Skip to content

कला आणि संगीत मानसिक आरोग्यासाठी कसे उपयुक्त ठरतात?

आजच्या धकाधकीच्या आणि ताणतणावाच्या जीवनशैलीत मानसिक आरोग्य टिकवणे ही एक मोठी गरज बनली आहे. मानसिक तणाव, चिंता, नैराश्य, एकटेपणा, आत्मविश्वासाची कमतरता अशा समस्यांनी ग्रासलेल्या जीवनात कोणतीतरी सर्जनशील दिशा लाभावी असे वाटते. आणि ही दिशा म्हणजे कला आणि संगीत.

मानसशास्त्राच्या दृष्टीने पाहिले, तर कला आणि संगीत हे केवळ मनोरंजनाचे साधन नाही, तर त्यांचे अनेक स्तरांवर सकारात्मक परिणाम मानसिक आरोग्यावर होतात.


१. सर्जनशीलता आणि मानसिक आरोग्याचा संबंध

American Psychological Association (APA) च्या अहवालानुसार सर्जनशील कामांमध्ये सहभागी होणाऱ्या व्यक्तींमध्ये तणावाची पातळी तुलनेत कमी असते. यामागे मुख्य कारण म्हणजे कला-संगीताच्या सान्निध्यात असताना मेंदूतील डोपामीन, सेरोटोनिन आणि एंडॉर्फिन यांसारखे “हॅप्पी हार्मोन्स” सक्रिय होतात. हे हार्मोन्स मानसिक तणाव कमी करतात आणि आनंदाची अनुभूती देतात.


२. माइंडफुलनेसचा अनुभव

कलेत किंवा संगीत सादरीकरणात मन गुंतले की आपण वर्तमान क्षणात जगतो – यालाच “माइंडफुलनेस” म्हणतात. ही स्थिती anxiety आणि depression कमी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. एखादी व्यक्ती जेव्हा स्केचिंग, रंगकाम, गाणं गाणं, वाद्य वाजवणं किंवा नृत्य करत असते, तेव्हा तिचं मन भूतकाळाच्या दुःखात किंवा भविष्याच्या भीतीत हरवलेलं नसतं, तर ती त्या क्षणात पूर्णपणे रममाण झालेली असते.


३. स्वतःशी संवाद

काही भावना शब्दांत व्यक्त करता येत नाहीत, पण त्या एखाद्या चित्रातून किंवा गाण्यातून व्यक्त होतात. व्यक्त होणं हे मानसिक आरोग्य टिकवण्यासाठी महत्त्वाचं असतं. जर एखादी व्यक्ती आपला राग, दुःख, निराशा, आनंद यांना रंगांतून, सुरांतून मोकळं करत असेल, तर ती स्वतःशी सतत संवाद साधते आहे. यामुळे suppressed emotions बाहेर येतात आणि मानसिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो.


४. संगीत थेरपीचे वैज्ञानिक आधार

Music therapy ही एक स्वतंत्र उपचारपद्धती म्हणून अनेक देशांत वापरली जाते. संशोधनातून असे सिद्ध झाले आहे की:

  • Alzheimer’s आणि Parkinson’s सारख्या न्यूरोलॉजिकल विकारांमध्ये संगीताने स्मरणशक्ती सुधारण्यास मदत होते.
  • रुग्णालयात असलेल्या रुग्णांवर जर शांत, सुमधुर संगीत वाजवले गेले, तर त्यांचे रक्तदाबाचे प्रमाण नियंत्रित राहते.
  • Depression असलेल्या रुग्णांनी जर नियमित गाणं ऐकणं, गाणं गाणं किंवा वाजवणं सुरू केलं, तर त्यांच्या लक्षणांमध्ये स्पष्ट बदल दिसतो.
  • काही मानसिक विकारांमध्ये, जसे की PTSD (Post-Traumatic Stress Disorder), संगीत हे उपचारात पूरक ठरते.

५. कला थेरपीचे प्रभाव

कला थेरपी म्हणजे व्यक्तीला चित्र, मूर्ती, रंगकाम, कोलाज, हस्तकला अशा माध्यमांतून स्वतःला व्यक्त करू देणे. हे उपचार पद्धती म्हणून मुलांमध्ये, मानसिक विकार असलेल्या रुग्णांमध्ये आणि वृद्धांमध्येही वापरले जाते. उदाहरणार्थ:

  • ADHD असलेल्या मुलांमध्ये लक्ष केंद्रित करणे हे मोठं आव्हान असतं. पण जर अशा मुलांना चित्रकला किंवा हस्तकलेच्या माध्यमातून रचनात्मक काम देण्यात आले, तर त्यांच्या एकाग्रतेत आणि संयमात वाढ होते.
  • नैराश्यग्रस्त वृद्ध व्यक्तींना जर दररोज काही वेळ चित्रं काढायला किंवा रंगकाम करायला प्रवृत्त केलं, तर त्यांच्या मनातला एकटेपणा कमी होतो.

६. भावनिक समतोल निर्माण होणे

संगीतामध्ये भावनांना हलवण्याची विलक्षण ताकद असते. एखादं गाणं ऐकताना आपण कधी हसतो, कधी रडतो, तर कधी उत्साहित होतो. ही सगळी भावनिक प्रतिक्रिया आहे. पण या भावनांवर जर आपण स्वयंनियंत्रण शिकू शकलो, तर आपण अधिक समतोल व्यक्ती म्हणून घडू शकतो.

मानसशास्त्रज्ञ असे म्हणतात की, जी माणसं आपल्या भावना व्यक्त करू शकतात आणि त्या ओळखू शकतात, त्यांचं मानसिक आरोग्य तुलनेत अधिक चांगलं असतं.


७. समूहामधील एकजूट आणि सकारात्मकतेचा अनुभव

जेव्हा एखादी व्यक्ती नृत्यकला, संगीत किंवा नाट्य यासारख्या कलेत गटात काम करते, तेव्हा ती सामूहिक भावना अनुभवते. एकमेकांच्या विचारांना समजून घेणे, ऐकणे, प्रतिसाद देणे – हे कौशल्य नकळत वाढते. अशा प्रकारे कला-संगीत केवळ वैयक्तिक मानसिक आरोग्यावर परिणाम करत नाहीत, तर सामाजिक आणि भावनिक बुद्धिमत्ताही वाढवतात.


८. नकारात्मक भावनांपासून मुक्तता

एखादी व्यक्ती सतत तणाव, राग, भीती अशा नकारात्मक भावनांमध्ये अडकलेली असेल, तर तिचे मानसिक संतुलन बिघडू शकते. पण जर तिला एखादं रचनात्मक माध्यम मिळालं, जसं की बासरी वाजवणं, कविता लिहिणं, रंगकाम करणं – तर ती या भावनांना सकारात्मक मार्गावर वळवू शकते.
हेच तत्व मानसोपचार तज्ज्ञ थेरपीच्या वेळी वापरतात.


९. कलेतून आत्मभान आणि आत्मविश्वास वाढतो

जेंव्हा एखादी व्यक्ती चित्र काढते, काही सादर करते किंवा सुरांतून आपल्या भावना व्यक्त करते, तेव्हा तिच्या मनात “मीही काही करू शकतो/शकते” अशी भावना जागृत होते. ही भावना आत्मभान आणि आत्मविश्वास वाढवते. अनेक वेळा शारीरिक अपंगत्व असलेल्या व्यक्तींनीही कला आणि संगीताच्या माध्यमातून स्वतःला पुन्हा शोधलं आहे.

कला आणि संगीत ही केवळ मन रंजनासाठी नसून मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी एक प्रभावी साधन आहे. सर्जनशील कामांमध्ये स्वतःला गुंतवणं, स्वतःच्या भावना मोकळ्या करणं, वर्तमान क्षणात जगणं आणि आनंद निर्माण करणं – हे सगळं कला आणि संगीताच्या माध्यमातून सहज शक्य आहे.

मानसोपचार तज्ज्ञ, थेरपिस्ट, शिक्षक आणि पालक यांनी याची जाणीव ठेवून कला आणि संगीताचा वापर मानसिक आरोग्यासाठी पुरक साधन म्हणून करायला हवा. प्रत्येक व्यक्तीच्या दैनंदिन जीवनात १५ ते ३० मिनिटं कला किंवा संगीतासाठी राखलेली असली, तर तणाव कमी करणे, भावनिक समतोल राखणे आणि आनंददायक जीवन जगणे नक्कीच शक्य होईल.

जर तुम्हाला सतत मानसिक तणाव, नैराश्य, चिंता वाटत असेल, तर केवळ कला-संगीतावर अवलंबून न राहता, तज्ञ मानसोपचार तज्ज्ञाचा सल्ला घेणे आवश्यक आहे. कला आणि संगीत हे थेरपीमध्ये पूरक म्हणून प्रभावी ठरतात.

धन्यवाद!


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयु‌ष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!