Skip to content

दुटप्पी समाजाची ‘ति ‘च्यावरच्या बलात्कारवर नजर!!!

नागपूर

मी एक स्त्री, नाव काहीही म्हणा,
सुधा, सलमा, सोनिया काय फरक पडतो. तूर्तास तरी फक्त एक स्त्री.
मला माझं मत मांडायचे आहे, म्हणण्यापेक्षा, एक प्रश्न विचारायचा आहे. या समाजाला, या आपल्या पुरुष प्रधान संस्कृतीला. कदाचित कुणी मला मूर्ख म्हणेल, कोणी वेडी ठरवतिल. कुणी वारांगना, वेश्याही ठरवतील. तरीही विचारावस वाटतंय… ‘बलात्कार’
काय असतो हा बलात्कार? स्त्रीला अंतर्बाह्य हादरवून टाकणारी घटना. तिच्या अस्मितेला, स्वातंत्र्याला संपवून टाकणारा दैत्य! हा अपराध करणाऱ्यापेक्षा, जिच्यावर बलात्कार झालाय तिलाच शिक्षा करणारा हा आपला पुरुषप्रधान समाज. आपली क्षणभराची वासना मिटविण्यासाठी एक संपूर्ण आयुष्य उध्वस्त करण्याची मानसिकता. त्यातच आपले नाव जगासमोर येऊ नये म्हणून तिला मारून टाकण्याचा पाशवी प्रकार. ती अस्मितेने ही जाते आणि जीवानेही. आणि हा मात्र ताठ मानेने फिरायला मोकळा. आजचे हे युग स्वैराचाराचे युग आहे,  असे म्हटले तरी चालेल एवढी सामाजिक पातळी खालावलेली. का कधी हा कुणाला हा प्रश्न पडू नये? हा पाशवी प्रकार जिच्यावर घडत असतो ती कुण्या कुटुंबातील कर्तीपूरूष असेल, तिच्या खांद्यावर कुणाची जबाबदारी असेल, म्हाताऱ्या आईवडिलांसाठी एकुलती एक असेल, तिच्या मागे तिच्या घराचे काय? हा विचार कधी कुणालाच पडू नये?
मग हा विचार तिचा तिनेच केला तर… 
एखादया मुलीला किंवा स्त्रीला स्वप्नातही या भयंकर परिस्थितिला सामोरे जाणे कठीण! पण जर हा प्रसंग आलाच तर ती जिवाच्या आकांताने स्वतःला वाचविण्याचा प्रयत्न करते; पण तरीही ती त्या नराधमाच्या हातातून नाही सुटू शकत. ती जर सुटू शकत नसेल, स्वतःच्या अब्रुला आणि जिवाला वाचवू शकत नसेल तर मग काय करावं तिनं?
मरावं की धडपडावं जगण्यासाठी? अन् जर ती जीवाने वाचलीच तर समाज तयारच असतो तिचे  लचके तोडण्यासाठी. मग जर तिनेच याचा स्वीकार केला तर? तिनेच स्वतःच्या मनाचा निर्धार करून या बलात्काराला मान्य केले तर? तिच्यावर झालेल्या या अत्याचारानंतर, तिच्याकडे पाहण्याचा समाजाचा जो दृष्टिकोन असतो तो तर जिवंतपणी मरणयातना देणारा ठरतो.
समाज तर तयारच असतो तिच्या अब्रुची लक्तरे वेशीवर टांगण्यासाठी, मग काय रोजचाच बलात्कार. मग तो कधी नजरेचा, कधी शब्दांचा, कधी आत्म्याचा.
न संपणाऱ्या यातनाचा एक प्रवास. मग तिनेच निर्धाराने जगायचं ठरवलं तर…
काय गरज आपले दुःख जगासमोर मांडायची आणि स्वतःच सरणावर जाऊन बसायची.
हाच स्त्री-पुरुष शरीर संबंध जर प्रेमात असताना आला तर तो मान्य होतो मग तो लग्नापुर्वीचे कुमार वयातील प्रेम असो किंवा लग्ना नंतरचा विवाह बाह्य गैर संबंध असो मान्य करताच ना? गैर असले तरी, का तर ते दोघांच्या परवानगीने असतात म्हणून. मग हेच शरीर संबंध ऑफीस मधील सहकाऱ्याच्यात असो, अफेअर्स असो, बढती मिळविण्यासाठी किंवा करियर घडविण्यासाठी असो, प्रेमात ही विश्वासघात असतोच नाही का? किंवा 
मग चार भिंतीच्या आत घडणारा लग्न नावाचा समाज मान्य बलात्कार स्वीकारतोच ना नाईलाजाने आपण?सर्वकाही विसरून नव्याने जगण्याची सुरवात करतोच ना? मग या पाशवी कृत्याचे ओरखडे, व्रण आपल्या शरीरावर होऊ द्यायचे आणि आपल्याच जगण्याचा अधिकार नाकारायचा? का आपल्या शरीरातील तीन इंचाच्या अवयवावर आपले पावित्र्य ठरवावं, स्वतः ही आणि इतरांनीही. फक्त शरीर म्हणजेच जीवन का? या शरीराच्या पलीकडे, या तीन इंचा पलीकडे तिचं काहीच अस्तित्व नाही. मग लग्नापुर्वी कौमार्य गमावलेले मुलं मुली जगत नाही? प्रेमात अपयश आले तर… दगा झाला तरी जगतातच ना? विवाहबाह्य संबंध गैर असले तरी घडतातच ना? जोडीदार सोडून गेला तरी पुनर्विवाह होतातच ना? लग्न न करता फक्त स्वातंत्र्य म्हणून लिव-इन रीलेशनशिपसुद्धा स्वीकारलेला आपला समाज अत्याचाराला बळी पडलेल्या स्त्रीला सन्मानाने जगण्याचा अधिकार का नाही देऊ शकत? यात तिची काय चूक? तिने का जीव गमवावा. आणि हा अधिकार जर मिळत नसेल तर तो स्वतः एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून मिळवला तर काय हरकत आहे. सांगा ना खरंच, काय हरकत आहे?

***
            लिहून आणि वाचून दडलेल्या भावना मोकळ्या होतात             
—– इतर लेख वाचा —–
________________________________________
मानसिक आजार व उपचार
________________________________________
प्रेरणादायी लेख/कथा
________________________________________
मुलांचं करीअर काउंन्सिलिंग
________________________________________
लैंगिक शिक्षण
________________________________________
वैवाहीक जीवन
________________________________________
सामाजिक जीवन
________________________________________
पालक – बालक
______________________________________________________
फेसबुक पेज    फेसबुक ग्रुप    YouTube    संचालक     WhatsApp
 _______________________________________________________
आपलेही प्रेरणादायी लेख आम्हाला ९१३७३००९२९ या व्हाट्सएप क्रमांकावर पाठवा. आपल्या नावासकट अत्यंत नम्रपणे ते प्रकाशित केले जातील.
“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “दुटप्पी समाजाची ‘ति ‘च्यावरच्या बलात्कारवर नजर!!!”

  1. यात दोन भाग आहेत एक बाहेरच्या माणसानं कडून झालेला बलात्कार आणि कुटुंबातील सदस्य कडून झालेला.बाप,भाऊ. मुलगा,सासरा,दीर, इतरही त्यावेळेस काय?

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!