Skip to content

शाळेतलं एकतर्फी प्रेम….जे सावरतात तेच टिकतात.

एकतर्फी प्रेम कथा


गीता गजानन गरुड


शाळेच्या घंटेची आन

गण्या नववीत होता
लास्ट बेंचवर बसायचा
गप्पा,गाणी,बाईंची खेचणं
सारं काही सुरू असायचं,अभ्यास सोडून. मित्रही भारी होते. जीवाला जीव लावणारे. अभ्यासात थोडे मागे असले तरी स्वभावाने लय चांगले. गण्याला त्याचे दोस्त रव्या,पक्या,दिग्या जाम आवडायचे.

काही दिवसांपूर्वी वर्गात एक नवीन एडमिशन आली. केसांचा यु कट,बोलके डोळे,गालावर नाणं रुतेल एवढी खळी. तिला बघताच गण्याचे इतर मित्र आपापसात तिच्याविषयी जोक्स पास करु लागले. गण्या मात्र आज त्यांच्यापासून निराळा होता.

खरं तर या कामात गण्या सदा अग्रेसर असायचा पण आज मात्र काहीसं वेगळं घडत होतं. हो, पडली गण्याची विकेट, त्या गोड बालेकडे पाहून. गण्याच्या रिदयात समथिंग वाजू लागलं.

तारुण्यात पदार्पण करणाऱ्या तिच्या देहावर नुकतच सौष्ठव उमटत होतं. गण्याच्या अनुभवी नजरेने तिला पुरतं न्याहाळलं मग मित्रांकडे वळला व मित्रांना नजरेनेच गप्प रहायला सांगितलं.

दोन वर्षे एकाच इयत्तेचा कसून अभ्यास केल्याने गण्या त्याच्या ग्रुपमध्ये अनुभवी माणूस होता. त्याच्या शब्दाला मान होता. गण्याचं ऐकून साऱ्यांनी जोक्सचा विषय संपवला पण मित्रांनी ओळखलं की आपल्या उत्सादचं चित्त नक्कीच भरकटलय.

शाळा सुटल्यावर घराकडे जाताना गण्याच्या मनात एकच भुंगा पोखरत होता,’तिचं नाव काय आसल?’ आज नेमक्या वर्गशिक्षिका डोमकावळे बाई गैरहजर असल्याने तिचं नाव जाणून घ्यायचं राहिलं. गण्या घरी आला. गण्याचे आईबाबा वावरात गेले होते. गण्याने टोपलीवरचं फडकं काढलं व भाकरी,भाजी घेऊन खायला बसला. पण जेवणावरही त्याचं लक्ष लागेना.

त्याच्या मोती कुत्र्याजवळ त्याने आपलं मन मोकळं केलं व मोत्याला विचारलं,”मोत्या सांगना ह्यालाच पिरेम म्हनतात काय रं?”

त्या रात्री गण्याला काही झोप लागेना. डोळे मिटले की ती नवीन पोरगी डोळ्यासमोर येऊ लागली. गण्याचे मायबापू वावरात खपून दमून आले होते. पाठ भुईला टेकताच ती दोघं निद्रादेवीच्या अधीन झाली. बापून तर मस्त सूर धरला. त्याला मंद सुरात गण्याची माय साथ देत होती. गण्या मात्र डोळे टक्क उघडे ठेवून कौलांकडे बघत होता. दिव्याच्या अंधुक प्रकाशात कोळ्यांनी विणलेली जाळी त्याला राजमहालासारखी भासत होती. कोळ्याच्या जोडीची ती मेहनत पाहून त्याच्या मनात आलं,’मी देखूल माझ्या बायकोसंगट अशीच म्हेनत करीन. लय पैका कमवीन नी महाल बांधीन. मायबापूची सेवा करीन.’ फार उशिरा त्याचा डोळा लागला.

सकाळीच गण्याच्या मायने सगुणा म्हैशीला अंगणात बांधली. तिची कास पाण्याने धुतली. तिला आंजारत गोंजारत तिचं दूध काढू लागली. आज दुधाचं एक गिराईक वाढलं होतं. त्याची गण्याशी ओळख करुन द्यायची होती कारण दूध पोहोचवणं हे गण्याचं काम होतं. मायने गण्याला चारदा हाका मारता पाचव्या हाकेला गण्या अंथरुणातून उठून बसला. त्याची वाकळ त्याने नीट गुंडाळून ठेवली. मिशरीचं बोट लावत परसाकडनं जाऊन आला नी न्हायला गेला. अंघोळीच्या पाण्यातसुद्धा गण्याला तिचा चेहरा दिसू लागला तसं गण्यानं स्वतःच्या गालात दोन लगावल्या नी पटापटा न्हाऊन दुधाची कितली घ्यायला गेला. माय म्हणाली,”गण्या,आरं थांब मीबी येते तुझ्यासंगट. आज येक नवीन गिराईक आलंय. त्ये दाखिवते तुला.”

माय नी गण्या पाणंदीतून जाऊ लागले. आताशा कुठे उजाडत होतं. धरणी मातेने धुक्याची शाल पांघरली होती. पाणंदीत हिरवं रान मातलं होतं. त्याचा ओलेता स्पर्श उघड्या पावलांना होत होता. स्लिपर घेण्याएवढेही पोराचे लाड गण्याच्या मायला करता येत नव्हते. दारात एक म्हैस होती पण दुधाला गावात भाव फारच कमी होता. दुधाचे काय पैसे येतील ते म्हैशीच्या खाण्याला व वाणसामानालाच पुरत नव्हते. सगळीकडून फाटलेला संसार, कुठं कुठं म्हणून ठिगळं लावणार!

गोखल्यांच्या वाड्यात नव्यानेच सुधा लिमये म्हणून भाडेकरू रहायल्या आल्या होत्या. गोखले आजीने दिलेल्या निरोपाप्रमाणे गण्याच्या मायने गोखले आजींसोबत सुधाताईंसाठीही दूध आणलं. गोखले आजीला दूध दिल्यावर सुधाताईंचा दरवाजा खटखटवला. गोऱ्यापान,शेलाट्या बांध्याच्या पण जराशा थकलेल्या अशा सुधाने गण्याला व त्याच्या मायला घरात बोलावलं. लेकीला साद घातली,”गायत्रीबेटा जरा दुधाचा टोप घेऊन ये.” गण्याची चौकस नजर सभोवार फिरली. खोलीत मोजकच सामान होतं. एक खाट,कपाट,टिपॉय,शोकेस. शोकेसमध्ये मण्यांचे पक्षी,प्राणी रांगेत लावले होते. तितक्यात गायत्री आली. गण्याने मायच्या सांगण्यानुसार तिच्या टोपात दूध ओतलं. गण्याचं तिच्या चेहऱ्याकडे लक्षच नव्हतं. तो त्याच्याच विचारात होता. इतक्यात गायत्री आईला म्हणाली,”अय्या!आई हा मुलगा माझ्या वर्गात आहे. काल मी पाहिलं याला बेंचवर उभं केलेलं गप्पा मारत होता म्हणून. हो ना रे?”

हे गायत्रीचे बोल ऐकताच गण्याने चमकून वरती तिच्या चेहऱ्याकडे पाहिले. तोच कालचा गोल चेहरा,टपोरे डोळे,गालावरची खळी,खांद्यावर रुळणारे केस. नुकतीच झोपून उठल्यामुळे ती अधिकच टवटवीत दिसत होती. गण्याची नजर तिच्यावरून हटेना. “होय र गण्या?”या मायच्या प्रश्नाने त्याची तंद्री भंग पावली. गण्या जरा रागातच म्हणाला,”गणेश नाव हाय माझं. इतकं चांगलं देवाचं नाव ठेवलंस तरीबी गण्या म्हंतीस.” गण्याची माय कौतुकाने हसू लागली.

सुधा म्हणाली,”आम्ही अलिबागचे. नुकतीच माझी इथल्या प्रांत ऑफिसात बदली झालेय. गणेश जरा जातायेताना सोबत करशील का गायत्रीला? इथे नवीन आहोत रे आम्ही. परक्या जागेत जरा भयच वाटतं बघ.”

गण्याची माय म्हणाली,”वयनी तुमी कायबी काळजी करु नगा. गण्या सावलीसारखा जपील गायत्रीला. आजकाल कोनाचं काय खरं न्हाय. गावात लय बेरकी पोरं फिरत्यात. तरण्या पोरींनी येकटं फिरणं अवघड झालय बघा.”

पण तितक्यात गायत्री आईला म्हणाली,”आई ग,कालच मी समोरच्या वाड्यातल्या मायाला तिच्यासोबत शाळेत जाईन म्हणून सांगितलय.’

गण्याला वाटलं,’शा,मी माया पेंडसे आसतो तर किती बरं झालं असतं!’

घरी परतताना गण्याची माय गण्याला ओरडली,”गप्पा मारतोस व्हय रं शाळत. चार बुका शिकलास तर उद्या तुज्याच पोराटोराले घालशील. आयबाप किती वरसा पोसनार र मुडद्या तुला.” गण्याचं मायकडे लक्षच नव्हतं.

घराकडे आल्यावर मायने त्याला गरमगरम दूधात भाकर चुरून खायला दिली. गण्या आज गपागप घास मारत होता. शेवटी माय न राहवून बोललीच त्याला,”जरा दमान जेव की रं लेकरा. काय वाघ पाठी लागल्यावानी करुन राहिला.” गण्याने तांब्यात चुलीतले कोळसे घातले नी शाळेच्या शर्टावर,पेंटीवर ती इस्त्री फिरवली. गणवेश घातला. एकदम व्यवस्थित इन केलं. केसाला तेलपाणी लखवून भांग पाडून केस विंचरले. मिना खाकी पावडर जरा चेहऱ्याला चोळून लावली. नेहमी कशातरी अवतारात शाळेत जाणारा गण्या आज जेंटलमनसारखा तयार झालेला पाहून त्याची माय तोंडाला पदर लावून हसू लागली. दप्तर घेऊन गण्या बाहेर पडला तेंव्हा ओसरीवर बसलेला त्याचा बापही अनोळखी माणसाकडे बघितल्यावानी गण्याला बघू लागला. पण गण्याने त्या दोघांकडे दुर्लक्ष केलं. नेहमी शाळेत दहा मिनिटं उशिरा पोहोचणारा गण्या वेळेआधी आलेला पाहून शिपाईकाकांनाही आश्चर्य वाटले.

आज बाईंनी साऱ्या विद्यार्थ्यांना गायत्रीची ओळख करुन दिली. गायत्री गाणं चांगल गाते हे कळल्यावर बाईंनी तिला गाणं गायला सांगितलं. तीनेही का कू न करता छान गाणं गायल. सर्वांना गायत्रीचं गाणं फार आवडलं. गण्याला तर इतरांपेक्षा जास्तच.

संध्याकाळी आई घरी आल्यावर गायत्रीने आईला नवीन मुलांसमोर तिने कसं गाणं म्हंटल व त्या गाण्याला मुलांनी कशी दाद दिली हे अभिमानाने सांगितलं. आईनेही तिचं कौतुक केलं. तिच्या आवडीचं मसाला दूध तिला करुन दिलं.

सुधाकडे तिची लेक,गायत्री हेच काय ते धन होतं. गायत्री दोन वर्षांची असताना तिच्या बाबांच त्यांच्या ऑफिसातल्या टायपिस्टशी सूत जुळलं. ते जेंव्हा त्या बाईला घरी घेऊन आले त्याच दिवशी सुधा ते घर सोडून तिच्या माहेरी गेली होती. सुधाच्या भावाने तिचं एका बिजवराशी पुन्हा लग्न लावण्याचाही विचार केला पण सुधाने त्याला ठामपणे नकार दिला.

सुधाला अलिबागमध्येच सरकारी नोकरी मिळाली. कारकून या पदावर ती रुजू झाली खरी, पण लोकांच्या नजरा सतत तिच्या अंगाखांद्यावरुन फिरायच्या. एकटी बाई म्हणजे बऱ्याच पुरुषांना मोकाट सोडलेलं जनावर वाटते. गायत्री तेंव्हा फार लहान होती. अवघी दोन वर्षांची. आई कामावर जायला निघाली की ती रडून घर डोक्यावर घेई. सुधा छातीवर दगड ठेवून गायत्रीने घट्ट धरलेला तिचा पदर सोडवून घेई. पुढे गायत्रीच्या भावाचं लग्न झालं. त्याच्या लग्नातही वराडी मंडळींचा चघळायचा विषय होती,सुधा. ती भावाला हळद लावू लागली तेंव्हाही बऱ्याच जणींनी नाकं मुरडली होती.

गायत्रीची मामी घरात आली अन् काही दिवसांत तिने तिचे रंग दाखवायला सुरुवात केली. गायत्री व तिची आई ही तिला अडचण वाटू लागली. छोटी गायत्री सारखी मामाच्या खोलीत जाऊ पहायची. गायत्रीच्या मामीला मात्र तिच्यामुळे आपली प्रायव्हसी जातेय असं वाटायचं कारण गायत्रीची मामी तिच्या आईवडीलांची एकुलती एक होती. साहजिकच दोघांचही भरभरून प्रेम तिला मिळालेलं तसंच प्रेम तिला तिच्या नवऱ्याकडून अपेक्षित होतं. तिच्या प्रेमात तिला कोणीही वाटेकरु नको होतं,अगदी छोटासाही नको होता. यावरुन त्या नवराबायकोंमध्ये खटके उडू लागले.

गायत्री तिच्या मामाचा जीव की प्राण होती. त्याच्या ताईचं असं झाल्यापासून तर गायत्रीबद्दल तो अगदीच हळवा झाला होता. शेवटी सुधा लेकीला घेऊन शाळेच्या बाजूला असणाऱ्या चाळीत राहू लागली. ती गेली तेंव्हा गायत्रीचे आजी,आजोबा खूप दु:खी झाले. लहान बाळं खूपच जीव लावतात. त्यांच्याशी होणारी ताटातूट ही फारच वेदनादायी असते. पण गायत्रीच्या मामीला त्यांच्या दु:खाचं काहीही सोयरसुतक नव्हतं.

त्याच चाळीत सरलाताई अंगणवाडी चालवत. सुधाने गायत्रीला त्यांच्या अंगणवाडीत घातलं. सरलाताई गायत्रीची आई येईपर्यंत गायत्रीला सांभाळू लागल्या. त्यांचा जय गायत्रीएवढाच होता. दोघांची छान गट्टी जमली. गायत्रीचे आजीआजोबाही शनिवार रविवार त्यांच्याकडे येऊन राहू लागले. गायत्री हळूहळू मोठी होऊ लागली.

सरलाताईंमुळे सुधाला छान आधार मिळाला. तरी आजुबाजूच्या इतर बायका तिला हळदीकुंकवाला,बारशाला बोलवायचं टाळीत तेंव्हा तिला फार अपमानास्पद वाटे. अवघ्या तिशीतली ती ,शारिरीक भूक तिलाही होती. तीही एक माणूसच तर होती. कधी रात्री शरीर अगदीच बंड करून उठे. मग ती न्हाणीघरात जाऊन थंडगार पाण्याचे तांब्ये डोक्यावर ओतून घेई. देहाच्या आगीला विझवण्याचा आटोकाट प्रयत्न करी.

गायत्रीचं नावही तिने गायत्री सुधा लिमये असं हजेरीपटावर घातलं. गायत्री थोडी समजुतीत आली तेंव्हा तिला या मधल्या नावाचा अर्थ कळू लागला. इतर मुली तिला विचारत,”अय्या!असं कसं तुझं मधलं नाव?” ती घरी येऊन आईला विचारु लागली. आईने तिला सांगितलं की मधलं नाव म्हणजे वडिलांच नाव. छोट्या गायत्रीने विचारलच तिला,”आई,माझ्या बाबांच नाव सांग ना. मग मी ते लिहित जाईन.” मग मात्र सुधाने तिला सांगितलं की तुझा बाबा आपल्याला सोडून गेला.

याच्यापुढे मीच तुझे आई व बाबा दोन्हीही. गायत्रीने असे प्रश्न विचारले की सुधाचं मन सैरभैर होई. ती रात्रभर रडत बसे. देवाला म्हणे,”खरंच देवा काय चुकलं माझं,जे माझ्या पदरी हे वैराण आयुष्य घातलंस!”

गायत्रीला आईच्या दु:खाची समज फार लवकर आली. ती आईला फार जपे. आईचे पाय दुखत असले तर चेपून देई. तिला वाण्याकडून काही सामान हवं असेल तर ते घेऊन येई. अभ्यासातही ती बऱ्यापैकी हुशार होती.

वर्षामागून वर्षे सरत होती. गायत्री नववीत गेली तेंव्हा तिच्या आईची बदली साखरपा या गावी झाल्याने त्या मायलेकी या गावी रहायला आल्या होत्या.

गणेश दिवसेंदिवस गायत्रीच्या अधिकाधिक प्रेमात पडत होता. सकाळी दूध द्यायला जायचा तेंव्हाही गायत्री पातेलं घेऊन बाहेर आली की खूष व्हायचा. एकदोनदा तर त्याने त्यांच्या परसबागेत फुललेली अबोलीची फुलं गायत्रीला नेऊन दिली होती. गायत्री अबोलीचा गजरा माळून शाळेत आली की गण्याला खूप मोठं समाधान मिळे.

पिटीच्या पिरियडला लंगडीत सगळ्यांना बाद करणारा गण्या जेंव्हा मुद्दामहून गायत्रीच्या हातून बाद होऊ लागला व इतर मुलांना गायत्रीला कुणी बाद करु नका अशी तंबी देऊ लागला तेंव्हा पीटीच्या सरांना एका मुलाने गण्याबद्दल सांगितले. पीटीच्या सरांनी गण्याला शाळा सुटल्यावर थांबायला सांगितल. गण्या सरांजवळ आला.

“सर,बोलिवलत मला. मी कायबी केलं नाय सर.”

“अरे हो,जरा ऐकून तरी घे. तुझं हल्ली खेळात लक्ष नसतं. तू त्या गायत्रीकडे पहात असतोस सारखा. का असं करतोस?”

“सर,आता तुमच्यापासून काय लपवू सर. सारखं तिच्याकडच बघावसं वाटतया. बघलं नाय तर पार खुळ्यागत होतया मला. काय करु काय बी कळना झालंय बगा. तुमी माजे सगळ्यात आवडते शिक्षक. तुमच्यापासून काय लपविलं हाय का आतापातूर? शाळच्या घंटेची आन घिऊन सांगतो सर मला गायत्री लय आवडती.”

“अरे गण्या हा दोष तुझा नाही बरं. दोष तुझ्या वयाचा आहे.”

“वयाचा? त्याचा काय संबंध?”

“अरे या वयात सगळ्यांनाच असं होतं. मुलांना मुली आवडू लागतात. मुलींना मुलं. पण ते प्रेम नसतं रे राजा. ते नुसतं आकर्षण असतं.”

“नाय सर मी गायत्रीसाठी कायबी कराया तयार हाय. तुमी म्हनलात जीव दे तरीबी दिन.”

“जीव नको देऊस. गण्या तुला गायत्री एवढी आवडते?”

“सर आता कोनाची आन घिऊ त्ये सांगा फकस्त. जेवाय गेलो तर मला भाकर वाढतेय अशी दिसत्ये ती, माज्यासमूर.”

“तीच्यासाठी एक काम करशील?”

“येक काय सर, हजार कामं करीन येका पायार.”

“गण्या दोन वर्ष झाली तू गणितात नापास होतोयस गड्या. खरंच तुला गायत्री हवी आसलं तर तुला सगळ्या विषयात चांगल्या मार्कांनी पास व्हावं लागेल. तू रोज संध्याकाळी जेवलास की माझ्या घरी येत जा. मी एकटाच रहातो. तुला माहितच आहे. मी तुला शिकवत जाईन.”

“ओ सर तुमी पीटीचे शिक्षक? कशाला गरीबाची चेष्टा करताय राव.”

“गण्या मी पीटीचा शिक्षक असलो तरी शाळेत शिकलोय हे विषय आणि एक वचन दे,आत्तापासून दहावी होईपर्यंत गायत्रीकडे टक लावून बघत बसणार नाहीस. कामापुरतच बोलशील.”

“बघतो सर.”

“बघतो नाय असंच करायचं.”

त्यादिवशीपासून गणेश पीटीच्या शिंदे सरांकडे रोज संध्याकाळी जेवणं झाल्यावर जाऊ लागला. सरही त्याला त्यांच्या तरुणपणातल्या गमतीजमती सांगून गोडीगुलाबीने त्याच्याकडून गणितं सोडवून घेऊ लागले. इतर विषयांच पाठांतर घेऊ लागले. गण्याच्या आईने सरांकडे फीची चौकशी केली. सरांनी फी नको म्हणून सांगितली.

गण्या नववी पास झाला तेंव्हा त्याच्या बापूला कोण आनंद झाला. त्या दोघांनी जाऊन शिंदे सरांचे पाय धरले. सरांनी उन्हाळ्याच्या सुट्टीपासूनच गण्याची ट्युशन घ्यायला सुरुवात केली. इतर मुलं एका प्रख्यात क्लासमध्ये जात होती. गायत्रीही तिथे जाऊ लागली. दहावीच्या सहामाहीला गणेशला साठ टक्के पडले तसं वर्गातली इतर मुलं तोंडाचा मोठा आ करून त्याच्याकडे पाहू लागली. गण्याचे आईबापपण पोरगं रांगेला लागतय हे पाहून खूष होते. कधीकधी अभ्यास करताना गण्याच्या समोर गायत्रीचा चेहरा येई पण मग त्याला त्याने घेतलेली शाळेच्या घंटेची आण आठवे. स्वतःच्या दंडाला जोरात चिमटा काढून तो परत अभ्यासात लक्ष घाले.

दहावीची परीक्षा झाली नी गण्याचा बापू आजारी पडला. तापाने बेजार झाला. खोकून खोकून छातीचा भाता हलू लागला. घरातली चूल तर पेटायला हवी होती. बापूची औषध आणणंही निकडीचं होतं म्हणून मग गणेश देसायांच्या वाड्यावर कामाला जाऊ लागला.

दुपारच्याला देसाई त्याला जेवण देत. देसायांची रक्मी सातवीत शाळा सोडून घरात बसली होती. ती गण्यावर भाळली. गण्याला भरपूर जेवण वाढू लागली. गण्यावर लाईन मारु लागली. गण्या जातानाच्या वाटेवर मुद्दाम उभी राहू लागली.

एकदा गण्या भरभर चालत घराकडे जात होता. घराकडे जायला जरा उशीरच झाला होता. सांज व्हायला आली होती. पक्षी घराकडे परतत होते. इतक्यात वाटेवर बसलेली रक्मी त्याला दिसली.
म्हणाली, “गण्या,माजा पाय मुरगळलाय. जरा उठीवतो का?”

गण्याच्या मालकाची पोरगी. तो तरी नाही कसा म्हणणार. त्याने तिला मागून खांद्यात धरलं नी उठवू लागला तशी तिने गर्रकन वळून त्याला मिठीत घेतलं. तिचे उष्ण उरोज त्याच्या छातीला लागले. गण्याच्या अंगातून एक शिरशिरी उमटली पण क्षणभरच.

त्याला त्याचा खाटीवर पडलेला आजारी बापू नी दिवसरात्र राबणारी त्याची माय आठवली. त्याने रक्मीला जोराचा हिसडा दिला. रकमी हेलपाटली नी धुळीत पडली. रक्मी त्याला शिव्या देऊ लागली. त्याला बदनाम करेन असं ओरडू लागली.

गण्याला काहीच सुधरेना. तो तीरासारखा धावत सुटला. त्याने शिंदे सरांच घर गाठलं. सर अंगणात बसले होते. धापा टाकत आलेल्या गण्याला त्यांनी बाकावर बसवलं. प्यायला पाणी दिलं. गण्या सरांच्या पायावर पडला व ओक्साबोक्शी रडू लागला. रडून रडून मन थोडं शांत झाल्यावर त्यांनी शिंदे सरांना घडलेली सारी हकिगत सांगितली.

शिंदे सरांचा गण्यावर पुर्ण विश्वास होता. पुर्वीचा गण्या मुलींना चिडवायचा पण कधी कुणा मुलीला त्याने स्पर्श केला नव्हता. शिंदे सर त्याला म्हणाले,”रडू नकोस गण्या. कर नाही त्याला डर कशाला पण तू देसायांकडे कामाला जाऊ नकोस. तुला मी डॉक्टरच्या दवाखान्यात कामाला लावतो.”

तेंव्हापासून गण्या डॉक्टरांकडे कामाला जाऊ लागला. गण्याचे वडीलही उठून बसू लागले. हिंडूफिरू लागले. डॉक्टरांकडे औषध,गोळ्या द्यायला राहिल्यापासून त्याचा आत्मविश्वासही वाढला. जून महिना जवळ आला तसं गण्याच्या मनात धाकधूक व्हायला लागलं. कुणी म्हणे सहा जूनला रिझल्ट तर कुणी म्हणे सात जूनला. अखेर नऊ जूनला रिझल्ट लागला. गण्याला पंचावन्न टक्के पडले होते. गण्याच्या मेहनतीचं चीज झालं होतं.

गण्याच्या मायने त्याच्या गालावर कडाकडा बोटं मोडून त्याची द्रुष्ट काढली. गण्याच्या बापूने त्याला मिठीत घेतलं. कितीतरी वेळ ते बापलेक एकमेकांच्या मिठीत होते. गण्याची पाठ बापूच्या आसवांनी भिजली. गण्याने देवापुढे साखर ठेवली. मायबापूला दिली न् त्यांच्या पाया पडला.

शाळेत गेला तर शिंदे सर खूप खूष झाले होते. सारीच मुलं पास झाली होती. गायत्री शाळेत दुसरी आली होती. तिला ऐंशी टक्के तर अमित परबला ब्याऐंशी टक्के मिळाले होते. मुख्याध्यापक सरांनी सर्व मुलांच कौतुक केलं. विशेष कौतुक गण्याचं केलं कारण नापास होणाऱ्या गण्याने त्याच्या जिद्दीने हे यश संपादन केलं होतं व शिंदे सरांनी त्याला सर्वतोपरी मदत केली होती. एक वाया जाणारा मुलगा त्यांनी रांगेला लावला होता.

गायत्री व अमितने विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. गणेशलाही गायत्रीसोबत विज्ञान शाखेत जायचं होतं पण शिंदे सरांनी त्याला कला शाखेत प्रवेश घेण्यास सांगितल कारण त्याचे भाषा,इतिहास,भुगोल हे विषय जास्त चांगले होते. गायत्री व अमित तालुक्याच्या गावी कॉलेजला जाऊ लागले.

गणेशने गावात असलेल्या महाविद्यालयात प्रवेश घेतला. आत्ता आपल्याला पुर्वीसारखी रोज रोज गायत्री दिसणार नाही म्हणून त्याचं मन नाराज झालं होतं. गणेशच्या बापूने अजून एक म्हैस विकत घेतली त्यामुळे शेण काढणं,गवतकाडी घालणं,शेण्या थापणं या गणेशच्या कामात आणखीन भर पडली.

सरांनी त्याला गावच्या ग्रंथालयात पार्ट टाईम नोकरी लावून दिली. तिथे गण्याला एमपीएससी म्हणजे काय असतं नी ही परीक्षा दिल्यावर कसं मोठं ऑफिसर बनायला मिळतं हे कळलं. गण्याच्या हे लक्षात आलं की जर नेटाने अभ्यास करून त्याने ही परीक्षा दिली नी देवीआईच्या किरपेने पास झाला तर जन्माची गरिबी सुटेल. मायबापू सुखाने चार घास खातील.

गण्याने बीए केलं नंतर एमपीएससीची परीक्षा देण्यासाठी शिंदे सरांच्या सुचनेनुसार पुण्याला गेला. शिंदे सर व गावातली चार जाणती माणसं त्याच्या शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य करु लागली.

सगळीच मुलं तिथे एका विशिष्ट ध्येयासाठी गोळा झाली होती. बरीच मुलं सामान्य कुटुंबातली असल्याने गण्याची त्यांच्याशी मैत्री जमली. गण्या दोन वेळा अयशस्वी झाला पण त्याच्या मायबापूने त्याला निरोप धाडला की पोरा कायबी झालं तरी हार मानू नगस. घराची काळजी करु नगस. तुझं सपान पुरं कर. हरलास तरी परत उठून उभा रा.

गण्या परत नव्या जोमाने अभ्यासाला लागला. गण्या पुर्वपरीक्षेत पास झाला. त्याचे क्लासचे शिक्षकही या गुणी मुलाकडे विशेष लक्ष देऊ लागले. त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करू लागले. गण्या मुख्यपरीक्षा व मुलाखतही पास झाला. त्याची उपजिल्हाधिकारी या पदावर निवड करण्यात आली.

ही गोड बातमी घेऊन तो बसमध्ये बसला. गाव जवळ येत होतं तसं त्याच्या डोळ्यापुढे मायबापूचे चेहरे नी शिंदे सर दिसत होते. आज शिंदे सरांना साष्टांग नमस्कार करायचा त्याने निश्चय केला. घराकडे गेला. त्याचा मोती धावत आला. खांद्यावर पाय ठेवून उभा राहिला. गण्याने मोत्याला मिठी मारली.

“मोत्या मी लय मोठा सायब झालो रं. आता तुबी सायबाचा मोती झालास.” माय माजघरातून पाण्याचा तांब्या घेऊन आली. गण्या मायबापूच्या पाया पडला. बाला कडकडून भेटला.

“बापू तुमी मला शिकन्याचं बळ दिलत. अपयशाने मी माघारी फिरनार हुतो पन तुमी मला होसला दिलात. आता आपुन नवीन घर बांदू. म्हसरांसाठी गोठा बांदू. तुमाले नीट धडुतं घेवू. मायबापू तुमाला मी आता राजावानी ठिवनार.” मायबापू दोघांच्याव डोळ्यात आनंदाश्रू होते. त्यांचा लेक मोठा सायेब झालेला.

देवाच्या पाया पडून मोत्याला संगट घेऊन गण्या शिंदे सरांकडे निघाला. शिंदे सरांच्या घराजवळ जाताच त्याला बागेत फुलझाडांना पाणी घालत असलेले शिंदे सर अन्
जोडीला..हो त्यांच्या जोडीला त्याची गायत्री दिसली.

गायत्रीच्या कपाळी टिकली,भांगात सिंदूर,हातात हिरवा चुडा,गळ्यात मणीमंगळसुत्र होतं. गण्या काय समजायचं ते समजला. तो वेडापिसा झाला. अंगातल त्राणच गळालं. शिंदे सर ज्यांना तो आपलं दैवत मानत होता. एकेकाळी त्याने ज्यांच्यापाशी आपल्या प्रेमाची कबुली दिली होती त्यांनीच त्याचा विश्वासघात केला होता.

गण्या तिथून वाऱ्याच्या वेगाने निघाला. जिथे वाट सापडेल तिथे चालत राहिला. मोती त्याच्या मागे होताच. गण्या मोठ्या आंब्याच्या झाडाखाली बसला नी ढसाढसा रडू लागला. मोती त्याला बिलगला. त्या मुक्या प्राण्याला त्याच्या मालकाची लय दया येत होती.

मोती, शिंदे सरांच्या घराच्या दिशेने धावत गेला. त्यांची लुंगी धरत तो त्यांना गण्याच्या दिशेने नेऊ लागला. शिंदे सरही त्याच्या मागोमाग गेले. शिंदे सरांना पाहून गण्या जागच्या जागी रागाने थरथरु लागला. त्यांच्या मागोमाग गायत्रीही तिथे आली. सरांच्या लक्षात काय तो प्रकार आला.

सर म्हणाले,”गण्या,तुला राग येणं स्वाभाविक आहे पण तू माझं म्हणण ऐकून घे. मग काय ते ठरव.”

” गण्या, तू पुण्याला गेलास. गायत्री बीएससी पास झाली. पुढे एमएससी करत होती. तिला बघायला स्थळं येत होती. तिच्याच कॉलेजातल्या समीर नावाच्या मुलाच्या ती प्रेमात पडली. समीरने तिला खूप स्वप्न दाखवली. गायत्री त्याच्या दिखाव्याला भुलली. त्याच्या मायाजालात अडकली. समीरने गायत्रीला प्रेमाचं वचन देऊन तिच्याशी अनैतिक संबंध ठेवले. शेवटी व्हायचं तेच झालं. गायत्रीची पाळी चुकली. तिच्या आईला हे सगळं कळताच तिला ह्रदयविकाराचा तीव्र झटका आला. ती जागीच कोसळली,गतप्राण झाली.

समीर गायत्रीचा स्वीकार करेना. पुर्णतः खचलेली गायत्री एका रात्री जीव द्यायला नदीवर गेली. मी त्या वाटेने देवळात भजनाला जात होतो. माझ्या हाती कंदील होता. जीव द्यायला निघालेली गायत्री मला दिसली. मी धावत जाऊन तिला कसेबसे अडवले. गायत्रीची व्यथा मला माहित होतीच. मी गायत्रीचा हात हाती धरला तो न सोडण्यासाठी. तिला व तिच्या बाळाला नवजीवन देण्यासाठी. गण्या, मी शाळेच्या घंटेची आण घेऊन सांगतो,तुला फसवायचा माझा हेतू नव्हता. गायत्रीला व तिच्या बाळाला समाजाच्या वाईट नजरांपासून वाचवण्यासाठी मी वैदिक पद्धतीने गायत्रीशी लग्न केलं.”

गायत्री म्हणाली,”गण्या तुझ्याबद्दल सरांनी मला आधीच सांगितलं होतं पण मी त्या नजरेने कधी तुझ्याकडे पाहिलच नव्हतं. मला भाऊ नव्हता. मी तुला भाऊच मानत होते.”

गण्याने शिंदे दांपत्याचे पाय धरले व म्हणाला,”फार मोठा गैरसमज करून घेत होतो सर मी तुमच्याबद्दल. तुम्ही माझं आयुष्य घडीवलत नी मी समजलो तुमी मला आयुष्यातून उठीवलत. गायत्रीच्या मनातच जर माझ्याबद्दल प्रेम नसेल तर माझ्या एकतर्फी प्रेमाला कायबी अर्थ रहात नाय. आजपासून तुमी माजे थोरले भाऊ नी गायत्री माजी वयनी.” सरांना त्याने त्याच्या यशाबद्दल सांगितलं तेंव्हा त्यांच्या डोळ्यात पाणी तरळलं. त्यांनी त्याला उराशी धरलं.

चार दिवस गावी राहून गणेश, यशदा ला ट्रेनिंगसाठी निघाला. पुढे त्याची रत्नागिरी जिल्हयाचे निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली. यथावकाश त्याच्या कार्यालयात नव्याने नियुक्त झालेल्या तहसीलदार, वर्षा हिच्याशी त्याचे प्रेम जुळले. आत्ता तो आर्थिकदृष्ट्या स्थिरस्थावर होता. गणेशने वर्षापासून काही लपवून ठेवलं नाही. त्याच्या गायत्रीवरील एकतर्फी प्रेमाबाबतही तिला सांगितलं. वर्षानेही ते फार सकारात्मकरित्या घेतलं. दोघांकडूनही ग्रीन सिग्नल होता.

मोठ्या थाटामाटात गणेश व वर्षाचे लग्न झाले. गणेशने आईला कबुल केल्याप्रमाणे छान टुमदार बंगला बांधला. आईबापू ,तो व वर्षा एकत्र गुण्यागोविंदाने राहू लागले.

लवकरच त्यांच्या घरात गोबऱ्या गालाच्या परीचं आगमन झालं जीचं नाव गणेशने ‘गायत्री’ ठेवलं. वर्षानेही मोठ्या मनाने त्याला बाळीचं नाव गायत्री ठेवण्यास अनुमती दिली.

या कथेतील गणेशला एकतर्फी प्रेम जडले खरे पण वेळीच सावरणारा हात मिळाल्याने त्याच्या आयुष्याला नवी दिशा मिळाली.


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram



आजचं मुलांचं योग्य करीअर कॉउन्सिलिंग करून घ्या. यासंदर्भात खालीलप्रमाणे संपूर्ण माहिती नमूद करण्यात आलेली आहे.प्रत्यक्ष घरी येऊन घरातल्या वातावरणातच आपण कॉउन्सिलिंग करतो, कारण यथायोग्य कॉउन्सिलिंग हा त्यामागचा मुख्य उद्देश. कृपया याची नोंद घ्यावी !धन्यवाद !


करीअर काउंन्सिलिंगचा नेमका अर्थ समजून घ्या!
***

“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!