Skip to content

वयात येणाऱ्या मुलांचं प्रेमप्रकरण, म्हणजेच पालकांची डोकेदुखी!

‘पौगंडावस्थेतील मुला-मुलींच प्रेम’


वसुधा देशपांडे-कोरडे
Mindmaster counsellors, Pune


हा आई-बाबांसाठी काळजीचा विषय. मुलगा किंवा मुलगी प्रेमात पडलेत हे कळल्यानंतर, ‘हे वय आहे का प्रेम करण्याचं?’ ह्या वाक्यापासून सुरुवात होते. प्रेमावर मग बंधनं घातली जातात. ‘पुन्हा त्याला भेटलीस तर बघ’, अशा धमक्या दिल्या जातात. प्रेमात पडण, अफेअर असणं म्हणजे वाया जाणं, असा समज असतो. म्हणूनच मुलांच्या प्रेमात पडण्याने आई-बाबा हवालदिल होतात.

आपली मुलगी किंवा आपला मुलगा चुकीच्या माणसाच्या प्रेमात वाहवत जाऊ नये, ह्याची काळजी वाटणं, ती घेणं पालक म्हणून खूप गरजेचं असतं. पण त्रागा हा त्यावर उपाय नाही. मुलांचं प्रेमात पडणं, कुणीतरी आवडणं हा त्यांच्या वाढीच्या टप्प्यातला एक भाग आहे. तो पालक म्हणून आपण स्विकारायला हवा. ‘त्याच्यात आहेच काय आवडण्यासारखं?’ असा प्रश्न मुलांना विचारण्यापेक्षा ‘त्यांना कुणीही कशासाठीही आवडू शकतं’, हे लक्षात घ्यायला हवं. आई-बाबांच्या म्हणण्यानुसार अशा नात्यांना अर्थ नसतो. हे अगदी बरोबर असतं. पण ते चार पावसाळे जास्त पाहिल्यामुळे तुम्हाला कळत असतं. त्यांच्या वयांत असताना तुम्हालाही ते कळलेलं नव्हतंच. हे लक्षात असू द्या.

मुलं-मुली जेंव्हा प्रेमात पडतात, तेंव्हा त्यांना ती दुसरी व्यक्ती जास्त जवळची वाटते. आई-बाबा म्हणजे शत्रू वाटतात. ‘मला माझे आई-बाबा आवडत नाहीत.’ असं जेव्हा मुलं म्हणतात तेव्हा काळजाचा ठोका चुकतो. लवकर राग येणं, टोकाची भूमिका घेणं हासुद्धा त्यांच्या वयाचा परिणाम असतो. ह्या वयांत मित्र जास्त आवडतात कारण कान देऊन ऐकणारं, आपल्या भावनांशी समरस होणारं, समजून घेणारं असं कुणीतरी हवं असतं. आई-बाबा नेमके इथेच चुकतात. प्रत्येक गोष्टीवर सल्ला दिलं जातो, चूक सांगितली जाते किंवा उपाय केला जातो. असं झालं कि, ‘माझे प्रोब्लेम्स आहेत, तुम्ही कशाला मध्ये पडता?’ हे वाक्य मुलांकडून हमखास येतं. विषय कुठचा कुठे जातो. मोठं म्हणून हे आपणच समजून घ्यायला हवं. त्याऐवजी ऐकून घ्या. मुलाला स्वत:ला समजून घ्यायला मदत करा. त्यांचा राग फारसा मनावर घेऊ नका.

त्यांच्या प्रेमाला, आवडीला अगदी टोकाची प्रतिक्रिया दिली कि ती उलट्या दिशेने जाऊ लागतात. मुलांची स्वत:बद्दलची मत, ह्या वयांत अत्यंत नाजूक असतात. ती लगेच दुखावली जातात. ‘माझं सगळं वाईटच आहे’, ह्या गोष्टीवर direct उडी मारली जाते. त्यांचा स्वत:बद्दलचा आदर वाढविण्यासाठी आपण त्यांना आदर देणं गरजेचं असतं. त्यामुळे टोकाची प्रतिक्रिया देण्यापेक्षा त्यांच्या आणि आपल्या नात्यांत मोकळेपणा ठेवणं जास्त आवश्यक आहे. म्हणूनच, तू म्हणतेस ते बरोबर असू शकतं पण मला तू वाहवत जाऊ नयेस ह्याची काळजी वाटते. हे मुलांपर्यंत पोहोचवायला हवं. मुलांना मारणं, घरात डांबून ठेवणं ह्यामुळे प्रश्न सुटत नाही. कित्येकदा वाढतो.

मुलांचं प्रेमप्रकरण स्विकारताना त्यांना काही गोष्टींची बंधनं पाळायला लावणं आवश्यक आहे. म्हणजे भेटा पण घरी, सगळे असताना. किंवा सामाजिक ठिकाणी. फोनवर बोला पण वेळेच्या मर्यादा पाळा. अशा काही मर्यादा. लक्षात घ्या तुमचा विरोध त्यांच्या प्रेमाला नाही त्यांच्या वागण्याला आहे. हे त्यांना कळायला हवं. ह्या गोष्टी पाळण्यामागे, लोक काय म्हणतील? हा विचार नाही पण त्याच्यापासून असणारे शारीरिक आणि मानसिक धोके लक्षात घेणं आवश्यक आहे, ते मुलांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. त्याच्या बरोबरीने मुलांनी अभ्यास, करियर ह्या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नये, ह्याची समज त्यांना देणंसुद्धा खूप महत्त्वाचं असतं. कोणत्याही चुकीच्या नात्यातून परत फिरता येऊ शकतं ह्याची जाणीव करून देणंसुद्धा प्रेम-प्रकरणं हाताळताना आवश्यक ठरते.
मुलं-मुली वयांत यायला लागली कि त्यांना काही प्रश्न पडू लागतात. ह्या प्रश्नांना उत्तरं देणं आई-बाबा बरेचदा टाळतात. वयांत येणाऱ्या मुलामुलींना त्यांच्यामध्ये होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक बदलाची वेळीच कल्पना देणं. त्यांच्या प्रश्नांना उत्तरं देणं, समजावणं हे त्यांनी चुकीच्या नात्यात अडकू नये म्हणून फायद्याचं ठरतं. तसेच कुणीतरी जोडीदार असणं हि प्रत्येकाची गरज आहे, पण हा जोडीदार निवडताना तुम्ही कसे आहात हे तुम्हाला आधी कळायला हवं. हे आई-वडीलच मुलांना सांगू शकतात.

मुलांच्या प्रेमप्रकरणामुळे आपणच सैरभैर होतो. प्रेमातच पडू नको असं म्हटलं जातं. त्याऐवजी, ती प्रेमात पडू शकतात हे गृहीत धरून, त्यांना त्यातल्या खाचा खोचा लक्षात आणून देणं. धोके कुठे आहेत ह्याची जाणीव करून देणं . त्यांच्याशी मैत्रीचं नातं जपणं त्यांना त्यांच्याकडून होणाऱ्या चुकांपासून अडवू शकतं. एवढ्यावरही मुलं चुकलीच तर आपल्या प्रेमाचे दरवाजे त्यांच्यासाठी सतत उघडे ठेवायला हवेत. ‘मला सगळं कळत’, असं मुलं म्हणत असली, तरी त्यांना तुमची गरज असते. त्यांनी परत उभे राहण्यासाठी ते फार आवश्यक असतं.


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांसाठी!

? ?

Whatsapp | Telegram



आजचं मुलांचं योग्य करीअर कॉउन्सिलिंग करून घ्या. यासंदर्भात खालीलप्रमाणे संपूर्ण माहिती नमूद करण्यात आलेली आहे.

प्रत्यक्ष घरी येऊन घरातल्या वातावरणातच आपण कॉउन्सिलिंग करतो, कारण यथायोग्य कॉउन्सिलिंग हा त्यामागचा मुख्य उद्देश. कृपया याची नोंद घ्यावी !

धन्यवाद !


करीअर काउंन्सिलिंगचा नेमका अर्थ समजून घ्या!
***

“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

6 thoughts on “वयात येणाऱ्या मुलांचं प्रेमप्रकरण, म्हणजेच पालकांची डोकेदुखी!”

  1. राज दिवाने

    खूपच अभ्यास पूर्ण आणि सखोल,मुलांसाठी आणि पालकांसाठी सुद्धा मुलं वयात आल्यावर पालकांनी एक पालक म्हणून नाही तर वडिलांनी पालक आणि आई ने मैत्रीण म्हणून वागले पाहिजेत त्याच्यात होणारे वयानुसार शारीरिक मानसिक बदल जोपासले पाहिजेत योग्य ते प्रशिक्षण दिलं पाहिजे

  2. Mazhi condition ashich aahe…mala madat haviaahe….Plz help mi….13 age chi mulgi aahe mazhi..mi khud disturb aahe…

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!