Skip to content

छान जगण्यासाठी कधी कधी आंधळं व्हावं !

छान जगण्यासाठी कधी कधी आंधळं व्हावं !


अनेक तत्वज्ञ सांगून गेलेत की, “डोळस जगा, तर सुखी व्हाल”
ते कदाचित खरेही असेल. पण कधी कधी जाणीवपूर्वक आंधळं होऊन जगणं देखील सुखाचं ठरत, हे सांगण्याचा आजचा माझा हा प्रयत्न.
यावर एक कथा सांगतो. मग नीट कळेल.

एक तरुण तरुणी एकमेकांच्या प्रचंड प्रेमात पडतात. ती अतिशय सुंदर आणि तोही देखणा हँडसम. जणू “मेड फॉर इच आदर” असं हे कपल. काही दिवस सहवासात रमल्यावर ते लग्न करतात. छानस घर, आटोपशीर संसार, रोज कामावरून येताना त्याचं गजरा आणण, तिनेही त्याच्यासाठी छान जेवण बनवणं असं सुरु होतं.

अचानक एके सकाळी तिच्याकडे पाहताना तो म्हणतो, “अग, तुझ्या ओठावर हा बारीक फोड कसला आलाय?”

ती पटकन आरशात जाऊन पाहते व म्हणते, “अंगातील हिट मुळे आला असेल रे, होईल कमी”!

मात्र एक दोन दिवसांनी तो फोड थोडा मोठा होतो. ती गुलकंद, गार दूध वगैरे उपाय करत असतेच. पण तरी फोड कमी न होता उलट पहिल्या शेजारी अजून एक बारीक फोड येतो. आठवड्यात सात आठ फोडांची जणू रांगच तयार होते. मग मात्र दोघेही घाबरतात. विशेषतः ती तर फारच खिन्न होते. की आता माझे सौंदर्य कमी होणार. हि धास्ती वाढत जातेय हे पाहून शेवटी मग तो तिला घेऊन स्पेशालिस्ट डॉक्टरकडे जातो.

तपासणी वगैरे झाल्यावर डॉक्टर सांगतात की, “तिला अमुक अमुक त्वचा रोग झाला असावा असे दिसतेय. शिवाय थोड्या वेगळ्या टेस्ट पण करूया. त्यातून निदान कळेल मग. सध्या औषध देतो. त्याने कदाचित फोड जातील पण व्रण कायम राहतील.”

दोघे घरी येतात. ती प्रचंड उदास. मात्र तो शांत चित्ताने विचार करून तिला समजवून सांगतो की, “अशा गोष्टीने डिस्टर्ब का होतेय? यामुळे आपलं आयुष्य थांबणार थोडेच? जगणं का सोडायचं? न टाळता येण्यासारख्या गोष्टी स्वीकारून आपण पुढे आनंदाने जगण्याचा प्रयत्न करूया न?”

मात्र हे काही केल्या तिला डायजेस्ट होत नाही. आपल्यात न्यूनत्व येणार. कदाचित त्यामुळे आपला पती आपल्यापासून नकळत दूर जाणार. आपलं वैवाहिक आयुष्य आता मोडकळीस येणार. याच विचारात ती सतत खिन्न अवस्थेत.

आणि अचानक एकेदिवशी तिला त्याच्या ऑफिसातील कलीगचा फोन येतो की, “वैनी, त्याचा ऍक्सीडेन्ट झालाय. आम्ही सगळ्यांनी त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केल आहे. आम्ही तिथेच आहोत. तर तुम्ही लगेच या”

ती हॉस्पिटलमध्ये पोचते. तो बेडवर शांत झोपलेला दिसतो. डोक्याला, हाताला बँडेज असत. आणि डोळ्यावर देखील पट्टी गुंडाळलेली दिसते. ती डॉक्टरला विचारते, “नेमकं काय झालं आहे?”

डॉक्टर सांगतात, “डोक्याला व हाताला मुका मार लागलाय. बँडेज केलं आहे. ते बरं होईल! पण डोळ्याना बहुतेक काहीतरी जोरात लागून जखम झाल्याने त्यांची दृष्टी मात्र गेलीय”

हा मोठा धक्का बसल्याने ती तिथेच मटकन बसते. शेवटी सगळे मिळून तिला सावरतात.

आठ दिवस दवाखान्यात काढल्यावर नंतर डिस्चार्ज मिळतो. दोघे मिळून घरी येतात. घराच्या पायऱ्या चढताना ती त्याचे हात धरून चालवू पाहते. अन तो खेळकर स्वभावानुसार बोलून जातो, “बघ, डोळे गेले तरी प्रेम कमी झालंय का ? पूर्वी पण आपण असेच एकमेकांचे हात धरून पायऱ्या चढायचो. आताही चढतोय.”

मात्र तिला हा त्याचा विनोद जिव्हाग्री लागतो. कारण वस्तुस्थिती वेगळी असल्याची तिची धारणा असते.

हळूहळू त्यांचे रुटीन सुरु होते. तोही पांढऱ्या काठीच्या साहाय्याने हळूहळू घरातल्या घरात व नंतर बाहेरही फिरणे सुरु करतो. सुदैवाने तिचीही नोकरी असल्याने किमान आर्थिक ताण नसतो. दोघेही हळूहळू नवीन जीवनाशी समरस होऊ पाहतात,

मुख्य म्हणजे तिला एक समाधान नकळत होते की, आता चेहऱ्यावरील वाढत्या फोडांमुळे आपले सौंदर्य कितीही बिघडले तरी तो आपल्यापासून दूर जाणार नाही. कारण त्याला ते काही दिसणारच नाहीये.

मात्र काही महिन्यांनी ते फोडाचे दुखणे वाढत जाते. इतके की त्यातून रक्तस्त्राव सुरु होतो. दोघे मिळून पुन्हा डॉक्टरकडे जातात. आणि तपासणीनंतर डॉक्टर धीर गोळा करून सांगतात की, “ज्याची भीती वाटत होती तेच निघालं आहे. हे फोड नसून कॅन्सरच्या गाठी आहेत. आणि लास्ट स्टेज आहे. किती दिवस हातात आहेत माहित नाही”
दोघांवर जणू आभाळ कोसळते. एकमेकांना धीर देत ते घरी येतात. जमेल तसे एकमेकांना सावरून आहेत तितके दिवस मस्त जगूया असं ठरवून ते नव्याने आयुष्याची आखणी करतात.

आणि

एके दिवशी तिची प्राणज्योत मालवते. शेजारीपाजारी नातेवाईक हळूहळू येतात. सांत्वन वगैरे होत. रिवाजानुसार मग अंत्यविधी होतात. आणि खिन्न मनाने सगळे घरी येऊन बसलेले असतात. त्याचा मोठा भाऊ त्याला म्हणतो, “आता या घरात तू एकटा कसा राहशील? ती होती तोवर ठीक होत. आता हे घर सोडून आमच्या घरी ये राहायला”
यावर तो म्हणतो, “ती नसली तर काय झालं? तिच्या सगळ्या सुंदर आठवणी तर याच वास्तूत आहेत न. महत्वाचे म्हणजे “शेवटच्या काळातले तिचे आनंदी दिवस” इथेच जगलोय. तर मला इथेच राहू द्या.”

आणि अजून एक महत्वाचं आता सांगतो…
असं म्हणून तो जे बोलतो, ते ऐकून सगळेच चकित होतात.
तो म्हणतो, “कोण म्हणत मी आंधळा आहे? अपघात झाला त्यानंतर डॉक्टरनी उपचार केले. ते डॉक्टर माझे मित्रच होते. त्यांना विचारा हवं तर. की मी आंधळा तेव्हाही झालो नव्हतो आणि आताही नाहीये. मला डोळे आहेत. काळा गॉगल तर मी फक्त तिच्यासाठी घालायचो. की तिला समजू नये. आणि तिच्या मनातले न्यून त्यामुळे कमी होईल. डोळस असून आंधळ्यासारखं वागायला अवघड किती असत हे अनुभवलं पण तेही शिकलो. त्याचे एकच कारण की, माझ्या आधी ती “जाणार” हे मलाही जाणवत होत. मग किमान तिच्या मनात चेहऱ्याच्या सौंदर्याबद्दल जो न्यूनगंड झाला होता तो तरी “मला दिसत नाहीयेय” यामुळे कमी झाला. त्यामुळेच ती शेवट्पर्यंत किमान सुखाने जगली”
***
सगळे विषण्ण आणि स्तब्ध !! प्रेमाची असीम सीमा म्हणजे काय ? हे समोर दिसत होतं.
**


सदर लेख हा सोशल मीडियावर कॉपी-पेस्ट असून आम्ही आमच्या पातळीवर या लेखाचा खरा चेहरा शोधण्याचा प्रयत्नही केला. शेवटी उत्तमोत्तम लेख आणि सेवा वाचक रसिकांपर्यंत पोहोचावी यासाठी नाईलाजाने असा मार्ग अवलंबावा लागत आहे. वाचकांपैकी जर कोणाला खरा लेखक समजल्यास कृपया माहिती द्यावी. धन्यवाद!



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!? ?
Whatsapp | Telegram


“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

12 thoughts on “छान जगण्यासाठी कधी कधी आंधळं व्हावं !”

  1. खुप च छान शेवट मनाला हळहळ लावून जातो

  2. अतिशय सुंदर आणी हार्ट टचिण्ग याला म्हणतात प्रेम मी टर तिला लकी म्हणेल जितकी जगली तितकी एका सुंदर प्रेमात जगली .

  3. Mrs. Pratima Mangesh Kharade

    जगातल्या सर्वच जोडप्यांना जर हे कळले तर अनेकांचे संसार सुखाचे होतील.

  4. लेख छान आहे, मुळ लेख जर सादर केला तर आणखी आकलन करता येईल….

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!