
परीक्षा आणि सकारात्मकता
संगीता वाईकर
नागपूर
परीक्षा म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या शैक्षणिक प्रवासातील एक अविभाज्य भाग आहे.परीक्षा देताना सखोल अभ्यास आणि टप्प्या टप्प्याने एक एक पायरी पुढे जाण्याचा एक सुंदर प्रवास आहे आणि त्या प्रवासात मुलांना पालक आणि शिक्षक यांचे महत्वपूर्ण योगदान मिळाले ,तर हीच परीक्षा आनंद देणारा शालेय प्रवास म्हणायला हरकत नाही.
आज शाळा आणि त्यात होणाऱ्या परीक्षा म्हणजे केवळ गुणांची स्पर्धा झाली आहे,त्याचा परिणाम म्हणजे पालकांना आपले पाल्य नेहमीच एक नंबर वर असावे असं वाटतं आणि मग त्यातून सुरू होतो तणाव,संघर्ष आणि मग त्याची पूर्तता झाली नाही की,नैराश्य त्यातून निर्माण होणारी उद्विग्नता आणि त्यातून घडणारे विघातक कृत्य हेच अतिशय घातक असे दुष्ट चक्र आहे.
आज अगदी बालवाडी पासून ते अगदी महाविद्यालयीन शिक्षणा पर्यंत प्रचंड चढाओढ आहे ती केवळ गुणांची आणि त्यातूनच सुरू होतो पालक आणि पाल्य यांच्या जीवाचा आटापिटा.
पालक आणि शिक्षक मुलांना किंवा विद्यार्थ्यांना कोणत्याही विषयाचे किती ज्ञान आहे यापेक्षा किती गुण मिळतील याकडेच अधिक लक्ष देतातआणि या स्पर्धेत कोणत्याही विषयाचा सखोल अभ्यास करणेच राहून जाते.काही शाळांमध्ये तर चौथीच्या मुलांना मराठी वाचता येत नाही किंवा अगदी साधे सोपे गणित देखील सोडवता येत नाही असे दिसून आले आहे.
आज केवळ गुणांची कमाई हेच एकमेव धै य झाले आहे आणि त्या मुळे अभ्यासू प्रवृत्तीच नष्ट झाली आहे.
लहान मुलांना सहज हसत खेळत शिक्षण दिले तर ते अधिक प्रभावी ठरते .रोजच्या व्यवहारीक कामातून देखील खूप काही ग्रहण करता येते.आपली किंवा आपल्या मागची पिढी असेच सहज शिकत गेली.पण आज सगळेच विषय शिकवायला कोणता ना कोणता वर्ग लावावा लागतो.व्यक्तिमत्त्व विकास शिबिरांचे तर उन्हाळ्याच्या सुट्टीत अक्षरशः पेव फुटते .
आज पालकांना मुलांना द्यायला वेळ नाही कारण अधिक संपन्न जीवन जगायचे तर पैसा हा हवाच मग तो मिळवण्यासाठी जीवाचे रान केले जाते.आणि मुलांना व्यस्त ठेवण्यासाठी विविध छंद वर्ग.
आज आपल्या मुलांना शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट असलेल्या अनेक विषयां सोबतच चित्रकला,पोहणे ,खेळ,यासोबत अजुन जे काही आपण आपल्या बालपणी करू शकलो नाही ते देखील यायलाच हवे हा अट्टाहास असतो.मग मुलांना त्यात आवड आहे का याचा विचार देखील केला जात नाही.आणि मग अगदी लहान मुले बालपण विसरून जातात.दिवसभर या वर्गातून त्या वर्गात अशा विळख्यात अडकून पडतात.
आज मुलांचे बालपण हरवले आहे असे वाटते.अवेळीच ही मुले मोठी झाल्या सारखी वागत आहे.बालपण हे सर्वात आनंददायी असते पण तेच तणावाखाली वावरत आहे.
खरं तर परीक्षा देखील आनंद देणारी असावी .परीक्षा म्हणजे काही राक्षस नाही की त्याला घाबरावे.
घरातील वातावरण शांत आणि आनंदी असेल तर तणाव न येता जे काही आपण ग्रहण केले असेल ते योग्य तऱ्हेने मांडता येते.आणि मनात गोंधळ असेल तर मात्र ते योग्य तऱ्हेने मांडता येणार नाही.
सकारात्मक विचाराने घरातील वातावरण उत्तम ठेवले तर नकारात्मकतेचे विचार आपोआपच निघून जातात .
सतत परीक्षेचे विचार करण्या पेक्षा खेळ,छंद,वाचन यासाठी थोडा वेळ ठेवला तर अधिक चांगल्या प्रकारे अभ्यासावरही लक्ष देता येईल.
प्रत्येक मूल हे एक वेगळे व्यक्तिमत्त्व घेऊन या जगात येत असते .त्याची आवड लक्षात घेऊन त्याला तसे घडवले तर ते अधिक प्रभावी आणि यशस्वी पणाने जगात वावरताना दिसून येईल.
आपले मूल केवळ गुणांच्या स्पर्धेत अव्वल येण्यापेक्षा एकूणच भावी आयुष्यात प्रत्येक परीक्षेत उत्तम रीतीने यशस्वी व्हायला हवा तरच ते मुल एक उत्तम नागरिक आणि एक चांगले व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जाईल.
मुलांची एकमेकांशी तुलना करणे हे देखील अत्यंत गैर आहे.घरातील बहीण भाऊ किंवा शाळेतील मित्र मैत्रिणी यांची देखील कधीही तुलना करू नये.त्यातून राग द्वेष इत्यादी भावना निर्माण होतात आणि त्यामुळे व्यक्तिमत्त्व खुरट ते जे अतिशय घातक आहे.
अशा वातावरणात वाढलेली मुले विचार प्रक्रिया करण्यास योग्य राहत नाही.तर त्यांच्या मनात नैराश्य आले तर आत्महत्या ,हत्या यासारखे गंभीर आणि भयावह दुष्परिणाम दिसून येतात.
हे सर्व सांभाळायचे तर अगदी लहान लहान बाबींचा पालक आणि शिक्षक यांनी विचार करायला हवा.आजच्या शिक्षण पद्धतीचा विचारही करणे अत्यंत आवश्यक आहे.
आता सगळीकडे परीक्षेचे वारे वाहणे सुरू होईल. यशा सोबतच अप यशा सोबतही मुलांसोबत असणे गरजेचे आहे.हा विश्वास त्यांना द्यायला हवा.
आपली मुले ही आपले उद्याचे भविष्य आहे.त्यांना जपायला हवे.
केवळ एखाद्या परीक्षेतील यश म्हणजे सर्व काही मिळवणे नाही तर जीवनात अशा अनेक परीक्षांना सामोरे जावे लागणार आहे याची जाणीव व्हायला हवी.
एखादेवेळी अप यश आले तरी त्यातून सावरता यायला हवे ते का आले याचा विचार करून पुन्हा प्रयत्न करून यश मिळवता येते.ही शिकवण खूप मोलाची आहे.
आज समजात असे अनेक यशस्वी लोक आहेत जे शालेय शिक्षण घेताना यशस्वी झाले नाही पण नंतर मात्र आपले जीवन यशस्वी पणाने भरारी घेत आहेत .
शिक्षण हे आनंददायी असायला हवे.तरच घर ,समाज आणि देशही संपन्न आणि समृध्द होईल हे निश्चित !
ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

आजचं मुलांचं योग्य करीअर कॉउन्सिलिंग करून घ्या. यासंदर्भात खालीलप्रमाणे संपूर्ण माहिती नमूद करण्यात आलेली आहे.
प्रत्यक्ष घरी येऊन घरातल्या वातावरणातच आपण कॉउन्सिलिंग करतो, कारण यथायोग्य कॉउन्सिलिंग हा त्यामागचा मुख्य उद्देश. कृपया याची नोंद घ्यावी !
धन्यवाद !

It’s right to remove the stress from our bodies