच असतं, असं वाटणं हा उच्च कोटीचा दुटप्पीपणा झाला.. असो..
म्हणून माझ्याबाबतीत प्रश्न रिक्षावाल्याचा किंवा खालच्या जातीचा असण्याचा नाहीच आहे, मुद्दा फक्त १. तुम्ही तुमच्या मुलीला निवड आणि निर्णयात किती सक्षम बनवताय आणि २. निवड केलीये निर्णय घेतलायच तर आता त्याच्या परिणामांची कल्पना देऊनही पुढची जबाबदारी पेलण्यासाठी तुम्ही तिला किती निश्चयी बनविता याचा आहे..
आता पूर्वीच्या विषयाकडे येऊ..
मला तर वाटतं, अरेंज मॅरेज आणि लव्ह मॅरेज हा एकदम मोघम प्रकार आहे.. लग्न ठरवण्याचा (निवडीचा) ॲक्सिस आई-वडिलांच्या हातातून मुलांच्या हातात शिफ्ट होऊ लागलाय, हेच खरं आहे, असं नेमकेपणानं सांगता येईल.. हा ॲक्सिस शिफ्ट होताना जे क्रायटेरिया आई-वडिलांचे होते (म्हणजे जात/धर्म/पैसा/प्रतिष्ठा) यात निवड मुलांच्या हातात गेल्यामुळे आणखी एका क्रायटेरियाची भर पडलीये, तो म्हणजे ‘प्रेम’..
मग या संक्रमणाच्या (शिफ्टिंग च्या) काळातली मुलं स्वतः पण अरेंज मॅरेज जुळवताहेतच की.. म्हणजे जातीतलीच मुलगी पाहून प्रेम करायचं नाटक बऱ्याच जणांनी वठवलंयच की! किंवा मुलाचा शिक्षण पैसा बघून कितीतरी मुलींनी मुलांना भुलंवलय किंवा फिदा झाल्याचं नाटक केलंयच की! किंवा दुसरीकडे, आईवडिलांनी पसंत केलेल्या मुलीशी/मुलाशी लग्न होईपर्यंतच्या काळात यांना प्रेम वगैरे झालेयच की!
असो..
पण हा संक्रमणाचा काळ लवकरच निघून जाईल अशी परिस्थिती आहे सध्या..
जागतिकीकरण, आधुनिककरण, सोशल मीडिया, बदलती सामाजिक परिस्थिती, यामुळे पूर्वीच्या जात/धर्म/पैसा/प्रतिष्ठा या क्रायटेरिया पेक्षा ‘प्रेम’ होण्याला, विचार आणि मनं जुळण्याला अधिक प्राधान्य दिले जाईल.. या क्रायटेरिया मुळंच लग्न जुळतील, आणि प्रेम संपलं, मनभेद झाले तर ती मोडतीलही.. बहुतांश विकसित जगात सध्या हीच परिस्थिती आहे.. लग्न करून बंधनात अडकण्यापेक्षा ‘लिव्ह इन’ राहण्यालाच पसंती वाढत आहे.. आपल्याला आवडो अथवा न आवडो, हे होणे क्रमप्राप्तच आहे..
बदलत्या काळात, या लग्नाने आपल्याला काय दिलं आणि काय हिरावून घेतलं हे एका पारड्यात आणि दुसऱ्या पारड्यात या नात्यातून बाहेर पडल्यावर मुलाबाळांची आणि स्वतःची होणारी परिस्थिती या दोन गोष्टींची तुलना होणं स्वाभाविक ठरणार आहे.. सामाजिक प्रभाव आणि घराण्याची इज्जत यांच्या दबावाखाली रडतखडत संसार रेटण्यापेक्षा, आणि भावनिक कुचंबणेत आख्खं आयुष्य घालवण्यापेक्षा ज्या नात्यात आता आदर/प्रेम आणि मोकळीक राहिली नाही, त्या नात्याचा (मुलाबाळांचा आणि भविष्याचा विचार करून) पुनर्विचार करणे नक्कीच चुकीचे नाही..
मॅरेज कसंही असो, त्यातून काय इप्सित साध्य करायचेय हे समजलं पाहिजे.. पूर्णतः वेगवेगळ्या परिस्थितीत लहाणाचं मोठं झालेले दोघे सहजीवन सुरू करणार आहेत, पुढची पिढी घडवणार आहेत आणि जबाबदार नागरिक म्हणून कुटुंबाच्या आणि समाजाच्या उन्नतीस हातभार लावणार आहेत, तर त्यांचे सहजीवन आनंदाचे आणि उत्कर्षाचे होण्यासाठी त्या दोघांच्यात प्रेम, मोकळीक आणि एकमेकांना सांभाळून घेण्याची वृत्ती हेच क्रायटेरिया हवेत हे तर कोणीही सांगेल.. आणि मग लग्नासाठी जुळवलेल्या जात/धर्म/पैसा/प्रतिष्ठा या गोष्टींपेक्षा लग्नानंतरचं दोघांचं ‘मानसिक समाधानी असणं’ हेच जास्त मॅटर करतं, असं नाही का?
म्हणून या लेखात मी अरेंज मॅरेज आणि लव्ह मॅरेज यांच्याविषयीच्या समजुतींचा किंवा फायद्यातोट्याचा लेखाजोगा मांडलेला नाहीये, कारण ते आपल्या सगळ्यांना माहिती असते, आणि ते बऱ्यापैकी ‘सब्जेक्टिव्ह’ असते.. तर या लेखात मी लग्नाचे ‘निवड क्रायटेरिया’ आणि त्याबाबतचा ‘निर्णय अधिकार’ या अंगाने या अरेंज आणि लव्ह मॅरेजकडे पाहिले आहे..
धन्यवाद ।
सदर लेख हा सोशल मीडियावर कॉपी-पेस्ट असून आम्ही आमच्या पातळीवर या लेखाचा खरा चेहरा शोधण्याचा प्रयत्नही केला. शेवटी उत्तमोत्तम लेख आणि सेवा वाचक रसिकांपर्यंत पोहोचावी यासाठी नाईलाजाने असा मार्ग अवलंबावा लागत आहे. वाचकांपैकी जर कोणाला खरा लेखक समजल्यास कृपया माहिती द्यावी. धन्यवाद!
Online Counseling साठी !
रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!
ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

