माणसं ओळखण्याची कला अवगत असली की फसवणूक होत नाही.
श्रीनिवास मोहोड
02-02-2020
खरंच, माणसं ओळखणं ही कला आहे का? असेलही आणि नसेलही. पण बाजू कुठलीही एकच घ्यावी लागेल नं!
मला वाटतं माणसं ओळखणं ही कला नसावी, अनुभवच आपल्याला माणसं ओळखणं शिकवतात. आणि असं नाही की फसवणूक एकदाच होईल. एकच फसवणूक अनेकदाही होऊ शकते. म्हणजे आपण आधी झालेल्या फसवणुकीतून काहीच शिकलो नाही असा त्याचा अर्थ होतो का?
नाही, माणूस प्रत्येक अनुभवातून काही ना काही शिकत असतोच. पण विवेकशील माणूस एका व्यक्तीच्या आलेल्या अनुभवाचा दुसऱ्या व्यक्तीच्या येणाऱ्या अनुभवाशी संबंध जोडत नाही. कारण प्रत्येक व्यक्ती ही निराळी असते याची जाण ठेऊन तो वागत असतो. आता हा दोष आहे की सुज्ञपणा हे नाही माहिती. कारण दोष म्हटलं तर तेही आहेच कारण पुन्हा फसवणूक होतेय आणि सुज्ञपणा म्हटलं तर तेही खरंच आहे, कारण सर्वांची वृत्ती एकाच तराजूत तोलणं हादेखील सुज्ञपणा नाहीच नं!
एक प्रचलित वाक्य आहे.
“लोग बदलते नहीं, बस बेनकाब हो जाते है”
प्रत्येकाच्या आयुष्यात एक तरी अनुभव असा असतोच की कुणीतरी दीर्घकाळ तुमच्या ताटात अगदी मांडीला मांडी लावून जेवतो. पण मग जेव्हा त्या खाल्ल्या मिठाला जागण्याची वेळ येते तेव्हा अगदी निर्विकारपणे त्याच ताटात विष्ठा करून निघून जातो.
आयुष्यातला हा फेज आपल्यासाठी खूप भयानक असतो, माणसाच्या माणूस असण्याची खरी परीक्षा हीच असते. घाण करणारा तर घाण करून निघून जातो, पण ते सगळं निस्तरण्यासाठी आपल्या विवेकाची जी कसोटी लागते तिथे आपल्याला आपलीच एक नवीन ओळख होत असते.
इतकं सगळं झाल्यावर इतरांविषयी मनात आधीइतकीच सद्भावना कायम ठेवता येणं, यासारखी दुसरी अग्निपरीक्षाच नाही. एकदा का ही अग्निपरीक्षा तुम्ही संयमाने पार पाडली की तुम्ही या जगासाठी उपयुक्त ठरू शकता.
आणि माणसं बेनकाब केव्हा होतात हो? एकदा तुमच्यावर वाईट वेळ येऊ तर द्या, बघा कसे पटापट मुखवटे गळून पडतात. आणि खऱ्या चेहऱ्याने सोबत असणारे तुमच्या कायम साथीला असतात.
अशा वेळी मी स्वतःचं व्यक्त होणं गरजेचं मानतो. जे खऱ्या चेहऱ्याने तुमच्यासोबत आहेत अशांजवळ जर तुम्ही व्यक्त झाले तर त्यातून तुम्हाला तुमची ऊर्जा पुन्हा मिळवता येते. पण व्यक्त होण्यासाठी निर्भयताही लागते, आणि निर्भयतेचा जन्म होतो प्रामाणिकतेमधून.
आज आनंदी जीवन जगण्याचं एक छान सूत्र मला गवसलंय, आणि ते म्हणजे कुणी आपल्या ताटात जेवत असेल तर त्याला वाटेल तेवढं जेवू द्यायचं, पण ताटात अन्न कायम उपलब्ध असण्याची जबाबदारी आपण स्वतःच पूर्णपणे घ्यायची.
आवश्यक नाही की त्यानं खाल्ल्या मिठाला जागलंच पाहिजे. त्याचे संस्कार केवळ याचक वृत्तीच जोपासतच असतील तर तोही दोषी नाही.
थोडक्यात अशी अपेक्षा ठेवली की अपेक्षाभंग निश्चित असतोच.
त्यापेक्षा देण्यातला आनंद घेत छान समृद्ध आयुष्य जगायचं.
सार हाच, की माणसं ओळखण्याची कला शिकण्याची काही गरज
नाही. अनुभवातूनच आपण समृद्ध होत असतो. त्यापेक्षा माणसं कमावण्याची कला शिकता आली तर त्यानं आयुष्य जास्त सुलभ होतं.
आणि यासाठी एकच गोष्ट मला आवश्यक वाटते, ती म्हणजे सद्भावना.
जो जे वांछिल, तो ते लाहो, प्राणिजात।।
Online Counseling साठी !
रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!
ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!
छंद जोपासण्यासाठी
क्लिक करून सामील व्हा!
??
छान लेख आहे.
Khup chan ahe
लेख छान आहे, मूळात विषय जिव्हाळ्याचा आणि प्रत्येकाला कमी अधिक प्रमाणात अनुभवास येतो.
Khupach Sundar
Chan pn asha lokana dhada shikwane pn gargeche ahe na
V touchy……
एकदम खरं आहे सगळं
मला हेच पटते….ज्याला जसे वागायचे तसे वागू द्यावे आपण आपल्या सन्मार्गाने चालावे.. शांत झोप लागते