Skip to content

आपल्या ज्ञानाची खिल्ली उडविणाऱ्यांना जशाच तसे उत्तर कसे द्याल?

जशास तसे


मिलिंद जोशी

नाशिक


मला कायम माझा लहान भाऊ मकरंदचे कौतुक वाटते. कोणत्याही गोष्टीवर त्याची तत्काळ प्रतिक्रिया अनेकदा अगदी अफलातून असते. मी एक वाक्याची गोष्ट सांगण्यासाठी चार वाक्ये वापरतो आणि तो चार वाक्यांची गोष्ट एका वाक्यात संपवतो. तेही अनेकदा समोरच्याला निरुत्तर करून. आता आजचाच किस्सा.

रात्री दहा सव्वा दहाच्या वेळी मकरंद घरी आला. मी आपला नेहमीप्रमाणे माझ्या फेसबुक पोस्टवरील सगळ्या कमेंटला उत्तर देत होतो.

“तुझ्या हातात सध्या किती कामे आहेत?” आल्या आल्याच मकरंदने प्रश्न विचारला.

“दोन…” मी उत्तर दिले.
“तुला परत दिवस रात्र एक करावा लागेल…” तो शेजारच्या खुर्चीवर बसत म्हणाला.
“ठीक आहे ना… काय टेन्शन नाय…” माझे नेहमीचे उत्तर.
“आज xxx च्या ऑफिसला जाऊन आलो.”
“मग?”

“त्यांना त्यांच्या साईटची काही पेजेस डायनामिक करायची आहेत. ज्यात होम, ग्यालरी, न्यूज, प्रोजेक्ट यांचा समावेश आहे.” त्याने हे म्हटले आणि माझ्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले.
“सात दिवस आहेत आपल्या हातात.” माझ्या प्रश्नार्थक चेहऱ्याच्या उत्तरादाखल त्याने सांगितले.
“फक्त???”
“हो…”
“चल ठीक आहे…” मी म्हटले आणि मग त्याने तिथे घडलेला वृत्तांत सांगायला सुरुवात केली.
*********************************

“काल मी त्यांच्याकडे गेलो तर म्याडमची मिटिंग चालू होती. दिड तास बाहेर बसून होतो. पण त्यांनी केबिनमध्ये बोलावलेच नाही. शेवटी मी उद्या आलो तर चालेल का असा मेजेस आत पाठवला आणि त्यांचा होकार आल्यावर निघून आलो. आज दुपारी एक दीडच्या सुमारास म्याडमचा फोन आला. ‘आत्ता येऊ शकाल का?’ त्याप्रमाणे मी तिथे गेलो, तर त्यांनी सांगितले की त्यांनी वेबसाईट हाताळण्याची जबाबदारी कोणत्या तरी कंपनीला दिली आहे. आणि यापुढे तेच या सगळ्या गोष्टी बघणार आहेत. त्यामुळे त्यांना साईटचा login ID आणि पासवर्ड पाहिजे आहे. खरे तर वेबसाईट हाताळणार म्हणजे काय करणार हेच मला त्यावेळी नीट समजले नाही. तेवढ्यात त्यांनी त्या कंपनीलाच फोन लावला, आणि माझ्याकडे दिला.”

“I am abc from xyz co.” समोरून एका स्त्रीचा आवाज आला.
“हं… बोला…” मी मराठीत सुरुवात केली.

“Which language you prefrer to talk? Hindi or English?” पलीकडून प्रश्न आला.

“हिंदी…” मी उत्तर दिले.
“ओह… आपकी इंग्लिश थोडी विक है क्या?” समोरच्या व्यक्तीने विचारले.

“नही… आपको मराठी नही आती इसलिये मै हिंदी बोल रहा हु…” मी उत्तर दिले आणि तिचा टोन काहीसा बदलला.

“सर… मुझे पुरे साईटका access चाहिये |”
“क्यू?”

“उसमे जो भी चेंजेस है वो अब हम करने वाले है. जैसे की कोई अपडेट हो, न्यूज हो या फिर कोई फोटो अपलोड करनी है… ये सारे काम. इसलिये मुझे उसका डाटाबेस और backend के सारे access चाहिए |” पलीकडून उत्तर आले.

“आपने साईट देखी है?” मी विचारले.
“जी सर…”
“आपको क्या लगता है? साईट Static है या Dynamic?”
“Means?”
“मतलब पेजेस का extension क्या है?”
“HTML…” पलीकडून उत्तर आले.

“क्या आपको ये भी नही पता के ९९% HTML साईट कोई डाटाबेस युज नही करते? तो फिर आप client को कैसी सर्विस दोगे?” मी काहीसे हसत विचारले.

“तो क्या इस साईटमे डाटाबेस नही है?” पलीकडून विचारणा झाली.
“नही… अभीतक तो कोई डाटाबेस हमने युज नही किया है | बाय द वे… आपकी कंपनी क्या कोई software या वेब डेव्हलपमेंट कंपनी है?”

“नही… हम सोशल मिडिया सर्विसेस प्रोव्हाईड करते है |” पलीकडून आवाज आला.

“ठीक है | मै म्याडम से बात करता हु |” उत्तर देत मी फोन कट केला.

“म्याडम… अहो या व्यक्तीला तर साईट कोणत्या प्रकारची असते हेच माहित नाही. अशा व्यक्तीला तुम्ही सांगत असाल तर मी सगळे Access देतो. पण नंतर माझी काहीही जबाबदारी राहणार नाही. म्हणजे साईट दिसत नाही किंवा साईटचा लुक चेंज झाला. अशा वेळी मी काहीही मदत करू शकणार नाही. कारण ही कंपनी सोशल मिडिया सांभाळते, वेब डेव्हलपमेंट नाही.” मी म्याडमला सांगितले.
“होय… ते असेच काहीतरी म्हणत होते. पण मग आता काय करता येईल?” म्याडमने विचारले.

“या साईटवरील अनेक गोष्टी अशा आहेत ज्या कायम बदलणार नाहीत. ते पेज तसेच ठेवून ज्यात वरचेवर बदल होऊ शकतील असे पेजेस dynamic करून घेऊ. पण त्यासाठी वेगळा खर्च आणि काही वेळ लागेल.”

“ठीक आहे… दोन दिवसात होईल का हे सगळे?”
“नाही… किमान आठ दिवस तरी लागतीलच.”
“तुम्ही दिवसरात्र एक करून तीन चार दिवसात द्या मग.”
“सॉरी… दिवसरात्र एक करूनच हा वेळ लागेल. कारण इथे फक्त कॉपीपेस्ट नसते. कोडींग येते. आणि मग त्यावेळी सगळ्याच गोष्टी बघाव्या लागतात.”

“ठीक आहे मग… आठ दिवसांनी भेटू आपण.” म्याडम म्हणाल्या आणि मी त्यांची रजा घेतली.
***********************************

“हेहेहे… तू फोनवर त्या कंपनीच्या बाईला अगदी योग्य उत्तर दिलेस. मला असे लगेच सुचलेच नसते.” मी हसत म्हटले.

“मग काय तर? महाराष्ट्रात कंपनी चालवतात, आणि हिंदी इंग्रजीचे गोडवे गातात याला काय म्हणायचे? बरे एकवेळ मी त्याकडेही दुर्लक्ष केले असते. पण ‘माझी इंग्रजी विक आहे का?’ असे विचारण्याची काय गरज होती?

याचाच अर्थ त्या बाईला भाषेच्या जोरावर इतरांना डॉमिनेट करण्याची सवय आहे. मग त्याला उत्तर दिलेच पाहिजे. कोणतीही भाषा ही अभिमान करण्याची नाही तर संवाद साधण्याची गोष्ट आहे. तुम्ही भाषेचे कितीही जाणकार असलात पण समोरच्या माणसाची समस्या सोडविण्याची कला तुमच्याकडे नसेल तर त्याचा काय उपयोग? एरवी मी सहसा कुणाच्या ज्ञानाची खिल्ली उडवत नाही, पण अशा लोकांना हीच भाषा समजते. आता यापुढे इतरांना भाषेचा टोमणा मारताना ती बया दोनदा विचार करेल.” त्याने हसत म्हटले.

खरंय ना… कुणाच्याही ज्ञानाची खिल्ली उडवू नये ही आपली रीत असली तरी, ज्याला ज्या भाषेत समजेल त्या भाषेत उत्तर देणे हेही तेवढेच गरजेचे आहे. भाषेचा उपयोग संवाद साधण्यासाठी व्हावा… इतरांना कमी लेखण्यासाठी नाही. तसेच ज्ञानाचा उपयोग इतरांच्या समस्या सोडविण्यासाठी व्हावा… अभिमान करण्यासाठी नाही.



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

2 thoughts on “आपल्या ज्ञानाची खिल्ली उडविणाऱ्यांना जशाच तसे उत्तर कसे द्याल?”

  1. Kharech chhan aahe,corporate rajkaranat tar hi gost varnvar yete.dominating kartar kiva samorcha rigid zala tar emotional atyachar.

  2. खुप छान माणसातील समज कष्याप्रकरची आहे हे समजते.म्हणजेच ज्याची जशी समज त्याला तसे समजावे best

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!