Skip to content

आपण दोघेही एकमेकांना गृहीत धरतोय.. असं वाटत नाही का?

आपल्या लाइफ पार्टनरला कधीही गृहीत धरूं नका….


मॅडम, आत येऊ शकतो का? भारदस्त आवाजामध्ये विचारणा झाली. दाराजवळ एक मध्यमवयीन गृहस्थ उभे होते…वय साधारणत: पन्नास बावन्नच्या आसपास, तांबूस गोरा वर्ण, उंच बाणेदार व्यक्तिमत्त्व! हं…. या… बसा ना…. त्यांनी आपला परिचय करून दिला. त्यांच्या बॉडी लॅग्वेजवरून ते कमालीचे अस्वस्थ असल्याचं जाणवत होतं. (दीर्घ उसासा सोडत) कशी सुरुवात करावी काहीच कळत नाहीये…हं… बोला…नि:संकोचपणे बोलू शकता आपण….

‘मी….मी….’ काहीतरी बोलायचा प्रयत्न करत असतानाच त्यांना रडूच कोसळलं.. ते ओक्साबोक्शी रडू लागले. ती पंधरा वीस मिनिटं भयानक होती. एखादा वृक्ष उन्मळून पडावा तशीच त्या गृहस्थांची अवस्था झाली होती. त्यावेळी शांत बसण्याखेरीज दुसरा उपाय नव्हता. तब्बल वीस मिनिटांनी स्वत:ला सावरत ते भानावर आले. मी टेबलवरचा पाण्याचा ग्लास त्यांच्यासमोर धरला… घ्या…पाच मिनिटं गेल्यावर म्हटलं… आता ठीक वाटतंय का? अं? हो.. मॅडम, सॉरी…पण मला असहय़ झालं हो सारं. ठीक आहे. तुम्ही कम्फर्टेबल असाल तर नेमकी काय समस्या आहे सांगाल का? हो, सांगतो….

मॅडम, मी प्रतिथयश टॅक्स कन्सल्टंट आहे. दोन मुलगे, पत्नी असं कुटुंब. माझे वडील अलीकडेच गेले. बरं माझी पत्नीही उच्चशिक्षित… परंतु आमच्या विवाहानंतर वर्षभरातच वडिलांचं आजारपण सुरू झाल्याने तिने गृहिणीपदच स्वीकारलं. नंतर मुलं, शिक्षण यामुळे घर आणि ती असंच समीकरण झालं. मी माझ्या व्यस्त दिनक्रमामुळे वेळच देऊ शकलो नाही कधी… पण तशी तिने कधीच तक्रार केली नाही. परंतु तिच्या तक्रारखोर नसण्याची मला इतकी सवय झाली की मी प्रत्येक गोष्टीत तिला गृहीत धरू लागलो. बेपर्वाच झालो म्हणा ना…

कधीतरी ती कुठे जाऊया म्हणाली तर मी म्हणायचो, कंटाळा कसला येतो गं तुला? कामं काय असतात? घरीच तर असतेच तू. कपडे, भांडी, लादी सगळय़ा कामाला मदतनीस आहेत. फक्त स्वयंपाक करणं आणि घरातली बारीक सारीक कामं याशिवाय तुला काम काय आहे? ती शांतच राहायची. सकाळी सकाळीच तिने वर्तमानपत्र घेतलं तर मी म्हणायचो दे… मला आधी. मला जायचंय कामावर, मी वाचतो. तू वाच नंतर निवांत. तुला कसली घाई आहे? ती निघून जायची.

तीन महिन्यापूर्वी मला ती म्हणाली. कालपासून माझा डावा हात जरा दुखतोय हो. मी म्हटलं… पेन किलर घे ना… नाहीच कमी वाटलं तर डॉक्टरांकडे जावून ये. असं म्हटल्यावर तिचे डोळेच भरले… मी चिडलो.. म्हटलं काय गं, डोळय़ात पाणी यायला काय झालं? माझी मीटिंग आहे आज… कमी वाटलं नाही तर डॉक्टरांकडे जाऊन ये. ती बरं म्हणाली. तिची तब्बेत बाकी उत्तम असल्याने माझ्या मनात वेडवाकडं काहीच आलं नाही. कुठेतरी हाताची शीर, स्नायू, आखडला असेल असंच वाटलं मला.. परंतु दुपारी घरून फोन आला. ती चक्कर येऊन पडली म्हणून. मी लगेच निघालो. येतोय तो सारं संपलं होतं. सुशिक्षित असूनही मी अडाणीच ठरलो होतो. मी दुर्लक्ष केलं नसतं तर ती गेली नसती. ते परत रडू लागले.

मॅडम आता तिचं असणं, ती घरी राहून काय करायची ते समजतंय हो…. माझीच वाक्य मला आठवतात. स्वयंपाकच तर करतेस…. पण ते किती महत्त्वाचं होतं ते आज उमगतंय. पैसे मोजून काही गोष्टी विकत आणता येतात. परंतु घरपण, घरातलं चैतन्य संपलं मॅडम! नुसतं कमवून आणलं की संसार चालत नाही हे आज पटतंय. परमेश्वराने डोळे उघडले माझे. पण फार उशीर झाला. सारं निसटून गेलं हातातून… पती पत्नी ही संसाराची दोन चाकं आहेत, हे कळून चुकलंय. मॅडम, किती वर्षात मी तिला किती दमतेस गं? अगं बस जरा, किती करतेस आमच्यासाठी? असं साधं एक वाक्यही बोललो नाही. आता सगळं सगळं जाणवतंय, गेले दोन महिने मी अस्वस्थ आहे. मुलं तर एकटीच पडली आहेत. माझी चूक कुणासमोर तरी कबूल करायची होती. म्हणून आलो इथपर्यंत… ही खंत आयुष्याची सोबत करेल आता… असं म्हणत ते परत अस्वस्थ झाले.

अचानक पत्नीचं निघून जाणं त्यांच्या जिव्हारी लागलं होतं. त्यामुळे निर्माण झालेली पोकळी, तिच्या कामाचं मोल, त्यांनी तिला अवास्तव गृहित धरणं, तू तर घरीच असतेस असं म्हणत हिणवणं, हे सारं सारं त्यांना आठवत होतं. एकमेकांवरच्या प्रेमापोटी अनेकदा पती पत्नीचं एकमेकांना गृहित धरणं होतंही परंतु हक्क गाजवण्याची भावना, वा गृहित धरण्याचं अवास्तव रूप त्रासदायक ठरतं. समोरच्याला मान न देता वा मीच श्रेष्ठ या विचारामुळे समोरच्याचं मोल अनेकदा उमजतच नाही. हातून वेळ निसटून जाते. आणि नंतर, आपण काय गमावलं आहे याची जाणीव होते. परंतु पश्चातबुद्धी काय कामाची? या उक्तीनुसार पश्चात्तापाखेरीज हाती काहीच उरत नाही.

बऱ्याच वेळा स्त्रियांच्याबाबतीत गृहित धरणं हे सहजी घडत असतं. त्यात ती गृहिणी असेल तर ‘तू तर घरीच असतेस ना… बाकी काय कामं आहेत तुला’ असे स्वरही कानी पडतात. परंतु केवळ गृहिणी असो वा नोकरी करणारी, सार्‍यांची आपापल्या परीनं कामांची कसरत सुरूच असते.

दिवस कितीही धावपळीत गेला असला तरी दुसर्‍या दिवशी सकाळी अलार्म होताच तिला टक्क जागं व्हावंच लागतं. उठल्यावर प्राथमिक आवराआवर झाली की, गॅसवर एका बाजूला चहाचे आधण, एकीकडे भाजी फोडणीला टाकलेली असते. कणिक तयार ठेवावी लागते. डबा तयार होतोय तोच मुलांना अंथरुणाबाहेर काढायची कसरत सुरू होते. या साऱया धावपळीत ए आई.. माझं पुस्तकच मिळत नाहीये. माझ्या शर्टाचं बटणं तुटलं गं.. अगं, माझे सॉक्स कुठे आहेत? अशा अनेक इमर्जन्सी कॉल्सना सामोरं जावं लागतं.

सकाळच्यावेळी बहुतांश घरामध्ये असंच चित्र पहायला मिळेल. या तिच्या सगळय़ा धावपळीतच कधी गॅस संपतो, गिझर बिघडतो, कुकरची रिंग खराब होते अशा छोटय़ा मोठय़ा अनेक अडचणींना सामोरे जात “गड सांभाळावा “लागतो. घरात मदतनीस असली तरी घरातील उरलं सुरलं, स्वच्छता, आवराआवर येणारे पै-पाहुणे, त्यांची ऊठ बस घरातील सगळय़ांचे मूड सांभाळत या साऱ्या कसरती ‘आपलं घर’ म्हणून करत असते. शेअर, केअर, लव्ह, अंडरस्टॅडिंग,
ऍडजेस्टमेंट याची सांगड आणि परस्पर समजुतीच्या पुलावरून वाटचाल केली तर सहजीवनाचा प्रवास सुखकर हेतो.

मृत्यू हा कुणाच्याही हातात नाही. परंतु तुम्ही एकमेकांसोबत परस्परांना समजून घेत जगलात तर तो सहवास आनंदाच्या, समाधानाच्या आठवणी जपणार्‍या क्षणांचा ठरेल!

विनाकारण एकमेकांवर कुरघोडी वा केवळ स्वत:चा इगो जपण्याच्या प्रयत्नात सुख नावाची गोष्ट हातून निसटते आणि दुर्दैवाने सुरुवातीच्या उदाहरणाप्रमाणे खंत करण्याखेरीज हाती काहीच उरत नाही. एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या प्रयत्नापेक्षा परस्परांच्या कामाचा नात्याचा आदर केला तर निदान चुकीच्या वर्तणुकीची टोचणी आपली सोबत करणार नाही हे मात्र खरे!

तात्पर्य :
स्त्री आणि पुरुष ही प्रत्येक संसाराची महत्वाची दोन चाके आहेत…
संसाराचा हा गाडा हाकत असतांना व संसार सुखाचा, समाधानाचा, आनंदाचा होण्यासाठी दोघांनींही एकमेकांचा मान-सम्मान, दोघांचेही आवडी-निवडी, दोघांचेही एकमेकावरील, प्रेम, आदर, सन्मान, आपुलकी, आपलेपणा…यांचा यथोचित सम्मान केला पाहीजे,
एकमेकावरील विश्वास दृढ़ केला पाहीजे व एकमेकांची काळजी व्यवस्थीत घेतली तरच हा उतारवयातील एकटेपणा सुसह्य होणार आहे…

आपला अहंकार सोडा… एकमेंकांना गृहीत धरु नका व एकमेकांचे एकमेंकासाठी होवून जा…


नवनवीन व्हिडिओसाठी YouTube चॅनेल

SUBSCRIBE करा!

??



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

क्लिक करून सामील व्हा!

??

8 thoughts on “आपण दोघेही एकमेकांना गृहीत धरतोय.. असं वाटत नाही का?”

  1. अतिशय छान व सुंदर व आत्मचितंन करायला लावणारा लेख.!

  2. संपतराव नागरे पाटील

    आत्मचिंतन करायला लावणारा हा उत्तम लेख आहे

  3. kharch khup chaan ahe apn nehmi auyasht saglyna dheer det ekmekanchi kalji gheygmag kuni hi asudet aai bahin bayko mulgi pan apulikini kalji ghetli ki hote sagle as ghadlyashivay mansala apli chuk pan kalal nahi ani changle vait pan kalat nahi

  4. Khup chaan, majyahi gharat mi asach vagat asto but aaj atta hya skhana pasun asa nahi vagnar,kharach khup chaan lekh aahe mi swata khup Inspire zhaloy hya mule. aani 101% improvement zhaliye majyat hya lekhamule. Lekhakanche agadi manapasun dhanyawad.jivan borade.nashik.

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!