Skip to content

तुमचं ‘मन’ कोणत्या गोष्टींसाठी आतुर आणि धाडसी आहे??

तुमचं ‘मन’ कोणत्या गोष्टींसाठी आतुर आणि धाडसी आहे??


विक्रम इंगळे


जन्माला आलेला प्रत्येक माणूस जगण्यासाठी काहीतरी करतोच. कुणी नोकरी कुणी व्यावसाय. मला अजिबात हे जाणून घ्यायचं नाही की तुम्ही ह्यापैकी काय करता. मला जाणून घ्यायचं आहे, तुमच मन कुठल्या गोष्टीसाठी आतुर आहे. असं कोणती गोष्ट आहे ज्यासाठी तुम्ही जिवापाड मेहनत करताय. असं काय मिळवायचंय तुम्हाला की जे तुमच जीव की प्राण आहे.

मला जाणून घ्यायचं आहे, तुम्हाला जे मिळवायचे आहे त्याची स्वप्नं तुम्ही बघता का? त्या स्वप्नांचा पाठलाग करता का? ती स्वप्नं खरी करण्यासाठी तुम्ही किती रात्री जागे राहाता ते जाणून घेण्याची उत्सुकता आहे. तुमच हृदयाची तुमच्या स्वप्नां करता काय अवस्था होते.

तुमचं वय काय? तुम्ही तरुण का म्हातारे हे मला बिलकुल माहिती नाही अणि जाणून पण घ्यायचे नाही. पण, तुमच्या प्रेमासाठी, तुमच्या आवडत्या गोष्टीसाठी तुम्ही धाडस करायला तयार आहे का? भले ते धाडस लोकांना वेडेपणाचे वाटेल, पण तुमचे एक स्वप्न पूर्ण करायला तुम्ही ते करणार! आहे एवढी धमक!!

जे आयुष्यात अगदी कुठल्याही परिस्थितीत मिळवायचे आहे त्यासाठी जोखीम घेणार का? वेड लागल्यासारखे त्या गोष्टीचा पाठलाग करून जर ती गोष्ट मिळवणार!

तुम्ही ज्या व्यक्तिवर मनापासून निस्सीम प्रेम केल आहे, तिच्यासाठी/त्याच्यासाठी, जगाशी लढायला तयार असाल तर तुम्हाला मानले. त्या व्यक्तीसाठी जगाचा विरोध पत्करणार का?

मला सांगा तुम्ही कधी टोकाचे दुःख भोगलंय का? अणि असेल तर त्या क्षणी तुम्ही शांत होतात का तुमची चिडचिड होत होती!
तुम्ही तुमच्या दुःखाचे मूळ कारण शोधून काढले असेल तर मला तुमच्याशी सखोल चर्चा करायला नक्की आवडेल. त्या टोकाच्या दुःखाच्या प्रसंगी तुम्ही जर शांत राहिला असाल! तर मी तुम्हाला गुरू मानेन.

तुमचा कोणी विश्वासघात केला आहे का? तुम्हाला कुणी फसवलं! कोणी वेदना दिल्यात!! मग तुम्ही काय केले हे जाणून घेण्याची मला इच्छा आहे. तुम्ही स्वतःला कोशात बंद करून घेतले का त्या प्रसंगाला धाडसाने तोंड दिले! का आणखीन वेदना नको म्हणून जगापासून पळून गेलात!! का घरात घाबरून लपून बसलात?

मला जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही आपल्या माणसाकडे आपले मन मोकळे करू शकता का? तुमच्याकडे आपल माणूस आहे का? ती व्यक्ती तुमच्याशी मोकळेपणाने बोलू शकते का? अणि महत्त्वाचे, तुम्ही पण तेवढेच मोकळे असता का? आपल्या आयुष्यात मनसोक्त रडायला एक तरी खांदा हवाच. मन मोकळे करायला, सगळं काही सांगायला एक व्यक्ती हवीच. आपल्या पापांची कबुली द्यायला अणि त्यावर योग्य मार्गदर्शन मिळण्यासाठी एक तरी संवेदनशील मन हवेच.

तुम्ही मनापासून आनंदी रहायला शिकलं पाहिजे. मुख्य म्हणजे, मिळवलेला आनंद उपभोगायला आला पाहिजे. पुरेपूर उपभोग घेत जगले पाहिजे. मिळालेला आनंद उद्या करता नका ठेवू. तो अमर्याद आजच उपभोगून घेऊया. उद्याची काही शाश्वती नाही. कदाचित आजचा आनंदाचा क्षण उद्या राहणार नाही. कदाचित आपली मानसिकता बदलेल, उद्या आपण तो आनंद उपभोगायच्या मूड मधे नसू किंवा उद्या त्याच मोल राहणार नाही. आयुष्य जे आहे ते आज आहे असं समजून, भरपूर कष्ट करू, नात्यांचा भरपूर आनंद घेऊ. कोण जाणे! उद्या सकाळी तुम्ही जागे नाही झालात तर! नाती इथेच राहतील. आजच आईच्या कुशीत पाच मिनिटे रहा. तिचा हात आपोआपच तुमच्या डोक्यावरून फिरेल. हा स्वर्गीय आनंद तुम्हाला मिळेल. आजच बापा बरोबर बसून मनसोक्त गप्पा मारा. आजच धाकट्या बहिणीचे लाड पूर्ण करा. हे असे सुवर्ण क्षण आयुष्यात परत कधी येतील सांगता येत नाही. थोडक्यात, आज पूर्ण जगून घ्या. हा क्षण, वय अणि काळ निघून गेल्यावर असं वाटायला नको की अरे! राहून गेलं!

कधीतरी असंही वागून बघुया की इतरांनी काय हे! असे म्हटले तरी चालेल पण आपण आपल्या मनाला नको फसवूया. कित्येक गोष्टी आपल्या आयुष्यात अशा असतात ज्या आपल्याला पटत नसतात. पण इतरांकरता आपण मनाविरुद्ध वागतो. आपण आपल्या मनावर जरा ठाम विश्वास ठेवून वागून बघू. मला छान वाटतंय किंवा मला हे करायचे नाही! म्हणून वागुया. कमीतकमी एका क्षणी हे तरी वाटणार नाही, अरे! मला खर म्हणजे असं वागायचं नव्हतं! आपल्या यश अपयशाची जबाबदारी आपणच घेवू. ‘ह्याच्यामुळे/हिच्यामुळे असं झालं’हे तरी वाटणार नाही.

गोष्टी कशाही असुदे, व्यवहारी भाषेत त्या देखण्या असुदे किंवा कुरूप असुदे, तुम्ही कधी त्यातील सौंदर्य पाहिलय! नीट पाहिले तर नक्की कळेल की प्रत्येक गोष्ट सुंदर असते. प्रत्येक माणूस एका विशिष्ट कोनातून अतिशय सुंदर दिसतो. ह्या सौंदर्याचा आनंद घ्यायला शिकू.
कुणी सांगितले की गाणं कळायलाच पाहिजे. ते येत नसेल ही, पण एखाद्या गायकाच्या आवाजातले सौंदर्याच आपण कौतुक करू की! त्याला दाद देवून बघू. रोज आपल्या घरात, आजुबाजुला अनेक चांगल्या गोष्टी होत असतात. त्यातील सौंदर्य बघू. एकदा आपण असे रसग्रहण शिकलो की रोजची भाकरी सुद्धा जास्त गोड लागते.
सौंदर्य! म्हणजे दिसण्यात अथवा शरीरातील नाही तर ते स्वभाव सौंदर्य. उघड्या डोळ्यांनी नीट पाहिले की हे सौंदर्य दिसते.

आपण नेहमी प्रेरणा (मोटिव्हेशन) मिळण्यासाठी कुणाकडे तरी पाहतो, कुणाचा तरी आदर्श ठेवतो. पण कधी विचार केलाय, आपणच आपले प्रेरणास्रोत बनलो तर! तुमचं अस्तित्व ही एक मोठी प्रेरणा आहे. तुमचे विचार ही एक मोठी प्रेरणा आहे. आपली प्रत्येक कृती ही एक मोठी प्रेरणा आहे. दुर्दैवाने, आपण आपल्यात फार कमी वेळा किंवा कधीच बघत नाही. आपण अंतर्मुख होऊन विचार करत नाही (इंटरोस्पेक्शन). कधितरी इंटरोस्पेक्शन करू! आपल्याला काहीकाही अनपेक्षित अणि आश्चर्यकारक गोष्टी आपल्या मधेच मिळतील. मग आपल्याला वाटेल की, अरे! माझ्याकडे एवढी इच्छाशक्ती आहे! माझ्याकडे मी समजत होतो त्यापेक्षा जास्त धमक आहे! मग कदाचित तुम्हाला जाणवेल की तुम्ही जेवढी क्षमता आहे त्यापेक्षा खूपच कमी मिळवलंय!!

यश अपयश, चढ उतार हे आपल्या आयुष्यात येतातच. पण तुम्ही कधी अपयश आनंदाने स्विकारले आहे का किंवा पचवले! ज्याप्रमाणे यशात आनंद होतो त्याच पद्धतीने अपयशामधुन योग्य तो धडा घेता आला पाहिजे. अपयशामुळे जीव देणारे भरपूर असतात, पण आपण त्यातून काहीतरी शिकून, परत एकदा प्रयत्न करून, यशस्वी होऊन दाखवू! त्यात खरी मजा आहे. मी खर सांगू का! अपयश आले की त्यातून बोध घेवून माणसाने ‘येसsss, मला कळलं, मी कुठे चुकलो ते!’, असं म्हटलं, म्हणजे ती खरी सकारात्मकता. अपयश आल्या नंतर जो माणूस डोंगरमाथ्यावर जावून सगळ्या जगाला जेंव्हा ओरडून सांगेल की तो यशस्वी होणारच, तो खरा जिद्दी अणि तोच यशस्वी होणार.

तुम्ही जर सुखाने झोपू शकत नसाल, आनंदाने जीवन जगत नसाल, तुमच्यामुळे तुमचे आई, वडील, भाऊ, बहीण, बायको, मुलं जर सुखी नसतील तर, तुमच्याकडे कितीही पैसा असुदे, कितीही बंगले, गाड्या घोडे असुदे, त्याचा काहीही उपयोग नाही. सुखी अणि आनंदी जीवनाला फक्त पैसा लागत नाही तर त्याबरोबर एक आनंदी मनोवृत्ती लागते. ती मनोवृत्ती आणूया!!

कुठलंही संकट येऊदे, त्याला धीरोदात्तपणे कसं तोंड द्यायच, ते आपण शिकुया! काहीही संकट असुदे, आपल्याला ते शिंगावर घेता आलं पाहिजे. एक असा आत्मविश्वास निर्माण करू की काय वाटेल ते झालं तरी मी डगमगणार नाही. हताश होणार नाही. ‘आय विल रीगल आउट’ ही जिद्द पाहिजे. म्हणजे काय! तर मुंगीच्या अंगावर माती टाकली की ती त्यात दबून न राहता कशी वर येते, तशी जिद्द अणि जिगर.

शेवटी एवढेच सांगतो की तुम्ही कितीही शिकलात, कितीही पैसा कमवला, तरी जीवन जगायला एक माणूस व्हावे लागेल. एक माणूस म्हणून जगण्यासाठी माणुसकी हवी, सहनशीलता हवी, सहसंवेदना हवी, जिद्द हवी, आपुलकी अणि जिगर सुद्धा पाहिजे.
चला मग! ज्या गोष्टी असतिल त्या अधिक वाढवत नेऊ, इतरांना शिकवू आणि जर नसतील तर जी लगाके आत्मसात करू!



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी 9137300929 या क्रमांकावर क्लिक करून दररोजचे अपडेट मिळावा!


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांसाठी व्हाट्सऍप समूह!

क्लिक करा!


“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

8 thoughts on “तुमचं ‘मन’ कोणत्या गोष्टींसाठी आतुर आणि धाडसी आहे??”

  1. खचलेल्यांना धीर येणार हे वाचून..सुंदर…

  2. सुज्वला दत्ताराम सावंत

    खुपच छान लेख आहे. सुखी जीवनाची जणू गुरूकिल्लीच होय

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!