Skip to content

प्रत्येकाला संधी मिळतेच, पण आपण त्यावेळी ‘जागे’ असतो का?

प्रत्येकाला संधी मिळतेच, पण आपण त्यावेळी “जागे” असतो का ?


धनंजय देशपांडे


आज एक पुन्हा कथा सांगून त्याद्वारे काहीतरी वेगळं सांगायचा हा प्रयत्न.

एका शहरात एक तरुण मुलगा, एका खाजगी कंपनीत काम करणारा, पगार फार नाही पण पोटापुरते भागायचे. घरी आई व निवृत्त वडील, एकूण परिस्थिती मध्यमवर्गीय. मुलाचे आई वडिलांवर खूप प्रेम व आदर. त्यांच्यासाठी तीर्थयात्रा घडवून आणावी, देशविदेशात त्यांच्यासह स्वतःही फिरून यावे. घरी एखादी तरी छोटी कार असावी ज्यातून घरच्यांना जवळपास घेऊन जाता यावे. अशी स्वप्ने तो पाहायचा. मात्र त्यासाठी वाढीव उत्पन्न म्हणजे वाढीव पैसा असेल तरच हे शक्य होते. पण पगारापेक्षा वाढीव कुठून व कसे मिळणार?
या चिंतेत तो राहू लागला अन त्या काळजीने खंगत चालला. त्याला असे पाहून एकदा त्याच्या मित्राने त्याला सांगितलं की शेजारच्या गावात एक सिद्ध पुरुष राहतो. तो कदाचित तुला मार्ग दाखवेल.

हे कळल्यावर तो तरुण शेजारच्या गावी जातो. त्या सिद्ध पुरुषाला भेटतो व सगळी कहाणी सांगतो.

त्या पुरुषाच्या सगळे लगेच लक्षात येते. तो पुरुष हसून याला म्हणतो,
“तुझी इच्छा मी पूर्ण करतो. चल माझ्यासोबत” असं म्हणून तो त्याला घेऊन गावाबाहेरच्या समुद्रकिनारी नेतो. तिथे किनाऱ्यावर छोटे छोटे अनेक दगड पडलेले असतात. तिकडे हात करून सिद्ध पुरुष सांगतो की, “यात एक दगड असा आहे की, जो तू कोणत्याही धातूला लावला तर त्याचे सोन्यात रूपांतर होईल”

तो तरुण पटकन विचारतो की, “म्हणजे परीस म्हणतात तोच का ?”
सिद्ध पुरुष सांगतो, “होय, तोच परिसाचा एकच दगड या ढिगाऱ्यात आहे. तो तू शोधून काढ अन घेऊन जा. घरी जाऊन मग धातूंच्या भांड्याला त्याचा स्पर्श झाला की सोन्यात रूपांतर होईल अन ते सोने विकून तू तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करू शकशील”

तो तरुण त्या दगडाच्या ढिगाऱ्याकडे पाहत विचारतो की, “पण यात खूप दगड एकसारखेच आहेत. त्यातला नेमका परीस मी कसा शोधू? काहीतरी आयडिया, हिंट द्या न”

यावर तो सिद्ध पुरुष सांगतो की, “हरकत नाही. तुला आयडिया देतो. तो जो परिसाचा दगड असेल न तर तो इतर दगडापेक्षा थोडा उष्ण असेल. तू हातात घेतला की लगेच तो फरक तुला कळू शकेल”
यावर तरुण खुश होतो. “आता तू तुझ्या कामाला लाग, माझं काम झालं आहे, मी जातो” असं सांगून तो सिद्ध पुरुष निघून जातो,
इकडं तो तरुण सुरुवातीला एकदम उत्साहाने एक एक दगड उचलून पाहायला लागतो.

हाताला गार लागला की मागे टाकून देऊन दुसरा उचलून चेक करणं सुरु करतो. पण तासाभरात त्याच्या लक्षात येत की, मागे टाकलेले दगड गुळगुळीत असल्याने पुन्हा ते घरंगळत पहिल्या ढिगाऱ्यात येऊन मिसळत आहेत. आता काय करावे? अन एकदम त्याला सुचते अन तो मग एक दगड उचलून गार निघाला तर तो दगड सरळ समुद्रात फेकून देणे सुरु करतो. त्यामुळे मी गार दगड आपोआप कमी होतील अन परीस दगड लवकर सापडेल हा त्याचा हेतू असतो. त्याप्रमाणे नंतर तो करत जातो. संध्याकाळ होते तरी तो “उष्ण” दगड काही हाताला लागत नाही. शेवटी थकून तो विचार करतो की अजून ढिगारा शिल्लक आहे. तर तो उद्या तपासूया” असं म्हणून तो घरी येतो.

दुसऱ्या दिवशी पुन्हा उत्साहाने तो राहिलेल्या ढिगाऱ्यातून एक एक दगड हातात घेऊन गरम आहे की गार हे पाहणे सुरु करतो. गार निघाला की पाण्यात फेक हे हि सुरु होते. नंतर त्याला सुमारे दीड दिवसाच्या या सततच्या क्रियेमुळे शरीराला हाताला नकळत ती सवय इतकी स्पीडने लागते की उष्ण दगड शोधायचा आहे हेच नकळत बाजूला सरते अन उचल दगड की फेक समुद्रात हीच क्रिया सुरु राहते.

अन असाच एक दगड तो सवयीने उचलतो अन क्षणभरात समुद्रात फेकतो. मात्र त्याक्षणी त्याच्या लक्षत येते की, आताच फेकलेला हा दगड तर हाताला गरम लागला होता. पण ते मेंदूला कळायच्या आत हाताने त्याचे काम केले अन तोच दगड जो त्याला हवा होता तो नकळत समुद्रात फेकला गेला, जो त्याला आता कधीचं मिळणार नव्हता.

तो हताश होऊन मटकन खालीच बसतो अन डोळ्यात पाणी येते !
डीडी क्लास : कथा इथं संपली अन आपला क्लास इथून सुरु होतो. तो असा की, आपण सध्या जे कमावतो ते कुणालाच “पुरेसे” वाटत नसते. अनेक इच्छा बाकी असतात त्या पूर्ण करायच्या असतात. कुटुंबाला सुखी ठेवायचं असत त्यासाठी पैसे जास्त हवे असं वाटण स्वाभाविक आहे. चूक काहीच नाही. पण त्यासाठी तुमच्या समोर नियती एक संधी घेऊन येत असते. त्यावेळी आपण जागे असतो का ? तर याचे उत्तर अनेकदा नकारार्थी येते.

मी स्वतः अनेक कॉलेजमध्ये लेक्चरला जातो तेव्हा हेच विचारतो की, “को जागृती” म्हणजे कोण जागे आहे? जो सदैव जागा असतो (जागा म्हणजे झोपेतून उठून जागा असे नव्हे तर संधी घेण्यासाठी सज्ज, या अर्थाने जागा) जो असेल त्याला नक्की ती संधी दिसते अन तिच्या मदतीने तो मग आर्थिक प्रगती करू शकतो. माझ्या स्वतःच्या जीवनात आलेल्या अशाच नकळत संधी, अन त्याचे नंतर चांगल्या प्रगतीत रूपांतर झाल्याच्या अनेक सत्यकथा यापूर्वीच मी माझ्या वॉल वर सांगितल्या आहेतच.

तर मित्र मैत्रिणींनो, तुम्ही प्रामाणिक व “पॅशन” मनात ठेवून कष्ट करत असाल तर कोणत्याही फिल्ड मध्ये असाल तरी तुम्हाला अशी एक तरी संधी नक्कीच मिळते ज्यामुळे तुमचे जीवन एकदम बदलून जाते. निराशा जाऊन आशेचे किरण डोकावतात. मात्र हि संधी त्यांनाच दिसते जे “जागे” असतात. अगदी बारीकशी संधी सुद्धा म्हणूनच कधीच सोडू नका. न जाणो त्यातूनच मोठं काम होऊ शकत.

सुरुवातीच्या स्ट्रगल काळात मलाही पैशाची तंगी असायची त्यावेळी मी अगदी साधी साधी व्हिजिटिंग कार्ड डिझाईन ची कामेही केली. अन त्यातूनच नंतर त्या त्या लोकांशी संपर्क वाढून मग त्या लोकांच्या मोठ्या बिजिनेसची मोठी कामे मिळत गेली. अरुंद वाटेने सुरु झालेला हा प्रवास नंतर प्रशस्त रस्त्याचा झाला. अन हे जर माझ्यासारख्याला जमू शकते तर तुम्हाला का नाही जमणार ? डोळे अन मेंदू फक्त जागा ठेवा मग पहा, अशक्य अशी अनेक स्वप्न तुमची पूर्ण झालेली असतील. नाहीतर मग आजच्या कथेतील तरुणासारखं होईल. हातात आलेला परीस दगड आपणच नकळत झोपेत असल्यासारखं फेकून देऊ ! ते टाळूया अन मस्त प्रगती करूया !!

शेवटी काय तर, डीडी क्लास बोले तो लाईफ झक्कास !



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!? ?
Whatsapp | Telegram


“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

2 thoughts on “प्रत्येकाला संधी मिळतेच, पण आपण त्यावेळी ‘जागे’ असतो का?”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!