Skip to content

लग्नाआधीचे ‘ती दोघं’ आणि लग्नानंतरचे ‘ती दोघं’!!!

संवाद हरवत चालला आहे…


जयश्री हातागळे


तो मोबाईलमध्ये व्यस्त, ती ही मोबाईलचा आधार घेते. एकमेकांच्या शेजारी बसून, जेवायला वाढू का? असा फोनवर त्याला ती मेसेज करते आणि तोही थांब थोडावेळ असा फोनवरच रिप्लाय देतो…कारण, दोघांमधला संवादच हरवला आहे. अधून-मधून, ती त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते, तिला बरंचकाही सांगायचं असतं त्याला… पूर्वी तो तिच्याशी तासन्-तास बोलत असे… परंतु आता तिचं बोलणं त्याला बालिशपणाचं वाटतं. तिला या गोष्टीचा खूप त्रास होतो. लग्नाआधीचा तो आणि लग्नानंतरचा तो यात तिला खूपच विरोधाभास जाणवत असतो… तो दिवसभर ऑफिसमध्ये ती घरी एकटीच, शिवाय अनोळखी शहर, त्यात एकही मैत्रीण नाही. शेजारी-पाजारी जाऊन गप्पा मारणं,हे तिच्या तत्वाबाहेरचं. अशात मनाचा होणारा कोंडमारा, कुठे व्यक्त व्हायचं… हा गहन प्रश्न….

हल्ली, असं वातावरण प्रत्येक घरात बघावयास मिळते. पुरुषांचा स्वभाव मुळातच बऱ्यापैकी अबोल असतो. व्यक्त झाले तरी ते फक्त त्यांच्या मित्र-मंडळींजवळच…. बायकोशी बोलण्यासारखं त्यांच्याजवळ काहीच नसतं…. घर चालवण्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक आहेत अगदी टिपिकल, माफक त्याच बोलायच्या… याव्यतिरिक्त संवादच नाही…

तिला मात्र छोट्या-छोट्या गोष्टी त्याच्याशी शेअर करायच्या असतात. तो तिचा स्वभावच असतो… परंतु याच्याकडे वेळ नसतो, किंबहुना, तिला वेळ द्यावा, तिची विचारपूस करावी याची त्याला गरजच भासत नाही… ती काही बोलायला गेलीच तर… त्याची ठरलेली काही वाक्यं….. काय तेच-तेच सारखं? मोठी हो जरा, काय अनावश्यक गोष्टींचा विचार करत असतेस नेहमीच, हे असलं काही मला सांगत जाऊ नकोस. मला खूप कामं असतात, माझ्यावर खूप जबाबदाऱ्या असतात. त्याच्या अशा बोलण्याचा तिला खुप त्रास होतो ती मनोमन दुखावली जाते.

मग, ती ठरवते. आता काहीही झालं तरी याच्यासोबत काहीही शेअर करायचं नाही… आणि अशाप्रकारे निर्माण होतो “दुरावा” नात्यांमध्ये….

बरेचजण जगणंच विसरले आहेत. हसणं, गप्पा-गोष्टी आता यामध्ये रमत नाहीत. अगदी रोबोटीक आयुष्य जगतात.

काय बिघडेल जर त्याने तिला जे म्हणायचं आहे ते ऐकून घेतलं? तिला खूप काही नको असतं, फक्त त्याची सहानुभूती हवी असते, त्याच्याशी प्रेमळ संवाद हवा असतो, मग ती स्वतःच्या हिंमतीवर संपूर्ण घर संभाळून दाखवते… अगदी कुठलीही तक्रार न् करता…. जर तोच तिचा मित्र झाला तर, तिला इतर कुठल्याही आधाराची, अन्य कुठल्याही मित्र-मैत्रिणींची गरजच भासणार नाही.

जेव्हा दोघांमधला संवाद बंद होतो… तेव्हा दोघांचाही इगो डोकं वर काढतो. एकमेकांची कोणतीच गोष्ट एकमेकांना पटेनाशी होते. प्रत्येकजण तू चुक आणि मी बरोबर कसा? हेच सिद्ध करण्यात व्यस्त होतो… आणि एकमेकांचा सहवास म्हणजे तुरुंगवास वाटायला लागतो… ते नातं गुदमरायला लागतं आणि दोघेही आपापली स्पेस शोधायला लागतात…. अशातच भेटतं कोणीतरी आधार देणारं..!!! आणि मग, पुन्हा मन त्यातही एखादं नातं शोधायला लागतं… अशाप्रकारे संवादाअभावी अनेक नाती भरकटली आहेत… तुटली आहेत.

एकमेकांशी बोलल्याविना, संवाद साधल्याविना….”नातं हे वरवर जरी, परिपूर्ण दिसत असलं तरी, ते अपूर्णच असतं…!!! ”

म्हणूनच टिकत नाहीत हल्लीची नाती…..

ह्या तुटणाऱ्या नात्यांना नव्याने सांधण्यासाठी, पुन्हा प्रेमाच्या गाठी घट्ट बांधण्यासाठी…. खरंतर आत्मपरीक्षणाची गरज आहे… तो एकटाच चुकत नसेल!!! ती सुद्धा चुकत असेल…!!!
त्यामुळे दोघांनीही एकमेकांची मनं जपणं… तितकंच आवश्यक आहे….

आपलं काय मत आहे?



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

11 thoughts on “लग्नाआधीचे ‘ती दोघं’ आणि लग्नानंतरचे ‘ती दोघं’!!!”

  1. लेख अत्तिशय अप्रतिम आहे। वास्तविक आहे। अगदी हे अस आयुष्य जे जोडप जगतात त्यांनाही कधी एवढं व्यवस्थित व्यक्त होता येत नही कारण ते जीवन अंगवळणी पडून जात. पण संवाद खुप गरजेचा आहे. कळत पण वळत नाही.

  2. वास्तविकता खुपच छान मांडली आहे

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!