Skip to content

मला आनंदी राहण्याची जादू सापडली आहे!!

कसंतरीच्या थकव्याचं ओझं


सचिन कोळी


आनंदी रहाण्याची जादू मला सापडली आहे आणि आनंदाने हरखूनच सगळ्यांना ते सांगत सुटावं तसं माझं झालंय !

जरा सूक्ष्म निरिक्षण केलं तर कळेल की एक आनंदाचा, सुखाचा, समाधानाचा अनुभव असतो जो आपण नेहमी अनुभवतो पण लक्षच नसल्याने तो कळत नाही.

हा एक प्रयोग समजा. कोणतंही एक लहानसं काम घ्या, अगदी पोस्ट वाचताना थांबून ते काम केलं तरी चालेल.

उदा. एका शर्टाला इस्त्री करणे, कपाटात पुस्तकं नीट लावणे, टिव्ही स्वच्छ पुसणे, सुरेख कांदा चिरणे…
अट एकच ते काम तुम्ही मन लावून आपल्याला जितकं चांगलं येतं तितकं चांगल करायचं आहे. बिनचूक … दिसायला सुंदर…

आता ते काम झाल्यावर आतून जे वाटतं ते अनुभवा.. तो असतो आनंद …कधीकधी पहा आपण स्वतःशीच हसतो सुद्धा…आपण थोडं मागे जातो … कामाकडे पहातो आणि आपण खूश होतो.
घर आवरल्यावर स्त्रिया घरभर नजर फिरवून तृप्त होतात किंवा आपली कार धुऊन चकचकीत झाल्यावर पुरुष पहात बसतात…लहान मुलं तर काही तयार केल्यावर नाचतातच …!

हे काय आहे ? हा आनंद आतून येणारा …आतल्या चैतन्याला काम आवडल्याचा…

हा आनंद बेस्ट मोटिवेशन आहे. बाहेर काही शोधायची गरज नाही. मला हा सापडलाय. सुरुवातीला हा आनंद खूप सुक्ष्म असतो; पकडावा लागतो. एकदा दिसू लागला की वाढत जातो आणि आपण अक्षरशः त्यात भिजून जातो.
करायचं काय ? तर वरील पध्दतीने काम केल्यावर क्षणभर थांबायचं आणि आत कसं वाटतंय ते पहायचं, अनुभवायचं; मग दुस-या कामाकडे जायचं.

सकाळी उठल्या उठल्या आपण जे पांघरुण घेतलं होतं त्याची सुंदर सुबक घडी करा आणि शेवटी त्यावर हात फिरवताना काय वाटतं ते पहा. पहिली कमाई झाली, आता दुसरं काम …तिथल्या तिथे मोबदला तिथल्या तिथे बक्षिस …अशी ही अद्भुत यंत्रणा काम करताना पाहून थक्क व्हायला होईल.

मग हेच सुरु ठेवायचं दिवसभर …थकवा गायब…नैराश्य गायब…उदासिनता, मरगळ पळून जाईल…
आपण काय करतो … कसंतरी करतो…मग आतून काम कसंतरी झालंय असा फीडबॅक येतो, त्याने आपण दुःखी होतो. आता पुढचं काम करायला ऊर्जा कमी होते. दिवसभर हे कर्ज वाढत जातं.

उदा. सकाळी चादरीची घडी कशीतरी करुन फेकली तर आपल्याला दंड थोडीच भरावा लागणार आहे ? पण आतमधे कोणीतरी असतं ज्याला हे माहीत आहे की चादरीची घडी कशी करतात; तो नापास करतो. असे आपण स्वतःला नापास करत रहातो …मग माझ्यात आत्मविश्वास नाही, मला नैराश्य आहे… ई. ई. तक्रारी आपण करतो.

यापुढे ‘कसंतरी काम करतोय, त्यामुळे आतलं कर्ज वाढतंय’ हे लक्षात येईल.थोडा वेळ दिला तरी चालेल, पण चांगलं काम करायची सवय लावली तर वेळ वाचेल आणि आनंद मिळेल.

‘भरभर कर…काय खेळत बसलाय…चेंगटपणा नको’ असं आपण ऐकतो. गती वाढवणं म्हणजे काम कसंतरी करणं नाही. काम झाल्यावर मस्त वाटलं पाहीजे. कोणी टाळ्या वाजवणारं नसलं तरी आतून त्या आपल्याला ऐकू आल्या पाहीजेत.

काम उत्कृष्ट करुन ह्या आनंदाचं सायन्स अनुभवून आपण दिवसभर उत्साही राहू शकतो. थकवा निराशा टाळू शकतो. आजच्या काळाचे मनोशारिरीक आजार दूर करु शकतो. थकवा आणि आजार म्हणजे हे साठलेलं कर्ज आहे. आनंदच संपलाय करण्यातला !

हवंय एक लहानसं काम पुर्ण…संपुर्ण…आणि सुंदर … आतला आनंद बाहेर आला पाहिजे असं !



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!