ज्याची जेवढी कुवत, तेवढा त्याचा विचार….
डॉ. अशोक माळी
मिरज
आमच्याकडे त्यावेळी मारुती 800 ही गाडी होती. बहिणीच्या गावाहून येताना गाडीला खालून दगड लागला. ऑईलचेंबर फुटला आणि ऑइल गळायला लागलं. मी तशीच गाडी दामटली. घरी आलो आणि गाडी बंद पडली.
दुसऱ्या दिवशी सकाळी मी मेस्त्रीला बोलावलं. त्यानं इंजिन चेक केलं आणि विचारलं,”ऑइल गळल्यावरही गाडी पळवलीय काय?”
“होय. पाच सहा किलोमीटरच.” मी म्हटलं.
“गाडीचं इंजिन जाम झालंय… इंजिनचं काम करावं लागेल.”
“अहो, नवीन गाडी आहे आणि एवढ्यात इंजिनचं काम?”
“ऑइल नसताना गाडी पळवल्याचा परिणाम. इंजिन खोलावंच लागेल.”
“ठीक आहे. इथंच काम होईल की गाडी मिरजला घेऊन जावी लागेल?”
“मिरजलाच घेऊन जावी लागेल.”
त्यांनी मग माझी गाडी एका टेंपोला बांधून ओढून नेली.
दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी एक पुढारी माझ्या दारात.
“वकिलसाहेब, गाडी बँकेनं ओढून नेली होय?” त्यानं विचारलं.
“कोण म्हटलं?”
“नाही, गावात कोणतरी म्हणत होतं.”
तासाभरात दुसरा मनुष्य. “वकिलसाहेब, किती हप्ते तटले होते हो?…हप्ते भरता येत नव्हते तर गाडीच घ्यायची नव्हती !”
असेच मग दिवसभर लोक येत राहिले आणि प्रश्न विचारत राहिले.
दिवसभरात एकानंही,” गाडीला काय झालं?” किंवा “गाडी कुठं गेली?” म्हणून विचारलं नाही. सगळे जण असे बोलत होते की जणू गाडी बँकेनंच ओढून नेलीय.
मला सकाळी सकाळी या प्रश्नांचा राग आला होता पण नंतर नंतर लोकांच्या हलक्या कानाचं आणि सुमार बुद्धीचं हसू यायला लागलं.
दुपारनंतर तर आमचा संवाद असा होऊ लागला,
“वकिलसाहेब, बँकेनं गाडी ओढून नेली होय ?”
“होय.”
“का?”
“इंजिनच्या कामासाठी आणि ऑइल बदलीसाठी.”
“पण गाडी बँकेनं का नेली ?…मेस्त्रीनं न्यायला पाहिजे होती नव्हं?”
“आजकाल असंच असतं,” मी गंभीरपणे म्हणायचो, “बँकेच्या कर्जवसुलीची कामं मेस्त्री करतात आणि गाड्या दुरुस्तीची कामं बँकवाले करतात.”
“असं का म्हणे?”
“काय माहीत?….पण सध्या असंच चाललेलं असतं !” मी आणखी गंभीर होऊन बोलायचो.
माझं नाटक बघून बायको हसायची आणि मग समोरचा माणूस खजिल होऊन निघून जायचा.
त्या एका प्रसंगानं मला शिकवलं की लोक काय म्हणतात तिकडं कधीच लक्ष द्यायचं नाही. लोक काहीही बोलत असतात.
मध्यंतरी तर कमालच झाली. माझ्याकडं एक *वकिल मुलगी* कामाला आली. तिला गाडीत बसलं की मळमळायचं. म्हणून ती पुढं माझ्याशेजारी बसायची.
लोक म्हणायचे, ‘वकिलानं दुसरं लग्न केलं वाटतं !’ एक जण माझ्या खऱ्या बायकोला म्हणालीही,
“स्नेहा,खरंच भाऊजींनी दुसरं लग्न केलं होय गं ?” माझी बायको हजरजबाबी,बोलली,
“अगो बाई, तुम्हांला लग्नाला सांगायचंच राहिलं की !” काही दिवसांनी ती मुलगी काम सोडून गेली.
लोक म्हणाले, ‘वकिलाची दुसरी बायको वकिलाला सोडून गेली वाटतं !’
तोपर्यंत दुसरी मुलगी कामावर आली. लोक म्हणाले,
‘आयला, वकिलाचं काही खरं दिसत नाही. दुसरी बायको गेली नाही तोपर्यंत *तिसरी * आणली.’
माझ्या कानावर अशा बातम्या आल्या की मी पूर्वी पूर्वी खूप अस्वस्थ व्हायचो पण आता हे सगळं एन्जॉय करत असतो….
लोक काय,काहीही बोलत असतात पण आपण आपलं काम करत जायचं….. कुणावरही न रागावता न चिडता.
“ज्याची जेवढी कुवत तेवढा त्याचा विचार….!!”
हसा खूप आनंदी रहा???
Online Counseling साठी !
रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!
ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!
Very Nice
Mastach
Dr ashok Mali याचं हे लेख आहे
मस्तच, आपल्या समूहाचा आणि त्यातील लेखांचा नक्कीच योग्य प्रभाव समाजातील लोकांवरती दिसून येतो. आपल्या भावीवाटचालीस खूप खूप शुभेच्छा.!!!!
खूप छान